वेदाली, स्वराली आणि अर्जुनला घेऊन त्यांच्याघराजवळ असलेली इंडियन ऍंशियंट आर्ट गॅलरी बघायला घेऊन गेली होती, तिथे अस्सल भारतीय कला संस्कृतीचं दर्शन घडतयं असं जाणवल्याशिवाय रहात नव्हतं. विविध कलाकृती, मुर्ती, चित्र, कलाकुसरीच्या विविध वस्तुंच ते अनोखं प्रदर्शन होतं, स्वरालीला चित्रांचा विभाग खुप आवडला होता, ती ते चित्रं बघण्यात गुंग होती. "हे स्वराली, हे घे तुझ्यासाठी..!" असं म्हणत अर्जुनने तिला पुर्वीच्या काळी वापरात येणारे अनोखे कुंचले व रंग तिच्यासाठी खरेदी केले, त्याला बघुन स्वराली खुप खुष झाली. "हे वेदाली, तुला सांगु का, स्वराली उत्तम चित्रकार आहे बरं का, इंटरमिजिएटच्या परिक्षेत अव्वल होती ती..!" असं अर्जुन बोलला. "व्वा, म्हणजे स्वरालीला इथे आणलं ते नक्की बरं झालं, चल स्वराली तुला मी अजुन एक छान गिफ्ट देते," असं म्हणुन वेदालीने चित्र काढण्यासाठी पुर्वी वापरत तशी सुमारे दोन डझन कागद तिला घेऊन दिली. "थॅंक्स वेदाली, खरंच बघं ना किती कमालीची सुंदर आहेत ही सगळी पेंटिंग्स," असं स्वराली तिला बोलली, सुमारे तासभर ते प्रदर्शन बघत होते, नंतर तिथुन ते त्यांच्या घराजवळ असलेल्या गार्डनमध्ये गेले. गार्डनमध्ये असलेली मिनीट्रेन स्वरालीला जाम आवडली. दरम्यान ते तिघे गार्डन मध्ये गप्पा मारत बसले असतांना स्वच्छिल समोरुन आला. "सरप्राईज, सरप्राईज..! असं म्हणत त्याने आणलेली कॉटनकॅंडी स्वराली आणि वेदालीला दिली. "अरे तु इथे अचानक कसं काय आलास? असं वेदाली आश्वर्यचकित होऊन बोलली.
"हे अगं असं काय बोलतेस, तुच तर सांगितलं ना मला की गार्डनमध्ये ये असं, आणि तु या दोघांना घेऊन आलीस, चिंटु आणि त्याच्या गॅंगला विसरलीस का, टेंशन घेऊ नकोस मी घेऊन आलोय त्यांना, ते बघं ती तिथे गोळा खातायं..!" असं म्हणुन स्वच्छिलने जणु वेदालीवरच बाऊंसर टाकला. "स्वच्छिल, मला पण गोळा खायचा रे..!" असं स्वराली जणु लहान मुलीसारखं बोलली, आणि स्वच्छिल खुष होऊन बोलला, "अगं नुसता गोळा नको म्हणुस, जंबो गोळा खाऊ घालतो चल..!" असं म्हणुन तो त्या गोळ्यावाल्याकडे निघाला, त्याच्यामाघे स्वरालीपण निघाली तसा अर्जुनही उठला, स्वच्छिलकडे बघुन वेदाली हळुच बोलली, "स्वच्छिल म्हणजे एकदम कठीण आहे, एकादाचं शोधलंच त्याने..!" गोळा खाऊन झाल्यानंतर स्वच्छिल बोलला, "हे चला आपण एक ग्रुप फोटो काढुया, या दिवसाची आठवण म्हणुन, काय विचार आहे तुमचा?" "अरे व्वा, मस्त आयडिया आहे रे स्वच्छिल..!" असं अर्जुन त्याला बोलला. सायंकाळची वेळ असल्याने त्यागार्डन जवळ नेहमीच गर्दी असायची, त्यामुळे स्वच्छिल स्वरालीसोबत चालु लागला, आणि अनायसे अर्जुनला वेदालीची सोबत मिळाली. अर्जुन आजुबाजुची दृष्ये बघत चालु लागला, तर स्वच्छिल स्वरालीशी गप्पा मारत चालत होता, "हे स्वराली, तुला सांगु का, आपण जो फोटो काढु ना, मी त्याची स्टोनप्रिंट देईल तुला..!" असं स्वच्छिल स्वरालीला बोलला. "स्वच्छिल काय असतं रे स्टोनप्रिंट?" असं स्वरालीने त्याला विचारलं.
"अगं माझा मित्र फोटोग्राफर आहे, त्याने नुकतच एक मशीन मागवलयं, त्यातुन आपले फोटो दगडावर प्रिंट करता येतात, त्याला स्टोनप्रिंट म्हणतात, तुला सांगतो स्वराली, एखाद्या मुलीचा फोटो तिला असा स्टोन प्रिंट करुन प्रपोझ करावं, शप्पथ, ती नाही म्हणुच शकत नाही, कारण इतक्या इनोव्हेटिव्ह वे ने तिला कुणीच प्रपोझ केलेलं नसतं..! अगं प्लेटवर तर नेहमीच आपण फोटो बघतो, पण असा दगडावर फोटो असेल तर समोरचा खुष होणारच, कारण आपल्याकडे पुर्वीपासुन दगडावर फक्त देव-देवतांची चित्रं किंवा मुर्ती कोरलेल्या असता, त्यामुळे असा कुणाला स्टोनप्रिंट दिला की तो जणु आपल्याला देवासमानच आहे असं वाटल्याशिवाय राहत नाही..!" असं स्वच्छिल बोलला.
"खरंच खुप रोमॅंटिक आयडिया आहे रे..!" असं स्वराली बोलली. अर्जुन आणि वेदाली काय करतायं हे बघण्यासाठी स्वच्छिल सहज मागे वळला, "हे स्वराली, अर्जुन आणि वेदालीला बघं, दोघं कशी नवं लग्न झालेल्यांसारखी चालतायं एकमेकांसोबत लाजत लाजतं, अगदी मेड फॉर इच ऑदर वाटतायं ना..!" स्वच्छिल असं बोलल्यावर स्वरालीने माघे वळुन पाहिलं, आणि हसतच बोलली, "अरे हो, ते दोघं किती लाजत लाजत चाललीएं, पण ती दोघं मेड फॉर इच ऑदर नाही वाटत रे, तुला खरं सांगु का स्वच्छिल, तुझी आणि वेदालीची जोडी मस्तच वाटेल बघं, अरे आम्ही मघा गप्पा मारत होतो ना तेव्हा ती तुझी खुप तारीफ करत होती, स्वच्छिल असा, स्वच्छिलने लहानपणी असं केलं वैगेरे वैगेरे असं सांगतांना तिचा चेहरा खुप आनंदुन गेला होता. तु आवडतो रे तिला असं तिच्या बोलण्यातुन जाणवतं..!" असं स्वराली बोलल्यावर स्वच्छिल नुसताच हसला, आणि मनातच "खरंच वेदालीला इमोशनल फुल म्हणतो ते चुकीचं नाही, मला वाटलं तीने माझ्या खुप चुगल्या केल्या असतील, बिचारीनं तर माझी स्तुती केली आणि आयतंच माझ्या हाती कोलीत देऊन टाकलं..!