"आयुष्यात काही जण मुळातच नैसर्गिक हिर्याप्रमाने असतात, जोपर्यंत अंगठीच्या कोंदणात बसवण्यासाठी हिर्याला तयार केलं जात नाही तोपर्यंत त्या रिकाम्या अंगठी अन त्या हिर्याचं अस्तित्व असुन नसल्यासारखंच नाही का? आयुष्यातील आणखी एक नवं वर्ष आलं." असं वाक्य ३१ डिसेंबरच्या रात्री आपल्या डायरीत लिहुन त्यानं बरोबर रात्री १२ वाजता ती डायरी जाळुन टाकली. धडाधडा पेटलेल्या डायरी कडे अर्जुन एकदम निरागसपणे बघत होता. अर्जुन सिराजसिंह राजपुत २१ वर्षाचा मुलगा होता. पिळदार शरिरयष्टी, नाकी डोळे एकदम सुरेख, सावळा असला तरी एक चमक त्याच्या डोळ्यांत असायची. संघर्ष, प्रामाणिकता आणि आदर या तिसुत्रीवर त्याचं आयुष्य चालंल होतं. असा हा अर्जुन मग जमलेल्या आपल्या मित्रांबरोबर नववर्षाच्या स्वागतासाठी त्यांच्यात मिसळला. "काय यार अर्जुन नेहमी सारखं वर्षभर दररोज अगदी न चुकता डायरी लिहितोस आणि मग वर्षाच्या शेवटी जाळुन टाकतो, निदान जाळायच्या आधी आम्हाला एकदा तरी वाचायला दिली असती." रितेशनं त्याच्याकडे बघुन असं म्हंटल्यावर त्याच्या गालावर गोड हसु आलं, हसला की त्याच्या पाणीदार डोळ्यांत जणु आनंदाश्रु क्षणातच उभे रहायचे. आत्ताही अगदी असंच झालं, पण ह्यावेळी त्यानं आपल्या मित्राच्या बोलण्या कडे दुर्लक्ष करुन आसमंतावर एक नजर टाकली आणि पुन्हा मग तो मित्रांच्या मध्ये आला. सोहमने तोपर्यंत सर्वांसाठी सोमरस तयार करुन ठेवलं. "लाईफ मे एक बार" असं नेहमी म्हणनार्या सोहमला आणि त्याच्या ग्रुपला पहिल्यांदाच चिल्ड बियरचा आस्वाद घ्यायचा होता. अर्जुन साठी देखील त्यानं ग्लास भरला होता. अर्जुन, सोहम, रितेश, हर्षित, नचिकेत, ध्रुव आणि शार्दुल असा तो सात मित्रांचा ग्रुप होता.
सातही जण एकाच फिल्डचे होते, एकाच कॉलेजचे, एकाच गावात राहाणारे. त्यांच्या मैत्रीचं सगळ्या वर्गाला आश्चर्य वाटायचं.! सातही जण जणु सेव्हन वंडर्स. "हॅपी न्यु इयर बॉस" म्हणत सोहम अर्जुनकडे तो भरलेला एकच प्याला घेऊन आला, "मला नकोय रे, तुला माहित आहे ना मला असलं काही पटतं नाही." असं म्हणत अर्जुनने नकार दिला. पण त्याच्या हातात पेला पकडवत बाकीच्यांकडे बघत सोहम बोलला, "अरे ओय आधी विधी तर करुन घ्या मग सुरु करु ना..!" अर्जुनला मात्र हसु आवरनं अवघड झालं. त्याला दिलखुलास हसतांना पाहिल्यावर अख्या ग्रुपला जोश आला. "काही म्हणा दोस्तांनो, अर्जुन एकदम मनमोकळे पणाने हसतो नाही का? नाही तर आपल्या गर्लफ्रेंड्स एकमेकीं बरोबर नेहमी असतात पण त्यातली एखादी जरी हसली की." असं म्हणता म्हणता नचिकेत हसायला लागला, "अरे सगळ्या जणु रिसेप्शनिस्ट सारख्या हसतात असंच वाटतं!" असं सोहम बोलला अन पुन्हा सगळे हसायला लागले. हसता हसता बाकीच्या ग्रुपने आप-आपले प्याले ओठांपर्यंत नेले नसतील तोच "खळ्ळ्ळ.." आवाज आला, अर्जुनने तो भरलेला ग्लास हातातच दाबुन फोडुन टाकला, फरशी वर पडलेल्या त्या फुटक्या ग्लासतच त्याचं ते सळसळणारं रक्त भळाभळा पडु लागलं. "अर्जुन अरे काय केलंस?" असं म्हणत अख्खा ग्रुप त्याच्या जवळ आला, रितेश गच्चीवरुन धावत खाली आला आणि त्याच्या रुममधुन फर्स्ट-एड किट घेऊन आला, अर्जुनच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, रक्ताने माखलेल्या हाताकडे बघुन तो हसला, "टेंशन नका घेऊ रे, जोश जोश मध्ये फुटला, तुम्ही सुरु करा मी करतो माझ्या हाताला बॅंडेज" असं म्हणनार्या अर्जुनकडे पाहुन हर्षित बोलला, "अरे तुझ्या हाताचं नाही, ग्लासभर बियर वाया गेली त्याची चिंता..!" पुन्हा मग ते क्षणभर चिंताग्रस्त झालेलं वातावरणात पुन्हा जणु तरुणाई संचारली. हर्षित मुद्दाम तसं बोलला हे सगळ्यांना माहिती होतं, पी.जे. मारायची त्याची ती सवयच..!
दोस्तांच्या पार्टीला आता चांगला रंग आला होता, तितक्यात "माय हार्ट इज बिटींग" अशी रिंगटोन असलेल्या रितेशच्या मोबाईल वर तेजालीचा फोन आला. घाई-घाई फोन उचलायला गेलेल्या रितेशला ध्रुव बोलला, "वहिनींना आमची आठवण येते का ते विचार रे." "असं का, ओय तुझ्या फ्रिडम फायटरचा फोन येईल ना तेव्हा दाखवतो." असं म्हणत रितेशने फोन उचलला. सात जणांच्या ग्रुप मध्ये अर्जुन आणि हर्षितला सोडुन बाकीच्यांना गर्लफ्रेंड्स होत्या. सोहम मात्र वर्गातल्या सहा जणींचा जणु कॉमन बॉयफ्रेंड होता. नचिकेत आणि ध्रुवच्या गर्लफ्रेंड्सची नावं त्या दोघांनी कंप्युटर गेम्सच्या नावानुसार मोबाईल मध्ये सेव्ह केली होती. ध्रुवच्या चैतालीला देशाचा खुप अभिमान आहे म्हणुन तो तिला फ्रिडम फायटर म्हणायचा. तर मितालीचे वडिल कुस्तीगीर म्हणुन नचिकेत तिला स्मॅकडाउन म्हणायचा. चांगल अर्धा-तास फोनवर तेजालीशी बोलल्यानंतर रितेश परत पार्टीत सामिल झाला. "काय म्हणत होती वहिनी?" असा सगळ्यांनी एकासुरात विचारलं अन रितेश बोलला, "काही नाही तिला रात्री एक वाजता अंताक्षरी खेळायची होती, आता राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्टापुढे कुणाचं काही चालतं का?" सगळे मग एकमेकांच्या चेहर्याकडे बघायला लागली एक मिनिट कुणीच काही बोललं नाही, मग केव्हाचा शांत असलेला अर्जुन बोलला, "वेड्या तुझ्यावर ती खुप प्रेम करते रे.!" "केले असते प्रयत्न थोडेफार तर कॉलेजमध्येच आज असती आमची प्रेम-प्रकरणे दोन चार!" असं हर्षित अर्जुनला पाहुन बोलला. "चला रात्रं खुप झाली," असं म्हणत मग अर्जुन तिथुन जाऊ लागला. अर्जुनला जातांना बघुन सगळे हर्षितला बोलायला लागले, "काय यार, त्याला नाही आवडत त्याच गोष्टी त्याच्या समोर ओकायची तुझी सवय कधी मोडेल काय माहिती."
रात्र चांगलीच भरात होती, चंद्राचं तेज चांदण्यांमुळं खुलुन दिसत होतं, हवेत जरा गारवा होता, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी फोडल्या गेलेल्या फटाक्याच्या दारुचा गंध वातावरणात दरवळत होता. अर्जुनच्या पावलांची गती तशी साधरण होती, निद्रादेवीच्या अधीन असलेल्या घरांकडे बघत बघत तो चालला होता. त्याच्या घराजवळ आल्यावर त्याने समोरच्या सोसायटीतल्या दुसर्या मजल्यावर नजर टाकली, आणि स्वगतच हसावं असं त्याला वाटलं पण तो एक मिनिट तिथेच बघत होता. स्वराली राहात होती त्या प्लॅटवरुन मग त्याची नजर हटली आणि आपल्या घराच्या दाराला लावलेलं कुलुप उघडुन तो त्या घरात आला. त्याच्या डोळ्यात आसवं दाटुन आली होती. त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण यांच्या फोटो कडे बघुन तो रडु लागला. देवीच्या दर्शनासाठी जातांना घडलेल्या अपघातात अर्जुनच्या संपुर्ण कुटुंबाला देवीचं जणु बोलावनं आलं, कारण अवघा बारा वर्षांचा असतांना अनाथपण त्याच्या वाट्याला आलं होतं. त्याचे मामा-मामी त्याच गावात राहात होते, मामा-मामीला मुलं बाळ नव्हतं त्यांनी अर्जुनला त्यांच्याकडे राहण्यास सांगितलं, पण अर्जुनने मात्र आपल्याच घरात राहाण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. त्याच्या स्वावलंबी पणाचं उदाहरण शाळेतले शिक्षक मुलांना द्यायचे. आयुष्यात एकटेपणाचा आनंद आणि एकटेपणाचं दुख: ज्याच्या वाट्याला येतं त्यालाच त्यातलं सगळं कळतं नाही का? अर्जुन मुळात अभ्यासत तरबेज होता, क्रिडा, कला, साहित्याची त्याला प्रचंड आवड होती.
रडता रडता त्याला केव्हा जोप लागली ते त्यालाच कळलं नाही. आज त्याच्या स्वप्नात अचानक त्याला स्वराली दिसली अन तो तसाच खडबडुन जागा झाला. रात्रभर गार फरशीवर झोप लागल्यामुळे त्याच्या अंगभर मुंग्या आल्या होत्या, तरी तो झटपट उठला. आई-वडीलांच्या प्रतिमेला त्याने वंदन केलं, आपल्या घराची साफ सफाई करुन तो व्यायामशाळेकडे निघाला, सकाळचे सहा-सव्वासहा वाजले असतील, वातावरणातील थंडी त्याच्या सर्वांगाला बोचत होती. रात्री हातातच ग्लास फोडल्यामुळे त्याचा हात दुखतं होता तरी तसाच तो व्यायामशाळेत आला, बजरंग बलीच्या मुर्तीसमोर तो नतमस्तक झाला, आणि एकतास कसुन त्यानं व्यायाम केला. जातांनाही त्यानं बजरंग बलीला वंदन केलं, आणि हनुमान चालिसा गुण-गुणत तो बाहेर पडला. सकाळचं धुकं हळुहळु दुर सरुन उगवत्या सुर्यनारायणाचं दर्शन धरणीला होत होतं. रस्त्यावरुन चालतांना त्याच्या डोक्यात त्या स्वप्नाबद्दल विचारमंथन सुरु झालं होतं. त्याचवेळी स्वराली आणि तिची मैत्रीण मैथिली स्कुटीवर बसुन अर्जुन ज्या रस्त्याने घराकडे परतत होता त्याच रस्त्यानं सकाळच्या शिकवणीला चालली होती. अचानक स्कुटी चालवत असलेल्या मैथिलीने अर्जुन जवळ येत असल्याचं लक्षात घेऊन स्कुटीचा वेग कमी केला, ही गोष्ट स्वरालीच्या लक्षात आली, तीनं लगेच मागुन मैथिलीला चिमटा काढला आणि तिच्या कानात काहीतरी कुजबुजली. मैथिलीने मुद्दाम अर्जुन जवळ आल्यावर जोरात ब्रेक दाबला आणि हॉर्न वाजवला आणि वेगात स्कुटी तिथुन चालवली. हॉर्नच्या आवाजामुळे अर्जुनचं लक्ष त्या दोघींकडे गेलं आणि त्याच्या गालावर हसु उमटलं.
No comments:
Post a Comment