स्वरालीची बोर्डाची परिक्षा संपली होती, त्यामुळे ती दिवसभर चित्रकलेचा सराव करायची, "आत्मकथन सोडुन ज्याला इतरही सगळं लिहिता येतं तो खरा लेखक, याप्रमाणे निसर्गचित्रांखेरीज बाकीची चित्र काढता येतात तो खरा चित्रकार..!" या वाक्याने स्वराली एकदम प्रभावित झाली होती, त्यामुळे ती निसर्गचित्रांखेरीज बाकीच्या चित्र प्रकारांचा अभ्यास करु लागली. असाच एक दिवस तीला अलका काकुंनी फोन केला, "हे स्वराली, बेटा आपलं ठरलं होतं ना की सुट्टी लागली की येशील तु माझ्या घरी अर्जुनला घेऊन आहे ना लक्षात तुझ्या?" असं अलका काकु बोलल्या होत्या. अलकाकाकुंचा फोन आला होता हे स्वरालीने तिच्या आईला सांगितलं, आणि मग अर्जुनच्या घरी आली. "हे अर्जुन, तुला दोन-चार दिवस सुट्टी घेता येईल का रे माझ्यासाठी आपल्याला अलकाकाकुंनी बोलवलंय रे, मी, आई आणि तु आपण तिघेजण जाऊया का त्यांच्याघरी?" असं तीने त्याला विचारलं, "चालेल, पुढच्या आठवड्यात जाऊ आपण," असं अर्जुन तिला बोलला. अर्जुनकडुन होकार मिळाल्यानंतर स्वराली खुष होऊन घरी परतली, आणि केव्हा आपण अलकाकाकुंच्या घरी जाऊ असं तिला वाटायला लागलं.सकाळी लवकर स्वराली, तिची आई आणि अर्जुन तिघंही अलकाकाकुंच्या घराकडे बसने रवाना झाले, बसस्टॅंडवर अलकाकाकुंच्या सोबत होता त्यांचा एकुलता एक मुलगा स्वच्छिल..!
स्वच्छिल हा स्वरालीपेक्षा वयाने तीनवर्ष मोठा, पण अर्जुनपेक्षा एकवर्षाने लहान होता. स्वच्छिल या शब्दाचा अर्थ ज्याचं चरित्र स्वच्छ आहे, पण स्वच्छिलची वागणुक त्याच्या नावाच्या अर्थाच्या एकदम विरुद्ध होती, घर सोडलं की बाकी सर्वत्र बॅडबॉयच्या इमेजमध्ये त्याला वावरायला आवडायचं..! "मला फक्त प्रेमात असणारी मजा लुटायचीऎ, पण "प्रेमाचं" लेबल, मला नकोयं." असं तो नेहमी म्हणायचा. स्वच्छिल एकदम जिद्दी होता, त्याला कशातच पराभव स्विकारायला आवडायचं नाही, बॅडबॉय असला तरी तो कॉलेजमध्ये सगळ्या परिक्षांत अव्वल असायचा, त्यामुळे त्यांच्या कॉलेजचा तो जी.एस. होता, त्यामुळे सगळीकडे त्याला मान असायचा. अलकाकाकु जेव्हा स्वरालीच्या घरुन आल्या, त्यांनी स्वच्छिलला स्वराली आणि अर्जुनबद्दल सांगितलं, अर्जुनच्या त्या कौतुक करतांना थकत नसत, त्यामुळे स्वच्छिलला अर्जुन नावाचा मुलगा आहे तरी कोण ज्याचं आपली आई इतकं कौतुक करते म्हणुन त्याला अर्जुनला एकदा भेटायचंच होतं.
बसस्टॅंडवर स्वरालीला बघताच स्वच्छिलला जणु लव्ह ऍट फस्ट साईट असंच वाटलं, त्याच्या कॉलेजमधल्या कित्येक मुलींबरोबर त्याने डेटिंग केलेलं होतं, पण स्वरालीला बघताच जणु त्याची विकेटच गेली असं त्याल वाटलं. पण स्वराली बरोबर असलेल्या अर्जुनकडे जेव्हा त्याचं लक्ष गेलं, तेव्हा सहाजिकच त्याच्यातला बॅडबॉय जागा झाला होता. घरी आल्यावर तो त्याचं घर स्वरालीला दाखवु लागला, त्याच्याबद्दल तो भरभरुन बोलत होता, अशातच स्वरालीचं लक्ष एका ट्रॉफीवर गेलं, "हे स्वच्छिल, ही ट्रॉफी कशाबद्दल मिळाली रे तुला?" असं तीने त्याला विचारलं, आपल्या टि-शर्टच्या बाह्या सावरत स्वच्छिल बोलला, "अगं इंटरकॉलेज बॉडीबिल्डींग मध्ये पहिला आलो तेव्हा मिळाली ती..!" स्वरालीने त्याला तसा प्रश्न विचारला म्हणुन तो फार सुखावला पण क्षणातच स्वरालीने त्याला बोलली, "अरे अर्जुन, या ट्रॉफीसारखीच तुझ्याक्डे पण ट्रॉफी आहे ना, यापेक्षा थोडीशी मोठी आहे ना, हे स्वच्छिल तु आणि अर्जुन पंजा लढवा ना एकदा..!" अर्जुनची तब्येत आपल्यासमोर काहीच नाही हे बघताच स्वच्छिलला जोश आला, आणि तो अर्जुनला आग्रह करु लागला, शेवटी अर्जुनही तयार झाला, पण अवघ्या काही सेकंदातच अर्जुनने स्वच्छिलला हरवलं, स्वरालीसमोर हरलो, यामुळे स्वच्छिलला खुप वाईट वाटलं, यामुळे अर्जुन तर पक्का त्याच्या मनात बसला. सायंकाळी स्वच्छिल अर्जुनला घेऊन त्याच्या मित्रांकडे घेऊन गेला, "हे बॉईज, हा अर्जुन आहे बरं का, एकदम हॉट डुड, हे हा आर्मसेसलर आहे बरं का..!" असं अर्जुनची ओळख त्याने त्याच्या मित्रांना करुन दिली, "भाई, आमच्याशी लावता का पंजा,?" असा प्रश्न उर्जित नावाच्या मित्राने अर्जुनला विचारला, अर्जुनने गम्मत म्हणुन त्याच्याशी पंजा लावुन त्यालाही हरवलं हे बघुन संजय नावाच्या स्वच्छिलचा मित्र त्याला बोलला, "व्वा, यार आमच्या कॉलेजच्या अनबिटेबल आर्म रेसलरला हरवलं, पंजा झाला आता पंच-पंच खेळायचा एक गेम,?" स्वच्छिलचे मित्रांच्या चेहर्यावरचे हावभावाचा अंदाज घेत अर्जुनने साफ नकार दिला.
घरी परतत असतांना, स्वच्छिल अर्जुनला बोलला, "हे अर्जुन, स्वराली आणि तुझ्यात काही रिलेशन आहे का रे? डाव आहे का ती तुझी? आयला, अरे लाजु नको सांग ना खरं खरं तुमच्याबद्दल? आपल्याला तर जाम आवडलीयं रे, साला आमच्या कॉलेजमध्ये अशा आयटम आहे, तु बघशील तर कुणाशी रिलेशन ठेऊ आणि कुणाशी नको असं होईल. पण स्वरालीला पाहिल आणि मला तर..., आईशप्पथ तुझं आणि तिचं अफेअर नसेल तर आपली सेटींग करुन देशील का यार तिच्याशी..!" स्वरालीबद्दल स्वच्छिल असं बोलला हे बघुन अर्जुनला प्रचंड राग आला, त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली, "अरे स्वच्छिल मला वाटलं तु चांगला मुलगा असशील, अरे तुला तर आपण काय बोलतोयं त्याचंही भान नाहिये, अरे असा विचारच कसा आला तुझ्या मनात? तुझ्या जागी आज कोणी दुसरा असता आणि स्वरालीबद्दल माझ्यासमोर असं बोलला असता ना, तर त्याच्या तोंडात हात टाकुन त्याची जीभ खेचली असती, एकदा बोललास, बसं झालं, परत स्वरालीबद्दल असं काही बोललास तर बघं," असं अर्जुन स्वच्छिलच्या डोळ्यांकडे एकदम खुन्नसने बघुन बोलला, "ओय, पहातोय काय रागाने, काय करशील रे? मारशील मला, चल मार एक पंच मारुन दाखव, मग मानेल..!" असं स्वच्छिल अर्जुनला बोलला, आणि खरंच अर्जुनने त्याला खुप जोरात पंच मारला त्यामुळे तो भररस्त्यात खाली पडला, चांगली पाच मिनिटं त्याच्या तोंडुन एक अवाक्षर निघालं नाही, पण त्याच्या डोळ्यांत पाणी आलं, "चिल चिल.. मर्दाची औलाद आहेस तु पटलं मला, माझ्यावर हात टाकलास कोई बात नही, पण स्वरालीचा हात हातात धरुन तुझ्यासमोरुन निघुन जाईल आणि हेच तुझे हात माझ्यासमोर झुकवील मी..! वाटु दे तुला माझा कितीही राग, पण शेवटी बाजी मारेल हा स्वच्छिल वाघ, लक्षात ठेव स्वराली सारख्या चांगल्या मुली नेहमी माझ्यासारख्या वाईट मुलांना सुधारण्यासाठीच असतात रे मजनु, अर्जुन भले ती तुझ्यावर या क्षणाला प्रेम करत असु दे, पण एकदिवस ती माझ्या प्रेमात पडल्याशिवाय रहाणार नाही, कारण स्वरालीला प्रेम करण्यासाठी यापुढे हा स्वच्छिल अर्जुनचा पर्यायच ठेवणार नाही..!" असं स्वच्छिल त्याला बोलला. घरी आल्यावर मात्र काही घडलंच नाही असं तो दाखवत होता.
रात्री सर्वांची जेवणं झाल्यानंतर ते सगळे मिळुन अंताक्षरी खेळु लागले, पण अर्जुनचं मन त्यात रमत नव्हतं, आपल्या आईच्या मैत्रिणीच्या मुलीबद्दल कोणी असं कसं काय बोलु शकतो, ह्या विचारात त्याच मन बुडुन गेलं, स्वच्छिल इतरांना जे दाखवतो, आणि आपल्याला जो स्वच्छिल दिसला यात खरं काय तेच कळत नाही. अंताक्षरीचा खेळ चांगलाच रंगात आला होता, पण अर्जुनचं लक्ष नव्हतं, तितक्यात स्वच्छिलचं, "तु चिज बडी है मस्त, मस्त..!" या गाण्याने अर्जुन संतापला होता हे त्याच्या चेहर्यावरुन कळत होतं, आपल्याला झोप येतीयं असं दाखवुन तो तिथुन जाऊ लागला, त्याचबरोवर स्वच्छिलही उठला. त्याच्या खोलीत आल्यावर अर्जुनसमोर तेच गाणं गुणगुणतं होता, थोड्यावेळाने त्याला त्याच्या मित्राचा फोन आला, "कुणाला तरी आपणं इंम्प्रेस करतोयं कारण आपलं हार्ट तिच्यामुळे फडफडतयं हे पाहुन समोरच्याचं रक्त उकळतयं, उद्या कॉलेजला आल्यावर सांगतो." असं म्हणुन स्वच्छिलने फोन ठेवला. अर्जुनला काही केल्या झोप लागत नव्हती, म्हणुन तो उठला आणि खिडकी उघडुन आकाशातल्या त्यार्यांकडे बघु लागला. स्वच्छिलचं लक्ष त्याच्याकडे गेलं, "काय अर्जुनराव, झोप उडाली का? की निद्रानाश झालायं? झोप येत नसेल तर यौवनाचे चमत्कार बघत बसं, आपल्याकडे बरंच कलेक्शन आहे, शांत झोप लागेल तुला..!" असं म्हणुन स्वच्छिल एकदम कुस्तितपणे हसला. अर्जुनने त्याच्याबोलण्याकडे दुर्लक्ष केलं, थोड्यावेळाने त्याला तिथेच झोप लागुन गेली.
सकाळी स्वच्छिल नेहमीपेक्षा खुप लवकर उठला होता, "हे स्वराली, तु आज येशील का माझ्यासोबत कॉलेजला? माझ्या सगळ्या फ्रेंड्सला भेटवील मी?" असं त्याने तिला विचारलं. "अरे येईल ना, पण अर्जुन?" असं स्वरालीने त्याला विचारलं. "अगं टेंशन नको घेऊ, त्यालापण घेऊ ना सोबत, पण तो अजुनही खुप गाढ झोपेत आहे, माझा एक मित्र आहे तो पिक करेल त्याला, काल रात्री अर्जुनला तसं मी सांगितलयं, अर्जुनच बोलला की त्याला काही हरकत नाहीऎ, तर मग निघुया का आपण?" असं स्वच्छिल स्वरालीला बोलला. क्षणभर थांबुन स्वराली त्याच्याबरोबर जायला तयार झाली, आणि स्वच्छिल तिला बाईकवरुन त्याच्या कॉलेजला घेऊन गेला. सुमारे नऊ वाजता अर्जुनला जाग आली, घड्याळाकडे बघताच तो हैराण झाला, "बापरे, रोज पहाटेच उठणारा मी, आज इतकी झोप कशी लागली?" असं स्वगत बोलत त्याने रुममध्ये नजर फिरवली तर तिथे स्वच्छिल नव्हता. मग त्याने अलकाकाकुंना स्वच्छिल कुठे गेलायं ते विचारलं, "अरे अर्जुन, तो आणि स्वराली दोघं त्याच्या कॉलेजला गेली आहेत, तु तयार हो पटकन, त्याचा मित्र येणार आहे तुला घ्यायला," असं अलकाकाकु त्याला बोलल्या. अर्जुन तयारी करुन स्वच्छिलच्या मित्राची वाट पहात बसला, थोड्यावेळाने फोन आला की स्वच्छिलच्या मित्राची तब्येत अचानक बिघडलीयं, म्हणुन तो येऊ शकत नाही, हे ऐकताच अर्जुन उदास झाला.
No comments:
Post a Comment