सेकंड इयर चांगलचं मस्तीत घालवलं होतं, त्यामुळे GATEच्या अभ्यासाला आता सुरुवात करायची असं आमच्या वर्गातल्या कित्येकांनी ठरवलं. अपेक्षेप्रमाणे ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पेपर मुलांना भयंकर अवघड गेला होता. कित्येक फस्ट क्लास मिळालेल्यांना ग्रेस मार्क्सचा आधार घेऊनच ऑरगॅनिक केमिस्ट्री ह्या विषयात पास होता आलं होतं. आमच्या रिझल्ट ज्या दिवशी लागला होता त्या दिवशी आम्ही प्रॅक्टिकल बुडवुन पांडवलेणीला गेलो होतो, अन तेही मागच्या बाजुने चढुन जायचं असं आमच्या भाऊंचा म्हणजे शंतनुचा आग्रह, पांडवलेण्यावरुन सरळ आम्ही शंतनुच्या घरी गेलो होतो, तितक्यात आमच्या वर्गातल्या मुलांनी त्याला नेटवर रिझल्ट आलायं असं सांगितलं.
इतक्यावेळ आनंदात असणारे आमच्या चेहर्याचा रंग बदलला, काळजात धडकी भरली, पण सर्वांना फस्ट क्लास होता, त्यामुळे मग पुन्हा वातावरण आनंदी झालं. संपदा कोरान्ने वर्गात पहिली आली होती, शंतनुला तर विश्वास बसत नव्हता, त्याला काय पण आम्हालाही धनेश्वर सरांची आवडती विध्यार्थीनी रोहिणी चव्हाणचं पहिली येईल असं वाटलं होतं; पण संपदानं यंदा बाजी मारली होती. डिप्लोमॅट असलेल्या निलेशलाही चांगलेच मार्क्स मिळाले होते, शिवाय त्यांना असलेले जादा विषयांतही तो सुटला होता, त्यामुळे मुलं सहज त्याला पार्टी मागु लागले, अन त्याने ती द्यायची कबुल करुन टाकली. आम्हा लोकलाईट्सच्या पार्टीचं हक्काचं ठिकाण म्हणजे अमेयचा प्लॅट.
असं थर्ड इयरच्या सुरुवातीला आमच्या वर्गात वातावरण असायचं. होस्टेलला तर मुलांनी अभ्यास करायचा धडाकाच लावला होता. यात आघाडीवर असायचे, लक्ष्मीकांत जोडवे (लक्ष्या), रमेश गोरड, युवराज जाधव, विशाल वेल्हाळ (बम्मण), विश्वजीत दाडगे (बोंगो), राहुल नारखेडे (नारु) आणि मोनाली जगताप. सिनियर्संनी ठरवुन दिलेल्याप्रमाणे पहिले कोलॉजी, नंतर कोग्नोसी, नंतर मेडिकेम अशा विषयांचा अभ्यास करायला जय्यत तयारी झाली. लेक्चरला कावळे सर यावर्षी आम्हाला मेडिसिनल केमिस्ट्री (मेडिकेम) हा किचकट विषय शिकवणार होते, आधीच सेकंड इयरला ओ.सी. इतकं वाईट होतं, अन त्यात मेडिकेम समोर ओ.सी. एकदम चिल्लर आहे असं सिनियर्सनी सांगितल्यावर आम्हाला टेंशन यायला सुरुवात झाली. यंदाही सुरुवातीचे काही दिवस सिनियर्सचे जरनल, पुस्तके आणि त्यांच्या नोट्स गोळा करण्यात गेले. यंदा फार्मास्युटिक्स-३ हा विषय आम्हाला श्री डेरले सर शिकवणार होते, पण सरांची निवड AICTE च्या डायरेक्टर पदी झाल्याने आम्हाला आता त्यांच्याजागी बेळे मॅडमच तो विषय शिकवणार होत्या. थर्ड इयरचा फार्मास्युटिक्सचा अभ्यासक्रम चांगला तयार केला होता असं आम्हाला वाटायचं, कारण टॅबलेट्स, कॅप्सुल्स, इमलशन, ससपेंशन्स यांच्या जोडीला कॉस्मेटिक्स होतीच. पण कॉस्मेटिक्स मध्येही मुलांना खास आकर्षण होतं ते लिपस्टिक्सचंच..!
फार्मा-मॅनेजमेंट हा विषयाचा समावेश आमच्या अभ्यासक्रमात केला होता, अन तो शिकवणार होते ते आमच्या कॉलेजचे मॅनेजमेंट गुरु-सावकारे सर. सरांच लेक्चर संध्याकाळी ५-६ या वेळेत असायचं, त्यामुळे मुलांना लेक्चरला बसवुन ठेवण्याचं काम सर शिकवतांना दैनंदिन घडणारे उदाहरणं सांगुन बरोबर मॅनेज करायचे. बायोटेक्नोलॉजी हा विषय शिकवण्यासाठी आम्हाला सौ. फरांदे मॅडम होत्या, पण त्या नाशिकच्या उपमहापौर पदी निवडुन आल्याने त्यांच्या जागी त्यांनी लिना मॅडमची नियुक्ती करुन दिली होती. लिना मॅडम आमच्या वर्गावर लेक्चर घ्यायला आल्या होत्या, नेहमी वर्गात डुलक्या घेणारा अमेय त्यादिवशी एकदम खडबडुन जागा झाला होता. अमेय मॅडमला एक-एक डाऊट विचारत होता, हा मुद्दाम प्रश्न विचारतो असं त्यांना वाटलं असावं पण आम्हाला तर याची १००% खात्री होती. बायोटेकचं लेक्चर झाल्यानंतर अमेय आमच्याकडे आणि आम्ही त्याच्याकडे बघुन हसतंच होतो.
लिना मॅडमचं दुसरं लेक्चर सुरु झालं, त्या आम्हाला फरमेंटेशन शिकवत होत्या, आता आमचे सर्व लेक्चर एक तासाचेच असतात, पण त्यादिवशी नेमकी लाईट गेल्याने लेक्चर संपल्याची बेल काही झाली नाही. मॅडमचं शिकवणं सुरुच होतं, अन आता मुलांनी त्यांना लेक्चर झालयं हे सांगण्यासाठी गोंधळ घालु लागले. त्यात देऊलभाऊ कोल्हे, बेलसरे सरांची नक्कल करत, "Don't talk in front of my back, I mark any one of you absent " असं ओरडतं होता. त्यातच मग मॅडम चिडल्या अन त्या सर्वांच्या वहीत फरमेंटरची आकृती काढली आहे का ते बघायला लागल्या, अन जे अपेक्षित होतं तेच झालं माघे बसलेल्यांनी तो फरमेंटर काढायला मग सुरुवात केली, पण मॅडमच्या तावडीत प्रशांत जमशेटे, स्वप्निल येवले लागलेच. मॅडम त्यांच्या नोटबुक्स घेऊन वर्गाबाहेर पडल्या, अन दोन-तीन मिनिटातचं आमच्या सी.आर.ला म्हणजे संपदाला टिचर्स रुममधुन बोलावणं आलं. झालेला प्रकार सांगुन लिना मॅडमच्या डोळ्यातनं अश्रु यायला सुरुवात झाली, मग काय अनंतवार सर, बेलसरे सर, कावळे सर, आणि दोन तीन शिपाई सरळ आमच्या वर्गात आले आणि त्यांनी आमची चांगलीच खरडपट्टी काढली. प्रशांत जमशेटे, आणि येवलेला मग प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये धाडलं होतं, आणि आम्हाला प्रत्येकाला १००/-रुपयांचा फाईन भरावा लागणार होता अन तोही दोन दिवसांच्या आत, शिवाय अपोलॉजी लेटर जोडीला होतचं.
यावेळीही आमच्या कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी साजरी झाली होती. पण यावेळी मुलांची घेण्यात आलेल्या स्क्रिनिंगला फायनल इयरच्या होस्टेलच्या मुलांनी कहरच केला. जी मुलगी दिसायला सुंदर, तिला जास्त वेळ नको ते प्रश्न विचारायचा पोरखेळ त्यांनी सुरु ठेवला होता. आता त्यांना प्रश्न विचारु दिले नाही तर ते क्वॉंट्री देत नाही, मग त्यांच्या टिचभर इगोला जणु सुज येते. फस्ट इयरची विनया, आणि पुजा या दोघींना त्यांनी जास्त प्रश्न विचारले होते, त्यातही विनयाला जरा जास्तच. साडी आणि बिकिनी यातला फरक एका सिनियरने तिला विचारला होता. बहुतेक त्याला त्याच्या या प्रश्नाचं उत्तर त्याच्या आई-बहिणीने दिलं नसावं, म्हणुन विचारत असावा असं आमच्या वर्गातले मुलं एकमेकांत म्हणत होते. नंतर तिलाच परत स्री कसा शृंगार करते ते सांगायला लावलं, यावेळी मात्र त्यांच्याच वर्गातल्या मुलींनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्या प्रश्न विचारणार्याशी भांडायला लागल्या.
मग प्रतिमा शिंदेचा नंबर आला, पण तीलाही याआधी काय प्रकार घडला हे ठाऊकच होतं, त्यामुळे मग ती रागातच प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत होती. "ह्या अंबाबाईला घालवा रे" असं म्हणत मग बाकीच्या मुला-मुलींना स्क्रिनिंगला बोलवण्यात आलं. स्क्रिनिंगच्या वेळी झालेला प्रकार बघुन आमच्या वर्गातली कित्येक मुलांनी यावेळी फ्रेशर्स पार्टीला न जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही तर आधीच पैसे दिले होते, त्यामुळे आम्ही जायचं ठरवलं होतं. फायनल स्क्रिनिंगसाठी काय करायचं हे देखील आमच्या सिनियर्सला ठाऊक नव्हतं. त्यामुळे त्यांना या कामात मी पुर्ण मदत केली.
यावेळी मी माझी "मॉडर्न प्रेयसी" ही कविता सादर केली होती. उत्कर्ष वाटाणे आणि पावडर मॅन विशाल गुरवचा डान्स चांगला चालु होता, पण लाईट मध्येच गेली, नंतर लॅपटॉप मध्येच बंद पडला त्यामुळे त्यांचा डान्स चांगलाच खोळंबला गेला. साई पुजारीनेही "जलवा" यावर चांगला डान्स केला. फ्रेशर्स पार्टी अन जेवण म्हंटलं की होस्टेलचे काही मुलं असे काही बिथरतात की विचारायची सोय नाही. एकाच ताटलीत अधाशासारखं वाढुन घेतलेलं असतं, आणि मध्यभागी मठ्याचा ग्लास ठेवलेला, अन अशातच घाई गर्दीत तो ग्लास कलंडला की सगळी प्लेट मठ्ठामय होऊन जाते, आणि ते तसेच खात बसतात. काहींची मग कोण जास्त गुलाबजाम खातो, अशी नेहमी प्रमाने पैंज लागते.
असो, फायनल स्क्रिनिंगच्या आधी कळलं की स्क्रिनिंग आधीच होस्टेलच्या मुलांनी प्रतिमा शिंदेलाच मिस. फ्रेशर्स करायचं असं त्यांच्या वर्गातल्या जजेसला सांगितलं, यांना मी इतकावेळ खर्च करुन चांगल्या स्क्रिनिंगसाठी कशा फेर्या असाव्यात यासाठी ऊठाठेव केली, पण यांनी आधीच ठरवलं की कुणाला मि. आणि मिस. फ्रेशर्स करायचं, ही गोष्ट मला खटकली. त्यामुळे मी पण स्क्रिनिंग होण्याच्या आधीच मग त्या सर्व सिलेक्ट केलेल्या मुलांना सगळे प्रश्न सांगुन टाकले, त्यामुळे विनयाला प्रतिमा पेक्षा जास्त मार्क्स मिळाले, प्रतिमा शिंदेनेही ब्लॅक मध्ये पिक्चरच्या टिकिटाची मार्केटिंग कशी करावी हे सुंदर पणे करुन दाखवलं, पण बाकीच्या प्रश्नांची उत्तरे तीला जमलेच नाही, तर दुसरीकडे विनयाला सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आली, आणि मग तिलाच मिस.फ्रेशर्स करण्यात आलं होतं. त्यादिवशी जी मुलगी चांगली दिसेल तिलाच मिस. फ्रेशर्स करायचा सिनियर्सचा मनसुबा चांगलाच उधळुन लावला होता. हा किस्सा जेव्हा माझ्या दोस्तांना सांगितला तेव्हा ते गदागदा हसत होते.
यंदा फार्मास्युटिक्सचे प्रॅक्टिकल्स चांगले होते, एम.फार्मचेच मुलं आमचं प्रॅक्टिकल कंडक्ट करयाचे, त्यामुळे निदान आमच्या बॅच मध्ये मला आणि दिवाकरला काही टेंशन नसायचं, कारण एम. फार्मच्या मुलांबरोबर आमची चांगली ओळख होती. प्रतिक गांधी आणि देवेंद्र येवले ह्या दोघं आमचे थर्ड इयरचे प्रॅक्टिकल्स कंडक्ट करणार होते. बाकीच्या मुलांना प्रतिक गांधी थोडा खडुस वाटायचा, तर देवेंदला मुलं बरोबर मॅनेज करुन टाकायचे. थर्ड इयरला आम्ही टॅब्लेट्स तयार करायचं शिकलो होतो. तसं आमच्या कॉलेजमध्ये बरेच चांगले उपकरण होते, पण त्याची योग्य निगा न राखल्याने त्यातले बरेच धुळ खात पडले होते. टॅब्लेट तयार करायचं मशीनही एकदम पुरातन काळातलं वाटायचं.
बी.फार्म लेव्हल नाही निदान एम.फार्मच्या मुलांना तरी असल्या मशीन्सवर काम करायची वेळ येते याची त्यावेळी कीव वाटत होती. बाकीचे प्रॅक्टिकल्स फस्ट इयरला केले होते तेच पुन्हा यावर्षी करायचे होते. कॉस्मेटिक्स असल्याने जरा इंट्रेस्ट वाढायचा. कोल्ड क्रिम, व्हॅनिशिंग क्रिम, सनस्क्रिन क्रिम, शेव्हिंग क्रिम, शॅम्पु, आय लायनर, आय मस्कारा, आय शॅडो, हर्बल फेस पॅक, टुथ पेस्ट यांच्या जोडीला लिपस्टिक होतीच. फार्मसीत कॉस्मेटिक्स पण तयार करायचं शिकवतात, हे कित्येक लोकांना माहिती सुद्धा नसेल. जेव्हा मी शेजारी या सर्वांसाठी लागणारे कंटेनर्स आहेत का ते विचारायचो, त्यावेळी त्यांना नवल वाटायचं. त्यांच्या कडे नसले की ते इतरांकडुन आणुन द्यायचे, पण त्यांची अट ऐवढीच की कॉलेजमधील तयार केलेलं प्रोडक्ट त्यांना जरुर दाखवायचं. आमच्या सोसायटीत राहत असलेल्या छोट्या मुलांना याच कौतुक असायचं. त्यांच्या बालसुलभ आणि चौकस प्रश्नांना उत्तरं देण्यात खरचं आनंद मिळायचा.
यंदा फार्माकोलॉजीच्या प्रॅक्टिकल्सचे ७०% एक्सपेरिमेंट हे गोट ट्रॅकियावर करायचे होते. बकरीच्या त्या ट्रॅकियाच्या तीन रिंग्स कापुन त्यावर रिस्पॉंन्स घेणं, हे मुलांसाठी सर्वात कंटाळवाणं काम होतं, तर मुलींना ते किळसवाणं वाटायचं. अम्रिता देशमुख मात्र त्याला अपवाद होती. आम्हाला कधी कधी जास्त कंटाळा आला की मग आम्ही खुप कॉंसंट्रेटेड डोस टाकायचो, त्यामुळे असां काही रिस्पांस यायचा, मग कावळे मॅडमला प्रश्न पडायचा की यांच्या ग्रुपचे रिस्पॉंस असे कसे आले? एकदा ऐन सेशनलच्या प्रॅक्टिकलला रिंग्स टाय करण्यात वेळ गेला, त्यामुळे वेळेत आपलं प्रॅक्टिकल काही पुर्ण होत नाही, याची खात्री झाली. मग त्या ऑरगन बाथ मध्ये डायरेक्ट ८० डिग्री सेल्सिअसचं पाणी ओतुन दिलं, त्यामुळे त्या रिंग्स जणु शिजुन मरुन गेल्या. त्यामुळे आता रिस्पॉंन्स काही मिळणार नाही हे हे फक्त मला आणि माझ्या पार्टनर दिवाकरला माहिती होतं. कावळे मॅडम जेव्हा रिस्पॉन्स चेक करायला आल्या तेव्हा मी त्यांना रिस्पॉंस येत नसल्याचं सांगितलं.
बाकीच्या सगळ्यांचे रिस्पॉंस येतात आणि याचा एकट्याचाच कसं काय येत नाही त्यामुळे मॅडम चिंता करत होत्या. एम.फार्मच्या मुलांना त्यांनी जास्त कॉंसंट्रेटेड Acetylcholineचं सोल्युशन बनवायला लावलं, लोड कमी करुन बघ, नीट वॉशिंग दे असं सांगत होत्या. नंतर एम.फार्मच्या मुलांनी बनवलेल्या फ्रेश सोल्युशनचाही डोस दिला, पण रिस्पॉंस काही येत नव्हता असं मॅडमच्या लक्षात आलं, आणि त्यांनी तुझ्या पार्टनरचाच रिस्पॉंस ट्रेस कर असं सांगितलं. त्यादिवशी मॅडमची चिंता आणि कळकळ बघुन नंतर या गोष्टीचा पश्चाताप झाला, आणि पुन्हा असला प्रकार करायचा नाही असं ठरवलं, पण वर्षभर हेच एक्सपेरिमेंट असल्याने अधुन मधुन असं मीच नाही तर बाकीचेही करायचे.
फार्माकोग्नोसी-२ हा विषय यंदाही भाऊच म्हणजे श्री अहिरे सर शिकवणार होते. यंदा याविषयाला प्रॅक्टिकल्सचीही जोड होती. वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचे सेक्शन घेऊन त्यांचा अभ्यास कराण्याचे एक्सपेरिमेंट यात होते. आमच्या कॉलेजमधल्या त्या बांटल्यात ठेवलेल्या वनस्पती मुलांना एकदम पुरातन काळातल्या वाटायच्या कारण एक टेस्ट धड येत नसायची, त्यात केमिकलही एकदम खराब होते. ही लॅब इतर लॅब्सच्या तुलनेत मात्र जरा जास्तच स्वच्छ असायची इतक समाधान या लॅबमध्ये होतं. यंदा र्हबॅरियमही बनवायचं होतं, आम्हाला आधी याबाबतं चांगलाच इंट्रेस्ट होता, पण सिनियर्सने जेव्हा हा प्रकार नक्की काय असतो, त्यावेळी मग त्या इंट्रेस्टचे सेक्शन निघायला सुरुवात झाली.
सावकारे सरांच्या एका लेक्चरला असंच मनोज जावरेला त्याचा सरांच्या शिकवण्यातला इंट्रेस्टला मॅनेज करणं कठीण गेलं, आणि त्याने मग सरांच चित्र वहीच्या मागच्या पानावर काढायला सुरुवात केली. सगळी मुलं काहीच लिहित नव्हती, आणि हा एकटाच काय लिहुन घेतोय असा प्रश्न सरांना पडला. आता मनोज जावरे हा काही एकदम हुशार मुलगा नव्हता, शिवाय त्यादिवशी तो शेवटच्या बेंच वर बसलेला, त्यामुले सरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि सर त्याची वही बघायला गेले. सर आपल्याकडे येतात असं बघुन त्याने ती वही दप्तरात टाकायचा अयशस्वी प्रयत्न केला, कारण सरांनी त्याच्या हातातुन ती वही हिसकावली. सर त्याची वही चाळत होते, आणि अचानक सर चिडले, कारण या पठ्याने सरांच चित्र वहीच्या मागच्या पानांवर काढलं होतं. सरांनी त्याची वही खिडकीच्या बाहेर रागाने फेकुन दिली, आणि आमचं लेक्चर संपल असं सांगितलं.
यंदा आम्हाला थर्ड इयरला प्रोजेक्ट करायचे होते, पण आमच्या कॉलेजकडुन आम्हाला साधे Re-view report तयार करायला लावले, आणि तेही स्वतःच्या हस्तलिखित स्वरुपात. आमच्या मुलांची तर याबाबत खुप नाराजी होती. कॉलेज असं चव घालवायचे काम करत होतं त्यामुळे संताप होत होता. थर्ड इयर सुरु झाल्यापासुन गेले काही महिने आमच्या C.P.N. मधील वातावरण एकदम बिघडलयं. एखाद्या स्वच्छ- शांत वाहत असलेल्या नदीतील पाणी अचानक पणे खळखळावं अनं सगळं गढुळ पाणी होऊन जावं असच सध्या घडतय़ं ..या सगळ्या वातावरणाला सुरुवात झाली ती आमच्या सेकंड सेशनल पासुनच. यंदा आमच्या कॉलेज मध्ये दरवर्षी लावतात तशी डिफॉल्टर्सची लिस्ट लागली. प्राचार्यांनी स्पष्ट संकेत दिले की यंदा डिफॉल्टर्सच्या सेरीजला सेकंड सेशनलचा किल्ला काही घेता येणार नाही, पण इंप्रुव्हमेंट टेस्टच्या जहागिरीवरच समाधान मानावं लागेल. (Defaulter student's म्हणजे कमी अटेंडन्स असणारी मुलं-मुली, त्यांना सेकंड सेशनलच्या परिक्षेलान बसु देण्याचं फर्मान आमच्या प्राचार्यांनी काढलं, पण त्यांच्या अटेंडन्स मध्ये सुधार करण्यासाठी त्यांनी त्यांच्या साठी इंप्रुव्हमेंट टेस्ट ठेवायचा निर्णय घेतला.)
No parking here! अशा पाटी खालीच जसे आपले देश-बांधव जसे गाड्या पार्क करतात कारण त्यांना ठाउक असतं की या सारख्या नोटिसांची काही किंमत नसते. अगदी त्याच थाटात आमच्या डिफॉल्टर्सनी सुद्दा त्या नोटिस कडे फारसं लक्ष दिलं नाही.. अशा ५६ नोटिसा दरवेळी लागतात,पण दरवेळी परिक्षेला तर मुलांना बसु देतात, कॉलेजची काय बिशाद आम्हाला सेकंड सेशनलला बसु न द्यायची?" असं त्या नोटिसकडे पाहुन डिफॉल्टर्स बोलत होते. प्राचार्यांनी जणु काही "बोला-तो-बोला" करत मुलांना सेकंड सेशनलला खरंच बसु देणार नाही हे क्लियर करुन टाकलं. मग मात्र डिफॉल्टर्सचे धाबे दणानले. काही मुलं कॉलेजकडुन क्रिकेट, व्हॉलीबॉल च्या स्पर्धा खेळायला गेले त्यांचे बंक्स सँक्शन केले होते. पण, आमच्या प्राचार्यांनी काढलेल्या फर्मानामुळे त्यांनाही डिफॉल्टर्स ठरवण्यात आलं.
आता काहींना वाटेल की कॉलेज प्रशासनाचं चुकतयं बरं का, पण तसं नव्हतं. म्हणतात ना एका हाताने टाळी वाजतं नाही! डिफॉल्टर्स मधील बहुतेक मुलांचे बंक्स साधारण ४० च्या पुढेच. त्यातही आमच्या कॉलेजचा Defaulter Icon बंकवीर, सम्राट बंकेश्वर, नितीनभाऊ बागुल यांनी तर एकही दिवस कॉलेजला दर्शन दिलं नाही असं बहुतेक सरांना वाटत होतं. सांगायचा हेतु ऐवढाच की मुलांनी सुद्दा मागचा पुढचा विचार न करता बंक मारले होते. सहाजिकच यांना सुधारण्याचा पवित्रा आमच्या प्राचार्यांनी घेतला, मग त्यांच काय चुकलं? पण जे मुलं कॉलेजकडुन क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळायला गेले त्यांना तर परीक्षेला बसु द्यायला हवं या गोष्टीवर अनेकांच एकमत झालं तर त्यात काही नवल नाही.
तशीच दुसरी बाब म्हणजे मुलं नव्या फाइन सिस्टिममुळे जाम झाले होते. "Arrogency fine, Life threatening jump fine, chemical loss fine यासारखे अस्त्रांचा शोध आमच्या कॉलेज प्रशासनाने लावला होता. सहाजिकच मुलं चुकल्या शिवाय आजपर्यंत कोणताही फाइन लावला गेला नव्हता. पण यंदा Arrogency fine, आणि Life threatening jump fine ने तर कहरच केला होता. एकदा आमच्या कॉलेजमध्ये कसला तरी सेमिनार होता, त्यामुळे आम्हाला खाली सेमिनार हॉलमध्ये बोलवायला शिपाई आला, त्याला मुलं सद्दाम म्हणतात. सगळी मुलं खाली जात होती. देऊल भाऊ हळुहळु येत होता, त्यावर सद्दाम चिडले आणि त्याला पटकन खाली जा असं सांगु लागले, देऊल भाऊ त्यांना, "सर खालुन तोंड धुवुन लगेच येतो", असं सांगितल्यावर सद्दाम तिथुन निघुन गेले आणि थोड्याच वेळात प्राचार्यांकडुन देऊलला बोलवणं आलं. आणि मग त्याला Arrogency fine म्हणुन ५०/-रुपये भरायला लावला.
आमच्या कॉलेजमध्ये पी.एच.डी. साठी नवीन इमारत करायचं काम सुरु होतं, ती बिल्डींग आमच्या कॉलेजच्या बिल्डींगला खेटुनच बांधली. एक फुटाचही अंतर नसेल, इतक्या कमी अंतरावरुन आमच्या वर्गातल्या लक्ष्मीकांतने उडी मारली, आणि त्या नव्या बिल्डींग मध्ये अभ्यास करायला गेला. पण हा प्रकार बेलसरे सरांनी बघितला, त्यालाही बोलवलं, आणि मग त्याला ५०/-रुपये Life threatening jump fine म्हणुन भरायला लावला. असले विचित्र फाइन भरायला लागत होते त्यामुळे मुलांची कॉलेज प्रशासनाबाबतच्या भावना फार बदलत चालल्या होत्या. या सगळ्यांत आनंदाची बाब म्हणजे आमच्या भाऊंचा जी.आर.ई. चा स्कोर खुपच चांगला आला होता.
असो,सेकंड सेशनल झाली आणि मग सगळ्यांना स्पोर्ट्स वीक, फेअरवेल पार्टी आणि गॅदरिंचे वेध लागले. कोठेही जा मुलांना काही ऑरगनाईज करायला लावलं की लगेच मच्छी-बाजारात जशी कलकल असते तशीच कलकल सुरु व्हायला वेळ लागत नाही. चार-पाच मुलं-मुली स्वतः पुढाकार घेऊन काहीतरी करतात, अन बाकीचे फक्त त्याला नावं ठेवतात हे चित्र प्रत्येक ठिकाणी आढळतंच. आमचा वर्ग सुद्दा त्याला अपवाद नव्हता. पण ऑल्स वेल दॅट एंड्स वेल प्रमाणे एकदाच मुलांनी कोणता इव्हेंट केव्हा साजरा करायचा ते ठरवलं. स्पोर्ट्स वीक आणि फेअरवेल पार्टी पर्यंत सार काही व्यवस्थित पार पडलं पण गॅदरिंगला मात्र गालबोट लागलं..!
यंदा T.Y.ला असतांना कॉलेजचं गॅदरिंग जरा लवकरच झालं होतं.गॅदरिंग लवकर घेण्याचा प्राचार्यांचा निर्णय कॉलेज मध्ये आयोजीत केलेल्य वर्क शॉप मुळे घेतला होता. सेकंड सेशनल नुकतीच पार पडली आणि एका दिवसाच्या अवधी नंतर लगेच कॉलेज मध्ये डेज, स्पोर्ट्स वीक, फेअरवेल पार्टी आणि गॅदरिंग हे सर्व अवघ्या सहा दिवसांत आटपायचं होतं. फायनल इयरच्या मुलांनी डेज आणि स्पोर्ट्स वीकची जबाबदारी सहाजिकच आमच्या वर्गावर सोपावुन दिली, मात्र गॅदरिंग त्यांनी अरेंज करायचं ठरवलं. बहुतांश कॉलेजमध्ये साजरे होत असलेले डेज आमच्या कॉलेजमध्येही साजरे होतात. काही नवीन्य आणायचं ठरवलं तर प्रत्येक मुलाला त्याबाबतीत समजवणं म्हणजे डोक्याला तापच..! टाय ऍंड सारी डे, थिम डे, कलर डे, ट्रॅडिशनल डे, कलर डे असे पारंपारिक डेज सोडुन इतर डेजलाच आमच्या कॉलेज मध्ये परवानगी मुळिच नाही. मिसमॅच डेचं नाव काढायला मुलांची हिम्मत होत नाही, कारण त्यांच मिसमॅच कल्पनेपलीकडचं नसतचं. त्यामुळे त्यात काही मजाच नाही.
दोन दिवसांमध्ये सगळे डेज आटपायचे, अन तीन दिवसांमध्ये स्पोर्ट्सवीक अन शेवटचा दिवस गॅदरिंगला अर्पण. डेजची सुरुवात नेहमी प्रमाणे टाय ऍंड सारी डे नेच झाली. त्यानंतर थिम डे आणि कलर डे साजरा झाला. फस्ट ते फायनल इयर मिळुन फक्त तीनच थिम सादर झाल्या. फस्ट इयरच्या थिमचा विषय बालमजुरांशी निगडीत तर आमच्या वर्गातुन प्रसाद माळीचा ग्रुप आणि माझा ग्रुप. माळीने त्यांची मागील वर्षी सादर केलेली थिमचा विषय "थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली" सादर केला. यंदा त्याने ट्रफिक हवलदार आणि श्रीमंत बापांच्या मुलांचे वर्तन यावर चांगली थिम सादर केली. मॊटर सायकलवरुन ट्रिप्सी जाण्याचं नाटक करणारे विशाल, नितीन आणि मनोज यांनी त्या गाडीचा आवाज "घ्यांग्यांग पिपऽऽऽ घ्यांग्यांग पिपऽऽऽ घ्यांग्यांग पिपऽऽऽ" करत उपस्थितांना खुश करुन टाकलं. फस्ट इयरच्या अजिंक्य सुपेकर यानं पेपर वाटत असलेल्या मुलांची झक्कास नक्कल केली. त्यांच्या वर्गातल्या बहुतेक मुली त्याच्यावर इंप्रेस झाल्या असणार यात शंका नव्हती. आमचा विषय "पाणी अन लोडशेडींगचा" तसा विषय नेहमीचाच पण तो नव्याने माडांयचा माझा कयास होता. "This is the problem faced by all, but ignored by most of us. so try to imagine, inspire & implement..Beacuse every move you make to save a drop of water & unit of electicity makes a difference.." हे वाक्य सर्वाना आवडलं, शिवाय पाणी नावाची एक चारॊळी थिमचा शेवट करतांना वापरली ती अशी:
"थेंब-थेंब पाण्यासाठी पॊरं त्यांची वणवणं फिरली,
दॊन थॆंब आसवांसंगॆ रणरणत्या ऊन्हातनं तशीच परतली,
काय त्य़ांचा गुन्हा असावा, दॊन दिवसांची तहानही न भागावी,
ज्यांना पुरेसं पाणी मिळतयं, का हॊ त्यांनी मग त्याची नासाडी करावी?
मॅड ऍड शो ला तर आमच्या वर्गातील पंकज, देऊलभाऊ(D.B.K.) आणि प्रणित यांनी व्हिक्स आणि हार्पिक या प्रोडक्ट्सची एकदम भन्नाट ऍड सादर केली आणि प्रथम क्रमांकावर आपलं नाव कोरुन टाकलं. पण एकमात्र नक्की व्हिक्स आणि हार्पिक या कंपन्यांनी यांचा फंडा वापरला तर प्रेम-वीरांकडुन व्हिक्सची, तर महिलांकडुन हार्पिकची मागणीचं प्रमाण कितीतरी पटींनी वाढेल. ओव्हर आर्म आणि अंडर आर्म क्रिकेट, व्हॉलिबॉल, चेस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम यांच्या सर्व मॅचेस अवघ्या तीन दिवसांमध्ये आटपायच्या होत्या. स्पोर्ट्स वीक मध्ये फक्त तीनच दिवस ऐकुन तुम्हाला नवलं वाटलयं का? पण आम्हाला ते तीन आठवड्यांपेक्षा कमी नाहीत..! स्पोर्ट्स वीकमध्ये फुटबॉल आम्ही फस्ट इयरमध्ये असतांनाच खेळला गेला, त्यानंतर आम्ही फायनल इयर पास झाल्या शिवाय हा खेळ खेळला जाण्याची शक्यता कमीच. त्याला कारण म्हणजे आमच्या वर्गातला अमेय चौरसिया. आम्ही फस्ट इयरला असतांना "दि रायजिंग स्टार ऑफ फुटबॉल" हे बिरुद याला प्रदान झालं. पण मुलांसाठी तो "C.P.N.चा रोनाल्डोचं". मैदानात अमेयने एकदा फुटबॉल घेतला की बाकीचे मुलं नुसते घुम्यासारखे त्याच्याकडे बघत बसतात. हा भाऊ गोल वर गोल करतच जातो, जणु आमच्या फुटबॉल टिमची वन मॅन आर्मी..! त्यामुळे इतर वर्गातील मुलांमध्ये "आयला हारणारच तर खेळायचं कशाला?" असं निगेटिव्ह स्पोर्ट्समन स्पिरीट तयार झालयं.
फेअरवेल पार्टी सुद्धा चांगली पार पडली. आणि मग २५-जानेवारी-२०१० गॅदरिंगचा तो काळा दिवस अखेर उजाडलाच..! गॅदरिंगला सुरुवात होतं नाही तोच वादळापुर्वी येणार असलेल्या शांततेचा अनुभव बहुतेकांना झाला. D.J.वाल्याच्या D.J.ची लक्षणं काही ठीक दिसत नव्हती. लाईट सिस्टीमचा घोळ चालु होता. सकाळी साडे-आठ वाजता बरोबर गॅदरिंगला सुरुवात होणार अशी आकाशवाणी आमच्या कॉलेजच्या G.S.ने दोन दिवसांपुर्वीच केली होती पण गॅदरिंगला सुरुवात मात्र पाऊणेबारा वाजता झाली. सकाळीच आलेल्या मुलांनी मग आमच्या धनेश्वर सरांच्या शब्दांत सांगायचं तर genes express करायला सुरुवात केली.
आदल्या दिवशी उरलेल्या रोझ डे च्या इंट्रीज तेवढ्यावेळात उरकण्याची सुबुद्धी फायनल इयरच्या मुलांना सुचली तीच मोठी भाग्याची गोष्ट. पण काही मुलं मात्र रोझ घ्यायला आलेल्या मुलींना आय लव्ह यु म्हणुन चिडवत हो्ते. अशावेळी पोरी मात्र दुर्गा-कालीचं रुप धारण करुन अशा मुलाना धडा नाही शिकवत तर आपल्या जागी बसुन बोट मोडत बसतात. असो, एकदाची गॅदरिंगला सुरुवात झाली आणि कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करायला आमच्या वर्गातील प्रणित आणि मयुरी यांची जोडी स्टेजवर आली. त्यांनी सुत्रसंचालनाला सुरुवात केली नाही तोच मुलांच्या घोळक्यातनं "छक्का..छक्का.." अशा आरोळ्यांनी हॉलवर ताबा मिळवला. आमच्या वर्गातल्या मुलांनी मग वातावरण शांत करत फायनल इयरच्या मुलांना समजवालं, आणि आणखी काही झालं तर कार्यक्रम सोडुन मुलं निघुन जातील असं सांगितलं मग पुढचा दिड-तास सगळं सुरळीत पार पडलं. पण फायनल इयर कडुन लागलेली आग इतक्यातच शांत होणारी नव्हती..
दुपारचे जेवण आटोपल्यानंतर फायनल इयरने अचानक फॅशन शो घेण्याचा विचार केला नाही तोच आमच्या वर्गातील मुलही पेटुन गेले. दरवेळी दिल्या जात असलेल्या "बेस्ट क्लास ऑफ दि इयर" साठी फायनल इयर हा पराक्रम करतयं याचा मुलांना राग आला. कारण एकुण गुण बघता व्हॉलिबॉल, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन यासारख्या खेळांत आमचा वर्ग अव्वल, अंडर आर्म क्रिकेट मध्येही वर्गाला दुसर स्थान मिळालं, याशिवाय सांस्कृतिक खेळांमध्येही आमच्याच वर्गाने सगळीकडे बाजी मारली. त्यामुळे फायनल इयर आमच्या पेक्षा सुमारे ३० गुणांनी मागे होतं. गॅदरिंगच्या कार्यक्रमात आमच्या वर्गातुन तीन नाटक सादर होणार होते. त्यातही माझाग्रुप मागील वेळचा विजेता ग्रुप, आमच्या कॉलेजमध्ये नाटकात आमचा हात धरणारा कोणताच ग्रुप नाही हे सगळ्यांना ठाऊक. त्यामुळे एकंदरीत आमचे गुण वाढणारच होते. फायनल इयरला मग मात्र फक्त डान्स, सिंगिंग आणि फॅशन शो यांचाच आधार होता आम्हाला माघे टाकण्यासाठी. अशा परिस्थीत आमच्या वर्गाचा संयम थोडाबहुत बाकीच होता..
एम.फार्म.च्या सोणवने सरांनी झक्कास डान्स केला त्यामुळे त्यांनाच प्रथम पारितोषिक मिळणार यात कोणालाच शंका नव्हती. फायनल इयरच्या आशा द्वितीय स्थानावर पण तिथेही एम.फार्मचं वर्चस्व दिसायचे वेध लागले. त्यातच मग आमच्या वर्गातल्या मोनालीचा डान्स केव्हाचा खोळंबत पडला होता त्यामुळे तिचाही पारा चढायला सुरुवात झाली. त्यातच माळीचा म्युझिकल ड्रामा सुरु असतांना स्टेजवर असलेल्या मुलींना फायनल इयरच्या काही मुलांनी "ऐ दुसर्या कोणत्या पोरी मिळाल्या नाही का बाजारात?" असा टॉंट मारला. सेकंड इयरच्या काही मुली जेव्हा लावणी सादर करत होत्या तेव्हा "रेट काय आहे गं तुमचाऽऽ?"म्हणायचं धाडस त्यांच्याच वर्गातल्या मुलांनी केलं. हे सगळं घडतं असतांना फायनल इयरच्या मुलांनी फॅशन शो घेण्याचं ठरवलं, मग इतकावेळ शांत असलेली मोनाली खवळली. त्यामुळे आमच्या वर्गातील काही मुलांनी लगेच रॅंम्प वरच ठाण मांडलं. मग कुठे मोनालीचा डान्स पार पडला, अन त्यानंतरच फॅशन शो झाला हे सांगायची गरज नाही..!
एकीकडे हा सगळा प्रकार घडत असतांना सावकारे सर मात्र आमच्या ग्रुपचा ड्रामा बघण्यासाठी आतुर झाले होते. पण काय करणार फायनल इयरचं मॅनेजमेंट अतिशय थर्ड क्लास, त्यामुळे सर वैतागुन तिथुन निघुन गेले, आणि मग वीस सुमारे वीस मिनीटांनंतर आमच्या नाटकाला सुरुवात झाली. मी लिहिलेल्या नाटकाचा विषय हा कॉलेज मध्ये गॅदरिंगच्या आधी घडलेल्या वातावरणाशी निगडीत, शिवाय दरवेळी काहीतरी नाविन्यपुर्ण नाटक सादर करायची आमच्या ग्रुपची परंपरा. त्यामुळे मुलं शांत बसुन चांगला प्रतिसाद देतं होती. कॉलेजची अन मुलांची बाजु मांडण अन तेही समोर असलेल्या शिक्षकांना न दुखवता, हे आमच्या साठी असलेलं चॅलेंज होतं. जरा काही कमी जास्त झालं की आमच्या मार्क्सशीट वर त्याचा परिणाम होणारच याची भिती माझ्या बरोबर माझ्या सोबत काम करत असलेल्या माझ्या दोस्तांनाही होती!
पण शेवटी एकदम जीव ओतुन काम करायचं समाधान आलं कारण सगळ्य़ांना भावना तर कळल्या, पण कोणी दुखावलं नव्हतं याची खात्री आम्हाला नाटक सादर करतांनाच येत होती. कारण ज्या वाक्यांवर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळणार नाही अशी खात्री होती, ती वाक्ये सुद्धा टाळ्या अन शिट्ट्या खेचण्यात यशस्वी झाली. माझ्या तोंडुन तर नकळत पणे आमच्या प्राचार्यांची खतरनाक मिमिक्री झाली. सर जर समोर असते तर सरांनाही आश्चर्याचा धक्काच बसला असता. मुलांचा मात्र त्याला टाळ्या अन शिट्ट्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. आमच्या नाटकाला पहिलं बक्षीस मिळेल की नाही यावर मुलांमध्ये सट्टा लागला होता. तो सुद्धा माळीचा म्युझिकल ड्रामा झाल्यावर अन आमचा ड्रामा सुरु होण्याआधी. पण पसंती आम्हाला जास्त होती हे नव्याने सांगायला नको..! आमचा ड्रामा झाल्यावर मग एक दोन परफॉर्मन्स झाले मग फायनल इयरच्या अनिकेत गायकवाडने "नटरंग"च्या गाण्यावर अप्रतिम डान्स केला, तोही "वन्स मोर"चा प्रतिसाद मिळवुनचं. त्यानंतर सेकंड इयरच्या सायली कासारच्या ग्रुपचा सुद्धा ड्रामा होता.
प्रसाद माळीच्या ड्रामाच्या वेळी त्यातल्या मुलींना सेकंड इयरच्या मुलांनी देखील चिडवल्यामुळे आमच्यातील दोघा-तिघांनी जत्रेत मिळणारे भोंगे वाजवायला सुरुवात केली-न-केली तोच सेकंड इयरच्या मुलांनी आमच्या वर्गातील मुलांवर खुर्च्या फेकल्या. मग काय गॅदरिंगच्या रंगाचा बेरंग झाला. डुंबरे सर मुलांच्या भांडणात पडले तर त्यांनापण सेकंड इयरच्या मुलांकडुन चांगलीच धक्का-बुक्की झाली. इकडे असा तमाशा चालु असतांना सायली कासारचा ड्रामा चालुच होता. शेवटी आमच्या मुलांनी तिथुन पाय काढुन घेणचं पसंत केलं.
कॉलेजचं नशीब बलवत्तर, प्रमुख अतिथी असलेल्या रेडिओ मिर्ची 98.3 FM याचा आर.जे. भुषण मटकरी समोर हा पराक्रम मुलांनी नाही गाजवला ते..! पण ज्या हॉल मध्ये हे सर्व काही घडलं तिथल्या लोकांकडुन ही बाब प्राचार्यांपर्यंत पोहचलीच. अन २६ जानेवारीला या घटनेचे पडसाद एकदाचे उमटलेच! काहीही म्हणा, पण मुलांनी त्या दिवशी कहरच करुन टाकला होता. एकवेळ खुर्च्या फेकल्या ते प्रकरण पचवता येण्यासारखं होतं. पण मंचावर असलेल्या मुलींना एकदम खालच्या दर्जाचे कमेंट्स पास करणं ही गोष्ट खपवुन घेण्यासारखी मुळीच नव्हती. वर लिहिलेले तर काहीच नाही, यापेक्षा भयानक अन लाजिरवाणे कमेंट्स मुलांनी पास केले ही सगळ्यात वाईट घटना C.P.N.च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. जास्त काय सांगणार, पण एवढं नक्की झालं होतं की याचे फार वाईट परिणाम भोगायला मुलांना तयार रहायचं होतं, कारण मुलांनी अखेर एकदाची लायकी दाखवलीच....!
२६ जानेवारीला सकाळी झेंडा वंदन झाल्यानंतर सावकारे सरांनी मला बोलवलं, आणि काल काय प्रकार झाला ते सगळ्या शिक्षकांना सांगायला लावलं. मी झाला तो प्रकार जसाच्या तसा सांगत गेलो, इकडे बेळे मॅडम आणि बाकीच्यां सरांचा संताप शिगेला पोहचला. सेकंड इयरच्या मुलांच नाव ऐकताच धनेश्वर सरांचा पारा चढला. कारण सेकंड इयरच्या बॅचने त्यांना भयानक त्रास दिला होता. एकाने तर त्यांना त्यांच्यासमोर "म्हातार्या" असं म्हणायला कमी केलं नव्हतं. हे प्रकरण ज्यावेळी प्राचार्यांकडे गेलं, तेव्हा सेकंड इयरच्या मुलांची चांगलीच हजामत झाली. शिवाय डुंबरे सरांनी देखील काय झालं होतं, खुर्च्या कोणी कोणावर फेकल्या ते माहिती होतं, त्यामुळे सेकंड इयरचे मुलं चांगलीच अडचणीत सापडले होते. फायनल इयरचे पण काही सिनियर्स होते, पण त्यांची शेवटची काही महिने राहिल्याने त्यांच नाव घेऊ नको असं आमच्या वर्गातली मुलं मला सांगत होती.
सहाजिकच यानंतर कॉलेजमधलं वातवरण आणखी कडक झालं. त्यातही लॅब असिस्टंट शिंदेंना नव्या बिल्डींगमध्ये निरोध सापडले होते. कॉलेजमधली काही मुलं मुली एकत्र अभ्यासाला नव्या बिल्डींगमध्ये बेंच टाकुन बसत होती, त्यांच्यापैकीच कुणाचं तरी काम असावं असं त्यांना वाटत होती. त्यामुळे आता कॉलेजमध्ये मुलींना संध्याकाळी सहानंतर थांबता येणार नाही असं फर्मान काढलं होतं. त्या नव्या बिल्डींगचे काम करणारे कामगार त्याच बिल्डींग मध्ये राहत होते, पण मुलांवरच शंकेची पाल आली होती ही गोष्ट फारच निंदनीय होती. यंदा इंडस्ट्रियल ट्रेनिंग केलं असल्याने कॉलेजमध्ये साधारण चार दिवस येता आलं नव्हतं, आणि नंतर पुन्हा आजारी असल्यामुळे दोन दिवसांचे बंक्स झाले होते असे एकुण सहा बंक्स मंजुर करुन घ्यायला प्राचर्यांकडे गेलो होतो.
आजपर्यंत बंक मंजुर करुन घेण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. ट्रेनिंगचे चार दिवस तर सरांनी लगेच मंजुर केले, पण आजारी असल्यामुळे झालेले बंक्स काही मंजुर केले नाहीत. आजारी पडायच्या पहिले बंक्स मंजुर करायचे होते, असं आमच्या प्राचार्यांचं म्हणनं होतं. आता कोणाला स्वप्न पडता, वा कुणी दिव्यात्मा आहे ज्याला आपण केव्हा आजारी पडणार आहोत ते कळतं. येत्या दोन दिवसांनंतर मला कावीळ होणार आहे सर कृपया सात दिवसांसाठी बंक्स मंजुर करुन देता का? असं त्यावेळी मी मनात म्हणत बाहेर आलो होतो.
फेम केयर फार्मा, अंबड येथे मी इंडस्ट्रियल ट्रेनिंग केलं होतं. दरवेळी आमच्या कॉलेजमधली मुलं टॅब्लेट्स आणि कॅप्सुल्स जिथे तयार होतात तिथेच ट्रेनिंग करायला जातात. पण मी कॉस्मेटिक्स इंडस्ट्रितच ट्रेनिंग करायचं ठरवलं होतं. फेम केयर फार्मातली लोकं फार चांगली होती. अगदी वर्करपासुन ते मॅनेजर्सपर्यंत सगळा स्टाफ चांगला होता. प्रोडक्शन, क्वॉलिटी कंट्रोल, रिसर्च & डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, पॅकेजिंग, स्टोअर्स अशा अनेक विभागातुन मला ट्रेनिंग दिलं गेलं. माझं नशीब चांगलं होतं, कारण मला ऑक्सिब्लीच आणि हेयर रिमुव्हींग क्रिम यांच प्रोडक्शन अगदी जवळुन बघायला मिळालं. क्वॉलिटी कंट्रोल या डिपार्टमेंट मध्येही खुप काही शिकायला मिळालं. रिसर्च & डेव्हलपमेंट मध्ये वेगवेगळी प्रोडक्टस कशी चांगल्यात चांगली बनवता याची माहिती मला समजेल अशा शब्दांत सांगितली होती.
तिथे फोटो काढण्याची सक्त मनाई होती. एकंदरीतच इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा अनुभव खुप छान होता. इतक्या मोठ्या प्रमाणात न ब्रेक होता क्रिम्स बनवली जाते हे मी अगदी जवळुन पाहिलं होतं. आम्ही कॉलेजमध्ये १०-१५ ग्रॅम्सच्या वर क्रिम्स वा लोशन बनवायचो, पण तेही पहिल्याच खेपेत बनेल याची खात्री नसायची, पण इंडस्ट्रित १००० लिटरची बॅच तयार होत होती, आणि ते सुद्धा काही चुक न घडता. इंडस्ट्रियल ट्रेनिंगमुळे वर्क इथिक्स काय असतं, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, वर्कर आणि मॅनेजर यांच्यात कसं वातावरण असतं हे बघायला आणि शिकायला मिळालं. रवी चुणे, शलाका कदम, मंदार काळे, सौ. मंजुषा जोशी मॅडम, यांनी मला फार्मा इंडस्ट्रिबाबत भरपुर माहिती दिली होती.
खरंच एप्रिल-मे हे दोन महिने ऐन परीक्षांचा काळ अन नेमकी त्यावेळीच काही-ना-काही गोष्टी अशा घडतात, अन मग वैतागुन म्हणावं लागतं आता वाजलेत की बारा..! दरवेळी परीक्षांची चाहुल लागली की तहान लागल्यावर विहीर खोदायची त्याप्रमाणे आमच्या कॉलेजमधली ४५%मुलं खडबडुन जागे होतात. ४५% मुलं जणु एकदाची परीक्षा आलीच अशा थाटात परीक्षेच्या स्वागतासाठीच सज्ज असतात, तर उरलेले मुलांची कंडिशन "अरे इतक्या लवकर परीक्षा, अजुन तर पोरशन व्हायचा बाकी आहे, आता नेहमी प्रमाणेच वाट लागली!!" अशीच होऊन जाते. आमची थर्ड सेशनल एकदाची झाली की सगळ्या कॉलेजवर जणु अवकाळाच आली असं वाटतं. ज्याला पहावं त्याला एक ना अनेक समस्या, चिंता, शंका-कुशंका, सगळ्या तोंडावर स्पष्ट दिसत असतात. "यार माझा फार्माकोलॉजीचा ऍव्हरेज होईल का नाही?" " अरे कोलॉजीचं काय मेडिसिनल केमिस्ट्री,सगळ्यात बाप विषय आहे, अरे एका चॅप्टरचे स्ट्रक्चर्स केले की मागच्या चॅप्टरचेचे स्ट्रक्चर्स जणु आपल्याला म्हणतात ’बघ माझी आठवण येते का?’ मेडिकेमच्या प्रॅक्टिकलची सगळी भिस्त तर वेगवेगळ्या ड्रग्सच्या स्ट्रक्चरवरच, त्यात भर म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर्सची साथ आपली वाट लावण्यासाठी तयार झालेला दुग्धशर्करा योगच आहे." "अरे स्ट्रक्चर्स, IUPAC नॉमेनक्लेचर्स गेले तीन टाईम, पण ऍनालिसिसची डायल्युशन्स अन इंस्ट्रुमेंट्स यांची काळजी लागुन आहे रे. आयला कोणत्या वेळी हे इंस्ट्रुमेंट्स दगा देतील काही भरवसा नाही." "अरे त्याचं इतकं टेंशन नसतं रे,
सगळ्यात भयानक प्रकार म्हणजे डुंबरे सर मुलांना दिलेले डायल्युशन्स बसच्या तिकीटावर, नाहीतर एखाद्या छोट्याशा चिठ्ठीवर लिहुन ठेवतात, अन नेमकी ती चिठ्ठी हरवुन जाते." "ते सोडा रे फार्माकोग्नोसीच्या प्रॅक्टिकलला ट्रान्सव्हर्स सेक्शनचा झोल होतोच बरं का.! आदिमानवाच्या काळापासुन जपुन ठेवलेल्या असतील अशा त्या जडी-बुटींवर आपल्याला ऍन्युअलचं प्रॅक्टिकल काढायचयं.." "फार्मास्युटिक्सला कमी नका समजु बरं का? आयला 33 प्रोडक्टसचे फॉर्म्युले रटायची. त्यातही शेव्हींग क्रिम, व्हॅनिशिंग क्रिम सारखे प्रिपरेशन्सभरीस भर म्हणजे ग्रॅन्युल्स कधी बनतात तर कधी बनतचं नाही.." या सारखे संवाद कॉलेज मधील मुलांमध्ये चालत असतातं.
आमच्या कॉलेज मधली काही मुलांचा नुसत्या नोट्स झेरॉक्स करायचा दणका चालतो. गरज असो-वा-नसो आपल्या बरोबरचे मुलं करतात ना मग आपण पण झेरॉक्स करुन टाकयच्या. उगाच नंतर कटकट नको. अशी भावना मनी बाळगणारे नगीने भरपुर सापडतील. वर्षाच्या सुरुवातीलाचा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्या हे मुलं वर्षाच्या शेवटी करत असतात. मग अशावेळी हत्ती गेलं अन शेपुट राहिलं असं म्हणन्यापेक्षा शेपुट गेलं अन हत्ती तेवढा राहिला हेच योग्य वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतांना मुलां समोर येते ती जरनल सर्टिफाय करायची अन फाइन भराण्याची वेळ..एकवेळ जरनल सर्टिफाय करवुन घेणं काही वाटतं नाही पण फाइन भरणं, यावर प्रत्येकाचा मेंदु विचार करतोच.
"सर मला किती फाइन लागला आहे?" असं मुलांनी विचारलं अन चुकुन जर त्यांच्या अपेक्षेपेक्षा त्याला जर जास्त फाइन बसला तर मग त्या मुलांची स्थिती बघण्या सारखी असते. "सर माझे अमुक बंक्स मंजुर झालेले आहेत, किंवा हे ब्रेकेज माझं नाही, किंवा ह्या ब्रेकेज समोरची सही माझी नाही. सर हे ब्रेकेज कॉमन वर टाकलं होतं ना मग आता मला एकट्याला कसं काय फाइन बसला?" ह्या प्रश्नांची बरसात करायला मुलं लगेचं तयार. अन समोरुन उत्तर एकचं, "प्राचार्यांना भेटा!" मग नाईलाज को क्या ईलाज है? म्हणतं फाइन भरायचा अन एकदाचं हॉल तिकीट मिळवायचं, अशा एक ना अनेक समस्या सोडवतं अभ्यास करायचा, मग कसं काय बारा वाजणार नाहीत हो..?
यावेळी एक गोष्ट आमच्या डिफॉल्टर्ससाठी प्राचार्यांनी चौथी सेशनल घेतली, अन तेही प्रत्येक पेपरचे ७५/-रुपये जास्तीचे भरुनच. डिफॉल्टर्सला मात्र यावेळी फायदा झाला कारण कित्येक विषयांचे पेपरमध्ये थर्ड सेशनलला आलेले प्रश्न टाकलेले होते. एक दोन विषयांचे तर थर्ड सेशनलचेच पेपर रिपिट झाले होते, त्यामुळे त्यांचा ऍव्हरेज चांगला झाला होता. १२८ बंक्सचा रेकॉर्ड आमच्या बंकवीर नितीन बागुलने यंदा केला होता, असं सावकारे सरांकडुन कळलं. कॉलेजच्या इतिहासात सगळ्यात जास्त कॉलेज बंक कुणी केलं असेल तर बागुलचं नाव त्यात अग्रभागी असेल. म्हणुनच तर मुलांनी त्याला सम्राट बंकेश्वर अशी उपाधी दिली होती.
यंदा आम्हाला प्रत्येकाला प्रोजेक्ट साठी सर्वांना एक एक ड्रग दिला होता, आणि त्याचा review reoprt आम्ही सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या हाताने लिहिला होता. ज्यांच अक्षर खराब होतं त्यांचा तो रिपोर्ट बघण्यासारखा होता. सर्वांना आपाआपल्या प्रोजेक्ट साठी सेमिनार देणं गरजेचं होतं, त्यामुळे सगळ्यांचा पावर पॉइंट प्रेझेंटेशन चांगल असण्यावर भर होता. आमच्या वर्गातल्या प्राजक्ताचा, नितीशचा आणि वैभव सुखाळकरचा सेमिनार खरचं खुप छान झाला होता. पण शंतनुच्या प्रेझेंटेशनमधले फोटो पाहुन सर्वांना हसु येतं होतं. त्याचा ड्रग हा डिप्रेशन आलेल्यांसाठी वापरतात, त्यामुळे त्याने डिप्रेस झालेल्या माणसांचे तुफान फोटो टाकले होते. आणि त्या फोटोतल्या माणसाला बघुन मुलं हसत होती.
फोटोग्राफीच्या बाबतीत आमच्या वर्गात शंतनुचा हात कोणी धरु शकणार नाही. फोटोग्राफीची चांगली समज त्याला आहे. एकदम साध्या कॅमेर्यातुनही तो चांगले फोटो टिपण्यात तरबेज झाला आहे. सर्वांचे सेमिनार झाल्यानंतर मग इंटरनल म्हणुन असलेल्या श्री. आखडे सरांनी शंतनुचा सेमिनार सगळ्यात चांगला झाला, असं सांगितलं. त्यामुळे शंतनु फारच खुष होता. योगेश शिरोळेला मात्र सेमिनार देतांना फार टेंशन आलं असावं, कारण त्याच्या सेमिनारच्या वेळी तिथे मिलिंद वाघ सर, बेलसरे सर, वाघ सर, धनेश्वर सर उपस्थित होते, आणि ते त्याला प्रश्न विचारत होते, याला तर काय बोलावं आणि काय बोलु नये असं झालं. चांगला पाऊण तास त्याचा सेमिनार चालला होता, त्याचीस्थिती बघण्यासारखी आणि केविलवाणी झाली होती.
असो, यावेळी थर्ड इयरला म्हणावं तसा अभ्यास कुणीच केला नव्हता. आम्हा फार्मसीच्या मुलांची गेटची परिक्षा रद्द केल्याने मुलांच्या डोळ्यासमोरचं टार्गेट गेलं होतं, त्यामुळे मुलही चलता है चलने दो, याच्यात मस्त राहायचे. मिलींद वाघ सरांचे मात्र शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचामार्फत गेट ची परिक्षा पुन्हा सुरु करणासाठी न्यायालय़ीन लढा देण्यासाठी प्रयत्न सुरु होते. वेगवेगळ्या कार्यालयांपुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी मोर्चे काढले होते. पण त्यांच्या प्रयत्नांना म्हणावं तितकं यश मिळत नव्हतं. कारण फार्मसीची आपल्या देशातली स्थिती हेच मला वाटलं, शिवाय मिडियाचा प्रभावी वापर झाला नव्हता असंही आमच्यातल्या काहींना वाटायचं. राज ठाकरे साहेबांच्या मनसे कडुन काही प्रयत्न करुन बघुया असं आम्ही ठरवलं होतं, पण सरांची कोणत्याच राजकीय पक्षाची मदत न घेता लढा देण्याचं ठरवलं त्यामुळे मग मुलं गप्प बसली होती.
यावर्षी देखील नेहमी प्रमाणे मे महिन्यातच आमची परिक्षा पार पडली, ऍनालिसिसच्या प्रॅक्टिकलला एक्सटरनल म्हणुन तांबे सर आले नव्हते म्हणुन मुलं खुष होते. आमच्या कॉलेज मधल्या मुलांना त्यांचा इतका तिटकरा होता, की कधी कधी मुलं चक्क शिव्याच देणं पसंत करायचे. मुलांच शैक्षणिक नुकसान करणार शिक्षक होता, असं आमचे सिनियर्स सांगायचे. असो, मेडिकेमच्या प्रॅक्टिकलला मात्र जरा वाट लागली, कारण प्रोडक्ट ओव्हन मध्ये जळुन खाक झाला, आणि कावळे सर असल्याने काही झोल करनं म्हणजे कठीणच काम होतं. त्यामुळे रिकाम्या पॉलिथिन बॅगलाच लेबल चिटकवलं आणि सरांकडे सबमिट करायला गेलो, सरांनी विचारलं की प्रोडक्ट कुठे आहे, मग सरांना काय झालं ते खरं खरं सांगुन टाकलं आणि मग लॅबच्या बाहेर पडलो होतो.
मेडिकेमच्या प्रॅक्टिकलला नापास होऊ नये हीच अपेक्षा मनात होती. युनिव्हरसिटीचे पेपरही चांगले गेले होते, मॅनेजमेंटच्या पेपरमध्ये मुलांना उत्तर चांगलीच टाईम मॅनेज करुन लिहावी लागत होती. बायोटेक्नोलॉजीचा पेपर फुटलायं असं होस्टेलाईट्सला कळालं होतं, आणि मग काय अपेक्षेप्रमाणे तो पेपर खुप सोपा गेला होता. असं एकंदरीत थर्ड इयरचं वर्ष गेलं होतं. आणि आता आम्हाला फायनल इयरचे वेध लागले होते.