स्वराली आणि मैथिली दोघीजणी मॅथचा पेपर देऊन बाहेर आल्या, "अर्जुन कुठे दिसतोयं का बघं गं मैथिली, काल बोलला होता तो की पेपर झाल्यानंतर भेटुया," असं स्वराली अर्जुनला नजरेनं शोधतांना बोलली. तितक्यात तिला समोरुन अर्जुन येतांना दिसला, "तो बघं, काय आयुष्य आहे अर्जुनला, आत्ताच आठवण झाली आणि लगेच तो समोर, क्या बात है स्वराली, प्रेमात शक्ती असते हे ऐकलं होतं आज बघितलंही..!" असं मैथिलीनं तिला चिडवलं. स्वरालीला हसु आलं, तितक्यात अर्जुनही तिथे आला, "काय गं स्वराली का हसतेयं?" असं त्यानं तिला विचारलं. "काही नाही रे, मैथिलीच्या मनात काहीही सुरु असतं, अरे पेपर छान होता, सेक्शन वन थोडा चॅलेंजिंग होता बरं!" असं स्वराली त्याला बोलली. "अरे अर्जुन तु म्हंटल्याप्रमाणे आलास रे खरंच, मला वाटलं." असं मैथिली अर्जुनला बोलली. "अगं स्वरालीला कबुल केलं आणि आलो नाही असं होणारच नाही, आणि माझी काय बिशाद दिलेला शब्द मोडायची, स्वराली रागावली नसती का माझ्यावर?" असं अर्जुन हसतच बोलला. "हे अर्जुन, मी कधी रागावलेयं का तुझ्यावर रे? अगदी स्वप्नातही तुझ्यावर रागावेल असं मला वाटत नाही बघं." असं स्वराली जरा लाजतच बोलली. "व्वा बघं अर्जुन, ती रुसल्यावर तिला मनवायचा आनंद तुझ्या नशीबात नाहिऐ बघितलंस." असं म्हणत मैथिली हसु लागली.
स्वराली आणि मैथिली घरी गेल्यानंतर अर्जुन कॉलेजमध्ये आला. लेक्चर झाल्यानंतर त्याला खान सरांनी बोलावुन घेतलं, खान सरांनी त्याचं मेडिकल चेकअप करुन घ्यायचं ठरवलं होतं, अर्जुन आल्यानंतर त्यांनी अर्जुनला मेडिकल चेकअप बद्दल सांगितलं. अर्जुननेही सहमती दर्शवली, कारण ऑपरेशननंतर त्याला आपल्याला बॉक्सिंग करता येईल ना याची चिंता असायची, त्याचंच निरसण होण्यासाठी मेडिकल चेकअप होणं गरजेच होतं. "सर अर्जुनच्या मेडिकल चेकअप मध्ये काही प्रॉब्लेम असला तर?" असं तिथे उभा असलेला सखाराम शिपाई बोलला. "राजपुत का खुन उसकी रगों मे दौडता है, सखाराम अर्जुनका मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आएगा देखों, एक छोटासा ऑपरेशन मेरे अर्जुन को बॉक्सिंग करने से नहीं रोक सकता." असं खान सर मोठ्या आत्मविश्वासानं म्हणाले. त्यांचा आत्मविश्वास बघुन अर्जुनला बरं वाटलं, एकप्रकारे त्याच्या मनातली चिंता त्यामुळे थोडीशी कमी झाली. "खान सर बरोबर बोलतायं ते अगदी योग्यंच आहे, जरी मेडिकल रिपोर्ट मध्ये काही असु दे, अर्जुन सिराजसिंह राजपुतला बॉक्सिंग करण्यापासुन कोणीच रोखु शकणार नाही, एका ऑपरेशनमुळे मी खचलो तर राजपुत म्हणवण्याचा अधिकार तरी राहिल का मला?" असं अर्जुन मनातच बोलला. खान सरांना मग त्याने मेडिकल चेकअपची तारिख आणि वेळ विचारुन घेतली, आणि मग तो घरी परतला.
घरी आल्यावर अभ्यास करत असतांना त्याच्या डोक्यात व्हॅलेंटाईन डे बद्दल विचार सुरु झाले, "विल यु बी माय व्हॅलेंटाईन" असं त्यानं मनातच स्वरालीला विचारलं, नंतर तो स्वगतच हसला, "अरे काय अर्जुन, काय झालयं तरी काय तुला? अभ्यास कर अभ्यास," असं मग त्याने स्वतःच्या मनाला समजवलं आणि पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. आज अभ्यास करतांना त्याच चित्त विचलीत होऊ लागलं होतं, मग त्याने रितेशला फोन केला, "रितेश मला काहीच सुचत नाहिए रे, तु आणि तेजाली वेळ असेल तर याल का घरी?" असं त्याने त्याला विचारलं. थोड्यावेळानं मग रितेश आणि तेजाली दोघही त्याच्या घरी आले. "काय रे अर्जुन काय झालं," असं तेजालीनं त्याला विचारलं. "अगं आता कसं सांगावं तेच कळत नाहिए बघं, परवा उजाडेल त्या दिवसाचा विचारानं अभ्यासातपण आज मन लागत नाहिये," असं अर्जुनजरा लाजतच बोलला. "ए रितेश, अरे अर्जुन चक्क व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलतोयं बघितलं का? अरे व्वा कोण आहे ती लकी गर्ल? हं लेट मी गेस, स्वराली, बरोबर ना..? असं म्हणतांना तेजाली खुप आनंदुन गेली होती. अर्जुन तर पुरताच लाजुन गेला होता, "अर्जुनराजे, म्हणजे तिला प्रपोझ करायचा मानस तर नाही ना आपला?" असं रितेशनं त्याला चिडवलं. "तसा काही विचार केला नाही रे..!" असं अर्जुन बोलला. "तेजु, बघं अर्जुन एकदम आपल्या हर्षित सारखा बोलायला लागला हो की नाही?" असं रितेश तेजालीला बोलला. "अरे अर्जुन, हर्षितला लावण्याने प्रपोझ केलयं बरं, स्वरालीला सांगु का?" असं म्हणतांना तेजाली एकदम एक्साईट झाली, तितक्यात तिच्या माघुन स्वराली तिथे आली, "काय सांगयच मला तेजाली दिदी?" असं स्वरालीनं तिला विचारलं. स्वरालीला बघताच तेजालीनं अर्जुनला नजरेनच खुणवलं, "अगं काही नाही, तुझी बारावी झाली की आमच्याच कॉलेजला ऍडमिशन घे असं सांगायच होतं तिला," असं अर्जुन तेजाली काही बोलायच्या आत पटकन बोलला. तेजाली अर्जुनकडे बघुन हसली, "हो गं स्वराली, तु आमच्या कॉलेजमध्ये आलीस तर काय धम्माल येईल ना, याबद्दलच आम्ही बोलत होतो," असं तेजाली बोलली.
"अगदी माझ्या मनातही तसंच होतं तेजाली दिदी, आई-बाबांना सोडुन मी बाहेर नाही जाणार शिकण्यासाठी, अगं पण मी येईल त्यावेळी तुमचं फायनल इयर असेल ना." असं स्वराली तिला बोलली. "विचार जुळले की, मनातल्या भावना कळण्यास वेळ लागत नाही, असं कोणीतरी म्हणुन गेलं" असं रितेश बोलला. अर्जुनला हसु आलं, थोडावेळ मग ते चौघं जण गप्पा मारत होते. बोलता बोलता तेजाली मुद्दाम बोलली, "स्वराली परवा रितेश आणि माझा पाचवा व्हॅलेंटाईन डे आहे माहिती आहे." "अरे व्वा, किती छान.!" असं स्वराली खुष होऊन बोलली. "अगं स्वराली अर्जुनला विचारना काही..!" असं रितेश तिला बोलला. "अरे हो की, अर्जुनचं विचारायचंच राहिलं?" असं स्वरालीनं अर्जुनकडे कुतुहुलपुर्ण नजरेनं बघत बोलली. "हे तेजाली, रितेशला समजवं काहीतरी, आणि स्वराली माझ्या आयुष्यात अजुन तरी काही व्हॅलेंटाईन डे साजरा करायची वेळ आली नाही बरं." असं अर्जुन बोलल्यावर तेजाली, रितेश आणि स्वराली तिघंही हसायला लागले. "तुमच्या कॉलेजमध्ये होतो का स्वराली व्हॅलेंटाईन डे साजरा?" असं तेजालीनं तिला विचारलं. "नाही गं, असलं काही नसतं कॉलेजमध्ये, पण माझी मैत्रिण मैथिली मात्र खुप एक्साईटेड असते बरं, आम्ही अकरावीत असतांना एक मुलागा आला होता तिला रोझ द्यायला, तिच्याच कॉलनीमधला होता. पण तीने नाही घेतला, उलट ती इतकी चिडली की बस." असं स्वराली बोलल्यावर अर्जुनला हसु आलं. "कदाचित तु समोर असशील म्हणुन ती चिडली असेल बरं का स्वराली." असं अर्जुन बोलल्यावर स्वरालीलाही हसु आलं. थोड्यावेळानं मग ती तिच्या घरी गेली.
"अरे अर्जुन काय सॉलीड चान्स होता तुला, वेडाच आहे तु अशी सुवर्णसंधी परत आली असती का, विचारुन तर बघायचं ना तिला." असं तेजाली अर्जुनकडे बघुन बोलली. "अगं असं कसं एकदम अचानक तिला विचारु? मैथिली जशी त्या मुलावर चिडली तशी स्वराली पण चिडली म्हणजे?" असं अर्जुन तिला बोलला. "मी म्हंटल होतं ना तेजाली तुला, जे काही करायचं ते अर्जुनला स्वतःलाच करु दे, चला वेळ होतोयं, तुला तुझ्या घरी सोडायचं आहे." असं रितेश तेजालीला बोलला आणि मग ते दोघेही तिथुन निघुन गेले. स्वराली घरी परतल्यावर ती अर्जुनचाच विचार करु लागली. अर्जुनने फक्त विचारायचीच देरी आहे, असं तीचं मन तिला सांगायचं. तेजाली आणि रितेश सारखं, तीचं आणि अर्जुनचं नातं असाव असं तिला आता वाटु लागलं. बारावी पास झाल्यानंतर तीनं ठरवुन टाकलं की अर्जुनच्या कॉलेजलाच प्रवेश मिळवायचा.
रितेश-तेजाली गेल्यानंतर अर्जुनला वाटु लागलं होतं की बोलता बोलता स्वरालीशी त्यासंदर्भात विचारायला हरकत नव्हती, स्वराली आपल्याला तिचा बेस्ट फ्रेंड मानते हे त्याला चांगल ठाऊक होतं, ती नुसतीच त्याला बेस्ट फ्रेंड मानते की अजुन काही, हे कधी ना कधी तरी विचारायलाच हवं असं त्याला वाटु लागलं. दरम्यान त्याला उद्या त्याच्या मेडिकल चेक अपची आठवण झाली आणि मग तो झोपी गेला. दुसर्या दिवशी अर्जुनचं मेडिकल चेक अप झालं, त्याचे रिपोर्ट २४ तासांनंतर समजणार होते, रिपोर्ट मध्ये नक्की काय आहे हे त्याच्या बरोबर जाणुन घ्यायला खान सर पण उत्सुक होते. कॉलेजला परतल्यावर उद्या असणार्या व्हॅलेंटाईन डेच्या वातावरण निर्मितीला आजपासुनच सुरु झालीए असं अर्जुनला वाटतं होतं. कॉलेजच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तपालनाची आधीच ताकीद दिलेली होती, व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली काही अशोभनीय वर्तन, मुलींची छेड काढणं, किंवा कोणतही अश्लील वर्तन आढळुन आल्यास कडक कारवाई करणार असल्याचे संकेत प्राचार्यांनी दिलेले होते. कॉलेजच्या कॅंटीन मालकाने देखील कॅंटीन विविध रंगबेरंगी फुलांनी, फुग्यांनी सजवली होती. विध्यार्थ्यांच्या आग्रहामुळे शिपायांनी कॅम्पस ऐरवी असायचा त्यापेक्षाही अधिक स्वच्छ करुन घेतला, स्टुडंट्स कॉर्नर तर खास सजवण्यावर भर होता. प्रेमावरचे लेख, कविता, पेंटिग्स, कथा यांनी तो स्टुडंट्स कॉर्नर एकदम भरुन गेला होता.
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तर कॉलेज जणु प्रेमनगरीच वाटत होतं. कॅंटीन मधुन जुणे रोमॅंटिक गाण्यांचा आवाजानं वातावरणात जणु वेगळीच प्रेमाची लाली पसरली होती. लावण्या कॅंटीनमध्ये हर्षितची वाट बघत होती, कॅंटीनमध्ये बाकीचा ग्रुप पण जमलेला होता. "आजा रे.." हे गाजलेलं गाणं कॅंटीनमध्ये सुरु होतं, शामलीनं लावण्याकडे बघितलं, "लावण्या येईल हर्षित नक्की.." असं म्हणत तीनं तिला जणु चिडवलं, आणि तितक्यात तिला समोरुन हर्षित येतांना दिसला. लावण्या धावतच त्याच्याजवळ गेली. आज ती खुप आनंदात होती, हे तीचा चेहरा आणि डोळेच सांगत होते. "हॅपी व्हॅलेंटाईन डे लावण्या," असं म्हणत हर्षितने तिला सुंदर लाल गुलाबाचं फुल दिलं. तीनंही आनंदाने ते फुल घेतल्यावर त्याला बोलली, "मला मला माहित नाही की तु तुझं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे फुल का दिलंस, पण जितका आनंद ही कळी उमलतांना झाडाला झाला नसेल त्यापेक्षा जास्त आनंद मला तु हे फुल दिल्यावर झालाय रे..! हर्षित आणि लावण्याकडे बघुन बाकीचा ग्रुप "पहेला नशा, पहिला खुमार." हे गाणं गुणगुणायला लागला. नंतर सगळे जण कॅंटीनमध्ये गप्पा मारु लागले. "अरे अर्जुन कुठे आहे?" असं हर्षितनं विचारलं. "अरे खरचं की, अर्जुन आज दिसलाच नाही रे," असं मिताली बोलली. "रितेश त्याच्या घरी फोन करुन बघ रे, कदाचित अजुन तो घरीच असेल," असं तेजाली बोलल्यावर रितेशने अर्जुनच्या घरी फोन केला. पण अर्जुन फोन उचलायला घरीच नव्हता. त्या दिवशी तो कॉलेजलाही आला नव्हता. सायंकाळी मग त्याचा सगळा ग्रुप त्याच्या घरी आला, पण त्याच्या घराला कुलुप होतं. मग ते सगळे जण अंगणात थांबुनच त्याची वाट बघु लागले.
"स्वराली, अर्जुनच्या घरासमोर त्याचे मित्र-मैत्रीणींची जमलेले दिसतायं, पण अर्जुन दिसत नाहिएं बघं, असं टेरेसमध्ये उभ्या असलेल्या स्वरालीच्या आईनं तिला सांगितलं. ती घाई-घाईनं टेरेसमध्ये आली. "अगं खरंच गं आई, आज सकाळचा तो दिसलाच नाही, थांब मी आलेच," असं म्हणत स्वराली खाली गेली. स्वरालीला बघताच तेजालीनं तिला विचारलं, "स्वराली अर्जुन भेटला होता का आज?" "अगं तेजालीदी मी पण तुम्हाला तेच विचारायला आले होते." असं स्वराली बोलल्यावर बाकीचा ग्रुपला अर्जुन खरंच कुठे गेलायं याची चिंता लागली. हर्षितनं अर्जुनच्या मामाच्या घरी फोन करुन बघितला, पण अर्जुन तिथंही नव्हता. सुमारे आठ वाजता समोरच्या रस्तावरुन त्यांना अर्जुन येतांना दिसला, "अरे तो बघा अर्जुन आलाच," असं लावण्या बोलली. अर्जुन त्याच्या घराजवळ आल्यावर आपल्या सगळ्या मित्रांना बघुन, विषेश म्हणजे स्वरालीला बघुन खुष झाला. "काय राजपुत साहेब, कोणत्या लढाई साठी गेले होते? स्वारीचा केव्हाचा पत्ता नाही, कॉलेजच्या जहांगीरीकडे आज फिरकला नाही आणि हातात कोणता लवाजमा घेऊन आला आहात राजे?" असं हर्षितनं त्याला विचारलं.
"अरे आज पहाटे मला तेच स्वप्न पडलं जे या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पडलं होतं, मला उठल्यावर मनात आलं की ते स्वप्न चित्रित करावं म्हणुन त्यासाठी सकाळ पासुनच घराच्या बाहेर होतो," असं म्हणत त्यानं ते दिवसभर मेहनत करुन काढलेलं चित्र सगळ्यांना दाखवलं. "हे स्वराली, मला माहिती आहे तु खुपच चांगली चित्रकार आहेस, सगळ्यात पहिले तु सांग तुला कसं वाटलं?" असं अर्जुनने तिला विचारलं. अर्जुनचं ते चित्र तीनं बारकाईनं बघितलं, तिला मनोमन खुप आनंद झाला होता. "अर्जुन खरंच खुप खुप खुप सुंदर चित्र काढलयं रे तु, अगदी जिवंत वाटावं असंच चित्र आहे बघं, मलाही कदाचित असं काढायला जमणार नाही रे, मी ठेवुन घेऊ का हे प्लीज?" असं स्वरालीनं त्याला विचारलं. अर्जुनने आनंदाने होकारार्थी मान डोलावली आणि मनातच बोलला, "अगदी माझ्या मनातलंच बोललीस बघं, अगं दिवसभर तुझ्यासाठीच तर काढत होतो ते." बाकीच्या ग्रुपनेही मग त्याच्या चित्राच मनापासुन कौतुक केलं. मग त्यांनी अर्जुनला सकाळी कॉलेजमध्ये घडलेल्या गमती जमती सांगितल्या. व्हॅलेंटाईन डेच्या त्या गप्पा ऐकतांना अर्जुनने स्वरालीकडे चोरुन बघत होता, हे तिच्या लक्षात आलं, ती पण त्याच्या नजरेला लाजुनच नजर भिडवत होती. "हे लावण्या तु आणि हर्षित कॅंटीनमध्ये त्या गाण्यावर केला तो ऍक्ट करुन दाखवाना अर्जुनला प्लीज," असं रितेश बोलला. मग त्या दोघांनी "प्यार हुआ इकरार हुआ" या गाण्यावर सकाळी केला तसा ऍक्ट केला. अर्जुन, स्वरालीनं त्याला मनापासुन दाद दिली. मग थोड्यावेळानं सगळेजण आप-आपल्या घरीन गेले. स्वराली जाऊ लागल्यावर अर्जुन तीला बोलला, "हे स्वराली, तुला खरंच आवडलं ना मी काढलेलं चित्र?" तीनं क्षणभर त्याच्याकडे बघितलं, तीच्या नजरेत वेगळीच चमक होती, "हो रे अर्जुन, तुला वाटेल मी काही पण विचार करतेयं, पण हे चित्र बघता क्षणी त्या चित्रातील मुली मध्ये मी जणु स्वतःलाच बघत होते, खुप छान काढलयं चित्र, खरंच मी ते माझ्या रुममध्ये लावणार बघं," असं ती त्याला बोलली. "आणि त्या चित्रातला मुलगा?" असं अर्जुनने तिला लाजतच विचारलं, स्वरालीला हसु आलं, लाजतच ती त्याला बोलली, "तुला माहिती आहे कोण आहे तो." असं म्हणत ती तिथुन धावतच घरी गेली. अर्जुनला जणु स्वर्ग जिंकल्यासारखा आनंद झाला.
घरी आल्यावर स्वरालीनं तिच्या आईला अर्जुनने काढलेलं चित्रं दाखवलं. "आई, हे बघं अर्जुनने किती सुंदर चित्र काढलयं ते, आणि मला दिलयं बघं ना आई." असं स्वराली आनंदान बोलली. "खरंच गं, किती सुंदर चित्र आहे हे, नदीकाठी दोन छोटी मुलं खेळतायं, समोर इंद्रधनुष्याचा सुरेख देखावा, आकाशात उडणारी पाखरं, नदीकाठची हिरवळ, काठाच्या कडेलाच असणारी ही कमळाची फुलं, खरंच खुप छान आहे हे. पण अर्जुन केव्हापासुन चित्र काढायला लागला?" असं तीची आई बोलली. "अगं मला पण काहीच ठाऊक नव्हतं याबद्दल, आज तो दिवसभर यासाठीच घराबाहेर गेला होता, कॉलेजलाही गेला नव्हता, म्हणुन त्याचा सगळा ग्रुप इथे आला होता त्याला भेटायला. अगं आई तुला एक गंम्मत सांगु का? ती तेजाली दिदि आहे ना, तिचा आणि रितेशचा यंदा ५ वा व्हॅलेंटाईन डे होता, २००७ मध्ये ते लग्न पण करणार आहेत. आई, तुझं आणि बाबांच पण लव्ह मॅरेज झालं होतं ना, सांग ना मला कसं झालं?" असं स्वराली बोलल्यावर तिची आई जरा लाजली.
"ईश्श.. काहीतरीच काय स्वराली, जा अभ्यास कर, बाबा आले की त्यांनाच विचार." असं म्हणत स्वरालीची आई लाजतच किचनमध्ये निघुन गेली. "आई, लाजलीस की खुपच सुंदर दिसतेस तु" असं स्वराली तिला हसतच बोलली, आणि मग ती आजीच्या खोलीत गेली. आजीच्या फोटोला अर्जुनचं चित्र दाखवत मनातच बोलली, "आजी हे बघं, अर्जुनने माझ्यासारखंच चित्रं काढलयं, तुला आवडलं ना आजी," नंतर स्वराली तीच्या खोलीत जाऊन अभ्यास करु लागली.
अर्जुन घरात आला, आनंदाने त्याला गाणं म्हणावसं वाटत होतं, स्वछंदपणे उड्या मारावसं वाटत होतं, फुलपाखरांसारखं बागडावं वाटतं होतं. आयुष्याच जणु सार्थक झालंय असं त्याला वाटु लागलं. स्वरालीच्या त्या उत्तरानं त्याच्या मनात वसंत फुलवला होता. अर्जुनला आता पटलं होतं की तो स्वरालीच्या प्रेमात पडलायं आणि ती देखील त्याच्या प्रेमात पडलीएं. एकप्रकारे त्यानं त्याच्या पध्दतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा केलायं असं त्याचं मन त्याला सांगत होतं. स्वरालीकडे चोरट्या नजरेनं आज त्याला पहिल्यांदाच बघावंस वाटलं होतं, स्वरालीच्या नजरेला नजर भिडवतांना त्याला जाणवत होतं की स्वराली नुसतीच सौंदर्यवती नव्हती तर ती लावण्यवतीही होती. सौंदर्य तर बाह्यरुपावरुन ठरतं तर लावण्य अतंरंगावरुन आणि स्वरालीच्या सौंदर्य आणि लावण्यावर अर्जुन एकदम फिदा झाला होता.
रात्री स्वरालीचे बाबा उशीरा आले होते, आल्यावर स्वरालीच्या आईनं त्यांना स्वरालीने विचारलेला प्रश्न सांगितल्यावर त्यांना हसु आलं. "अगं आशु, सांगायच ना तिला, वेडीच आहेस तु, खरंच आपली लव्हस्टोरी किती निराळीच आहे ना?" असं स्वरालीचे बाबा बोलले. मग कसलातरी विचार करुन त्यांनी स्वरालीला बोलवलं. स्वराली आल्यावर तीच्या बाबांनी तिला त्यांची लव्हस्टोरी सांगायला सुरुवात केली. "बेटा स्वराली, तुला आश्चर्य वाटेल की आता आशु जशी आहे ना, कॉलेजमध्ये एकदम वेगळीच होती. सतत अभ्यास, जेव्हा बघावं पुस्तक हाताशीच असायचं, कॉलेजमध्ये जितकी पुस्तक मी चार वर्षात वाचली नसतील तितकी हीनं महिन्याभरात वाचली असतील, मी एकदम मस्तकलंदर बंदा होतो. कॉलेजचा जी.एस. होतो मी, जितका वेळ वर्गामध्ये नसायचो तितका वेळ लायब्ररीच्या बाहेर आम्ही मुलं गप्पा मारायचो. कारण लायब्ररीच्या खिडकीतुन आशुला पुस्तक वाचतांना बघायला मजा यायची. नंतर आशुला कळलं की मी तिच्याकडे बघत असतो, एकदिवशी तीनं धाडस करुन विचारलं मला, "काय रे राहुल, माझ्यासारखा एकटक का बघत असतो?" असं स्वरालीचे बाबा बोलल्यावर स्वरालीनं उत्सुकतेनं विचारलं, "बाबा मग तुम्ही काय उत्तर दिलं?" स्वरालीचे बाबा हसायला लागले.
"अगं स्वरा, कॉलेजचे जी.एस. हे, सगळ्या कॉलेजमध्ये वट होती, पण मी असं विचारल्यावर एकदम घाबर्या आवाजात म्हणाले, "समोरचा आपल्याकडे एकटक बघतोयं, हे त्याच्याकडे एकटक बघितल्याशिवाय कसं कळणार अश्विनी?" आणि लगेच तिथुन पळुन गेले. असं स्वरालीच्या आईनं स्वरालीला सांगितलं. "बाबा, म्हणजे तुम्ही आईला घाबरले होते?" असं स्वरालीनं तिच्या बाबांना विचारलं. त्यांनीही हसुन तिला सांगितलं, "अगं घाबरलो, म्हणजे काय, एकतर हिच्या हातात जाड-जुड पुस्तक होतं, मनात म्हंटलो, "देवा, वाचवं बरं का, ह्या सरस्वतीची कधी कडक लक्ष्मी होईल, आणि त्या पुस्तकानं मला धडा शिकवेल," म्हणुन तिथुन पटकन निघुन जाणं पसंत केलं. पण नंतर आम्ही दोघंही एकमेकांशी नजरेनंच संवाद करायला लागलो. जणु मुक्यांची बडबड असावी असंच, हळुहळु आम्ही दोघं एकमेकांशी बोलायला लागलो, मग आमची चांगली मैत्री झाली, मैत्रीच्या झाडाला मग प्रेमाचं फळ लागलं, तुला सांगु, त्यावेळीपर्यंत कॉलेजमध्ये कधीच असं घडलं नव्हतं की कॉलेजच्या जी.एस.च अफेअर असेल, पण माझं झालं होतं. नंतर आमच्या घरापर्यंत हे प्रकरण पोहचलं." असं स्वरालीचे बाबा बोलले. स्वराली त्यांच वाक्यनं वाक्य मनापासुन ऐकत होती.
"अगं, पहिले तर हिच्या घरातुन खुप कडाडुन विरोध झाला, पण आईनं हिच्या घरच्यांना समजवलं, त्यावेळी आमच्या गावतलं ते पहिलं इंटरकास्ट मॅरेज ठरलं. आणि मग अश्विनी पटेलची आश्विनी मराठे झाली. दोन्ही कुटुंबाच्या परंपरा वेगळ्या, संस्कृती वेगळी, पण तुझ्या आईनं खुप लवकर यांना इतकं सफाईदारपणे जुळवलं की बस्स. म्हणुन मी नेहमी म्हणतो की "मला वाटायचं ही कधीच बदलणार नाही, आणि तिला वाटायचं मी नक्कीच बदलेल, पण आमचं दोघांचं लग्न झाले, आणि दोघांचेही अंदाज चुकले, मी आहे तसाच राहिलो, आणि तुझी आई माझ्यासाठी सर्वस्वी बदलुन गेली. हेच आहे आमच्या प्रेमाचं रहस्य. बेटा प्रेम करणं म्हणजे नुसता एकमेकांबरोबर वेळ घालवणं, एकमेकांसोबत राहण असं नसतं, तर एकमेकांसाठी आपल्या आयुष्यातले प्रत्येक क्षण खास बनवणं, एकमेकांसोबत रहाण्यापेक्षा एकमेकांसाठीच जगणं महत्वाच असतं. स्वराली, तुला सांगु का प्रेम म्हणजे मुलासाठी जणु कॅरमचा खेळ, आणि मुलीसाठी जणु बुद्धीबळाचा डाव. कॅरम खेळतांना सारखं मुलाचा प्रयत्न असतो की राणी त्यालाच मिळावी, त्यासाठीच त्याच्या जीवाचा आटापिटा असतो, तसं खर्या जीवनात तो आपल्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असतो. तर बुद्धीबळामध्ये होतं असं की राणीच नेहमी आपल्या राजाला वाचवायचा प्रयत्न करते, अगदी त्याचप्रमाणे मुलगी आपल्या प्रेमासाठी सगळ्यात मोठी गोष्ट करायला तयार असते ती म्हणजे त्याग." असं स्वरालीचे बाबा तिला बोलले.
"चला पुरे झाल्यात गप्पा आता, तिला अभ्यास करु द्या, आपली स्टोरी सांगायला खुप वेळच वेळ आहे, तिचा पेपर आहे उद्या," असं म्हणत स्वरालीच्या आईनं स्वरालीला अभ्यास करायला सांगितलं. स्वरालीला खरंतर तिच्या बाबांकडुन अजुन खुप काही ऐकायचं होतं, पण अभ्यास करणंही महत्वाचं होतं, म्हणुन ती अभ्यासाला बसली. अभ्यास झाल्यानंतर स्वराली स्वरालीला झोप लागली. तिच्या स्वप्नात आजी तिला आवडणार्या राजकुमाराची गोष्ट सांगत होती, आणि गोष्ट संपल्यानंतर स्वराली आजीला बोलली, "आजी, तु मला त्यादिवशी तो गोष्टीतला राजकुमार दाखवणार होतीस ना? अगं पण तुला माहितीच नाही की त्याला मी दररोज भेटते, त्याच्याशी बोलते, त्याने आज मला किती छान चित्र भेट दिलयं तुला आवडलं ना?" स्वप्नात आजी स्वरालीला बोलली, "सांग बर बाहुली, कोण आहे तो राजकुमार?" स्वप्नात स्वराली लाजली, तितक्यात आजी तिला बोलली, "स्वराली, त्यादिवशी तुझा राजकुमार भेटवला नव्हता ना? हे बघं मी आज त्याला आणलयं फक्त तुझ्यासाठी," असं आजी बोलली.
तिला त्या चित्रातल्या देखाव्यासारखाच देखावा दिसत होता, आणि समोरुन येणारा अर्जुन तिला जणु एखाद्या शुरवीर योद्धाच वाटत होता. तिच्याजवळ पोहचल्यावर अर्जुन तिला म्हणतो, "हे स्वराली, सांग ना त्या चित्रातला तो मुलगा कोण आहे ते?" स्वरालीनं लाजुन मान खाली घातली, तिच्या चेहर्यावर अलगद हसु उमटलं होतं, अर्जुनने तिचा चेहरा अलगद आपल्या हातांनी वर केला, "तुच आहेस रे अर्जुन त्या चित्रातला मुलगा, आजीच्या गोष्टीतला मला आवडणारा, हवाहवासा वाटणारा, माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणारा माझा राजकुमार." असं स्वराली त्याला बोलली. स्वराली असं बोलल्यावर अर्जुनला प्रचंड आनंद झाला, आनंदाच्या भरात त्यानं तिला उचलुन घेतलं. स्वराली हे सगळं स्वप्नात बघंत होती. पण तितक्यात तीने रात्री ३ वाजता लावलेला गजर वाजला, आणि तीला नाईलाजानं त्या गोड स्वप्नातुन जागं व्हावं लागलं.
स्वरालीला जसं स्वप्न पडलं तसंच स्वप्न अर्जुनलाही पडलं होतं, पण तो मध्येच दचकुन जागा झाला. वादळापुर्वी येणारी शांततेचा जणु त्याला अनुभव झाला. आपल्या आणि स्वरालीच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी विपरीत घडेल या विचारानं त्याचं मन चिंताग्रस्त झालं. "माझ्या आयुष्यात मला जे मिळालं त्यासाठी परमेश्वरानं माझी बरीच परिक्षा बघितलीएं, का मला असं जाणवतयं की स्वरालीचं प्रेम मिळवतांना मला माझ्या आयुष्यातल्या अग्नीपरिक्षेला सामोर जावं लागणारच आहे याची जाणीव का होतेयं मला? मी स्वरालीशी याबाबत बोलायला हवं का? ती नेहमी म्हणते की मी तिचा बेस्ट फ्रेंड आहे ते, पण मी तिचा नुसताच बेस्ट फ्रेंड आहे का? स्वराली मला खरंच तुझ्यावर जीवापाड प्रेम करायचं आहे गं, तुझ्या बरोबर आयुष्याचे प्रत्येक रंग बघायचे आहे गं," असं अर्जुन स्वगतच बोलला. पुन्हा मग त्याने जोपायचा प्रयत्न केला, पण काही केल्या त्याच्या डोक्यातुन तो विचार जातच नव्हता.