Tuesday, July 31, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.११

              "माझं रक्त घ्या," असं म्हणत ड्राईव्हर पुढे आला, "तुमचा पण तोच ब्लड ग्रुप आहे का?" असं तीनं विचारलं, "ठाउक नाही, पण मनं सांगतयं की त्याला रक्त द्याव," असं तो म्हंटला. नर्स घाईनं त्याला आत घेऊन गेली, सुदैवानं त्याच्या ब्लड ग्रुप तोच निघाला, "तुमचा ब्लड ग्रुप मॅच झालायं, तुम्हाला काही आजार वैगेरे, तुम्ही दारु वैगेरे पितात का?" असं त्या नर्सने विचारताचं ड्राईव्हर कपाळाला हात लावुन खाली बसला. "आई जगदंबे, काय ह्या लेकराच्या नशीबाची थट्टा केलीस तु, व्हय मी दारु पितो सिस्टर." असं तो खिन्न होऊन बोलला. "सॉरी, तुमचं रक्त नाही चालणार त्याला." असं सिस्टर त्याला बोलल्यावर तो डोळ्यातल्या आसवांनिशी तसाच बाहेर आला. गावातल्या रक्तपेढीत ए.बी. निगेटीव्ह ब्लड ग्रुपचा काहीच साठा नव्हता, तालुक्याच्या ठिकाणी तो उपलब्ध होता, पण तिथुन येण्यासाठी सुमारे अर्धा तास लागणार होता. 
पोहतांना काचेचा एक छोटा तुकडा अर्जुनच्या तोंडातुन पोटात गेला, धावपळीमुळे त्याला इंटरनल ब्लिडींग झालं होतं, अर्जुनला आता वेळेवर रक्त मिळण्याची नितांत गरज होती. "त्याच्या मामांना फोन लावा इंन्सपेक्टर," असं हर्षित बोलला. थोड्यावेळानं त्याचे मामा मामी तिथं येऊन पोहचले. त्याच्या मामी तर धाय मोकलुन रडायला लागली. त्याच्या मामाचा ब्लड ग्रुपही वेगळाच होता. तालुक्याच्या ठिकाणाहुन रक्तपेढीतुन रक्त येण्यासाठी सुमारे अजुन वेळ होता. डॉक्टर निलेश छाजेड यांनी शर्थीचे प्रयत्न करुन सगळ्या जखमांतुन होणारं ब्लिडींग थांबवण्यात यश मिळवलं, पणं त्याला आता रक्ताची जास्त गरज होती. बाहेरचे सगळे देवाचा धावा करत होते. पोलिसांच्या पथकानं तोपर्यंत नचिकेत आणि शार्दुलचे मृतदेह आणले, पण ध्रुवचा मृतदेह अपुर्‍या प्रकाशामुळं शोधता आला नाही, पुन्हा एकदा सगळीकडे त्यांच्या पालकांच्या रडण्याने वातावरण शोकसागरात बुडालं. थोड्यावेळानं एक नर्स बाहेर आली, "अर्जुन कसा आहे?" असं त्याच्या मामानं विचारलं. "ऑपरेशन सुरु आहे अजुन, ब्लिडींग खुप झालयं, आत्ताच काही सांगता येणार नाही, असं तीने ऑपरेशन थिएटरमध्ये पुन्हा प्रवेश करतांना सांगितलं, आणि मग त्यांच्या दुखःला पारावार राहिला नाही. त्यांना धीर तरी कसा द्यावा हे कुणालाच सुचत नव्हतं. थोडयावेळानं रक्ताच्या पिशव्या घेऊन रक्तपेढीची गाडी तिथं आली. डॉक्टर छाजेड यांनी आपलं सगळ कसब पणाला लावुन अर्जुनचं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडलं. "तुमच्यापैकी स्वराली कोण आहे? बेशुद्ध होण्याच्या पुर्वी त्याच्या तोंडुन तिचं नावं आलं होतं." असं ऑपरेशन करुन बाहेर आलेले डॉक्टर निलेश छाजेड बोलले. 
स्वरालीचं नाव ऐकताच हर्षित घाई-घाईनं उठला, त्याने पोलिसांना स्वरालीचे बाबा जिथे काम करायचे त्या कंपनीचं नाव सांगितलं, मग त्यांनी तिथुन तिच्या बाबांना फोन करुन सांगितलं. थोड्यावेळानं स्वराली, तिची आई, आणि तिचे बाबा तिघंही तिथे पोहचले. "डॉक्टर मी स्वराली आहे, अर्जुन कुठे आहे, कसा आहे तो?" असं म्हणत स्वराली रडु लागली. "बेटा काळजी करु नकोस, त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालयं, पण आजची रात्र महत्वाची असेल त्याच्यासाठी, त्याला खुप इंटरनल ब्लिडींग झालं, शिवाय रक्तही वेळेवर मिळालं नाही म्हणुन असं झालं, उद्या सकाळीच काय ते सांगता येईल." असं डॉक्टरांनी तिला सांगितलं, "मला त्याला एकदा बघु द्या ना डॉक्टर" असं म्हणत स्वराली रडु लागली. नर्सने बाहेरुनच तिला अर्जुनला दाखवलं. तिच्या डोळ्यांतनं आसवं थांबत नव्हती. तिला आवरणं तिच्या आईलाही कठीण जाऊ लागलं. तिला कसंतरी बाहेर आणल्यावर तीने हर्षितला विचारलं, काय झालं ते? हर्षित आणि रितेशचे प्राण वाचवणारा अर्जुन स्वतः आता मृत्युशी झुंज देतोयं असं जेव्हा तिला कळालं तेव्हा तर ती अजुनच रडु लागली. "गणपती बाप्पा, माझ्या आजीला तुम्ही माझ्यापासुन दुर नेलतं, प्लीज अर्जुनच नका ना तसं करु, त्याला वाचवा बाप्पा," असं म्हणणार्‍या स्वरालीचं दुखः इतरांना बघवलं जात नव्हतं. दरम्यान पोलिसांनी नचिकेत, शार्दुल आणि सोहमचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. 
स्वराली रात्रभर त्या आय.सी.यु.च्या बाहेर बसुन होती. तिची आई सुद्धा तिथं होती. हर्षित, आणि रितेशही तिथंच होते. आपल्यामुळेच अर्जुनवर ही वेळ आली होती, हे त्यांना कळालं होतं, त्यांना स्वतःला स्वतःची लाज वाटु लागली. त्यांना जगणं नकोसं होऊन गेलं. "आई अर्जुनला बघं ना काय झालयं, का गं देवबाप्प्पानं त्याच्या सोबतं असं केलं? इतरांचे प्राण वाचवणार्‍यालाच अशी प्राणांची झुंज देण्याची अग्नीपरिक्षा द्यावी लागतेय? मुसळधार पावसात एका मोठ्या झाडानं आपल्या फांद्यांखाली सर्वांना आसरा द्यावा, आणि नेमकी त्याच झाडावर वीज कोसळावी, असंच झालयं अर्जुनचं.!" असं म्हणत स्वराली रडु लागली. "राहुल." असं तिच्या बाबांना आवाज देत तिच्या आईनं तिला समजवण्याचं खुणवलं. "स्वराली रडु नको गं, बरा होईल तो नक्कीच, डॉक्टर काका करताय ना प्रयत्न, बेटा मला खात्री आहे तो लवकरच बरा होईल बघं." असं म्हणत त्यांनी तिला आपल्या छातीशी धरलं, तिच्या डोक्यावरनं त्यांनी मायेनं हात फिरवला, तिच्या चेहर्‍यावरुन वाहत असलेले अश्रु पुसले. 
सकाळ झाल्यावर डॉक्टर छाजेड प्रसन्नमुखाने बाहेर आले, "आमच्या प्रयत्नांना आणि आपल्या प्रार्थनांना यश आलयं, अर्जुनच्या जीवाचा धोका टळलायं, आज सायंकाळपर्यंत शुद्धीवर येईल तो," असं डॉक्टरांनी सांगितलं. "काही विपरीत तर घडणार नाही ना डॉक्टर?"असं अर्जुनच्या मामानं विचारलं. "नक्कीच नाही, त्याची जगण्याची इच्छा जबरदस्त दिसतेयं. कारण इतक्या प्रमाणात ब्लड लॉस झाल्यानंतर पेशंट वाचेलच याची खात्री नसते, पेशंट कोमातच जाण्याचे ८०% चान्सेस असतात, पण त्याच्या शरीरानं त्याची साथ दिलीए." असं डॉक्टर निलेश छाजेड धीर देत बोलले. "त्याला मोठ्या दवाखान्यात हलवण्याची गरज तर नाही ना?" असं स्वरालीच्या बाबांनी विचारलं. "नाही, तुम्ही काळजी करु नका. तसं काही असतं तर रात्रीच मी तसं पाऊल उचललं असतं. आणि जिल्ह्यातील विख्यात गॅस्ट्रो-इंट्रोलॉजिस्ट डॉ. अष्टेकर येतीलच आज, त्यांना मी रात्रीच फोन करुन बोलावुन घेतलयं." असं डॉक्टर बोलल्यावर त्यांची थोडी चिंता मिटली. 
"स्वराली आज तुझी परिक्षा आहे ना आज?" असं आईनं विचारलं, तीनं होकारार्थी मान हलवली. "मी इथचं थांबणार आई, अर्जुन जवळ." असं ती बोलली. "बेटा, तुझं बारावीचं वर्ष आहे ना, आणि अर्जुनने तुझी किती तयारी करुन घेतली होती, आणि आता तु परिक्षा देणार नाही असं म्हंटल्यावर त्याला किती वाईट वाटेल ना. स्वरा, तुला कळतयं ना मी काय म्हणतेयं ते?" असं आईनं विचारलं, "बेटा, तुझं प्रॅक्टिकल झालं का लगेच आई बरोबर इकडे ये तु." असं बाबा बोलले, मग त्यांच्या सोबत ती घरी निघुन गेली. सकाळी कॉलेजमध्ये ही बातमी समजताच कॉलेजमध्ये शोककळा पसरली. प्राचार्यांनी तीन दिवस सुट्टी दिली, कॉलेजचा स्पोर्ट्स वीक, आणि गॅदरिंग त्यांनी रद्द केलं. आपल्या सगळ्या अध्यापकांसह ते तिथं येऊन पोहचले. दरम्यान प्रमुख वर्तमानपत्रांत ती बातमी छापुन आल्यानं सगळ्या जिल्ह्यात या घटनेची चर्चा होऊ लागली. ज्यानं ज्यानं ती बातमी वाचली होती, मृत्यशी लढा देणार्‍या अर्जुनला बरं करावं यासाठी नकळत मग त्यांचे हाथ देवापुढे प्रार्थनेसाठी जोडले गेले. 
सकाळी दहाच्या सुमारास पोलिसांना शेजारच्या गावातील पोलिस स्टेशनमधुन फोन आला, एक शव नदीच्या पाण्यात तरंगत असल्याचं एका गावकर्‍यानं बघितलं, ते नक्कीच ध्रुवचं शव असेल, जे वाहत्या पाण्याबरोबर शेजारच्या गावात वाहतं गेलं असणार, याची पोलिसांना शंका वाटली. त्या शवाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांबरोबर मग हर्षित, आणि ध्रुवचा मोठा भाऊ गेला. तो ध्रुवच होता याची खात्री केल्यानंतर पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.  स्वराली तिची प्रॅक्टिकलची परिक्षा झाल्यानंतर ती थेट अर्जुनला भेटण्यासाठीच निघाली. वाटेत तिला हनुमानाचं मंदिर दिसलं, अर्जुन हनुमानभक्त होता हे तिला माहिती होतं, ती मंदिराच्या बाहेर थांबली. "हे बजरंगबली, मी मुलगी आहे म्हणुन मंदिरात येतं नाहिए, पण अर्जुन तुमचा भक्त आहे ना, आपल्या भक्ताची रक्षा करा देवा, त्याला लवकर शुद्धीत आणा, हे बजरंगबली कृपा करा त्याच्यावर, इतकी परिक्षा नका बघु त्याची." असं म्हणुन तीनं त्या मुर्तीला बाहेरुनच मनोभावे वंदन केलं, आणि ती हॉप्सिटलमध्ये आली. "डॉक्टर कशी आहे अर्जुनची तब्येत? ते दुसरे डॉक्टर येणार होते ते आलेत का?" असं स्वरालीनं त्यांना विचारलं. "हो ते येऊन गेलेत, घाबरायची चिंता नाही. त्याला लवकरात लवकर बरं करण्यात आम्ही कोणतीच कसर सोडणार नाही, आपल्या मातृभाषेत एक सुंदर म्हण आहे, "लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे, इथं तर यानं दोन अनमोल जीव वाचवलेत, म्हणुन याला लवकरात लवकर बरं करण्यासाठी माझी पुर्ण टिम शर्थीचे प्रयत्न करणार यात तिळमात्र शंका नसावी, पण तुम्ही धीर सोडु नका." असं डॉक्टर स्वरालीला समजवतांना बोलले. तीच्या मनाचं त्यांनी समाधान करायचा प्रयत्न केला, पण अर्जुन जोपर्यंत शुद्धीत येत नाही तोपर्यंत तिच्या मनातली काळजी थोडीच कमी होणार होती.  
सायंकाळी पाचच्या सुमारास सोहम, नचिकेत, ध्रुव आणि शार्दुलवर अंतिमसंस्कार करण्यात आले. चार तरुण मुलांच्या त्या धडधड पेटलेल्या चितेकडे बघुन सगळ्यांना शोक अनावर होत होता. सोहम आणि शार्दुल दोघही एकुलते एक होते, त्यांच्या पालकांचा आक्रोश तर बघवल्याच जात नव्हता. हर्षित आणि रितेश कितीतरी वेळ आपल्या जीवलग मित्रांच्या चितेकडे बघत रडतं होते. आपण उगीच त्या डॅमवर गेलो, यार आपल्याला त्या गेटवरच्या शिपायानं टोकलं, त्या शेतकर्‍यानंही मनाई केली, धबधब्याकडे जाण्याआधी सोहमपण घाबरला होता, नियतीनं तीन इशारे दिले होते, पण आपल्या मनाचीच ऐकली, त्याचीच किती मोठी शिक्षा आपल्याला मिळाली. चार मित्रांना प्राण गमवावा लागला, आपल्या दोघांचे प्राण वाचवणारा, सख्या भावापेक्षाही जास्त जीवलग असलेला अर्जुनही मृत्युशी एकटाच झुंज देतोयं. असा ते दोघं विचार करु लागले. "हर्ष्या, आपल्यामुळे अर्जुनवर ही वेळ आली ना रे, तो चांगला धबधब्याच्या वर थांबला होता, त्याला आपण उगीच खाली बोलवलं, तो वरतीच असता तर वेळ असतांनाच त्यानं आपल्याला सावधं केलं असतं. पाहिजे असतं तर तो एकटा सुखरुप राहिला असता, पण जीवावर खेळुन त्यानं आपला जीव वाचवला. आणि त्याच्या जीवावरच आता बितलीएं" असं रितेश बोलला. 
"माझा तर जगुन काहीच उपयोग नाही रे, मला पाण्यातुन वाचवतांना मी त्याला म्हणत होतो, मला मरायचं नाहिए, पण मला वाचवतांनाच तो खुप दमलेला वाटत होता. तुला बाहेर काढल्यावरही मी तसाच हातपाय गाळुन तसाच बसुन राहिलो, तो बाकीच्यांना शोधण्यासाठी किती दुरवर पळत गेला काहीच ठाऊक नव्हतं. सोहमच्या मृतदेहाला खांद्यावरुन तो जेव्हा घेऊन येत होता तरी मला का काहीच झालं नाही? मदत आणण्यासाठी त्यानं किती खटाटोप केला असेल रे, का मी त्याला थांबवुन मदत आणण्यासाठी का गेलो नाही? त्याच्या या धावपळीला सर्वांत जास्त मीच जबाबदार ठरलो. आणि त्याच्यासाठी काहीच करु शकत नाही रे, याचंच दुखः होतयं. मला तर जगायची इच्छाच राहिली नाही रे..!" असं म्हणत हर्षित लहानमुलांसारखा हुंदके देऊन रडायला लागला.
"अरे असं नको म्हणु हर्षित, अर्जुनने आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, आणि आता तुच काहीतरी वेड्यासारखं करुन बसला तर त्याच्या मनाला काय वाटेल रे?" असं म्हणत रितेशही रडायला लागला. आपल्या मित्रांच्या चितेची आग विझेपर्यंत ते त्या स्मशानत तसेच बसुन राहिले होते. नंतर ते तिथुन हॉस्पिटलला आले. रात्री ८ वाजता डॉक्टर आय.सी.यु. मधुन बाहेर आलेत, "अर्जुनच्या तब्येतीत सुधारतेयं आहे, तो मघा पाच मिनिटांसाठी शुद्धीवर आला होता, पण लगेच त्याची शुद्ध हरपली, काळजी करु नका एक-दोन तासांत तो येईल पुर्ण शुद्धीवर." असं डॉक्टरांनी सांगितलं. मग तिथे असलेल्या त्याच्या मामा-मामी, स्वराली आणि तिच्या बाबांची चिंता जरा कमी झाली. स्वराली मनातच हनुमानाचे आभार मानत होती. दरम्यान काही वेळानं हर्षित आणि रितेश तिथे आले, त्यांनीही अर्जुनच्या तब्येतीची चौकशी केली. 
स्वरालीची आई जेवणाचा डबा घेऊन आली होती, अर्जुनच्या तब्येतीची विचारपुस केल्यानंतर, "वहिनी-भावोजी, या दोन दोन घास खाऊन घ्या, कालपासुन तुम्ही काहीच खाल्लं नाही, चला बेटा स्वराली तु पण खाऊन घे थोडसं, प्रॅक्टिकल झाल्यानंतर तु इकडेच आली आहेस ना," असं म्हणत तिच्या आईनं त्यांना जेवायचा आग्रह केला. "थांबा वहिनी, डॉक्टर बोलले तो येईल शुद्धीत लवकर, तोपर्यंत घास उतरायचा नाही गळ्याखाली, ए बेटा, तु जेऊन घे, दुपारी आली तसं साधं पाणी पण पिलं नाहिये तु, परिक्षा आहे ना तुझी, आजारी पडशील," असं म्हणत अर्जुनच्या मामांनी स्वरालीला जेवण करायला सांगितलं. "मी पण तुमच्या बरोबरच अर्जुन शुद्धीवर आल्यावर जेवणार" असं स्वराली बोलली. "बरं जशी तुझी मर्जी बेटा, पण पोटभरं जेवायचं बरं का." असं तिची आई बोलली. स्वरालीनं हलकेच मान डोलावली. 
रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अर्जुनला शुद्ध आली. "अर्जुनला शुद्ध आली आहे, आपण भेटु शकतात त्याला, फक्त त्याला काहीच हालचाल किंवा बोलु देऊ नका," असं नर्सनं बाहेर आल्यावर सांगितलं. त्याचे मामा-मामी, स्वराली, तिचे आई-बाबा, हर्षित आणि रितेश हे सर्व त्याला बघायला आत गेले. त्याच्याकडे बघुन त्याच्या मामीला रडु आलं, "काय काय सोसावं लागतयं लेकराला," असं त्या बोलल्या. "अर्जुन बेटा आता बरं वाटतयं ना?" असं मामा त्याच्याकडे बघुन बोलले. नजरेनंच त्यानं होकार दिला. हर्षित आणि रितेशकडे त्यानं बघितलं, "सोहम, ध्रुव, नचिकेत आणि शार्दुल यांपैकी कुणीच वाचलं नाही, त्यांच्यावर अंत्यसंस्कार करुनच आलोयं," असं रितेश बोलला आणि अर्जुनचे डोळे पाणावले. स्वराली त्याच्या जवळ गेली, आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या डोळ्यांतले आसवं तिने पुसले. नजरेनंच तीनं त्याला रडु नकोस असं खुणवलं. "बेटा अर्जुन, हे लेकरु खुप काळजी करतयं रे तुझी, काल रात्री इथं आय.सी.यु.च्या बाहेर अख्खी रात्र जागुन तिनं तुझ्यासाठी प्रार्थना केली, आजही दुपारची आली तशी तु शुद्धीवर केव्हा येशील याचीच वाट बघत होती. अजुन तीनं अन्न-पाण्याला स्पर्शही केला नाही." असं अर्जुनचे मामा बोलल्यावर अर्जुन सुखावला. स्वरालीकडे त्यानं एकदम प्रेमळ नजरेनं बघितलं, तीनं त्याचा हात हळुच पकडला, "अर्जुन तु लवकर बरा हो,"असं ती त्याला बोलली. तिच्या आई-बाबांनाही अर्जुन शुद्धीत आल्यामुळे आनंद झाला होता. "चला, आता पेशंटला आराम करु द्या, लवकर बरं व्हायचं ना त्याला, असं म्हणत डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर जाण्यास विनंती केली. 
"चला दादा आता जेवण करुन घ्या, असं स्वरालीचे बाबा अर्जुनच्या मामांना बोलले. "हो हो, पहिले तुमच्या लेकीला घास भरवुनच सुरुवात करुया, काय बेटा ठरल्याप्रमाणं आता जेवण करु या ना?" असं त्याचे मामा स्वरालीकडे बघुन बोलले. जेवण झाल्यानंतर अर्जुनचे मामा बोलले, "मुलांनो आता रात्रीचे १०.३० झालेत, तुम्ही घरी जा आता, मी थांबतो अर्जुन जवळ, काळजी करु नका. सकाळी या." मग स्वराली, तिचे आई-बाबा, अर्जुनची मामी, हर्षित आणि रितेश हॉप्सिटलच्या बाहेर आले. "वहिनी, तुम्ही चला आज आमच्या घरी, इतक्या रात्रीचं तुम्ही एकट्या कुठे तुमच्या घरी जाणार," असं स्वरालीची आई अर्जुनच्या मामींना बोलली. रात्री घरी आल्यावर स्वरालीला दिवसभराच्या थकव्यामुळे लगेच झोप लागली. "तुमची मुलगी फार गोड आहे स्वभावानं, आणि खुप गुणी सुद्धा. आमच्यापेक्षाही अर्जुनची जास्त काळजी करते ती हे बघुन मन खरचं खुप सुखावलं ताई, अहो इतक्या लहान वयातही तिचा समजुतदारपणा बघुन समाधान वाटतं," असं अर्जुनची मामी स्वरालीच्या आईला बोलली. "अहो, हे सगळं ती अर्जुनला बघुनच तर शिकते, माघे साडे-तीन आठवड्यांपुर्वी माईंच, म्हणजे माझ्या सासुबाईंच निधन झालं, त्यावेळी स्वरालीला खुप मोठा मानसिक धक्का बसला. त्यांच्यावर फार जीव होता तिचा, या धक्क्यातुन तिला सावरण्यासाठी आम्हाला अर्जुनचीच सगळ्यात जास्त मदत झाली." असं स्वरालीची आई बोलली. "अगं आशु, गप्पाच करणार आहेस का, अगं त्या दमल्या असतील त्यांना बिछाना लावुन दे, काल रात्रीपासुन त्या एक मिनिटसुद्धा झोपल्या नाहीत त्या." असं स्वरालीचे बाबा स्वरालीच्या आईला बोलले.

No comments:

Post a Comment