"चेक ऍंड मेट..!" असं आनंदाने अर्जुन बोलला, "कमाल आहे अर्जुन तुझी, अरे माझ्या मित्रांशी कितीतरी वेळा मी चेस खेळलो, आजवर कधीच हरलो नाही, पण आज सलग तीन गेम मध्ये हरवलंस तु मला, वेल डन, कोणी शिकवलं तुला इतकं छान चेस खेळायला..?" असं स्वच्छिलच्या बाबांनी अर्जुनला आनंदाने विचारलं. "स्वरालीच्या बाबांनी, ते खुप छान चेस खेळतात, लहान असतांना ते मला आणि स्वरालीला चेस खेळायाल शिकवतं, त्यांच्याबरोबर आजपर्यंत मी एकदाही जिंकलो नाही..!" असं अर्जुन बोलला. सुमारे अर्ध्यातासापासुन त्यांचा गेम बघत असलेली स्वरालीने मग अर्जुनला आवाज दिला. "हे केव्हा आलीस तु स्वराली?" असं अर्जुनने तिला विचारलं. "अरे मी तर केव्हाच घरी आले, केव्हाचा तुमचा गेम बघत होते, काही म्हंटल तरी चालेल पण, अर्जुन अगदी बाबांसारखाच गेम खेळतो तु, काका तुम्हीपण खुप छान खेळतात, पण अर्जुनच्या क्वीनने तुमच्या सगळी चाल उलटवली..!" असं म्हणुन स्वराली हसली. स्वरालीचं ते बोलणं ऐकुन अर्जुन आणि स्वच्छिलचे बाबा दोघंही हसायला लागले. "काय स्वराली, रात्री जेवण झालं की होऊन जाऊ देऊ तुझी आणि अर्जुनची चेसची एक मॅच..!" असं स्वच्छिलचे बाबा तिला बोलले आणि स्वरालीने हसुनच होकार दिला.
गच्चीवरुन खाली आल्यावर स्वराली अर्जुनला बोलली, "काय रे अर्जुन तुला कंटाळवाणं वाटतयं का? तु का आला नाहीस सकाळी स्वच्छिलच्या मित्रासोबत? अरे स्वच्छिलने थंब हिल दाखवली खुप मस्त होती, तुला मिस करत होते रे, का नाही आलास तु?" अर्जुन काही बोलणार इतक्यात, "अर्जुन भैय्या, चल ना आमच्यासोबत क्रिकेट खेळायला..!" असं चिंटुने त्याला आवाज दिला, त्याच्यासोबत त्याची चिल्लरपार्टी आणि वेदालीपण जोडीला होती. चिंटु आणि वेदालीला बघताच अर्जुन आनंदाने स्वरालीला बोलला, "अगं तुमच्यासोबत आलो असतो तो मला इथे चिंटु भेटला नसता ना? अगं हा चिंटु, आणि हे त्याचे सगळे मित्र, ही चिंटुची ताई वेदाली, स्वच्छिल आणि ही दोघंही क्लासमेट आहेत, वेदाली ही स्वराली..!" त्या छोट्या मुलांकडे बघत स्वराली त्यांना बोलली, "ऐ मला पण घ्याल का तुमच्या टिममध्ये कच्चा लिंबु म्हणुन..?" स्वराली असं बोलल्यावर अर्जुन आणि वेदालीला हसायला आलं. इतक्यावेळ स्वतःच्या रुम मध्ये असलेला स्वच्छिलला हसण्याचा आवाज आला आणि तसा तो लगबगीने त्याच्या रुममधुन बाहेर आला. हॉल मध्ये असलेल्या वेदाली, अर्जुन, स्वराली, चिंटु आणि त्यांच्या मित्रांना बघुन स्वच्छिल क्षणभर त्यांच्याकडे बघत बसला.
"हे दिदी, तुला घेऊ आमच्या टिममध्ये, पण स्वच्छिलदादाला नाही घेणार, तो चिटिंग करतो, आमचा बॉल घेऊन पळुन जातो..!" असं चिंटुसोबत त्याचे बाकीचे मित्र बोलल्यावर स्वरालीने स्वच्छिलकडे आश्वर्याने पाहिलं आणि बोलली, "बाप रे, स्वच्छिल अरे काय ऐकतेयं मी? तु या छोट्या मुलांना असा त्रास देतोस? अरे इतका मोठा झालास तरी अजुन तु खोड्या काढतोस? बघं ती मुलं कशी घाबरतात तुला, स्वच्छिल चांगलं नाही रे असं वागणं..!" स्वराली असं बोलली आणि स्वच्छिलला खुप ओशाळल्यासारखं झालं. मनातच तो चिंटु आणि त्याच्या मित्रांना शिव्या घालु लागला, "आईशप्पथ, आज तर आपलं बॅडलकच खराब आहे, चिंट्यासारखी शेंबडी कार्टी स्वरालीसमोर हिरोगिरी करतायं, एकदा स्वराली गेली की दाखवतोय यांना, कसं क्रिकेट खेळतात तेच बघतो. क्रिकेटच काय पण गोट्या-गोट्या खेळणंही अवघड करेल तुमचं.!" असं स्वच्छिल मनातच बोलला.
"हे चिंटु, असं काहीपण काय बोलतो," असं म्हणत वेदालीने त्याला रागवायचा प्रयत्न केला. "चल ना अर्जुनभैय्या," असं अर्जुनच्या हाताला पकडत चिंटु त्याला बाहेर घेऊन जाऊ लागला, तशी त्याच्यासोबत स्वराली आणि वेदालीपण निघाली, त्यांच्यामागुन बच्चे कंपनी निघाली पण स्वच्छिलला वाकुल्या दाखवनुच..! स्वच्छिलने रागानेच त्यांच्याकडे बघितलं, आणि त्याच्यारुम मध्ये येऊन तो खिडकी उघडुन यांचा खेळ बघु लागला. "देवा, तुझी करणी महान रे..! सकाळी या अर्जुनाला एकटं सोडलं, आणि आता या वानरसेनेनं मला एकटं पाडलं, चांगलं नाही केलंस देवा..! असं स्वच्छिल बोलला. इकडे अर्जुन, स्वराली क्रिकेट खेळण्यात रमुन गेले. कितीवेळ यांना बघुन स्वतः जीवाची घालमेल करत बसणार त्यापेक्षा कार्टुन बघुया असा विचार करुन स्वच्छिल त्या खिडकीसमोरुन उठला. थोडावेळ झाल्यानंतर त्याने वेदालीला फोन केला. "हे वेदाली, असं का छळतेयं गं, त्या तुझ्या भावाला काही समज देत जा? यार शोभतं का त्याला, असं कुणा सुंदर मुलीसमोर आपला असा गेम केला राव त्याने..! बरं ते जाऊ दे, तुझी आणि त्या अर्जुनची कशी भेट झाली गं?" असं स्वच्छिल तिला बोलला. "अरे बापरे, कुठे तरी आग लागली म्हणायची तरं, काय रे अर्जुनची स्वराली आवडली का तुला हं? म्हणुनच तु मुद्दाम सकाळी तिला एकटीलाच घेऊन कॉलेजला गेलास ना?" असं वेदालीने त्याला उत्तर दिलं. "हो आवडलीएं मला ती, म्हणुन मी मुद्दाम तिला एकटीलाच घेऊन गेलो कॉलेजला, खुष हेच ऐकायचं होतं ना तुला, झालं तुझ्या मनाचं समाधान, तुझी पण कमालच आहे यार, एक दिवसही झाला नसेल त्या अर्जुनला भेटुन आणि त्यासाठी तु मला, तुझ्या बालमित्राला चिडवतेयं, आय डोन्ट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यु वेदाली..!" असं स्वच्छिल जरा रागातच तिला बोलला. "हे स्वच्छिल, उगाच माझ्यावर का चिडतोयं, अरे तु जर या छोट्यांना असा त्रास देत नसतास ना तर आज तुलाही खेळता आलं असतं, चल नंतर बोलुया, आता माझी बॅटिंग आलीए, आणि अर्जुन बॉलिंग करतोयं..!" असं म्हणुन वेदालीने फोन ठेवला.
"या वेदाली बरोबर बोलण्यात काही अर्थ नाही," असं स्वच्छिल फोन ठेवल्यानंतर स्वगतच बोलला. थोड्यावेळाने त्याने विचार केला, घाई-घाईने त्याने त्याच्याकडे असलेला नवा टेनिसबॉल घेतला आणि बाहेर गेला, "हे चिंटु, हे घ्या तुमच्यासाठी नवा बॉल आणलायं, आता तरी घ्याल का मला तुमच्या टिममध्ये," असं तो म्हणणारच तितक्यात त्याने बघितलं की तिथे ना अर्जुन होता ना स्वराली आणि वेदालीपण दिसत नव्हती. तसा तो आर्यन जवळ गेला आणि बोलला, "अरे तुमचा अर्जुनभैय्या कुठे गेला?" आर्यनने वेदालीच्या घराकडे बोट दाखवल्यावर स्वच्छिलला काळजी वाटु लागली, "वेदाली, या दोघांना तिच्या घरी घेऊन गेली, कमाल आहे या मुलीची..!" असं म्हणुन तो परत त्याच्या घरी आला आणि अर्जुन आणि स्वराली परत यायची वाट बघत बसला. एकतास त्या दोघांची वाट पाहुन आता स्वच्छिलचा संयम सुटणार असं वाटत होतं, म्हणुन तो वेदालीला फोन करायला लागला, पण ती त्याचा फोन मुद्दाम उचलत नव्हती. शेवटी न राहावुन स्वच्छिलने तिच्याघरी जायचं ठरवलं. वेदालीच्या घरची डोर-बेल वाजवल्यावर तिच्या आईने दरवाजा उघडला, "काकु, वेदाली आहे का घरी?" असं त्याने नेहमीप्रमाणे साळसुदपणे विचारलं."नाही रे स्वच्छिल, ती थोड्यावेळापुर्वीच बाहेर गेली, आणि तिच्याबरोबर तर तुमच्याघरी आलेले पाहुणे होतीच की, कदाचित तुझ्याच घरी गेली असणार बघं..!" असं वेदालीची आई बोलल्यावर स्वच्छिल तिथुन निघाला, वेदाली अर्जुन आणि स्वराली या दोघांना घेऊन कुठे गेली असेल याचा तो विचार करु लागला.
No comments:
Post a Comment