Saturday, May 19, 2012

छाटलेल्या पंखांची भरारी..! भाग-१

       नमस्कार मित्रांनो, "नशीबाची साथ नको रे मला, मनगटांत अजुन बरंच बळ आहे, अपयशाचं फळ सुद्धा मित्रा, यशाच्या फळा इतकंच गोड आहे..!" ही चारोळी जेव्हा फेसबुकवर अपलोड केली त्यावेळी तिला अनपेक्षित असा उत्तम प्रतिसाद लाभला, म्हणुन तुम्हाला जास्त वाट पहायला न लावता तुमच्या भेटीस घेऊन येत आहे "शिंपल्यातले मोती..!" या कथासंग्रहातील माझी १० कथा "छाटलेल्या पंखांची भरारी..!"
        "आज मृत्यु मला कवेत घ्यायला आलायं, आणि मला त्याचं जराही कौतुक नाही, आज मी त्याच्याशी मैत्री करायलाही तयार आहे..!" असं जणु तो आपल्या शेवटच्या घटका मोजतोय अशा रितीने आपल्या लाडक्या अर्धांगिनीला बोलला. "तुम्ही असं अभद्र नका हो बोलु काही..!" असं म्हणत तीने आपल्या पदराने गालांवरुन ओघळणारे अश्रु पुसतच ती आय.सी.यु. मधुन बाहेर आली..! आपल्या सुनेचा तो दयनीय चेहरा बघुन प्रतापच्या वडिलांचे डोळे भरुन आले..! "आई भवानी, अगं अशी का कोपली गं माझ्यावर तु? पाहिजे तर मला जिवंतपणी नरक दाखवं, पण माझं लेकरु जगवं..!" असं म्हणत त्याच्या आईनेही हंबरडा फोडला..! तितक्यात प्रतापला आय.सी.यु. मधुन ऑपरेशन थिएटर मध्ये स्ट्रेचरवरुन नेतांना त्याच्या वडिलांनी बघितलं..! आपल्या मुलाच्या नजरेचा सामना करतांना त्यांच्या चेहर्‍यावर पश्चाताप जाणवत होता, एका बापाचं आपल्या मुलाला समजण्यात आलेलं अपयश आज त्यांच्या चेहर्‍यावरुन स्पष्ट दिसत होतं..! अपार दुःखात बुडायला तयार असलेली त्याची पत्नी, जीवाच्या आकांताने देवाला साकडं घालणारी त्याची आई, परिस्थितीचं जराही गांभिर्य नसलेली त्याची ती दोन लहान निरागसपणे रडणार्‍या मुलांकडे त्याने एक क्षण पाहिलं आणि त्याची शुद्ध हरपली..!
        जन्माला आल्यावरच नियतीनं अन्याय जणु त्याच्या पाचवीला पुजला होता, त्या प्रतापने दरवेळी नियतीवर मात केली होती..! त्याच्या जन्म झाला तो मुळात अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या कुटुंबात, आई-बाप दोघही वेठबिगारीचं काम करुन कसेबसे दिवस काढायचे, त्यातही दारु म्हणजे त्याच्या बापाचा जीव की प्राण..! आपला बाप असा का वागतो? भडव्या म्हणुनच तो मला हाक मारतो, आईचं नाव सावित्री असुन देखील आपला बाप तिला सारखं रांड या नावानेच का हाक मारतो?, बहिणीला कधी कौतुकाची थाप नाही तर रोज उठता लाथ बसता बुकके का मिळतात? याचं उत्तर छोट्या प्रतापला कधी मिळालंच नाही..! जेव्हा तो सहा वर्षाचा झाला तेव्हापासुन त्याचा बाप त्याला शेतात काम करायला घेऊन जायचा, दिवसभरात नशीबानं त्याला चतकोर भाकर मिळाली तर त्याला आनंद वाटायचा, कधी चिंचेचा पाला, कधी गुलाबाची जमिनीवरची फुलं, कधी कधी बैलांना टाकल्या जायच्या त्यातल्या शिळया पोळ्या खाऊन त्याचं बालपण चाललं होतं..! त्याच्या बरोबरीचेच असलेले काही मुलं गावात फिरुन भिक मागुन आपल्या पोटाची वितभर खळगी भरायचे..! "ये प्रताप्या, अरे घे..!" असं म्हणुन कोणी त्याला ते भिक मागुन आणलेलं काही द्यायचा प्रयत्न केला की त्याला रडु यायचं..! तो ज्या शेताजवळ असायचा त्याच्या जवळच स्मशान होतं, त्यामुळे तो रडत नेहमी तिकडेच पळायचा..!
        "स्मशानात आलं की मुक्ती मिळते..!" असं त्याने एकदा ऐकलं होतं, आणि ही मुक्ती असते तरी काय याचा शोध घ्यायचा त्याचं मन प्रयत्न करायचं. एकदा गावच्या जत्रेत फिरतांना तो हरवला आणि नेमका गावच्या काटकर मास्तराला दिसला. त्याने त्याला विचारलं, "कोण रे तु? कोणाचा पोरगा आहेस?" त्यावर प्रताप रडतच बोलला, "म्या परताप, माह्या बापानं गर्दीत माझं बोट सोडुन दिलयं आणि कुठे हरवलायं काय माहितं..!" असं त्याचं उत्तर ऐकुन मास्तरला हसु आलं, "चल आपण तुझ्या वडिलांना शोधुया, असं म्हणत तो जत्रेत घेऊन त्याला फिरु लागला. जत्रेत एका दुकानात ग्रंथ, पोथ्या आणि बरेच पुस्तके होते, शिवाय पाट्या, पेन्सिल सारखी शैक्षणिक साहित्यसुद्धा एका कोपर्‍यात पडलेली होती. "ह्यो काळं लाकुड कसलं असतं?" असं तो त्या पाटीकडे बघुन बोलला. त्याच्या त्या चौकस नजरेला बघुन मास्तर खुष झाला, "अरे ते लाकुड नाही, पाटी आहे ती..! तिच्या मदतीने आपल्याला लिहिता येतं, शिकता येतं, आणि माणुस शिकला की मोठा होतो..!"
        "मोठा म्हणजे माह्या बापासारखा?" असं प्रतापने मास्तरांना प्रश्न विचारला. त्याच दुकानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज, विनायक सावरकर यासारख्यां महापुरुषांचे फोटो होते, त्यांच्याकडे बोट दाखवुन मास्तरांनी त्याला मोठा माणुस कोण ते सांगितलं. तितक्यात माघनं प्रतापच्या वडिलांची आरोळी ऐकु आली, "ह्यो बघं हा रांडीचा इथं उभा आहे, भडव्या..!" असं म्हणत त्यांनी प्रतापच्या पाठीत जोरदार बुक्का मारला, तितक्यात मास्तरांनी प्रतापच्या वडिलांना सावरलं, "अरे हुशार दिसतयं तुझं पोरगं, याला शाळेला पाठवत जा..! उद्या नाव लावुन घेऊ आपण शाळेत याचं, सकाळी ये ११ वाजता..!" असं मास्तरांनी सांगितल्यावर प्रतापच्या वडिलांनी नुसती होकारार्थी मान डोलावली. जातांना काटकर मास्तरांनी प्रतापला एक पाटी आणि पेन्सिलचा एक बॉक्स घेऊन दिला.
        "ये सुमे, ह्ये बघं मला काय मिळालयं..!" असं आपल्या लहान बहिण सुमनला पाटी दाखावायला प्रताप घर दिसताच पळायला लागला तोच त्याच्या कमरेत त्याच्या वडिलांनी लाथ मारली. "भाड्या फेक ती पाटी.. खबरदार पुन्हा हिला हात लावला तरं, हातच तोडुन टाकील..!" असं रागाने प्रतापचे वडिल त्याला बोलले. तसा तो ढसा-ढसा रडतच घरात शिरला. रात्री जेवण न करताच झोपी गेला, स्वप्नात त्याला ती पाटी दिसायला लागली. पाटीमुळे आपल्याला मुक्ती मिळेल असं त्याला वाटु लागलं, आणि त्याने ठरवलं, की बापानं कितीही मारलं तरी चालेल पण पाटीची संगत कधी सोडायची नाही. सकाळी उठल्यावर त्याने पाटी शोधायचा खुप प्रयत्न केला, शेवटी चुलीमध्ये जळण्यासाठी त्याच्या वडिलांनी तिला टाकलं होतं हे पाहिल्यावर त्याला वाईट वाटलं. घरी काही न  सांगताच तो उठला आणि स्मशानात जाऊन पोहचला, तिथे थोडावेळ बसल्यानंतर त्याला बरं वाटु लागलं, सहज त्याने तिथे असलेल्या काही काड्या जमा केल्या आणि त्याने त्या चौकोनासारख्या लावल्या, "आईशप्पथ, मातीची प्ण पाटी तयार होईल..!" असं त्याच्यातोंडुन वाक्य बाहेर आलं. त्याक्षणापासुन त्याच्या लक्षात आलं की आपण हवं तेव्हा या जमिनीवर मास्तर म्हटंले तसं लिहु शकतो आणि मोठं होऊ शकतो.
        त्यादिवसापासुन प्रतापंच आयुष्यच जणु बदलुन गेलं, त्याला जमेल तेव्हा तो जमिनीवर काड्या रचुन काहीतरी रेखाटण्याचा प्रयत्न करायचा. एकदिवस त्याला एक फाटकी अकंलिपी सापडली, त्यातली अक्षरं तो मातीवर गिरवायचा, पण आपण काय करतोय हे त्याला माहिती नव्हतं, पण असं करुन आपण मोठं होऊ असा विश्वास त्याच्या मनात होता. शेतात कामावर जातांना तो ती अक्षरं मातीवर रेखाटंत जायचा, एकदिवसं गणोबा नावाच्या शेतकर्‍यांन त्याला असं अक्षरं रेखाटतांना पाहिलं, आणि त्याला फार आनंद झाला. "अरे प्रताप, ह्ये अक्षर लिव्हायला कोणी शिकवलं तुले?" असं गणोबानं विचारल्यावर प्रतापला पहिल्यांदा जाणवलं की आपण जे मातीवर काढतो त्याला लिहिणं असं म्हणतात. "म्या मांझं मांझंच काढतु असंच, माह्याजवळ आहे बरीच कागदं, त्यातुन पाहुन काढतु..!" असं प्रताप अभिमानानं बोलला. "आयला, मगं वाच बरं हे काय आहे ते?" असं गणोबाने मातीवर असलेल्या "ग" या अक्षराकडे बोट दाखवतं बोलला. "मला काय माहितं..?" असं प्रतापच्या उत्तराने गणोबाला आश्चर्य वाटलं. गणोबा त्याला बोलला अरे ते "ग" आहे, गणोबाचा ग, अरे तु हे लिव्हतो, पण तुला वाचाया जमतं नाही? एक काम कर उद्यापासनं माझ्या शेतावर येत जा, मी शिकवील तुला वाचाया, अरे ७ वी पास हाये म्या..!" असं गणोबा प्रतापला बोलला.
        दुसर्‍यादिवसापासुन प्रताप नित्यनियमाने गणोबाच्या शेतावर जायचा, त्याला शेतकामात मदत करायचा, त्याबदल्यात गणोबा त्याला दिवसाचे तीन रुपये, जेवणं, आणि  लिहायला-वाचायला शिकवायचा. रात्री घरी आल्यावर प्रताप लवकर झोपुन जायचा, आणि पहाटे लवकर उठुन सगळ्या अंगणात ती अक्षरे गिरवायचा, आणि परत पुसुन टाकायचा. एकदिवस असंच अक्षरे गिरवत असतांना त्याला भास झाला की आपला वडिलांना जाग आलीये, म्हणुन घाई-घाईनं तो घरात जाऊन झोपला, सकाळी प्रतापचे वडिल अंगणात आले, आणि मातीवरची ती अक्षरे बघुन ते मोठ्यानं ओरडले, "प्रताप्या भाड्या, भायेर ये.. या रांडीच्यानं काय तमाशा करुन ठेवलायं अंगणात..!" प्रताप डोळे चोळत बाहेर आला, तसा त्याच्या वडिलांनी त्याला काठीनं बडवायला सुरुवात केली, तसा प्रताप "आये...नको मारु ना...आये..." असं जीवाच्या आकांताने म्हणु लागला, त्याची ती आर्त आरोळी ऐकुन प्रतापची आई बाहेर आली, आपला नवरा आपल्या लेकाला असं गुरांना मारल्यागत मारतोयं हे बघुन ती रडतच प्रतापला सोडवु लागली.
        प्रतापला बराच मार लागला होता, त्याच्या आईनं घाई-घाईनं त्याला गावाच्या वैद्याकडे नेलं, त्यानं प्रतापला तपासलं, आणि बोलला, "मला वाटतंय याच्या उजव्या हाताच्या पंज्याची सर्वी हाडं मोडलीये..!


क्रमश:


थंड घे थंड..! ३०

Friday, May 11, 2012

तो आणि त्याची ती..! १.८

            पार्टी झाल्यानंतर घराकडे परततांना अर्जुन स्वरालीकडे बघुन बोलला, "तु आज माझी मॅच बघायला आलीस मला खुप आनंद झाला, अगं एकवर्षानंतर कमबॅक केल मी रिंग मध्ये. वाटलं नव्हतं जिंकुन जाईन, खरचं तु खुप लकी आहेस माझ्यासाठी..!" स्वरालीनं त्याच्याकडे बघितलं, आणि त्याच्या गालांवरुन हात फिरवला. "आई गं...दुखतयं खुप..!"असं अर्जुन हसतच बोलला, स्वरालीनं फक्त नकारार्थी मान हलवली आणि त्याच्याकडे बघुन ह्सली. "परवा पासुन माझी प्रॅक्टिकलची परिक्षा सुरु होईल.." असं स्वरालीनं त्याला सांगितलं. "होय, मला ठाऊक आहे ते, तुझं पहिलं प्रॅक्टिकल फिजिक्सचं २३ जानेवारी, दुसरं बायोलॉजी २५ जानेवारी." असं म्हणतं अर्जुनने तिच्या परिक्षेचं शेड्युल तिला सांगितलं. "मला वाटतं परिक्षा माझी नाही, तुझीच आहे अर्जुन." असं स्वराली त्याला बोलली, आणि घरी परतली.
             "बेटा स्वरा, कुठं होतीस इतक्या वेळं?" असं स्वरालीच्या बाबांनी तिला घरी आल्यावर विचारलं. "अहो बाबा, आज मी अर्जुनच्या कॉलेजला गेले होते." असं स्वरालीनं सांगितलं. "काय गं काही विषेश?" असं आईनं तिला विचारलं. "अगं आई आज अर्जुनची बॉक्सिंगची मॅच होती माहिती आहे. अर्जुन फायनल मॅच जिंकला, आणि चॅंम्पियन झाला. त्याची ती मॅच बघायला मी गेले होते. दुपारी तेजाली दिदी आली होती, तिच्याबरोबर गेले होते. बाबा तुम्हाला माहिती नाही, अर्जुन एतका जबरदस्त बॉक्सिंग करतो ना की बस. तुमची आणि त्याची फाईट झाली ना बाबा, तर तुम्हाला पण तो सहजच हरवुन टाकेल. त्याला त्याच्या कॉलेज मध्ये "करियर किलर" असं म्हणतात. त्याची फाईट सुरु झाल्यावर त्याच्या अपोनंन्टने पहिल्यांदा त्याला खुप मारलं, एकदम क्रुर होता तो, मला तर वाटलं अर्जुनचं आज काही खरं नाही, मग नंतर अर्जुनने त्याला अशी फाईट दिली की बसं, तो उठलाच नाही. अर्जुनला त्याच्या मित्रांनी खांद्यावर घेतलं होतं, त्याला खुप मोठी ट्रॉफी पन मिळाली, मला तो रिंग मध्ये पण घेऊन गेला होता. त्याचे कोच त्याच्यावर जाम खुष झाले होते." असं स्वराली तिच्या आई-बाबांना खुप उत्साहानं सांगत होती, अगदी कृतीसहितं. कितीतरी दिवसांनी ती इतकी मनमोकळेपणानं बोलतेयं हे बघुन तिच्या आई-बाबांना बरं वाटलं होतं.
               "राहुल, स्वरा किती खुष आहे ना आज. माई गेल्यानंतर पहिल्यांदा ती इतकी समाधानी आणि आनंदी बघितली." असं स्वरालीची आई तिच्या बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवुन म्हणाली. "हो ना आशु, अगं आई गेल्यानंतर तिला खुप मोठा धक्का बसला. आपल्या नोकरीमुळे आपल्याला तिला म्हणावं तसा वेळ देता येत नाही, आई होती म्हणुन तरी बरं होतं. पण ती अजुनही खुप छोटी आहे, आई म्हणायची तसं बाहुली सारखी. तिचं स्वतःच विश्व किती छोटसं आहे गं, तिला बाहेरचं जगं कसं आहे त्याची तिळमात्र कल्पना नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतुन आनंद मिळवायची तिची सवयं. खरचं आपलं भाग्य चांगलं, स्वरालीनं आपल्या पोटी जन्म घेतला." असं स्वरालीचे बाबा तिच्या आईला बोलले. "खरंच राहुल, फार गोड मुलगी आहे आपली, एकदम सोन्यासारखी." असं आई हसत बोलली.
             अर्जुन घरी परतल्यावर स्वतःवर तो खुष होता. "सकाळी बोललो, अगदी तसचं झालं, अशीच कृपा या भक्तावर ठेवा बजरंगबली." असं अर्जुन बोलला. तितक्यात त्याच्या घराची डोअरबेल वाजली, "अरे वा, मामा-मामी आज इतक्या दिवसांनी, या ना आत या.." असं दार उघडल्यावर अर्जुन आपल्या मामा-मामींना बघुन तो आनंदानं बोलला. "आज आमचा भाच्यानं कॉलेजमध्ये पराक्रम केला, बॉक्सिंग चॅंम्पियन झाला, असं शेजाराची मुलं सांगत होती, म्हणुन तुझं अभिनंदन करायला आलोयं." असं मामीनं सांगितलं. अर्जुनने त्याला मिळालेली ट्रॉफी मामा-मामीला दाखवली, आणि त्यांच्या पाया पडला. "अस्सचं यश कमवं बेटा. तुझ्या वडिलांना सिराजसिंहलाही कुस्तीगीर बनायचं होतं, त्यावेळी गावात त्यांच्यासारखं पिळदार शरीर आणि ताकद कुणातच नव्हती, पण त्यावेळी संसाराच्या बेडीमुळं त्यांना काही करता आलं नाही, निदान कुस्तीगीर नाहीस पण चांगला मुष्टीयोद्धा बनुन तु तुझ्या वडिलांच स्वप्न पुर्ण करं..!" असं मामा अर्जुनला बोलला. वडिलांची आठवण काढताच अर्जुनचे डोळे पाणावले.
               "त्यांची खुप आठवण येते मामा.." असं म्हणत तो रडायला लागला. "रडु नको अर्जुन, तुझं रडणं बघवलं जायचं नाही माझ्या बहिणीला.." असं अर्जुनच्या डोक्यावरुन मायेनं हात फिरवत मामा बोलला. "अर्जुन तु आमच्या कडे तरी चल ना रहायला, अरे तुझ्याशिवाय आम्हालाही कुणी आहे का या जगात? देवाची काय मर्जी होती कुणास ठाऊक, आई होण्याचं भाग्य मला मिळालं नाही रे. एकाच गावात राहुन देखील तु असा आमच्यापासुन दुर असतो. बेटा तुला कसं सांगु आता." असं म्हणतांना मामीचे डोळे पाणावले होते. "अगं आपण का रडतोय? अगं अर्जुननं इतकी मोठी ट्रॉफी जिंकली, त्याचं कौतुक करायचं राहिलं बाजुला, अर्जुन चल बेटा, आज आपण तिघे बाहेर जाऊ जेवायला. आज मामा तुला खुप छान पार्टी देणार बघं." असं मामानं अर्जुनला सांगितलं.
                रात्री घरी परतल्यावर अर्जुन एकदम थकला होता, त्यामुळे त्याला पटकन झोप लागली. झोपेत तो सकाळच्या मॅचचा विचार करत होता. "खरचं आजं जिंकणं खुप कठीण झालं होतं, अगदी पहिली मॅच खेळलो तेव्हाच. फायनल मॅचच्या आधी स्वराली आल्यावर माझ्यात जणु नवा जोश आला, जणु मन ती येण्याचीच वाट बघत होतं. गॅंथरने पहिल्या राउंडला खुप वेगानं आक्रमण केलं, तो राउंड झाल्यानंतर स्वरालीकडे बघितलं, त्यावेळी तिचा चेहरा किती काळजीनं भरलेला होता. जणु मार मला पडतं होता, आणि वेदना तिला होतं होत्या. मॅच जिंकल्यानंतर तिला रिंग मध्ये घेऊन जातांना मला खुप अभिमान वाटत होता. ट्रॉफी उंचावुन रिंगमध्ये फिरवली, तसं तिच्याबरोबर फिरावं असं वाटतं होतं. तिलाही मी जिंकल्याचा किती आनंद झाला ते तिच्या डोळ्यांकडे बघुनच कळत होतं. मामा-मामीसारखंच आपलं म्हणावसं वाटणारी सध्यातरी स्वरालीच एक आहे असं वाटायला लागलंय. खरचं स्वराली बरोबर एक वेगळीच नाळ जुळली आहे असं वाटतं. मला खरचं स्वराली आवडायला लागली आहे. नुसतं आवडायलाच नाही तर मी तिच्या प्रेमात पडलोयं असं वाटतयं मला. खरचं मला असं वाटणं हिच प्रेमाची सुरुवात आहे का? की सोहम म्हणतो तसं नुसतं आकर्षण? काहीही असु दे, पण ती अशीच माझ्यासोबत असावी इतकीच माझी इच्छा आहे.
               सकाळी जाग आल्यावरही अर्जुनच्या डोक्यात तोच विचार येत होता. "प्रेमात पडलं की" अशी हर्षितची कविता त्याला आठवली. "खरचं, हर्षित म्हणतो ते एकदम बरोबर आहे, प्रेमात पडलं की..!" असं म्हणतं तो ती कविता गुण-गुणायला लागला. कॉलेजला जातांना त्याला स्वरालीचे बाबा दिसले, "अरे अर्जुन, अभिनंदन तुझं, काल स्वरानं सांगितलं तु बॉक्सिंगची मॅच जिंकुन चॅंम्पियन झालास ते. काल तीनं आम्हाला जसं घडलं तसं सांगितलं, विथ ऍक्शन, तु कसा पंच मारायचा ते सांगतांना तिच्या नाजुक हातांचे एक-दोन पंच मला पण लागले. पुन्हा एकदा अभिनंदन तुझं बेटा, अशीच प्रगती करत जा." असं म्हणतं स्वरालीचे बाबा हसायला लागले. "थॅंक्स काका, स्वरालीनं पहिल्यांदाच प्रत्यक्ष मॅच बघितली असणार म्हणुन तिला खुप आनंद झाला." असं अर्जुन बोलला आणि तो कॉलेजला आला. कॉलेजला आल्यावर तो पहिले तेजालीला भेटला, "थॅंक्स तेजाली, काल तुझ्यामुळे ती मॅच माझ्यासाठी अविस्मरणीय झाली." असं तेजालीला बघुन अर्जुन बोलला. "अरे अर्जुन, इतकं तर आम्ही तुझ्यासाठी करुच शकतो ना, खरं तर ही आयडिया, माझी नव्हती तर रितेशचीच होती, पहिल्यांदा त्याचं आणि माझं या गोष्टीवर एकमत झालं आणि ते सुद्धा एकमेकांशी न भांडता." असं म्हणुन तेजाली हसायला लागली. तितक्यात अर्जुनचा बाकीचा ग्रुप आला. "काल काय सॉलिड फाइट केलीस बॉस, आपले प्रिंसिपल इतके खुष झाले की बसं. यंदाचा गॅदरिंगला त्यांनी फुल्ल स्पॉंन्सर करायचं ठरवलं, शिवाय नेहमी आपल्याला स्पोर्ट्स वीकच्या नावाखाली फक्त तीनच दिवस मिळतात, पण यंदा आठ दिवसांचा स्पोर्ट्स वीक आहे ना यार, गॅदरिंगपण एक दिवसा ऐवजी दोन दिवसं ठेवलयं. लॉटरी लागलीय म्हणा की आपल्याला." असं दिनेश सांगत होता. "थ्री चिअर्स फॉर अर्जुन, हिप हिप हुर्ये, हिप हिप हुर्ये, हिप हिप हुर्ये..!" असं सगळ्या ग्रुपनं जल्लोष केला.
                   कॉलेज सुटल्यानंतर अर्जुन स्वरालीच्या घरी गेला. "स्वराली उद्या तुझं बोर्डाचं पहिलं प्रॅक्टिकल आहे ना, म्हणुन तुला ऑल दि बेस्ट करायला आलोय, उद्या सकाळी तु घाईत असशील म्हणुन ठरवलं आजच तुला विश करावं. हे घे माझ्याकडुन तुला प्रेझेंट" असं अर्जुन बोलला. "किती छान घड्याळ आहे, थॅंक्स अर्जुन," असं स्वराली बोलली. "चल येतो मी, उद्या प्रॅक्टिकलला सांभाळुन जा, फिजिक्सचं प्रॅक्टिकल आहे म्हणुन जास्त टेंशन घेऊ नकोस, तुझं जरनल, कंपास, लॉग टेबल, हॉल तिकीट आठवणीने ने, आज लवकर झोपुन घे, पहाटे उठल्यावर पाहिजे तर अभ्यास करं, चल गुड नाईट.!" असं म्हणुन अर्जुन तिथुन निघाला. "कुणाला कोणतं गिफ्ट कोणत्या वेळी द्यावं ते तुझ्याकडुन शिकावं अर्जुन, चला आता या घड्याळाला जसा वेळ आहे, तसा तु सुद्धा माझ्यासाठी वेळ काढतोयं हे बघुन खुप आनंद होतो मला अर्जुन.!" असं स्वराली मनात बोलली.
                  घरी आल्यानंतर अर्जुन आपल्या नाटकाचे संवाद पाठ करत होता, थोड्यावेळानं त्याचा ग्रुपही आला. त्यांची प्रॅक्टिस खुप सुरेख होत होती. हर्षित प्रत्येकाकडुन चोखपणे हवं तसं काम करवुन घेत होता. संवाद कसा म्हणायचा, त्यावेळी शरीराची हालचाल कशी पाहिजे, स्टेजवर उभं कसं रहायचं हे सगळं तो मन लावुन सांगत होता. थोड्यावेळानंतर त्यांनी नाटकाची पोस्टर्स तयार करायला घेतली. "अरे हर्षित आपण आपल्या नाटकाचं नाव बदलुया का रे?" असं सोहम बोलला. "का रे अचानक काय झालं तुला, "तिच्या साठी वाट्टेल ते", चांगल तर नाव आहे ना?" असं हर्षित बोलला. "अरे हर्षित, हे नाव "प्रेमासाठी वाट्टेल ते" या नाटकासारखं आहे, आणि सगळ्यांना आधीच कळतं की काय घडु शकतं, म्हणुन मी म्हणतोय काहीतरी वेगळं नावं देउया," असं सोहमने स्पष्टीकरण केलं. "हो, सोहम बरोबर म्हणतोय, पण आता दुसरं नावं काय द्यायचं? सुचवा एक एकेकानं." असं रितेश बोलला. दहा मिनिटं कुणालाच काही सुचलं नाही. "अरे यार, जे आहे तेच राहु द्या रे, निदान आपण स्वतःच लिहिलेलं नाटक सादर करतो, बाकीच्या मुलांसारखं इकडुन तिकडुन उचलेलं नाटक सादर करतं नाही. आपल्याला जे सुचतं ते त्यांना सुचणारच नाही, आपल्या ग्रुप समोर ते एकदम चिल्लर आहेत. आपला नाटकाचा ग्रुप सगळ्या कॉलेजमधला बेस्ट ग्रुप आहे, असं सगळेच म्हणतात, खुद्द प्रिंसिपल देखील." असं नचिकेत बोलला. "अरे असं नको बोलुस नचिकेत, आपल्या सारखं नाटक सादर करणं त्यांना जमत नसलं, तरी बाकीचे ग्रुप आपल्याला टक्कर देण्याचं धाडसं तरी करतात. आपला हर्ष्या एकपात्री करायला तयार झाला, तरी बाकीचे ग्रुप त्याच्यासमोर काहीच नाही." असं आपलं मत शार्दुलने मांडलं.
                "मला तर काहीच सुचत नाही, तुम्हाला जे वाटेल ते नाव द्या," असं डोक्याला हात लावत हर्षित बोलला. सगळे विचार करण्यात गुंग झाले होते, तितक्यात अर्जुन बोलला, "तो आणि त्याची ती" कसं वाटतयं? "बेस्ट आहे बॉस, हेच टायटल राहिल आपल्या नाटकाचं..!" असं सोहम बोलला. "सही आहे यार, तो आणि त्याची ती, मच बेटर दॅन तिच्यासाठी वाट्टेल ते..!" असं ध्रुव बोलला. "एकदम खरीखुरी निर्मळ प्रेमकथाच आहे असं वाटतंय. काय डायरेक्टर, ठेवायचं का हेच नाव?" असं रितेश बोलला. "अरे विचारताय काय, पोस्टर बनवायला लागा, फायर स्टार्टर ग्रुप सादर करतोय, हर्षित जोशी दिग्दर्शित, "तो आणि त्याची ती", प्रमुख भुमिकेत आपले आवडते कलाकार- अर्जुन, सोहम, नचिकेत, रितेश, शार्दुल, ध्रुव, तेजाली, शामली, वृषाली, केतकी, अनामिका आणि एका खास भुमिकेत स्वतः नाटकाचा सर्वेसर्वा, हर्षित.." असं सोहम बोलला, आणि सगळा ग्रुप हसायला लागला. "आणि हो आपल्या नाटकाची यंदाची एक खास लाईन टाकुया, "आयुष्यात कधीतरी प्रेमात पडलेल्या आणि न पडलेल्या सर्वांसाठीच..!", असं इतका वेळ शांत असलेला हर्षित बोलला. "एक नंबर, याला म्हणतात ना डायरेक्टर मे हो दम, तो ड्रामा कामयाब करेंगे हम..!" असं सगळे बोलले. रात्री मग सर्वांनी उत्तमपणे पोस्टर्स तयार केले. "उद्या कॉलेजमध्ये हे पोस्टर लावल्यावर काय धमाल येईल. बाकीच्या ग्रुप्सची चेहरे बघायचे रे..!" असं नचिकेत बोलला.

थंड घे थंड..! २४