Saturday, May 19, 2012

छाटलेल्या पंखांची भरारी..! भाग-१

       नमस्कार मित्रांनो, "नशीबाची साथ नको रे मला, मनगटांत अजुन बरंच बळ आहे, अपयशाचं फळ सुद्धा मित्रा, यशाच्या फळा इतकंच गोड आहे..!" ही चारोळी जेव्हा फेसबुकवर अपलोड केली त्यावेळी तिला अनपेक्षित असा उत्तम प्रतिसाद लाभला, म्हणुन तुम्हाला जास्त वाट पहायला न लावता तुमच्या भेटीस घेऊन येत आहे "शिंपल्यातले मोती..!" या कथासंग्रहातील माझी १० कथा "छाटलेल्या पंखांची भरारी..!"
        "आज मृत्यु मला कवेत घ्यायला आलायं, आणि मला त्याचं जराही कौतुक नाही, आज मी त्याच्याशी मैत्री करायलाही तयार आहे..!" असं जणु तो आपल्या शेवटच्या घटका मोजतोय अशा रितीने आपल्या लाडक्या अर्धांगिनीला बोलला. "तुम्ही असं अभद्र नका हो बोलु काही..!" असं म्हणत तीने आपल्या पदराने गालांवरुन ओघळणारे अश्रु पुसतच ती आय.सी.यु. मधुन बाहेर आली..! आपल्या सुनेचा तो दयनीय चेहरा बघुन प्रतापच्या वडिलांचे डोळे भरुन आले..! "आई भवानी, अगं अशी का कोपली गं माझ्यावर तु? पाहिजे तर मला जिवंतपणी नरक दाखवं, पण माझं लेकरु जगवं..!" असं म्हणत त्याच्या आईनेही हंबरडा फोडला..! तितक्यात प्रतापला आय.सी.यु. मधुन ऑपरेशन थिएटर मध्ये स्ट्रेचरवरुन नेतांना त्याच्या वडिलांनी बघितलं..! आपल्या मुलाच्या नजरेचा सामना करतांना त्यांच्या चेहर्‍यावर पश्चाताप जाणवत होता, एका बापाचं आपल्या मुलाला समजण्यात आलेलं अपयश आज त्यांच्या चेहर्‍यावरुन स्पष्ट दिसत होतं..! अपार दुःखात बुडायला तयार असलेली त्याची पत्नी, जीवाच्या आकांताने देवाला साकडं घालणारी त्याची आई, परिस्थितीचं जराही गांभिर्य नसलेली त्याची ती दोन लहान निरागसपणे रडणार्‍या मुलांकडे त्याने एक क्षण पाहिलं आणि त्याची शुद्ध हरपली..!
        जन्माला आल्यावरच नियतीनं अन्याय जणु त्याच्या पाचवीला पुजला होता, त्या प्रतापने दरवेळी नियतीवर मात केली होती..! त्याच्या जन्म झाला तो मुळात अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या कुटुंबात, आई-बाप दोघही वेठबिगारीचं काम करुन कसेबसे दिवस काढायचे, त्यातही दारु म्हणजे त्याच्या बापाचा जीव की प्राण..! आपला बाप असा का वागतो? भडव्या म्हणुनच तो मला हाक मारतो, आईचं नाव सावित्री असुन देखील आपला बाप तिला सारखं रांड या नावानेच का हाक मारतो?, बहिणीला कधी कौतुकाची थाप नाही तर रोज उठता लाथ बसता बुकके का मिळतात? याचं उत्तर छोट्या प्रतापला कधी मिळालंच नाही..! जेव्हा तो सहा वर्षाचा झाला तेव्हापासुन त्याचा बाप त्याला शेतात काम करायला घेऊन जायचा, दिवसभरात नशीबानं त्याला चतकोर भाकर मिळाली तर त्याला आनंद वाटायचा, कधी चिंचेचा पाला, कधी गुलाबाची जमिनीवरची फुलं, कधी कधी बैलांना टाकल्या जायच्या त्यातल्या शिळया पोळ्या खाऊन त्याचं बालपण चाललं होतं..! त्याच्या बरोबरीचेच असलेले काही मुलं गावात फिरुन भिक मागुन आपल्या पोटाची वितभर खळगी भरायचे..! "ये प्रताप्या, अरे घे..!" असं म्हणुन कोणी त्याला ते भिक मागुन आणलेलं काही द्यायचा प्रयत्न केला की त्याला रडु यायचं..! तो ज्या शेताजवळ असायचा त्याच्या जवळच स्मशान होतं, त्यामुळे तो रडत नेहमी तिकडेच पळायचा..!
        "स्मशानात आलं की मुक्ती मिळते..!" असं त्याने एकदा ऐकलं होतं, आणि ही मुक्ती असते तरी काय याचा शोध घ्यायचा त्याचं मन प्रयत्न करायचं. एकदा गावच्या जत्रेत फिरतांना तो हरवला आणि नेमका गावच्या काटकर मास्तराला दिसला. त्याने त्याला विचारलं, "कोण रे तु? कोणाचा पोरगा आहेस?" त्यावर प्रताप रडतच बोलला, "म्या परताप, माह्या बापानं गर्दीत माझं बोट सोडुन दिलयं आणि कुठे हरवलायं काय माहितं..!" असं त्याचं उत्तर ऐकुन मास्तरला हसु आलं, "चल आपण तुझ्या वडिलांना शोधुया, असं म्हणत तो जत्रेत घेऊन त्याला फिरु लागला. जत्रेत एका दुकानात ग्रंथ, पोथ्या आणि बरेच पुस्तके होते, शिवाय पाट्या, पेन्सिल सारखी शैक्षणिक साहित्यसुद्धा एका कोपर्‍यात पडलेली होती. "ह्यो काळं लाकुड कसलं असतं?" असं तो त्या पाटीकडे बघुन बोलला. त्याच्या त्या चौकस नजरेला बघुन मास्तर खुष झाला, "अरे ते लाकुड नाही, पाटी आहे ती..! तिच्या मदतीने आपल्याला लिहिता येतं, शिकता येतं, आणि माणुस शिकला की मोठा होतो..!"
        "मोठा म्हणजे माह्या बापासारखा?" असं प्रतापने मास्तरांना प्रश्न विचारला. त्याच दुकानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज, विनायक सावरकर यासारख्यां महापुरुषांचे फोटो होते, त्यांच्याकडे बोट दाखवुन मास्तरांनी त्याला मोठा माणुस कोण ते सांगितलं. तितक्यात माघनं प्रतापच्या वडिलांची आरोळी ऐकु आली, "ह्यो बघं हा रांडीचा इथं उभा आहे, भडव्या..!" असं म्हणत त्यांनी प्रतापच्या पाठीत जोरदार बुक्का मारला, तितक्यात मास्तरांनी प्रतापच्या वडिलांना सावरलं, "अरे हुशार दिसतयं तुझं पोरगं, याला शाळेला पाठवत जा..! उद्या नाव लावुन घेऊ आपण शाळेत याचं, सकाळी ये ११ वाजता..!" असं मास्तरांनी सांगितल्यावर प्रतापच्या वडिलांनी नुसती होकारार्थी मान डोलावली. जातांना काटकर मास्तरांनी प्रतापला एक पाटी आणि पेन्सिलचा एक बॉक्स घेऊन दिला.
        "ये सुमे, ह्ये बघं मला काय मिळालयं..!" असं आपल्या लहान बहिण सुमनला पाटी दाखावायला प्रताप घर दिसताच पळायला लागला तोच त्याच्या कमरेत त्याच्या वडिलांनी लाथ मारली. "भाड्या फेक ती पाटी.. खबरदार पुन्हा हिला हात लावला तरं, हातच तोडुन टाकील..!" असं रागाने प्रतापचे वडिल त्याला बोलले. तसा तो ढसा-ढसा रडतच घरात शिरला. रात्री जेवण न करताच झोपी गेला, स्वप्नात त्याला ती पाटी दिसायला लागली. पाटीमुळे आपल्याला मुक्ती मिळेल असं त्याला वाटु लागलं, आणि त्याने ठरवलं, की बापानं कितीही मारलं तरी चालेल पण पाटीची संगत कधी सोडायची नाही. सकाळी उठल्यावर त्याने पाटी शोधायचा खुप प्रयत्न केला, शेवटी चुलीमध्ये जळण्यासाठी त्याच्या वडिलांनी तिला टाकलं होतं हे पाहिल्यावर त्याला वाईट वाटलं. घरी काही न  सांगताच तो उठला आणि स्मशानात जाऊन पोहचला, तिथे थोडावेळ बसल्यानंतर त्याला बरं वाटु लागलं, सहज त्याने तिथे असलेल्या काही काड्या जमा केल्या आणि त्याने त्या चौकोनासारख्या लावल्या, "आईशप्पथ, मातीची प्ण पाटी तयार होईल..!" असं त्याच्यातोंडुन वाक्य बाहेर आलं. त्याक्षणापासुन त्याच्या लक्षात आलं की आपण हवं तेव्हा या जमिनीवर मास्तर म्हटंले तसं लिहु शकतो आणि मोठं होऊ शकतो.
        त्यादिवसापासुन प्रतापंच आयुष्यच जणु बदलुन गेलं, त्याला जमेल तेव्हा तो जमिनीवर काड्या रचुन काहीतरी रेखाटण्याचा प्रयत्न करायचा. एकदिवस त्याला एक फाटकी अकंलिपी सापडली, त्यातली अक्षरं तो मातीवर गिरवायचा, पण आपण काय करतोय हे त्याला माहिती नव्हतं, पण असं करुन आपण मोठं होऊ असा विश्वास त्याच्या मनात होता. शेतात कामावर जातांना तो ती अक्षरं मातीवर रेखाटंत जायचा, एकदिवसं गणोबा नावाच्या शेतकर्‍यांन त्याला असं अक्षरं रेखाटतांना पाहिलं, आणि त्याला फार आनंद झाला. "अरे प्रताप, ह्ये अक्षर लिव्हायला कोणी शिकवलं तुले?" असं गणोबानं विचारल्यावर प्रतापला पहिल्यांदा जाणवलं की आपण जे मातीवर काढतो त्याला लिहिणं असं म्हणतात. "म्या मांझं मांझंच काढतु असंच, माह्याजवळ आहे बरीच कागदं, त्यातुन पाहुन काढतु..!" असं प्रताप अभिमानानं बोलला. "आयला, मगं वाच बरं हे काय आहे ते?" असं गणोबाने मातीवर असलेल्या "ग" या अक्षराकडे बोट दाखवतं बोलला. "मला काय माहितं..?" असं प्रतापच्या उत्तराने गणोबाला आश्चर्य वाटलं. गणोबा त्याला बोलला अरे ते "ग" आहे, गणोबाचा ग, अरे तु हे लिव्हतो, पण तुला वाचाया जमतं नाही? एक काम कर उद्यापासनं माझ्या शेतावर येत जा, मी शिकवील तुला वाचाया, अरे ७ वी पास हाये म्या..!" असं गणोबा प्रतापला बोलला.
        दुसर्‍यादिवसापासुन प्रताप नित्यनियमाने गणोबाच्या शेतावर जायचा, त्याला शेतकामात मदत करायचा, त्याबदल्यात गणोबा त्याला दिवसाचे तीन रुपये, जेवणं, आणि  लिहायला-वाचायला शिकवायचा. रात्री घरी आल्यावर प्रताप लवकर झोपुन जायचा, आणि पहाटे लवकर उठुन सगळ्या अंगणात ती अक्षरे गिरवायचा, आणि परत पुसुन टाकायचा. एकदिवस असंच अक्षरे गिरवत असतांना त्याला भास झाला की आपला वडिलांना जाग आलीये, म्हणुन घाई-घाईनं तो घरात जाऊन झोपला, सकाळी प्रतापचे वडिल अंगणात आले, आणि मातीवरची ती अक्षरे बघुन ते मोठ्यानं ओरडले, "प्रताप्या भाड्या, भायेर ये.. या रांडीच्यानं काय तमाशा करुन ठेवलायं अंगणात..!" प्रताप डोळे चोळत बाहेर आला, तसा त्याच्या वडिलांनी त्याला काठीनं बडवायला सुरुवात केली, तसा प्रताप "आये...नको मारु ना...आये..." असं जीवाच्या आकांताने म्हणु लागला, त्याची ती आर्त आरोळी ऐकुन प्रतापची आई बाहेर आली, आपला नवरा आपल्या लेकाला असं गुरांना मारल्यागत मारतोयं हे बघुन ती रडतच प्रतापला सोडवु लागली.
        प्रतापला बराच मार लागला होता, त्याच्या आईनं घाई-घाईनं त्याला गावाच्या वैद्याकडे नेलं, त्यानं प्रतापला तपासलं, आणि बोलला, "मला वाटतंय याच्या उजव्या हाताच्या पंज्याची सर्वी हाडं मोडलीये..!


क्रमश:


No comments:

Post a Comment