असं म्हणतात "ज्याला स्वत:च्या चुका स्वत:लाच कळतात त्याने प्रेमात कधीच पडु नये आणि चुकुन प्रेमात पडलं तर आपल्या प्रेयसी शिवाय दुसरीकडे जगजाहिर करु नये" हे कितपत सत्य असतं हे ज्याला त्याला आलेल्या अनुभवांवरुन ठरणार नाही का? "प्रेम म्हणजे प्रेम असतं-तुमचं आणि आमचं खरंच सेम असतं" हे एकदा तरी तपासुन बघावं असं कॉलेजला असतांना वाटायचं. "केले असते प्रयत्न थोडेफार तर कॉलेजमध्येच असतील आमची प्रेम-प्रकरणे दोन चार..!" या उक्ती प्रमाणे मग आयुष्यातं काहीतरी घडनं स्वाभाविक असतंच.
"तो आणि त्याची ती" ही कादंबरी सामान्यांसाठी तरी एक कथाच त्या दोघांची. आयुष्यात कधीतरी प्रेमात पडलेल्या आणि न पडलेल्यां सर्वांचीच.. प्रेम म्हंटल की लगेच काहींच्या मनातील भावनांवर जणु पहिल्या पावसासारखी धुंदी तर काहींची अवस्था काही औरच जणु दगडालाही पाझर फुटावा अन धरणीला कंप सुटावा. आयुष्यात एकटेपणाचा आनंद आणि एकटेपणाचं दुख: ज्याच्या वाट्याला येतं त्यालाच त्यातलं सगळं कळतं नाही का? तीच्या वर भरभरुन प्रेम करण्याशिवाय प्रेमानं त्याला दुसरं काही शिकवलंच नाही असा या कादंबरीचा नायक. एखाद्या चित्रपटातला नायक वाटावा आजच्या भाषेत सांगायचं तर चॉकलेट बॉय सारखा तर मुळीच नाही, आणि जीच्यावर तो प्रेम करायचा ती पन काही स्वर्गातील अप्सरा नव्हती ना वाटायची चटकचांदणी, पण दोघही एक-मेकांना हवी-हवीशी वाटणारी..!
नदीच्या दोन काठांप्रमाणे ती आणि तो, आणि नदी सारखं आयुष्यभर वाहणारं त्यांच प्रेम, आयुष्याच्या समुद्रात नकळतपणे समावुन वाहुन जातं, उतारवयात मग बाष्पाच्या रुपात पुन्हा जवळ येतं आणि पहाटेच्या कोमल सुर्य किरणांच्या साक्षीने दवबिंदुत जणु एकत्र सामावुन जातं. पानावर साचलेलं ते दवबिंदु मग हळु-हळु खाली पडु लागतं, धरणीच्या पोटात मग हळुच रुजुन जातं, आणि पहिल्या पावसातील मातीच्या सुगंधाप्रमाणे त्यांच्या प्रेमाचा सुगंध सदैव दरवळतो.. जणु माझ्या प्रेमाच्या अर्थ तुला मी मरणशय्ये वर असतांना कळु दे, तुझ्या डोळ्यांतल्या त्या दोन आसवांकडे बघुन पुन्हा मला संजिवनी मिळु दे..! असंच सांगतो.
ठरवुन दोस्त बनवता येतात पण ठरवुन प्रेम कधी करता येतं का? विश्वासाच्या मुळांनी तग धरलेल्या, मैत्री खोडावर, त्यागाच्या फांद्यांवर, इच्छाशक्तीच्या पानावर, निस्वार्थ फुलांजवळ बागडणारं छोटंस फुलपाखरु म्हणजे प्रेम असतं का? या प्रश्नाचं समाधान शोधण्यासाठी जणु तो आणि ती धडपडताय असं तुम्हाला वाचतांना जाणवेल. "तो आणि त्याची ती" ही कादंबरी खरंच आपण करतो ते प्रेमच आहे का ह्याचा विचार करायला लावणारी प्रेमळ आणि निरागस कथाच आहे.
"तो आणि त्याची ती" या कादंबरीच्या लिखाणाची सुरुवात खरी झाली ती मी सेकंड इयर बी.फार्मला असतांना, मी लिहिलेल्या "प्रेमासाठी वाट्टेल ते" यानाटकाच्या कथेतच या कादंबरीचा पाया होता असं मला वाटतं.. बी.फार्मसी पुर्ण झाल्यानंतर आयुष्यात आलेल्या अनपेक्षित वळणार जेव्हा वर्षभर थांबाव लागणारच होतं असं जेव्हा कळलं अन मग जोमानं सुरुवात केली "तो आणि त्याची ती" या कादंबरीच्या लिखाणाला. "तो आणि त्याची ती" ही कादंबरी लिहिणं माझ्यासाठी स्वप्न जगण्यासारखंच होतं असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. "तो आणि त्याची ती" हे नाव मला एकदिवस अचानक सुचलं, त्यादिवशी सहजच लिहायला सुरुवात केली आणि सुरुवातीचे ५-६ पाने लिहिल्यानंतर मला एका क्षणी मीच ते सगळं जीवन जगतोयं असं वाटलं. आणि हीच भावना माझ्यासाठी खुप खास होती, कदाचित ह्या भावनेच्या ओघातच मग ही कादंबरी लिहितांना स्वतःला झोकुन द्यावसं वाटलं. कादंबरीची काही पाने ही ब्लॉगवर टाकली, कादंबरीतली काही वाक्य फेसबुकवरही टाकायचो, त्यांना अनपेक्षित प्रतिसाद येत गेला, आणि त्यामुळे लिखाणाला नवा जोश, नवी उमेद मिळायची. एकदिवस माझ्या घरच्यांना याबाबत सांगितलं, वडिलांनी कादंबरी वाचली, ते काही बोलले नाही मात्र त्या कादंबरीच कौतुक करणारी एक चिठ्ठी त्यांनी मला दिली. ती चिठ्ठी वाचतांना मनाला एक अनोखं, अविस्मरणीय असं समाधान मिळलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी लिहु शकतो याबाबत खंबीर विश्वास त्यामुळे निर्माण झाला. माझ्या लेखणीनं त्यावेळी जणु माझी लाज राखली, कोणत्याही पुरस्कारापेक्षा मला ती चिठ्ठी खुप अनमोल वाटते
प्रस्तुत कादंबरी जरी कल्पनांतुन साकारलेली असली तरी माझ्या आयुष्यातील काही घटनांतुन सत्याची एक किनार तिला देण्याचा नक्कीच थोडासा प्रयत्न केला आहे, म्हणुनच यातील व्यक्ती अन पात्रांच्या नावाचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही, कोठे आढळल्यास निव्वळ योगायोगच समजावा. प्रेमामुळं स्वाभाविक सर्वांना आनंदच मिळतो, सगळे सुखावततात हे जरी खरं असलं तरी जीवनातील सर्व रसांना सगळ्या गुण-दोषांबरोबर एकत्र गुंफुन ठेवत असलेल्या प्रेमावर केलेल्या लिखाणामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास आधीच क्षमस्व. प्रस्तुत कादंबरी मला ज्यांनी जन्म दिला आणि माझ्या आयुष्याचे गुरु असलेल्या माझ्या प्रेमळ आई-वडीलांना, ज्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देऊन या देशातली कोटी कुळे उद्धारली त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सर्वस्वीपणे अर्पण करावीशी वाटते. माझ्या "लाईफ इन फार्मसी कॉलेज" या पुस्तकाला जसा उत्तम प्रतिसाद दिला, अगदी तसाच प्रतिसाद मिळेल अशी नुसतीच आशा नाही तर खात्रीसुद्धा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी निस्वार्थ प्रेमाचा वसंत येवो, आणि प्रत्येक अर्जुनाला त्याची स्वराली मिळेल अशी ईश्वराकडे माझी प्रार्थना..!
तुम्हा सर्वांचा-स्वप्निल सुरेश गरुड
No comments:
Post a Comment