सकाळी स्वरालीचे बाबा, स्वराली आणि तिची मैत्रिणी मैथिली तिघही अर्जुनला भेटायला गेले. अर्जुन त्यावेळी जागाच होता. स्वरालीला बघताच त्याचा चेहरा आनंदानं फुलला. स्वरालीच्या बाबांनी डॉक्टरांशी भेट घेऊन अर्जुनच्या तब्येतीविषयी विचारपुस केली. त्याच्या मामांना त्यांनी घरी जायला लावलं, ते घरुन जाऊन येईपर्यंत स्वराली आणि तिचे बाबा तिथेच थांबणार होते. स्वराली आणि मैथिलीनं अर्जुनसाठी खुप छान फुलं आणली होती. त्या दोघी थोडा वेळ तिथेच होत्या, मग नर्सने त्यांना आय.सी.यु. मधुन बाहेर जायला लावलं. बाहेर आल्यावर मैथिली स्वरालीला हे नक्की घडलं कसं हे विचारु लागली. स्वरालीला जेवढं माहिती होतं तितकं तीने तिला सांगितलं. थोड्यावेळानं ज्या ट्रक ड्राईव्हरने अर्जुन आणि त्याच्या मित्रांना हॉस्पिटल पर्यंत पोहचवलं होतं, तो तिथे आला होता अर्जुनला भेटायला. "कसा आहे अर्जुन?" असं त्यानं डॉक्टरांना विचारलं. नंतर त्यानं त्यादिवशी आपण रागाच्या भरात त्यांना अपशब्द वापरले म्हणुन माफी पण मागितली. डॉक्टरांनी देखील त्याला मोठयामनानं माफ केलं. अर्जुनच्या तब्येतीत आता सुधार होत होता. दरम्यान गावचे सरपंच त्याला भेटण्यासाठी आले. त्यांनी त्याच्या साहसाचं कौतुक करतांना यंदाचा ग्रामपंचायतीकडुन दिला जाणारा विशेष शौर्य पुरस्कार त्याला देण्याचं ठरवलं. अर्जुनची तब्येत बरी झाल्यानंतर तो पुरस्कार प्रदान करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. तसेच रक्तदान शिबिराचही आयोजन करण्यात आलं होतं.
दहा दिवस अर्जुन हॉस्पिटल मध्येच ऍडमिट होता, त्याच्या प्रकृतीत पुर्ण सुधारणा झाल्यानंतर त्यांनी अर्जुनला डिस्चार्ज दिला. तोपर्यंत रोज स्वराली नित्यनियमानं त्याला भेटायला यायची. हर्षित आणि रितेशदेखील त्याला भेटण्यासाठी येत असत, पण स्वरालीला जेव्हा कळलं की अर्जुनने ज्यावेळी हर्षितला वाचवलं, त्यानंतर हर्षित बसुनच राहिला होता, अर्जुनची त्यानं मदत केली नव्हती, त्यामुळे स्वरालीला हर्षितचा राग यायला लागला. बुद्धीबळात आपल्याच प्याद्यांमुळं राजा अडचणीत सापडावा, असंच अर्जुनच्या अवस्थेचं तिला वाटलं. त्यामुळे ती कटाक्षानं हर्षितशी बोलणं टाळत असायची. अर्जुनला त्याच्या बहादुरीबद्दल पुरस्कार त्याच्या कॉलेजमध्ये प्रदान करण्याचं ठरलं होतं. दुपारी चार वाजता कॉलेजचा सभागृह मुलांनी, गावतील प्रतिष्ठित व्यक्तींनी, पालकांनी भरुन गेला होता. स्वराली तिचा पेपर झाल्यावर आई-बाबांसोबत तिथे आली होती. खानसरांनी स्वरालीला ओळखलं, त्यांनी तिला आणि तिच्या आई-बाबांना स्टेजच्या समोरच असलेल्या पहिल्या रांगेतच बसण्याची व्य्वस्था केली. सव्वाचारच्या सुमारास कार्यक्रमास सुरुवात झाली. प्राचार्यांनी आपलं मनोगत मांडलं, आपल्या मनोगतात त्यांनी अर्जुनचं कौतुकही केलं तसेच त्याच्या चार मित्रांना श्रद्धांजली पण दिली. नंतर सरपंचांच्या हस्ते अर्जुनला पुरस्कार देण्याची विनंती सुत्रसंचालकांनी केली. "एक मिनिट थांबा सर, मला पहिले काही बोलायचं आहे," असं म्हणत अर्जुन व्यासपीठावर असलेल्या माईककडे जातांना बोलला.
"आपल्याला मला एक गोष्ट सांगायची आहे, मी हा विषेश शौर्य पुरस्कार स्विकारण्यास मी अजिबात पात्र नाहीए, ज्या मित्रांचे जीव वाचवण्यासाठी मला हा पुरस्कार दिला जातोय, आणि ज्या मित्रांना मी वाचवु शकलो नाही त्या माझ्या मित्रांना मीच तो धबधबा दाखवला होता. डॅम बघायला आम्ही जेव्हा गेलो त्यावेळी तिथल्या शिपायानं कटाक्षानं आम्हाला मनाई केली असतांनाही आम्ही दुसर्या रस्त्यानं तिथे गेलो. जातांना एका वडिलधार्या शेतकर्यानंही आम्हाला सावध केलं होतं, पण त्याकडे दुर्लक्ष झालं, अगदी विनाशकाले विपरीत बुद्धी अशीच अवस्था झाली. सुमारे दिड तास त्या शांत वाटणार्या पाण्यानं जेव्हा विक्राळ रुप धारण केलं त्यावेळी आमच्या काळजाचा ठोका चुकला. माझ्याशिवाय कुणालाच पोहता येतं नव्हतं, आणि म्हणुनच मी त्यांना वाचवलं, मी जर तो धबधबा त्यांना दाखवला नसता तर आज हा बिकट प्रसंग ओढावलाच नसता. माझ्या चारही मित्रांच्या मृत्युला मीच जबाबदार आहे, आणि त्यामुळेच मी हा पुरस्कार स्विकारु शकत नाही." असं म्हणत अर्जुनचे डोळे भरुन आले. उपस्थितांचही मन हेलावुन गेलं. मग स्वतः सरपंच उठले, त्यांनी अर्जुनला सावरलं.
"जे झालं ते नियतीला मंजुर होतं, त्यात तुझी चुक नव्हती मुला, आपला जन्म कोणत्या रुपात असावा, केव्हा व्हावा, हे जसं आपल्या हातात नसतं, त्याच प्रमाणं मृत्यचंही आहे. कोणत्या क्षणी, कोणत्या रुपात मृत्यला अलिंगन द्यावं लागेल हे सांगता येत नाही. शेवटी जन्म होणं हे जर सत्य असेल, तर जन्माला आलेला प्रत्येक जण एकदिवशी मरणार हे अटळ सत्यच आहे ना. तु दाखवलेल्या असिम बहादुरी, प्रसंगावधाना मुळेच तुला हा पुरस्कार हा देण्यात येतोय अर्जुन." असं सरपंच बोलले. "तु खरचं त्या पुरस्काराच्या लायक आहेस रे अर्जुन.." असं खाली बसलेला हर्षित व्यासपीठाकडे येतांना बोलला. त्याच्या डोळ्यातनं अश्रु वाहत होते, तरी त्यानं सगळ्यांना त्या दिवशी अर्जुनने कसं त्याचे आणि रितेशचे प्राण वाचवले, खुप दुरुन वाहत चाललेल्या सोहमचं शव आपल्या खांद्यावर उचलुन आणलं, रस्त्यावर आपल्या जीवाची पर्वा न करता भरधाव वेगानं येतं असलेल्या ट्रक समोर आडवं झोपुन मदत आणली, हे सगळं हर्षितनं सांगितलं. उपस्थित सर्वांच्या डोळ्यांच्या कडा अश्रुंनी पाणवल्या. रितेशही मग व्यासपीठावर आला, त्यानं आणि हर्षितनं तो पुरस्कार त्यांच्या हातांनी अर्जुनला दिला.
"आमच्या आयुष्यात आलेला हा सगळ्यात कठीण प्रसंग होता, जमलं असतं तर अर्जुनला एकट्याला सुखरुप राहता आलं असतं, पण त्यानं तसं न करता आमचे जीव वाचवले. मैत्रीचा खर्या अर्थ त्याने त्याच्या कृतीतुन दाखवुन दिला. एकवेळ सख्खा भाऊ असता तरी त्या भावाने वेगानं वाहणार्या पाण्यात उडी मारण्याआधी एकवेळ विचार केला असता, पण अर्जुनच्या मनात हा विचार सुद्धा आला नसेल. प्रवाहाविरुद्ध पोहत जाऊन त्यानं जेव्हा सोहमला पकडलं असेल, त्याला तिथंच समजलं असावं की तो मेला आहे, पण तरी त्याचं शरीर त्यानं जिद्दीनं काठापर्यंत आणलं, देव कोणत्या रुपात दर्शन देतो, असं मला विचाराल तर मी क्षणाचाही विलंब न लावता या माझ्या मित्राकडे बोट दाखवेलं," असं म्हणत रितेशनं अर्जुनला मिठी मारली.
मग प्राचार्यांनी, सरपंचांना विनंती केली, "सरपंच साहेब, एक प्राचार्य म्हणुन नाही, तर एक पालक म्हणुन मला सांगावंस वाटतं की धरणाचे पाणी जेव्हा सोडण्यात येईल त्याच्या निदान दहा मिनिट पुर्वी तशी सुचना करणारा अलार्म तिथं बसवण्यात यावा. आपल्या गावातल्या रक्तपेढीचं सक्षमीकरणं करावं, त्यासाठी रक्तदानचं महत्व गावकर्यांना पटवुन द्यावं, म्हणजे भविष्यात चुकुन असा दुर्देवी प्रसंग घडणार नाही, आणि घडलाच तर यावेळी आज अर्जुनला जशी रक्ताची वाट बघावी लागली, तशी वाट बघावी लागणार नाही. आपलं हे पाऊल या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माझ्या चारही विध्यार्थ्यांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल." सरपंचानी देखील प्राचार्यांची विनंती मान्य केली. नंतर अर्जुनला मदत करणार्या ट्रक ड्राईव्हरचा, अर्जुनला विपरीत परिस्थितीतही वाचवणार्या डॉक्टरांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सोहम, नचिकेत, ध्रुव आणि शार्दुलला दोन मिनिट मौन ठेवुन श्रद्धांजली देवुन झाली.
कार्यक्रम झाल्यानंतर स्वराली अर्जुनला भेटली, "खरचं अर्जुन तु खुप ग्रेट आहेस," असं ती बोलली. हर्षितनही प्रामाणिकपणे जे घडलं ते सर्वांसमोर सांगितल्यामुळे तिला बरं वाटलं होतं. सायंकाळी अर्जुन घरी आला, स्वरालीही त्याच्याबरोबर होती. अर्जुन थोडावेळ काहीच बोलला नाही, आणि नंतर तो रडु लागला. "देवानं नेहमी माझ्यासोबत असं का करावं गं? लहानवयात माझं कुटुंब माझ्यापासुन हिरावुन घेतलं, त्यातुन सावरण्यासाठी मला चांगले मित्र दिलेत, पण माझ्यामुळेच त्यांच्यावर जीव गमवायची वेळ आलीए, स्वराली..! माझा ज्यांच्यावर जीव जडतो, विधाता लगेच त्यांना माझ्यापासुन असं का गं दुर करतो, आयुष्याला गरजेचं असणारं पाणी असं विसंगत का वागतं गं, स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्याला बुडवतं, आणि मेलेल्या प्रेतांना तरंगत ठेवतं? कधी कधी तर मला वाटतं." असं म्हणत त्यानं स्वरालीचा हात पकडला. त्याच्या डोळ्यातील अश्रु तिच्या नाजुक हातांवर एकसारखे पडत होते. "अर्जुन असं काहीच घडणार नाही रे, तु रडु नकोस रे, तुला असं रडतांना नाही बघवत रे माझ्याकडुन, मला पण रडायला येतं," असं म्हणत स्वरालीनं त्याच्या डोळ्यांतले अश्रु पुसले. थोडावेळ ती तिथेच थांबली, "जेवायला ये रात्री घरी.." असं सांगुन ती बाहेर पडतच होती तोच अर्जुन बोलला, "अन्नावरची इच्छाच मेलीए गं.." "मला काही कारण नको सांगु, तु रात्री जेवायला यायचं म्हणजे नक्की यायचं. तु जोपर्यंत येणार नाहीस तोपर्यंत मी पण जेवणार नाही." असं म्हणत स्वराली निघुन गेली.
अर्जुन थोडावेळ तसाच उभा राहिला, मनात चाललेल्या विचारांच्या वादळातुन त्याला बाहेर पडता येत नव्हतं, कोणीतरी खुप उंचावरुन त्याला ढकलुन दिलयं, आणि अजुनही त्याचं शरीर खाली कोसळलं नाहीए, आकाशातुन पडणार्या उल्केला असलेल्या वेगाप्रमाणं आपण खाली येतोयं असं त्याला वाटतं होतं. या विचाराच्या तंद्रीत असतांना त्याला चक्कर आली, आणि तो खाली पडला. कितीतरी वेळ तो तसाच पडुन राहिला. रात्री साडे आठच्या सुमारास, "अरे अर्जुन, काय झालं तुला? अर्जुन..अर्जुन.." अशा स्वरालीच्या हाकेनं तो जागा झाला. "स्वराली, खुप थकल्यासारखं वाटतयं गं." असं अर्जुन स्वतःला सावरत बोलला. "थकवा जाणवरणारच ना अर्जुन, आज सकाळी किती दगदग झाली तुझी, चल जेवण करायला, आई-बाबापण वाट बघतायं तुझी. जेवण केलं की तुझा थकवापण दुर होऊन जाईल." असं स्वराली त्याला बोलली. मग ते दोघही तिच्याघरी गेले.
No comments:
Post a Comment