Wednesday, November 14, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१६


                     घरी आल्यावर स्वराली अभ्यास करु लागली, रात्री झोपेत ती अर्जुनच्या बर्थ डे ला त्याला काय सरप्राईज द्यायचं त्याचा विचार करु लागली. सकाळी अर्जुन तिला पेपरसाठी शुभेच्छा देण्यासाठी आला. मग मैथिली आणि स्वराली दोघ्याजणी तिथुन निघाल्या. "ऐ मैथिली, तुला एक विचारु का पण तु हसणार नसशील तर?" असं स्वरालीनं तिला विचारलं. "अभ्यासाचं काही विचारु नकोस गं, आधीच जाम टेंशन आलयं," असं मैथिली तिला बोलली. "अगं अर्जुनचा बर्थ डे आहे २२ फेब्रुवारीला, त्याला एकदम छान सरप्राईज द्यायचं आहे," असं स्वराली त्याला बोलली. "अगं स्वराली, मगं काय ठरवलंय तु?" असं मैथिलीनं तिला विचारलं. "अजुन काही सुचलच नाही गं," असं स्वरालीनं तिला सांगितलं. "एक काम करु, आपण पेपर झाला की ठरवुया," असं मैथिलीनं तिला सुचवलं. 
        इकडे कॉलेजमध्येही १४ फेब्रुवारीचे सगळ्यांना वेध लागले होते. व्हॅलेंटाईन डे येणार म्हणुन प्रत्येक जण उत्साहात होता. कॉलेजमधली मोजकीच अफेअर्स सोडली तर एरवी मुला मुलींमध्ये जणु वर्गात कोल्डवॉर चालायचा. पण व्हॅलेंटाईन डे च्या आठवडाभर आधी जणु कोल्डवॉर थांबलेलं असायचं. मुलं-मुली आप-आपसांतलं इंटरएक्शन वाढवु लागायची. कोणाला अचानक त्याच्या जवळ असलेल्या विषयाच्या नोट्स मुद्दाम तीच्याकडुन हव्या असायच्या, एखादी मुद्दाम मग तीला आवडणार्‍याचं जर्नल मागायची, लेक्चरला दांड्या मारणारे हक्कानं लेक्चरला येऊन बसायचे. कॉलेजसुरु झाल्यापासुन ज्यांनी लायब्ररीकार्ड काढायची तसदी घेतलेली नसायची त्यांच दुर्लभ दर्शन कॉलेजच्या लायब्ररीला व्हायचं. लेक्चरला एरवी सरांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष करणारे अचानक सरांच्या प्रश्नांना स्वतःहुन उत्तर द्यायची, कुणाला मग कधी न पडायचे असे प्रश्न पडायचे, कॉलेजनंतरही अभ्यासाला काही जण थांबायचे. 
            कॉलेजच्या कॅंटीनमध्ये एरवी मिळणारे पोहे, उपमा, वडापाव, समोसे, मेदुवडे, मिसळ, चहा, कोल्ड्रिंक्स यासारख्या पारंपारिक पदार्थांच्या जोडीला मग इडली, डोसे, व्हेज कटलेट्स, पेस्ट्रीज, आईसक्रीम्स, केक, पावभाजी, पाणीपुरी, कोल्ड कॉफी यासारख्या पदार्थांची रेलचेल असायची. कॉलेजचा युनिफॉर्म घालायचा नाही, त्याऐवजी फाईन भरणारे मग कडक इस्त्री केलेल्या कॉलेजच्या युनिफॉर्ममध्ये झळकायचे. कॉलेजमधल्या विध्यार्थीप्रिय शिक्षक असलेल्या श्री बच्छाव सर विध्यार्थीप्रिय शिक्षिका असलेल्या सौ. पोद्दार मॅडमच्या लेक्चरला मुल-मुली हक्कानं ऑफ मागायचे, वर्गात मग प्रत्येकजण आप-आपलं टॅलेंट सादर करायचा, एखादी गाणं चांगल म्हणायची, कुणाला डान्स छान जमायचा, काहीजण मिमिक्री करायचे, कधी अंताक्षरी रंगायची, सर व मॅडमही त्यांच्यावेळचे किस्से वर्गात मुला-मुलींना सांगायचे असं छान हसतं-खेळत वातावरण कॉलेजमध्ये असायचं. जणु श्रावणात धरणी जशी हिरवळीने सजुन जाते आणि वातावरण कसं प्रसन्न वाटतं अगदी कॉलेजमध्ये तसंच वाटत असायचं, एकप्रकारे जणु कोणीतरी जादुची कांडी फिरवलेली असायची व्हॅलेंटाईन डे असला की..! 
             पेपर झाल्यानंतर स्वराली आणि मैथिली दोघीजणी अर्जुनच्या वाढदिवसाला काय खास तयारी करायची याचा विचार करु लागल्या. "हे स्वराली, अर्जुनचा बर्थडे १४ फेब्रुवारीला असता तर तुला तर काही टेंशन घ्यायचीच गरज नसती, व्हॅलेंटाईन डे ला अर्जुनचा बर्थडे, आणि स्वराली त्याला प्रपोझ करतेयं व्वा हाऊ रोमॅंटिक..!" असं मैथिली तीला बोलली. "छे, मैथिली काहीपण डोकं चालवु नकोस तु, अर्जुन माझा बेस्ट फ्रेंड आहे कळलं, तु मला असंच चिडवणार असशील तर मी चालले," असं स्वराली थोडी लाजतच बोलली. "बरं, नाही चिडवतं, पण माझी कल्पना छान होती ना? अगं खरंच त्याच्याबद्दल माझ्यापेक्षा तुलाच जास्त माहिती आहे ना, त्यामुळे तुलाच छान काहीतरी सुचेलच बघं, आणि तु त्याच्यासाठी काही केलं तरी ते त्याला खुप आवडेल बघं, तुला एक गोष्ट मनापासुन सांगते कदाचित तुला वाटेल की मी काहीपण बोलतेयं, पण मला वाटत तु अर्जुनला खुप आवडतेस, मी नेहमी बघते जेव्हा तो तुला बघतो तेव्हा खुप खुष असतो," असं मैथिली बोलली. मैथिलीच्या या बोलण्यानं स्वराली क्षणभर गप्पच होती. मैथिलीच्या त्या वाक्यांनी तीचं मन सुखावलं होतं. 
                 "हे कायं गं स्वराली, रागावलीस का माझ्यावर?" असं मैथिली गप्पच असलेल्या स्वरालीला बोलली, मानेनचं तीनं नकार दिला आणि त्या दोघी घरी परतल्या. कॉलेजमध्ये अर्जुनचा ग्रुप दुपारी कॅंटीनमध्ये गप्पा मारत होता. "दोस्तांनो, तुम्हाला आज एक गुडन्युज देण्याचं मी आणि तेजालीनं ठरवलंय बरं का?" असं रितेश बोलला. "अरे व्वा, सांग की लवकर, शुभ काम में देरी क्यों?" असं शामली बोलली. "०७-०७-२००७ ला आम्ही सात फेरे घेऊन सातजन्माच्या बंधनात अडकणार आहोत.!" असं रितेश बोलला. "अरे म्हणजे तुम्ही कॉलेज पासाआऊट झाल्यानंतर  लगेच लग्न करणार आहात? आईशप्पथ काय सॉलिड गुड न्युज दिलीस रे, खरंच का?" असं हर्षित एकदम एक्साईट होऊन बोलला. "अगं तेजाली खरंच?" असं बाकीच्या मुली तिला बोलल्या. रितेश आणि तेजाली दोघांनी हसतच मान हलवुन होकार दिला. "अरे पण हे असं अचानक घडलं कसं रे?" असं अर्जुन बोलला. "अरे काल हिचा बर्थ डे होता, हिच्यासाठी मला काहीतरी खरचं खुप खास करायचं ठरवलं होतं, तिला घरी गेल्यानंतर मी आई-बाबांना तेजालीशी लग्न करणार असल्याचं सांगितलं, आई-बाबांनी विचार करुन होकार दिला, आणि आम्ही सगळे मग थेट तेजालीच्या घरी गेलो, तिथे माझे आई-बाबांनी तिच्या आई-बांबाशी बोलणी केली, आणि सगंळ जणु स्वप्नासारखं वाटावं असं घडलं." असं रितेश बोलला. "अरे खरचं याला म्हणतात प्रेम, तेजाली- रितेश तुम्ही दोघं मेड फॉर इच ऑदर आहात यात कुठलीच शंका नाही, कॉंग्रॅट्स..!"असं लावण्या बोलली. सगळ्या ग्रुपनं मग त्यांच अभिनंदन केलं. 
              "चला यंदाचा व्हॅलेंटाईन एकदम खास ठरेल तर मगं," असं अर्जुन बोलला. "अरे आमचा तर प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे पेक्षा काही कमी खास असतो का?" असं रितेश तेजालीकडे  बघुन बोलला. त्याच्या या वाक्यानं तेजाली पुरतीच लाजुन गेली, आणि जमलेल्या सगळ्यांना हसु आलं. थोड्यावेळानं मग ते लेक्चरला गेले. आज लेक्चरला त्यांना अनायसे ऑफ मिळाला, वर्गात मग मुलं-मुली जस्ट-अ-मिनिट खेळु लागले. "अर्जुन, तुला एक गोष्ट सांगतो तुला हसु येईल, बघं ना दरवेळी सोहम असायचा तर या बाकीच्या मुलांचा नुसता जळफळाट व्हायचा ना..! सोहम असं काही सादर करायला लागला की मुली काय खुष व्हायच्या, मागची मुलं त्याला कशी विनवत म्हणायची, "भाई एखादी तरी राहुद्या ना आमच्यासारख्यांवर प्रेम करण्यासाठी, सगळ्या मुली तुमच्याच प्रेमात पडायला लागल्या तर आम्हाला तर या वयात हिमालयात जायची वेळ येईल, कॉलेज लाईफमध्ये एकही गर्लफ्रेंड नाही असं सांगितल्यावर हसतात की बाकीचे..! काहीतरी दया करा तुमच्या भक्तांवर, आम्हाला काही टिप्स द्या," असं हर्षित बोलला. "हो रे, पण नुसतेच मागचे मुलं नाही तर तु सुद्धा असायचाच की त्यांच्याजोडीला विसरलास का?" असं म्हणत अर्जुनने त्याला कोपरखळी दिली, आणि मग ते दोघही हसायला लागले. 
                         वर्गात जस्ट-ए-मिनिटचा खेळ चांगलाच रंगात आला होता, तितक्यात लावण्या उठली आणि हर्षितला बोलली, "कविराज उठा, एखादी कविता म्हणा की..!" तीनं सगळ्यांसमोर त्याला कविता म्हणायला उठवलं हे बघताच वर्गात सगळी मुलं-मुली "कम ऑन कविराज, कविता, कविता," असं म्हणु लागले. हर्षित मग लाजतच कविता सादर करायला समोर आला, "चला मित्रांनो, खास तुमच्या आग्रहासाठी मी माझी नवंकविता सादर करतोय, "तो आणि त्याची ती" असं हर्षित बोलला. तितक्यात वर्गातल्या मुली एकासुरात ओरडल्या, "हर्षित कविता कुणाला डेडिकेट करतोय रे?" आणि सगळे हसायला लागले, लाजतच हर्षित बोलला, "लावण्या फक्त तुझ्यासाठी." सगळ्या मुली परत त्याला बोलल्या, "ऐकु नाही आलं, वन्स मोअर." आणि मग हर्षितने लावण्याकडे बघितलं, तिच्या नजरेला नजर भिडवत तो पुन्हा मोठ्यानं बोलला, "लावण्या फक्त तुझ्यासाठी," आणि त्यानं ती कविता सादर केली. वर्गातल्या प्रत्येकानं मनापासुन त्याला दाद दिली, कविता झाल्यानंतर मिनिटभर वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. लावण्या तर मनोमन सुखावली होती, तर हर्षितला जणु स्वर्गच सापडला इतका आनंद झाला होता. 
               अशीच मजा लेक्चरमध्ये येत असल्याने हल्ली मुलांचा अटेंडन्स १००% असायचा. टिचर्स रुममध्ये सर्व शिक्षक आप-आपसांत गप्पा मारतांना म्हणायचे, "कॉलेजध्ये निदान दोन महिन्यांनतर एखादा इव्हेंट ठेवायलाच हवा, म्हणजे नेहमी मुलांना अटेंडन्सच सांगायची कटकट चालली जाते, लेक्चरला मुलं लक्ष देतात, बरोबर का नाही पोद्दार मॅडम," असं बच्छाव सर बोलले. "हो ना, हेच तर वय असतं त्यांच शिकता शिकता मजा करायचं, कॉलेजचे दिवस परत परत थोडेच मिळतात, यंदाच्या सगळ्या बॅचेस खरच खुप ऍक्टिव्ह आहेत बरं का, आणि त्यातही हर्षित जोशीची बॅच खुपच छान आहे, मला तर माझे कॉलेजचे दिवस आठवतात त्यांच्या वर्गावर लेक्चरला गेलं की." असं सौ. पोद्दार मॅडम बोलल्या. इतर शिक्षकांनाही यानिमित्तानं त्यांच्या आठवणींची आठवण व्हायची.
                    कॉलेज सुटल्यानंतर आज अर्जुन एकटाच घराकडे चालला होता, घरी लवकर जाऊन त्याला स्वरालीला भेटायची ओढ लागली होती. हल्ली त्याला स्वरालीला भेटल्याशिवाय रहावतं नव्हतं, म्हणुनच त्याच्या पायांची गती वाढली होती. तितक्यात त्याच्या लक्षात आलं की कोणीतरी त्याला माघुन हाक मारतयं त्याने मागे वळुन बघितलं तर त्याला चिराली दिसली. "अरे अर्जुन थांब ना, केव्हाची हाक मारतेयं रे, पण तुझं लक्षंच नव्हतं," असं ती एका दमात बोलली. "अगं जरा घाईतच होतो, पण तु सांग काय काम आहे?" असं अर्जुनने तिला विचारलं. "अरे तुला कसं सांगु रे, तुला तर सगळं महितीच आहे ना, सोहमला फार मिस करते रे." असं म्हणतांना ती उदास झाली होती. अर्जुनने तिच्याकडे सहानभुतीनं बघितलं आणि बोलला, "तुझ्या इतकचं आम्ही सगळेही त्यालाच नाहीतर बाकीच्या सगळ्यांना मिस करतो गं, आजच जस्ट-ए-मिनिट सुरु होतं त्यावेळीच हर्षितनं त्याची आठवण काढली होती." 
            "तेजाली आणि रितेशला बघितल्यावर मला सोहमच आठवतो रे, मला पुर्ण जाणीव होती की वर्गातल्या बर्‍याच मुली त्याच्यावर जीवापाड प्रेम करायच्या आणि तोही." असं म्हणतांना तिचे डोळे पाणावले. अर्जुनला तिला कसं समजवावं हा प्रश्न पडला. "रस्त्याच्या मध्ये उभं राहुन त्याच्यासाठी खुप मोठ्यानं रडावसं वाटतं, कुणी नाही निदान त्या चंदेरी चंद्रालाच माझ्या आसवांच कारण कळावं रे, त्याला मी कधीच विसरु शकत नाही रे अर्जुन." असं चिराली त्याला बोलली. तितक्यात तिथे मिताली आणि शामलीही येऊन पोहचली. अर्जुनने त्यांना चिरालीच्या दुखाःच कारण सांगितलं, मग त्यांनी तिला समजावलं, आणि मग ते घराकडे परतले.
                घरी आल्यावर अर्जुनला स्वरालीला भेटायचं होतं, दिवसभरात जे घडलं ते तिला सांगायचं होतं, म्हणुन तो तिची वाट बघत अंगणातच थांबला होता. पण रात्रीचे आठ वाजले तरी स्वराली अजुन कशी आली नाही म्हणुन त्याच मन बैचेन झालं होतं, "असं कसं झालं आज, स्वरालीची तब्येत तर बरी नसेल ना? रोज ती मला भेटायला येते आणि आज?" असं अर्जुन स्वगतच बोलला, आणि त्याने स्वरालीच्या घरी जाऊन तिला भेटुया असं ठरवलं. तिच्या घरी गेल्यावर त्याला कळालं की स्वराली आज अभ्यासासाठी मैथिलीच्या घरीच रहाणार होती. अर्जुन मग घरी आला, "मैथिली कुठे रहाते, ते विचारायला हवं होतं आपण, निदान तिचा फोन नंबर तरी घ्यायला हवा होता, छे आज काही स्वरालीशी बोलण होणार नाही असं दिसतेयं," असं अर्जुन मनातच बोलत होता तोच त्याच्या घरच्या फोनची रिंग वाजली. 
           "नक्कीच स्वराली असणार..!" असं आनंदाने म्हणत त्याने तो फोन उचलला, आणि समोरुनही स्वरालीच बोलतच होती. "अगं स्वराली तुला माहिती आहे का, केव्हाचं तुझी आठवण काढत होतो बघं, इतक्यात तुझ्या घरी जाऊन आलो आणि कळलं की तु तर आज मैथिलीच्या घरी आहे ते, बरं तुझा पेपर कसा होता?" असं अर्जुन बोलला. "अरे अर्जुन, पेपर तर इतका सोप्पा होता की बस्स, मैथिलीलापण खुप सोप्पा गेला पेपर, आणि सॉरी अर्जुन तुला न सांगताच इकडे आले, उद्या मॅथचा पेपर आहे ना, म्हणुन मी आणि मैथिलीनं एकत्रच अभ्यास करायचं ठरवलं होतं." असं स्वराली त्याला बोलली. "छे गं, त्यात काय सॉरी म्हणतेस, तुझा पेपर महत्वाचा आहे, मन लावुन अभ्यास करा दोघीपण, उद्या येईल तुमचा पेपर झाला की भेटुया, आता फोन ठेवतो तुम्हाला अभ्यासात डिस्टर्ब नको, चल गुड नाईट," असं म्हणुन अर्जुनने फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतरही त्याला स्वरालीशी बोलायची इच्छा होत होती. 
                 हर्षित थोड्यावेळानं अर्जुनच्या घरी आला, "हाय अर्जुन, तुझ्याकडे एक काम आहे यार, पण आपल्या दोघांशिवाय लावण्याला कळायला नको," असं हर्षित बोलला. "अरे असं कोणत काम आहे? आणि लावण्यापासुन आत्ताच लपवाछपवी करायला लागलास का?" असं अर्जुन हसतच बोलला. "अरे तसं नाही रे, तुला तर माहिती आहे ना परवा व्हॅलेंटाईन डे आहे ते, माझ्या आयुष्यातला पहिलाच आहे म्हणुन तो एकदम स्पेशल करायचा आहे रे," असं हर्षित बोलतांना उतावीळ झाला होता. "अरे हर्षित, तु तर असं बोलतोयं जसं की तो तुझा पहिला आणि शेवटचा. जाऊदे बरं काही ठरवलयं का?" असं अर्जुन हसतच त्याला बोलला. "नाही रे, हे असलं पहिल्यांदाच आहे ना आपल्या आयुष्यात भाई," असं हर्षित बोलल्यावर अर्जुनला हसु आवरणं अवघड झालं, "तु तर असा म्हणतोय की मला खुप सार्‍या व्हॅलेंटाईन डे चा अनुभव आहे, मी काय तुला मदत करणार? सोहम असता तर नक्की मजा आली असती बघं," असं अर्जुनने त्याला समजावलं. "अरे तु असं का बोलतोयं? म्हणजे तु आणि स्वराली." असं हर्षित बोलला, त्याला मध्ये थांबवतच अर्जुननं त्याला सांगितलं, "हे हर्षित, असं काही मनात विचार करु नको रे, ती आणि मी दोघंही बेस्ट फ्रेंड्स आहोत बस्स..! अर्जुनचं वाक्य मध्येच थांबवत हर्षित बोलला, "यार, तु तर रिलेशन स्टॅटसच क्लियर केल्यासारखं बोलतोयं, पण मला नाही वाटत तुम्ही नुसतेच बेस्ट फ्रेंड्स आहात, तुमच्यात त्यापेक्षाही खास नात आहे असं मला वाटतं रे, तु आणि स्वराली एकत्र का येत नाही तेच आम्हाला कळत नाही बघं, मला माहिती आहे की ती तुला खुप आवडते, मग तु का तिला प्रपोझ नाही करत रे अर्जुन? सोहम म्हणायचं तसं अभी नहीं तो कभी नहीं रे.!" असं हर्षितनं त्याला विचारलं. 
              हर्षितच्या प्रश्नानं अर्जुन निरुत्तरीत झाला, हर्षितला काय सांगावं हे त्याला सुचेना, "अरे माझं जाऊदे रे, आपण ठरवुया ना लावण्या आणि तुझ्या बद्दल," असं अर्जुन बोलला, "विषय बदलु नको अर्जुन, आधी मला सांग तु स्वरालीला सांगणार आहेस की नाही?" असं हर्षितच्या बोलण्यावर अर्जुनने क्षणभर त्याच्याकडे बघितलं, "काळ आला आहे रे, पण अजुन वेळ आली नाही हर्षित..!" असं म्हणत अर्जुनने हर्षितला परत त्याबद्दल बोलायला मनाई केली. थोडावेळानं मग हर्षित तिथुन निघुन गेला, तो गेल्यावर अर्जुन हर्षितच्या बोलण्याचा विचार करु लागला. त्याला एकदा वाटायचं की स्वरालीला सांगावं की तो तिच्यावर प्रेम करतो ते, पण पुन्हा त्याच्या मनानं तो विचार केव्हाच खोडलेला असायचा. आकाशात दाटुन आलेल्या काळ्या मेघांच्या उपस्थितीनं धरणी जशी सुखावते अगदी तसंच अर्जुनच्या मनाचं झालं होतं, स्वरालीच्या नसण्यापेक्षा ती असण्यानेच तो समाधानी होता. 

Saturday, November 3, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१५


              त्या रात्री स्वरालीला झोपच लागत नव्हती. अर्जुन काय बोलला होता, याचाच विचार तिच्या मनात सुरु होता. अर्जुनला मी खरचं इतकी आवडते का? या प्रश्नाचं उत्तर तिला हवं होतं. अर्जुनने फक्त विचारायचीच देरी आहे, असं तिला वाटायचं. अर्जुनला ती तिचा बेस्ट फ्रेंड मानत होती, पण त्या दोघांतलं नातं निव्वळ मैत्रीपुरतच मर्यादित नव्हतं हे तिला जाणवायचं. तिचं मन पहिल्यांदा खुप चंचल होतयं असं तिला वाटलं. नंतर ती अर्जुनला उद्या अलकाकाकुंना भेटवणार होती ते तिच्या लक्षात आलं, अलकाकाकुंना अर्जुन नक्कीच आवडेल असं तिला वाटत होतं. सकाळी आठ वाजता स्वराली अर्जुनच्या घरी आली. "अर्जुन, आत्ता चल ना माझ्या घरी, तुला कोणाला तरी भेटवायचं आहे." असं स्वराली बोलली. "अगं इतक्या सकाळी कोणाला भेटवणार आहेस?" असं अर्जुन बोलला. "तु इथेच बोलत बसणार आहेस का अर्जुन? चल ना पटकन." असं स्वराली त्याला बोलली. मग ते दोघेही स्वरालीच्या घरी आले. "अलकाकाकु, हा बघा हा अर्जुन, अर्जुन ह्या अलकाकाकु, आईची बालपणीची सखी." असं स्वराली एकदम प्रफुल्लित होऊन सांगत होती. 
         अर्जुनबरोबर मग त्यांनी थोडावेळ गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांना जाणवलं की त्यांनी अर्जुनबद्दल जे मत मनात तयार केलं होतं ते किती चुकीचं होतं, अर्जुन खरंच खलनायक नाही तर त्यांना नायक वाटायला लागला. थोड्यावेळानं अर्जुनच लक्ष घड्याळाकडे गेलं, "येऊ का काकु मी, कॉलेजला जायचं आहे मला..!" असं अर्जुन बोलला, जातांना तो त्यांचा आशिर्वाद घ्यायला विसरला नाही. अलकाकाकु त्याच्या या वर्तनाने  खुपच खुष झाल्या, अर्जुन गेल्यानंतर त्या स्वरालीला बोलल्या, "स्वराली एकदम छान स्वभावाचा मित्र आहे बघं अर्जुन, अगं या कलयुगात मुलं स्वतःच्या आई-वडीलांच्या पाया पडायला कचरतात, अर्जुनवर खरचं खुप छान संस्कार झालेले आहेत, त्याच्यासारखा विनयशील मुलगा मी आजवर बघितला नाही. आमच्या स्वच्छिलला एकदा अर्जुनला भेटवायलाच हवं.!" अलका काकुंच्या तोंडुन अर्जुनची स्तुती ऐकुन स्वरालीला अर्जुनाचा खुप अभिमान वाटला, ती जाम खुष झाली. "अगं स्वराली, तुझी बारावीची परिक्षा झाली की अर्जुनला नक्की घेऊन ये आमच्या घरी," असं अलका काकु बोलल्या. थोड्यावेळानं अलकाकाकु स्वरालीच्या आईसोबत बसस्टॅंडवर गेल्या, बसमध्ये चढण्यापुर्वी त्या स्वरालीच्या आईला बोलल्या, "अश्विनी, तु काल रात्री बोलली ते खरंच होतं बघं, अर्जुनबद्दल माझ्या मनात अनेक शंका होत्या, पण आज त्याला सकाळी भेटल्यावर एकदम मतपरिवर्तनच झालं बघं, खरचं तुझ्या स्वरालीसाठी अर्जुन खरंच एकदम सुयोग्य जोडीदार ठरेल बघं." स्वरालीच्या आईलाही खुप बरं वाटलं होतं. 
                 कॉलेजमध्ये आल्यावर अर्जुन हर्षितला भेटला, "काय कविराज, काय म्हणत होती लावण्या?" असं अर्जुन बोलल्यावर हर्षित जरासा लाजला. "अरे आपण उगाच तिला मिस. इगो म्हणायचो रे, खरतर ती एकदम मस्त आहे स्वभावाला, पण सोहम म्हणायचा तशी थोडी रिझर्व्ह टाईपची आहे रे. अर्जुन, काल खरचं माझ्या आयुष्यातली सुंदर सायंकाळ होती बघं.!" असं हर्षित बोलला. अर्जुन आणि हर्षित तिथे गप्पा मारत उभे होते, तिथे मग चिराली, शामली, मिताली आणि रितेशपण आले, "अरे अर्जुन आज तेजालीचा वाढदिवस आहे रे, तिला सरप्राईज द्यायचं आहे पण काही सुचतच नाही, एखादी आयडिया सांग ना?" असं रितेश बोलला. "अरे आम्हाला तर काही सुचलंच नाही बघं, तुम्ही काही तरी सुचवा याला, पहिली गोष्ट म्हणजे हा तिचा बर्थडे विसरला, मी त्याला सांगितल्यावर आत्ता कुठे याला भान आलं," असं केतकी बोलली. मग सगळेजण विचार करत बसले होते, तितक्यात चिरालीला तेजाली येतांना दिसली, "अरे तेजाली येतेयं बरं का." असं ती बोलली. "अरे अर्जुन, आज तर माझं ब्रेकअप पक्क आहे यार, ती इथे यायच्या आत चल इथनं," असं रितेश बोलला. मग अर्जुन आणि रितेश दोघही तिथुन हळुच निघुन गेले. 
            "हॅपी बर्थडे तेजाली," असं तेजाली आल्यानंतर हर्षित, शामली, केतकी आणि चिराली एकसुरात बोलले. "थॅंक्स फ्रेंड्स," असं तेजाली बोलली, जरा उदास मुडमध्येच. "काय गं तेजाली, रितेश कुठे आहे? मला वाटलं तुम्ही दोघं नेहमीप्रमाणे बरोबर एकत्र येणार आहात? आहे कुठे तो? असं हर्षित मुद्दाम बोलला. "कुठे गेलायं काय माहिती, माझा बर्थडे आहे हे पण त्याच्या लक्षात नसणार, काल रात्रीपासुन त्याच्या फोनची वाट बघत होते, पण साधा एक एस.एम.एस. सुद्धा पाठवला नाही त्याने, सकाळी वाटलं तो घ्यायला येईल पण आलाच नाही," असं म्हणतांना तेजालीचा चेहरा हिरमुसला होता. "येईल गं, अगं एकवेळ तो त्याचा बर्थडे विसरुन जाईल, पण तुझा बर्थडे तो विसरणं शक्यच नाही. त्याला माहिती आहे ना तेजाली रागवेल, असेल कॅंम्पसमध्येच तुला शोधत, कदाचित तुला सरप्राईज देणार असेल तो." असं मितालीनं मग तिला समजावलं. तितक्यात कॉलेज सुरु झाल्याची बेल झाली, लेक्चरला तेजालीचं मन रमत नव्हतं. ती सरांची नजर चुकवुन रितेशला फोन करत होती, पण रितेशने तिचा फोन उचलाच नाही. तासाभरानंतर त्यानं तिला मेसेज पाठवला, "हा मोबाईल नं कोणाचा आहे, मुर्खासारखं केव्हाचा मिसकॉल देतोय?" त्याच्या ह्या मेसेजमुळे तेजालीला रडुच आलं.
                  तेजालीच्या शेजारी बसलेल्या शामलीनं तिला हळुच विचारलं, "कायं गं काय झालं, का रडतेयं?" तेजालीनं तिला रितेशचा मेसेज दाखवला. "येऊ दे त्याला, आज बघतेच त्याच्याकडे." असं ती बोलली. कॉलेज सुटायच्या थोडावेळ अगोदर रितेश आणि अर्जुन दोघंही कॉलेजच्या गेटवर येऊन थांबले. कॉलेज सुटल्यानंतर समोरुन सुप्रिया येतांना दिसताच रितेश कान पकडुन उठबशा काढायला लागला, "हॅपी बर्थडे तेजाली.. सॉरी तेजु.." असं कॉलेजच्या गेटवर रितेश बोलत होता. त्याला बघताच तेजालीच्या डोळ्यांत आनंदाश्रु दाटुन आलं, धावतच ती त्याच्याजवळ गेली. "रितेश, जा कट्टी, किती तरसवलंस.." असं म्हणत तीनं त्याच्याकडे बघितलं, "सॉरी राणीसरकार, अहो तुमच्यासाठी नजराणे आणण्यास गेलो होतो." असं म्हणत रितेशनं अर्जुनला खुणवलं. तेजाली एकवीस वर्षाची झाली होती म्हणुन रितेशनं ’चॉकलेट्स, ग्रिटींग्स, पर्फ्युम, टि-शर्ट, टेडी बेअर, मेक अप किट, तिचा फोटो असलेली फोटोफ्रेम, इयर रिंग्स, ब्रेसलेट, तिला आवडणार्‍या जुण्या पिक्चर्सची सिडी, गुलाबाच्या फुलांचा बुके, घड्याळ, एक छान कादंबरी, डायरी, साडी, पैंजण, ताजमहालाची अप्रतिम प्रतिकृती, बांगड्यांचा सेट, तिचा फोटो असलेला चॉकलेट केक, लेदर पर्स, तिचा आणि त्याचा फोटो असलेलं लॉकेट, असे तिच्यासाठी सुंदर २१ गिफ्ट त्याने घेतले होते, एक एक गिफ्ट तिला तो देत होता, आणि त्यासोबत "हॅपी बर्थ डे टु यु... हॅपी बर्थ डे टु यु.. हॅपी बर्थ डे डियर तेजु हॅपी बर्थ डे टु यु.." असं रितेश म्हणत होता, त्याच्यासोबत त्याच्या ग्रुपनही सुंदर साथ दिली. तेजालीला खुप आनंद झाला, तीनं रितेशला मिठी मारली, "थॅक्स रितेश," असं ती त्याला बोलली. "काय गं भांडणार नाहीस का?" असं त्यानं तिला चिडवलं, "आजपासुन आपण भांडायचं नाही रे." असं तेजाली बोलली. "हे तेजु असं नको करुस गं, तुझ्याशी भांडलो नाहीतर करमत नाही, तुझं माझं जमेना, तुझ्याविना करमेना, हे असंच राहु दे, काही म्हण रडु आलं की खुप सुंदर दिसतेस तु, आय लव्ह यु तेजाली..!" असं रितेश तिला बोलला.
                      "अरे तुम्ही दोघं बोलतच बसणार आहात का? आम्हाला पार्टी हवी तेजाली." असं लावण्या बोलली. "अरे मग वाट काय बघतायं, चला कॅंन्टीनला, आज तेजाली नाही मी देईल पार्टी" असं रितेश बोलला. पार्टी झाल्यानंतर "रितेशने काय छान गिफ्ट घेतले ना रे हर्षित," असं लावण्या बोलली. "हं, तुझा बर्थ डे असल्यावर बघं..!" असं हर्षित बोलला. पार्टी झाल्यानंतर रितेश तेजालीला तिच्या घरी घेऊन गेला. "रितेश आज खरंच तु माझा वाढदिवस अविस्मरणीय केलास रे, कसं काय सुचलं तुला हे सगळं?" असं तेजालीनं त्याला विचारलं. "अगं खरं तर मला काही सुचतंच नव्हतं, आज सकाळी तुला येतांना बघितलं आणि अर्जुनबरोबर मी तिथुन निघुन गेलो. कितीतरी वेळ मी विचार करत होतो, पण काही सुचतच नव्हतं, शेवटी अर्जुनलाच विचारलं, स्वराली जर त्याची गर्लफ्रेंड असती तर त्यानं तीला काय गिफ्ट दिलं असतं? मग त्यानंच सांगितलं की तुला एकवीस वर्ष पुर्ण झालेत म्हणुन २१ गिफ्ट दे..!" असं रितेश बोलला. 
                   "अर्जुन किती रोमॅंटिक आहे ना. खरचं रे मला तर मनापासुन वाटतं की त्याचं आणि स्वरालीचं कमिटेड रिलेशनशिप असावं." असं तेजाली बोलली. "त्याला गरज आहे गं तीची, मैत्री जिथे असते त्यावेळी कसलीच गरज नसते, आणि जेव्हा गरज असते त्यावेळी मैत्री पेक्षाही प्रेमाचीच जास्त गरज असतेच असते. आपला सगळा ग्रुप होता त्यावेळी त्याला आपण त्याच्या एकटेपणाची जाणीवपण होऊ दिली नाही, पण आता आपला ग्रुप नुसताच नावाला राहिला आहे गं, ह्या २२ फेब्रुवारीला त्याचा बर्थडे आहे, होप त्यादिवशी तरी." असं रितेश बोलला. "स्वरालीशी बोलायचं का आपण?" असं तेजाली बोलली. "वेडी आहेस का तेजु तु? अगं तिची बारावीची परिक्षा आहे, आणि असं अचानक कसं तीला सांगणार, गोंधळुन जाईल ती, जे काही करायचं ते अर्जुनलाच करु देऊया.!" असं रितेश बोलला.
            कॉलेजवरुन घरी आल्यानंतर अर्जुनला भेटायला स्वराली त्याच्या घरी आहे. "अर्जुन, अर्जुन आज मी खुष आहे तुझ्यावर.!" असं स्वराली आनंदानं त्याला बोलली. "काय झालं स्वराली?" असं अर्जुनने स्वरालीला उस्तुक्तेनं विचारलं. "अरे आज तु आमच्या घरी आलास ना अलकाकुंना भेटायला, त्या खुप इंप्रेस झाल्यात, तुझा स्वभाव एकदम आवडला त्यांना, आणि त्यांनी तुला त्यांच्या घरीपण बोलवलयं, माझी परिक्षा झाली ना की सुट्टीत जाऊया आपण?" असं स्वरालीनं अर्जुनला विचारलं. "हो जाऊया, पण तुझी परिक्षा तर संपु दे, उद्या तुझा केमिस्ट्री-१चा पेपर आहे ना, झाला अभ्यास?" असं अर्जुन तिला बोलला. "हो रे आज अलकाकाकु गेल्यानंतर दिवसभर अभ्यास करत होते, पुर्ण ३ रिविजन्स करुनच उठले, आता रात्री परत थोडा अभ्यास करेल." असं स्वराली बोलली. "हं अभ्यास करुन दमलीस वाटतं तु? काही करु का खायला आपल्यासाठी? तु सांग तुला काय आवडेल?" असं अर्जुन बोलला. "अरे आता सायंकाळ झाली, आठ वाजता बाबा आले की मग जेवण करायचं असतं, मग भुक कशी लागेल? आणि कशाला माझ्यामुळे तुला कशाला त्रास?" असं स्वराली बोलली. "हे त्रास काय त्यात, तुला मॅगी नुडल्स आवडतात ना? बस आलोच मी दोन मिनीटांत," असं अर्जुन स्वरालीला बोलला आणि किचनमध्ये वळला. 
           अर्जुनच्या पाठीमागे स्वरालीपण त्याच्या किचनमध्ये आली, "अर्जुन तुला सगळा स्वयंपाक येतो का रे?" असं तीनं त्याला विचारलं. "हो गं स्वराली, शिकलोय सातवीपासुनच" असं अर्जुन अभिमानानं बोलला. "किती छान, मला सांगु काय काय बनवता येतं, चहा, रसना, कोकम सरबत आणि मॅगी बस इतकच बनवता येते. पण मी सुट्टीत शिकणार आहे कुकिंग." असं स्वराली बोलली. अर्जुन तिच्याकडे बघुन हसला, तयार झालेली मॅगी मग त्याने छान तिला सर्व्ह करुन दिली, आणि स्वतःलाही घेऊन मग ते दोघंही हॉलमध्ये येऊन गप्पा मारत बसले. अर्जुनने तिला तेजालीच्या बर्थडे ची गंम्मत सांगितली. "अरे अर्जुन, आज तेजालीचा बर्थडे होता, मला सांगायंच ना सकाळी, ए ती फार चांगली आहे रे, तुझी मॅच बघायला आठवणीने घ्यायला आली होती रे मला, चल अर्जुन आपण तिला फोनवरुन बर्थडे विश करुया ना..!" असं स्वरालीनं अर्जुनला आग्रह केला. 
      स्वरालीचा आग्रह मग अर्जुन थोडेच टाळणार होता, मग त्याने तेजालीला फोन केला, "ऐ तेजाली, तुला अजुन एक खास गिफ्ट माझ्याकडुन जरा डोळे बंद कर, हं ऐक आता," असं अर्जुनने तिला म्हणत स्वरालीला फोन दिला. "हॅलो तेजाली दिदी, विश यु मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दि डे, हॅपी बर्थ डे..!" असं स्वराली एकदम मंजुळ आवाजात बोलली. "अरे व्वा, स्वरालीच बोलतेय ना तु?" असं तेजालीने तिला विचारलं. स्वरालीनंही फोनवरुन होकार दिला. पाच मिनिट मग त्या दोघी एकमेकींशी बोलत होत्या, "हे स्वराली, तुला एक गुपित सांगते बरं का, अर्जुनचा बर्थडे आहे २२ फेब्रुवारीला, आम्ही त्याला सरप्राईज देणार आहोत तु करशील ना आम्हाला मदत?" असं तेजालीनं तिला विचारलं. "अगं नक्कीच करेल ना," असं स्वरालीनही आनंदाने होकार दिला. फोन ठेवल्यानंतर अर्जुनने तिला विचारलं, "काय गं स्वराली, काय नक्की करणार आहेस?" "आमची गम्मत आहे, तुला कळेल नंतर." असं म्हणत स्वराली हसायला लागली. "तुम्हा मुलींच्या मनात काय चालतं ते कळणं खरच कठीण आहे बरं," असं अर्जुन तिला बोलला.