Saturday, September 8, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१३


                  "अर्जुन ये ये, अरे तुला माहिती आहे का, आज स्वरालीने मला मदत केलीए बरं का स्वयंपाक करण्यासाठी..!" असं स्वरालीची आई अर्जुनला बोलली. "काय गं आई, जेवण झाल्यानंतर सांगायचं ठरलं होतं, तु आत्ताच सांगुन टाकलसं.!" असं स्वराली लाजतच बोलली. "अगं तुम्ही दोघी बोलतच बसणार का? अश्विनी अगं जेवणाची तयारी कर पटकन," असं स्वरालीच्या बाबांनी स्वरालीच्या आईला सांगितलं. "अरे अर्जुन, तुझ्या मामांचा फोन आला होता थोड्यावेळापुर्वी, अरे उद्या आपल्याला डॉक्टरांकडे परत एकदा फॉलोअपला जायचं आहे बरं का, तुझ्या मामांना कामानिमित्त बाहेर जावं लागणार आहे, म्हणुन त्यांनी मला सांगितलं. उद्या जाऊ आपण सकाळी साडेनऊ वाजता, तिथुन मग मी तुला कॉलेजला ड्रॉप करेल, आणि तसाच ऑफिसला जाईल." असं स्वरालीच्या बाबांनी अर्जुनला सांगितलं. तोपर्यंत स्वराली आणि तिच्या आईनं डायनिंग टेबलवर सगळी तयारी करुन ठेवली. "अर्जुन लाजु नकोस बरं का," असं स्वराली मुद्दाम बोलली. अर्जुन नुसताच तिच्याकडे बघुन हसला. "अरे, खरचं बोलतेयं ती, आपलं स्वतःच पुर्ण नाव सांगायला, आणि जेवण करायला कधीच लाजु नये बेटा. समोरच्याला स्वतःचं नाव सांगितलं नाही तर त्याला आपली ओळख कशी होणार आणि जेवतांना लाजलं की  मग उपाशीच राहावं लागतं नाही का..!" असं स्वरालीचे बाबा हसतच बोलले. 
     "काकु, स्वयंपाक खरचं खुप छान झाला होता, अगदी आईच्या जेवणाची आठवण झाली." असं अर्जुन स्वरालीच्या आईला जेवण झाल्यानंतर बोलला. "अर्जुन, मला खुप बरं वाटलं, पण हो, नुसतच माझं कौतुक केलं, तर स्वराली रुसेल बरं का, आज तीने मला छान मदत केली," असं स्वरालीच्या आईनं आपल्या लेकीच्या डोक्यावरुन मायेन हात फिरवत अर्जुनला सांगितलं. "स्वराली तुम्हाला स्वयंपाकात मदत करते नक्कीच कौतुकाचीच गोष्ट आहे, नाहितर आजच्या मुलींनी या वयात स्वयंपाक करणं म्हणजे दुर्मिळच होत चाललेलं दिसतयं." असं अर्जुन स्वरालीकडे बघुन बोलला. थोड्यावेळ गप्पा मारल्यानंतर अर्जुन घरी आला. त्यानं त्याची डायरी लिहिण्यासाठी घेतली. या वर्षी त्याच्या डायरी लिहिण्यात सातत्य राहिलं नव्हतं. त्या डायरीच्या कोर्‍यापानांकडे बघुन त्याच्या डोळ्यांत आसवं उभी राहिली. त्याच्या डोळ्यातुन अश्रुंचे दोन थेंब त्या कोर्‍या पानांवर पडले. त्यानं पेन उचलला, आणि डायरी लिहिण्यास सुरुवात केली. 
         "आज ५ फेब्रुवारी, जिवनचक्राच्या समुद्रात माझ्या नावेला, कोणत्या वादळात अडकवलयं कोण जाणे? आजवर फक्त दुखःच्या असंख्य लाटांचे तडाखे झेललेल्या या नावेला कधी सुखाचा किनारा मिळेल का? हे नवं वर्ष खरचं खुप वादळी ठरलयं. वर्षाच्या सुरुवातीस देवीसमान असलेल्या स्वरालीच्या आजीचं निधन झालं, आणि माझ्या एका चुकीमुळे किती मोठा अनर्थ घडला. ज्याच्या त्याचा मृत्यु ठरलेलाच असतो असं म्हणतात, मग प्रत्येकाच्या मृत्युला कुणीतरी कारणीभुत ठरलेला असायलाच हवा नाही का? हर्षितला वाचवतांना, तो किती याचनेनं बोलला, "अर्जुन मला मरायचं नाहिए रे..!" त्याच्या डोळ्यात बघुन मला आईची आठवण झाली. "भाऊ, मला काही करुन वाचवा हो, माझ्या अर्जुनसाठी, माझं लेकरु घरीच राहिलयं," असं मरणापुर्वी आई बोलली होती, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं. सोहमचं निचपत असलेलं शरीर जेव्हा पाण्यातनं बाहेर काढलं, एकवेळ खरचं मला डोळ्यांवर विश्वास बसला नव्हता, की तो मेलायं, त्याचं शरीर उचलुन आणतांना शरीराला जेवढं कष्ट झालं नसेल, त्याच्या कैक पटींनी जास्त यातना मनाला होत होत्या. 
          नव्या जन्मासारखी सुंदर आणि सुखकारक गोष्ट कुठलीच नसते, त्याच प्रमाणे मृत्यु सारखं भयावह आणि दुखःकारी काहीच नसतं हेच आयुष्याच सार आहे. असं मला त्या ऑपरेशन थिएटरकडे नेतांना जाणवलं. वादळात फसलेलं जहाज बुडायला टेकावं, आणि तोच वादळ शांत व्हावं, अगदी तसचं झालं. डॉक्टर म्हणतात, माझ्या शरीरानं माझी साथ दिली, पण त्यापेक्षा माझ्या मनाला जगायचं होतं, हर्षितप्रमाणेच माझं मनही मला सांगत होतं, "अर्जुन मला अजुन मरायचं नाहिए..! मृत्युशी मैत्री अजुन करायची नाहिए, अर्जुन तुला जगायचं आहे. या वादळातनं मला बाहेर पडायचंय, आयुष्याच्या नौकेला किनारा मिळवायचा राहिलायं..!" 
          बेशुद्ध होण्यापुर्वी माझ्या तोंडुन स्वरालीचं नाव बाहेर पडलं, नकळतच नव्हतं ते, माझ्या आयुष्यातील तर जे अखेरचे क्षण असते तर खरंच त्याक्षणी ती मला जवळ हवी होती, तिच्यामुळेच जगायची एक प्रबळ इच्छाशक्ती तयार झालीए, खरचं स्वतःच्या नशिबावर विश्वास कसा ठेवु तेच कळत नाही? मी शुद्धीत येईपर्यंत तीनं अन्न-पाण्याला स्पर्श केला नव्हता, माझं ऑपरेशन झालं ती अख्खी रात्र स्वरालीनं माझ्यासाठी प्रार्थना केली, का करते ती माझी इतकी काळजी? का वाटतं मला ती नेहमी माझ्यासोबत असावी? याप्रश्नाच उत्तर मला शोधायलाच हवं. "अर्जुन तु लवकर बरा हो" असं म्हणतांना तिने माझा हात पकडला, तीन तो कधीच सोडु नये असं वाटत होतं.
           रात्रीचे साडे अकरा वाजले असतील, अर्जुनच्या घराची डोअरबेल वाजली, अर्जुन गडबडीनं उठला, दरवाजा उघडुन बघतो तर समोर हर्षित उभा होता. "अर्जुन मला झोपु दे रे इथे, खुप अस्वस्थ वाटतयं रे, सारखं त्या दिवशी घडलं ते आठवतयं," असं म्हणुन हर्षित रडु लागला. अर्जुनने त्याला घरात घेतलं. अर्जुन काहीच बोलला नाही. "जमलं तर माफ कर यार मला," असं म्हणतच हर्षित झोपी गेला. सकाळी नेहमीप्रमाणे अर्जुन लवकर उठला. स्वरालीची आजपासुन बारावीची परिक्षा सुरु होणार होती, हे त्याला माहिती होतं. सकाळी सकाळीच तो हनुमान मंदिरात जाऊन तिच्यासाठी प्रार्थना करुन आला. हर्षित तोपर्यंत तयार झाला होता. हर्षित त्याला काही बोलणार हे लक्षात येताच, अर्जुनने त्याला नजरेनंच खुणवलं. त्याला प्रसाद दिला, आणि मग हर्षित तिथुन गुपचुप निघुन गेला. जातांनाही त्याच्या डोळ्यात आसवं होती. "कसं समजवावं याला, असं बघवत नाही याला," असं अर्जुन स्वगतच बोलला. दरम्यान त्याला बाहेर मैथिलीचा आवाज ऐकु आला, अर्जुन घाई-घाईनं घरा बाहेर आला. मैथिली स्वरालीला घेण्यासाठी आली होती, त्या दोघींचे नंबर एकाच केंद्रात आले होते.
              "हे स्वराली-मैथिली, ऑल दि बेस्ट, आज तुमचा पहिला पेपर आहे ना..!" असं अर्जुन स्वरालीला बोलला. परिक्षेला जाण्याच्या घाईत असलेल्या स्वराली त्याच्याकडे बघुन हसली, "थॅंक्स अर्जुन..!" असं म्हणत त्या दोघी तिथुन निघुन गेल्या. मग अर्जुन आणि स्वरालीचे बाबा डॉक्टरांकडे फॉलोअप साठी गेले. नंतर स्वरालीच्या बाबांनी अर्जुनला कॉलेजच्या गेटजवळ सोडलं. आज कॉलेजमध्ये प्रवेश करतांना त्याला खुप अवघडल्यासारखं वाटत होतं. नेहमीप्रमाणे तो आज त्याचा ग्रुप असायचा तिकडे गेला. "हाय अर्जुन, जर्नल पुर्ण झालं का?" असं त्याला विचारतांना आपल्या गर्लफ्रेंड कडे हसत बघणारा सोहम आज नव्हता. "माझी फ्रिडम फायटर दिसली का अर्जुन?" असं विचारायला ध्रुव नव्हता. मितालीला बघुन दंड थोपटुन गुड मॉर्निंग करायला नचिकेत नव्हता, शामलीला बघताच करंगळीवर वही फिरवायला शार्दुल कुठे होता. त्याच मन्न खुप उदास झालं. "तब्येत बरी आहे ना अर्जुन?" असं त्याला मितालीनं विचारलं. तिच्याकडे बघुन त्याने नुसतीच मान डोलावली. अर्जुन काहीतरी बोलेल असं तिला वाटलं पण तिचा हिरमुड झाला. दोन मिनिटं ती त्याच्याकडे बघत होती. अर्जुनच्या डोक्यात विचारांच काहुर उठलं होतं, त्याचं मितालीकडे अजिबात लक्ष नव्हतं. 
              थोड्यावेळानं तिथे रितेश आणि तेजाली येऊन पोहचले. "अरे हर्षितला बघितलं का कोणी?" असं रितेश बोलला. रितेश च्या वाक्यानं अर्जुनचं लक्ष वेधलं. "अरे काय झालं?" असं त्यानं विचारलं. "अरे त्याच्या घरुन फोन आला होता, सकाळी तो तुझ्या घरुन त्याच्या घरी गेला, त्यावेळी घरात शिरल्यावर त्याने एका एक त्याच्या कविता, नाटकं, त्याने लिहिलेले लेख फाडुन टाकले. त्याच्या आईला काही कळायच्या आत, त्यानं ते सगळे तुकडे पेटवुन दिले. रडतच कॉलेजला येण्याची तयारी केली, आणि घराबाहेर पडला, असं त्याच्या बाबांनी सांगितलयं" रितेश असं बोलला. अर्जुनच्या काळजात एकदम धस्स झालं, "हा हर्षितपण ना.." असं म्हणत तो तिथुन त्याला शोधायला निघाला. सगळ्या कॉलेजमध्ये त्यानं हर्षितला शोधलं, पण तो कॉलेजमध्ये नव्हता. अर्जुनच्या डोक्यात नको-नको ते विचार यायला लागले. कॉलेज सुरु झाल्याची बेल झाली, नाईलाजानं त्याला प्रॅक्टिकलला जावं लागलं. त्याच्या मनात हर्षितचा विचार सुरु होता. दुपारी लंच ब्रेकमध्येही त्याने त्याच्या घरी फोन करुन तो घरी आला आहे का ते विचारलं, पण हर्षित घरीच आला नव्हता. सायंकाळी तो हर्षितच्या घरी आला.
               "काकु आला का हर्षित घरी?" असं दारातच हर्षितची वाट बघत असलेल्या त्याच्या आईला अर्जुनने विचारलं. अर्जुनला बघताच त्याच्या आईचा कंठ दाटुन आला, "नाही रे, सकाळचा कुठे गेलायं काही पत्ता नाही, घरी आला तसा त्याच्या रुममधुन त्याच्या कवितांच्या वह्या, त्यानं लिहिलेले नाटकं, आणि बरच काही त्यानं फाडायला सुरु केलं, त्याला मी विचारतच होते तोपर्यंत त्यानं त्या फाडलेल्या पानांना काडी लावली. रडत रडत कॉलेजला जायला बाहेर पडला. एकशब्द बोलला नाही माझ्याशी.." असं म्हणत हर्षितच्या आईला अश्रुंना रोखनं अनावर झालं. त्यांना धीर कसा द्यावा हे अर्जुनला सुचेनास झालं. "काका कुठे गेलेत?" असं त्यानं त्यांना विचारलं. "पोलिस स्टेशनला पाठवलयं मी त्यांना, हर्षितला शोधायला मदत होईल म्हणुन." असं हर्षितची आई बोलली. अर्जुनही मग हर्षित कुठे कुठे जाऊ शकतो याचा विचार करु लागला. सुमारे पाऊन तासांनी हर्षित, त्याचे वडिल, आणि दोन पोलिस समोरुन येतांना दिसले. 
         "जीव द्यायला गेला होता गं," असं म्हणत हर्षितचे बाबा रडु लागले. "याचे चार मित्र जिथुन बुडाले तिथंच गेला होता हा, पाण्यात उडी मारली, पण नेमकं तिथल्या एका शेतकर्‍याला दिसलं, त्यानंच याला वाचवलं आणि त्यानं आम्हा पोलिसांना फोन लावला. नेमके जोशीसाहेब हर्षितसाठी तिथे आले होतो. फोनवरुन आम्ही त्याला हर्षितच वर्णन सांगितलं, "हो साहेब, तुम्ही या, तोपर्यंत याला ठेवतो इथं, असं त्यानं सांगितलं," आम्ही तिथे जाऊन याला घेऊन आलो." असं एक हवलदार बोलला. हर्षितची आई ताडकन उठली, पळतच हर्षित जवळ गेली. हर्षित खाली मान घालुन उभा होता. त्याच्या आईनं एक जोरदार चपराक त्याला लगावली, तसा तो जमिनीवर पडला. "नवस बोलुन तुला यासाठी जन्माला घातला होता का रे हर्षित? स्वतःचा जीव द्यायला निघाला, आम्हा दोघा आई-बापाचा विचारही तुझ्या डोक्यात डोकावला नाही का रे? या अर्जुनने स्वतःचा जीव धोक्यात घालुन तुला वाचवलं, त्या लेकराचाही तु विचार केला नाही का रे? काय चुक झाली रे आमची हर्षित? असं म्हणत त्याची आई समोर असलेल्या तुळशी वृंदावर डोक आपटायला लागली. त्याच्या बाबांनी धावत जाऊन त्याच्या आईला पकडलं, "तुला मरायची इतकी हौस आली होती तर, पहिले आम्हाला मारुन टाकलं असतं रे लेकरा," असं म्हणुन त्याच्या बाबांनी टाहो फोडला. 
            हर्षित तसाच जमिनीवर पडुन रडत होता. अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं, त्याच्याजवळ जाऊन तो बोलला, "का हर्ष्या, कशासाठी असलं माथेफिरु काम करायला गेला?" "मला जगायचीच इच्छा राहिली नाही रे अर्जुन, सारखं त्यादिवसाचं चित्र माझ्याडोळ्यासमोर उभं राहतयं. मला तर वेड लागायची पाळी आली आहे असंच वाटतयं बघं?" असं हर्षित बोलला. "जे झालं ते जाऊ दे, एक वाईट स्वप्न म्हणुन बघ त्याच्याकडे, आणि तुझा जीव दिल्यानं कुठे आपले जीवाभावाचे मित्र परत येणार आहेत का? हर्षित माझी शप्पथ आहे तुला, परत जर असं काही करायचा विचार जरी मनात आणशील तर बघं, जा तुझ्या आई-बाबांची माफी माग." असं म्हणत अर्जुनने हर्षितला उठवलं. हर्षित त्याच्या आई-बाबांजवळ गेला, त्यांच्या पायावर डोक ठेवुन त्यांन त्यांची माफी मागितली, आणि पुन्हा असं काही करणार नाही याचं वचन दिलं. हर्षितला त्यांनी आपल्याजवळ घेतलं, आई-वडिलांनी पण त्याला माफ केलं. थोड्यावेळानं पोलिसही तिथुन निघुन गेले, अर्जुनने हर्षितला परत समजवलं आणि तो आपल्या घराकडे जाउ लागला.
         घराकडे जातांना अर्जुनच्या डोक्यात हर्षितचाच विचार सुरु होता. "का हर्षितला जगायची इच्छा वाटत नाहिए? जेव्हा मी त्याला पाण्यातुन बुडतांना वाचवत होता, तेव्हा जिवाच्या आकांतानं तो मला म्हणत होता की त्याला मरायचं नाही, मग असं अचानक का त्याला वाटतयं? का झाल्या प्रकराला तो स्वतःला दोषी मानतोय? हर्ष्या खरचं असं काही करु नको यार, आधीच मी चार जीवाभावाचे मित्र गमवुन बसलोय रे, आणि तुच जर असं काही केलं तर कसं चालेल रे, मला मोठ्या भावासारखा मानतोस तु, एकदा तुझ्या मोठ्या भावाचं म्हणन ऐकुन घे रे." असं अर्जुन रस्त्यानं जातांना मनात बोलत होता. घरी आला तेव्हा अंगणातच स्वराली उभी होती. "हे अर्जुन, आजचा पेपर एकदम सोप्पा गेला रे, तु जे जे सांगितलं होतं ना त्यातलं जवळ-जवळ ८०% तसचं होतं, प्रश्नपत्रिका हातात पडली आणि मी इतकी खुष झाले ना, थॅंक्स अर्जुन..!" असं ती अर्जुनला बोलली. 
          स्वरालीला बघताच अर्जुनच्या डोक्यात चाललेलं विचारांच मंथन थांबल. अलगद त्याच्या चेहर्‍यावर हसु उमटलं. "अरे वा, चला तुझ्या परिक्षेची सुरुवात तर चांगली झाली म्हणायची तर, किती मार्क्सचा अटेम्प्ट केलास? आणि मैथिलीला कसा गेला पेपर?" असं अर्जुनने तिला विचारलं. "अरे फुल्ल ८० मार्क्सचा अटेम्प्ट केला, आणि वेळ होता म्हणुन सेक्शन टु चे दोन प्रश्न एक्स्ट्रा सोडवलेत, मैथिलीला तसा पेपर बरा गेला, तिला सेक्शन वन जरा टफ गेला रे, म्हणुन ती जराशी उदास होती." असं स्वराली त्याला बोलली. थोडावेळ ते तिथेच अंगणात गप्पा मारत बसले, "अरे अर्जुन चल मी निघते आता, आई बरोबर जायचं मला बसस्टॅंडवर, आईची बालमैत्रिण येणार आहे आज आमच्या घरी." असं स्वराली बोलली, आणि ती तिथुन निघुन गेली. 
               अर्जुन घरात आला, सायंकाळचे सात वाजले असतील, त्यानं आई-वडीलांच्या, आणि हनुमानाच्या मुर्तीपुढे दिवा लावला, आरती करुन मग तो अभ्यासाला बसणार तोच रितेश, तेजाली आणि लावण्या तिथे येऊन पोहचले. "अरे अर्जुन, तु गेला होतास ना हर्षितच्या घरी, काय झालं? हर्षित आला का घरी?" असं रितेशनं विचारलं. अर्जुनने मग झाला प्रकार थोडक्यात सांगितला. लावण्याला बघुन त्याला आश्चर्य वाटलं. "अगं लावण्या तु कशी काय यांच्या सोबत?" असं हर्षितने तिला विचारलं. "अरे अर्जुन मला दुपारी समजलं हर्षितबद्दल, मला तर खुप काळजी वाटत होती रे, पण कुणाला सांगावं म्हणुन गप्पच बसले. सायंकाळी रहावलं नाही म्हणुन तेजालीला सांगितलं, आणि मग आम्ही इथे आलो," असं लावण्या बोलली. "हर्षितला नक्की काय झालयं ते मलाच नक्की उमजलं नाहिये गं, पण एक गोष्ट विचारु का लावण्या तुला, तुला राग तर नाही ना येणार ?" असं अर्जुन तिला बोलला. "हो विचारना, त्यात कसला राग येणार?" असं लावण्या बोलली. "जाऊदे, नंतर सांगेन, आत्ता ती वेळ पण नाहिये," असं म्हणुन अर्जुन गप्प बसला. थोडावेळ मग कुणीच काही बोललं नाही. "तेजाली, रितेश आपण जायचं का हर्षितच्या घरी?" असं लिलीनं विचारलं. "आत्ता नका जाउ तुम्ही." असं अर्जुन बोलला. नंतर ते तिघेही अर्जुनच्या घरुन निघाले.