रितेश, तेजाली आणि लावण्या गेल्यानंतर अर्जुन हर्षितबद्दल विचार करु लागला. आज त्याला डायरी लिहिण्याची इच्छाच होत नव्हती. आपली डायरी हातात पकडत तो बोलला, "काय लिहु मी आज, हर्षितने आज जे काही केलं, मला तर काहीच सु़चत नाहीए, आज तो किती वेगळाच वाटला. जणु गोठलेल्या बर्फाखालुन वाहणार्या नदीसारखाच, त्याच्या मनात काय सुरु आहे, याचा थांगपत्ताच लागत नाहिए. आज जर त्याच्या जीवाचं काही बरं-वाईट झालं असतं तर, छे छे कसा विचार करतोय मी. उद्या हर्षितशी याबाबत बोलायलाच हवं. आज रितेश-तेजाली बरोबर लावण्या आलेली बघुन बरं वाटलं. कदाचित हर्षितच्या मनात चालेलेलं विचारांच युद्ध लावण्यामुळे शांत होऊ शकतं. खरचं जर लावण्या त्याच्यावर प्रेम करत असेल तर तीच्या प्रेमामुळे हर्षितच्या बर्फासारख्या गोठलेल्या भावनांना नवी वाट मिळेल. पण एक मन असाही विचार करतं लावण्या कधी आयुष्यात कुणासाठी रडणार नाही, म्हणुन तिला कदाचित हर्षितच्या भावनांची किंमत कळणार नाही, असं झालं तर खुप वाईट होईल."
नंतर अर्जुन झोपी गेला, स्वप्नातही त्याला हर्षित पुन्हा त्याच धबधब्याजवळ उभा असलेला दिसला, त्यादिवशी आलं तसचं वेगानं पाणी त्याच्याजवळ येऊ लागलयं, हर्षितला माघे घेण्यासाठी तो पळतोय, पण पाण्याच्या वेगांपुढे काही चालत नाही, आणि हर्षित त्यापाण्यात वाहत जातो." या स्वप्नानं अर्जुन एकदम खडबडुन जागा झाला. नंतर प्रयत्न करुनही त्याला झोप येईना, केव्हा दिवस उजाडेल आणि हर्षितला भेटेल असं त्याला झालं. सकाळी अर्जुन कॉलेजला लवकरच आला, आणि आश्चर्य म्हणजे हर्षित त्याच्या पहिले तिथे उभा होता. अर्जुनला बघितल्यावर तो हसला, "काय झालं रे, असं का बघतोय?" असं त्यानं विचारलं. "काल जे घडलं त्याचं स्वप्न पडलं रे." असं अर्जुन बोलला. "अरे अर्जुन, मी तुझ्या स्वप्नातही मेलो तरी वाईट वाटुन घेऊ नकोस, अश्रुंना देखील वाट मोकळी करुन देऊ नकोस, माझी तिरडीपण उचलु नकोस, सरळ वरती निघुन ये, आपण मग सगळे पार्टी करु." असं म्हणुन हर्षित हसायला लागला.
कालपर्यंत जीव देण्याची गोष्ट करणार्या हर्षित मधला बदल अर्जुनला न उमजणारा होता. "अरे मी असं का बोलतोय याचाच विचार करतोय ना? जीवन जगण्यातला आणि मरणातलं अंतर काल कळलं, बस दुसरं काही नाही." असं हर्षित बोलला. हर्षितला असं बोलतांना पाहुन अर्जुनला बरं वाटलं, "जीव भांड्यात पडला एकदाचा, मला जर पहिलेच माहिती असतं ना तुला असं अंतर शोधायचं होतं, तुला त्यावेळी वाचवतांना मध्येच बुडण्यासाठी सोडलं असतं." असं म्हणुन अर्जुनला हसु आलं. थोड्यावेळानं रितेश आणि बाकीचा ग्रुप आला; त्यांच्या सोबत लावण्यापण होती. हर्षितला बघताच तिच्या चेहर्यावर स्मितहास्य उमटलं. "काय रे हर्षित काल कुठे होतास?" असं तिनं त्याला विचारलं. "काही नाही गं, डायरेक्टरची भुमिका सोडुन हिरोचा रोल करायचा बघतं होतो, नाही जमला म्हणुन ठरवलं आपलं आपलं दिग्दर्शनच बरं." हर्षित असं कोड्यात बोलला. अर्जुनसोडुन बाकी कुणालाच कळलं नाही. नेहमीचा हर्षित बघुन सगळ्यात जास्त आनंद अर्जुनला झाला. कॉलेज संपल्यानंतर हर्षित आणि अर्जुन दोघं चालु लागले.
"अर्जुन, काल मी किती मुर्खासारखा वागलो ना रे? जणु कवटीत मेंदुच नाही असं..!" असं हर्षित बोलला. तितक्यात माघनं लावण्या आली. "काय रे कोणाच्या डोक्यात मेंदु नाहिए?" असं तीने विचारलं. "काही नाही गं, काल मी माझ्या जुण्या कविता जाळल्या म्हणुन बोललो." असं हर्षित बोलला. "अरे, का केलसं असं? किती छान कविता होत्या तुझ्या?" असं लावण्या बोलली. "अगं लावण्या काळजी कशाला करतेस, आता तो आणखी छान-छान कविता करेल बघं, त्याला कविता करण्याला तुझ्या रुपात प्रेरणा मिळालीए ना आता, काय हर्षित? चल मी येतो, मामाच्या घरी जायचंय." असं अर्जुन बोलला. "हे अर्जुन थांब ना यार." असं हर्षित बोलला. "नाही रे खरचं जायचं आहे," असं अर्जुन लावण्याकडे बघुन बोलला आणि ती नुसतीच लाजली. आज पहिल्यांदाच हर्षित आणि लावण्या दोघांना एकत्र बघुन अर्जुनला मनोमनी आनंद झाला. "आयुष्य अनमोल असतं, आता जगुन बघं, हर्षित प्रेमाच्या ही परिक्षा पास करुन बघं." असं मनातच अर्जुन बोलला.
"हे लावण्या, पहिलं प्रेम म्हणजे नुसतीच उस्तुकताच असते नाही का? म्हणुनच पहिल्या प्रेमाचा आनंद खरा आणि निखळ आनंद पहिल्या प्रेमातच असतो असं मला वाटतं, नाही का?" असं हर्षित बोलला. "हं. अनुभवांवरुन बोलतोयं असं दिसतयं बरं हर्षित." असं लावण्या हसतच बोलली. "अनुभव वैगेरे काही नाही गं, आता तुच बघं ना, आपण असं पहिल्यांदा एकत्र चाललोय, तुला काय सांगु काय नको सांगु याची उत्सुकता, तुला माझ्या गप्पा आवडतील की "खुप पकवतोस रे तु" असं मनातच म्हणशील याची उत्सुकता, रस्त्यानं चालतांना आपल्याकडे बघुन लोक काय म्हणतील याची उस्तुकता. रत्यानं चालतांना मला एखादं छान फुल दिसेल की नाही याची उत्सुकता, ते फुल दिसल्यानंतर मला कदाचित ते तुझ्या केसांत माळायची इच्छा होईल की त्यावर कविता सुचेल याची उत्सुकता, चालता चालता कदाचित एखादा पावभाजीचा ठेला किंवा पाणीपुरीची गाडी दिसेल की नाही याची उत्सुकता. मला अजिबात तिखट सहन होत नाही, आणि कदाचित तु म्हणशील "भैय्या दो प्लेट तिखी पाणीपुरी दो." याची उस्तुकता. घर जवळ येतयं हे लक्षात येताच आपल्या पावलांची गती कमी होईल की नाही याची उस्तुकता." असं सगळं हर्षित एकदम उस्तुकतेनं लावण्याकडे बघुन बोलत होता. "हर्षितचं मन किती सुंदर आहे ना?" असं लावण्या मनातच बोलत होती. आपल्या उभ्या आयुष्यातले सगळ्यात नाजुक क्षण आहेत असंच तिला वाटतं होतं. आज तिला कसलीच चिंता नव्हती, ना अभ्यासाची, ना कुणी तिला हर्षित बरोबर बघितल्यावर चिडवेल याची, इतकं तीचं मन हर्षितवर फिदा झालयं असं तिला वाटलं.
"हर्षित इथे एखादा फोटोग्राफर असता तर किती बरं झालं असतं ना रे? या वेळेची छान आठवण सदैव आपल्यासोबत ठेवता आली असती." असं लावण्या म्हणाली. "काळजी करु नकोस लावण्या, यासारख्या कित्येक आठवणींची ज्योत अशीच तेवत ठेवील, तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण माझ्या कवितांत गुंफुन ठेवील." असं हर्षित बोलला. लावण्याला खुप आनंद झालायं, हे तिचा चेहराच सांगत होता, क्षणभर ती त्याच्याकडेच बघत राहिली. "हे लावण्या, स्वतःचाही मला विसर पडतो जेव्हा तु माझ्याकडे असं रोखुन पहातेस, जणु एका क्षणात या भुतलावरुन स्वर्गात घेऊन जातेस," असं हर्षित बोलला, आणि तिला हसु आलं. "खरचं हर्षित, आजचा ही संध्याकाळ मी कधीच विसरणार नाही." असं घर जवळ आल्याच लक्षात आल्यावर लावण्या बोलली. हर्षित नुसताच हसला, "बाय लावण्या." असं तो तिला बोलला. "चला माझ्या कवितांनो, तुम्हाला तुमची सवत मिळलीए बरं, आता तिच्यासाठी तुम्हाला अजुन छान व्हावं लागेल," असं ती गेल्यानंतर हर्षित स्वतःलाच बोलला.
सायंकाळी घरी आल्यानंतर अर्जुनला स्वरालीला भेटायची इच्छा झाली, पण त्याला आठवलं की तिच्या घरी पाहुणे येणार होते, म्हणुन तो घरातच थांबला. स्वरालीनं त्याला दिलेला पेन त्याने समोर धरला, आणि स्वरालीच समोर आहे, असं समजुन तो बोलायला लागला. बोलता बोलता त्याच्या डोळ्यातुन आनंदाश्रु बाह्रेर आलं, त्याने अलगद ते त्याच्या बोटांवर घेतलं, आणि बोलला, "हे स्वराली, बघ तर किती सुंदर आहे ना हा, अगदी त्या दिवशी आपण बघितलेल्या दवबिंदुसारखाच. का रे तु असा अचानक का बाहेर आलास?" असं अर्जुन त्या आसवाकडे बघत बोलला, आणि खुदकन हसला. "हं, आमच्या डोळ्यातच नाही तर ह्रदयातही स्वराली आहेना, मग ती जेव्हा आमच्या डोळ्यांत कधी बघेल तर तीला कळायला हवं ना, जणु तुझी जागा तिने घेऊन टाकलीयं, म्हणुन तु बाहेर आलास ना?" असं अर्जुन बोलला. तो असं बोलण्याच्या नादात असतांना तिथे स्वराली येऊन पोहचली. अर्जुन काय बोलला होता, हे तीनं ऐकलं, मनोमन तिला गगनात मावेनासा आनंद झाला. आज ती स्वतःला जगातली सगळ्यात सुखी मुलगी समजु लागली. अर्जुनच्या डोळ्यात खरचं तिला स्वतःच अस्तित्व शोधावसं वाटलं. ती दारातच असा विचार करत होती. "हे स्वराली, केव्हा आलीस?" असं अर्जुनच तिच्याकडे लक्ष गेल्यावर तो बोलला.
"अरे इतक्यातच आलीए, काय करतोय तु?" असं तीनं त्याला विचारलं. अर्जुन आपली डायरीकडे बोट दाखवत बोलला, "काही नाही गं, आज डायरी लिहायचा मुडच नाही म्हणुन बसलो होतो. पण तु कसं काय अचानक आलीस?" "अरे अर्जुन, आईची मैत्रिण आलीएं ना घरी, आई बसली तिच्याबरोबर गप्पा मारत, मला तर खुप कंटाळा आला, म्हणुन इकडे निघुन आली." असं स्वराली बोलली. "काय गं, तुला का कंटाळा आला, तु पण त्यांच्याशी थोडंस बोलायचं ना." असं अर्जुन बोलला. "अरे त्या काकु एकदम वेगळ्याच आहे अर्जुन, मला विचारत होत्या तुझं वयं काय, स्वयंपाक वैगेरे येतो का करता ते. असले अनेक प्रश्न विचारुन त्यांनी भंडावुनच टाकलं रे. आई बोलली की त्यांना माझी चित्र दाखवं, मी इतक्या उत्साहानं त्यांना चित्रं दाखवली, पण त्यांना ती उमजलीच नाही रे अर्जुन, हं छान आहेत, बस्स इतक्याच बोलल्या." असं स्वराली त्या काकुंची नक्कल करुन बोलली. अर्जुनला हसु आलं, "हे स्वराली, काही म्हण, मी तर अजुन तुझी पेंटिंग्स बघितली नाहीत, पण तुझी ऍक्टिंग बघुन मला वाटतं अभिनयाचे धडे तुझ्याकडुन घ्यावेत." स्वराली जरा लाजली, "छे, काहीतरीच काय अर्जुन, चेष्टा करतोयस माझी, तुझी ड्रामाची प्रॅक्टिस बघितली आहे मी, हे लक्षात नाही वाटतं तुझ्या?" असं स्वराली बोलली. थोड्यावेळ ते दोघं गप्पा मारत बसले.
अर्जुनच्या घरुन स्वराली घरी आली त्यावेळी स्वरालीच्या आईच्या मैत्रिणीनं तिला विचारलं, "काय गं स्वराली, कुठे होतीस? तुझ्याशी गप्पा मारायच्या राहुनच गेल्यात बघं." "काकु, मी अर्जुनकडे गेले होते," असं स्वराली बोलली आणि तिच्या खोलीत निघुन गेली. स्वरालीची आई आणि त्यांची मैत्रिण दोघ्याही पुढच्याच खोलीत बसलेल्या होत्या. "काय गं अश्विनी, हा अर्जुन कोण? आणि सायंकाळची आपली स्वराली का गेली त्याच्याकडे?" असं तीनं स्वरालीच्या आईला विचारलं. स्वरालीच्या आईनंही अर्जुनबद्दल आपल्या मैत्रिणीला सांगितलं. अर्जुनबद्दल ऐकल्यावर स्वरालीच्या आईची मैत्रिण बोलली, "अगं अश्विनी, स्वराली वयात आलेली आहे, हे वयं कसं असतं माहिती आहे ना? भले अर्जुन तु म्हणते म्हणुन मानुया की चांगला मुलगा आहे, पण बाकीच्या लोकांच काय? हाताची पाचही बोटं सारखी नसतात असं उगाच म्हणत नाही. स्वराली अजुन किती नादान आहे तुला सांगायची गरज नकोच, राहुलला पण काही प्रॉब्लेम नाही का?" "अगं अलका, तु उगाचचं काहीपण काळजी करतेस बघं, अगं अर्जुनला मी आणि राहुल दोघही लहानपणापासुन ओळखतो. आणि त्याच्याकडुन काही चुकीचं घडेल असं कधीच होणार नाही बघं." असं स्वरालीची आई बोलली. पण तिच्या मैत्रिणीचं काही समाधान झालचं नाही.
रात्री जेवण झाल्यानंतर स्वरालीच्या आईची मैत्रिण अलका, स्वरालीच्या खोलीत आली. स्वराली तिच्या नेहमीच्या सवयी प्रमाणे चित्र काढत होती. "कसलं चित्र काढतेयं स्वराली?" असं स्वरालीनं ऐकलं, तीनं मागे वळुन बघितल्यावर बघितलं की अलका काकु आहेत, घाई-घाईनं तीनं चित्र काढणं थांबवलं. त्यांच असं अचानक येणं तिला आवडलं नव्हतं. "काय गं, काढ ना चित्र, का थांबवलंस? एक काम कर त्या तुझ्या टेडी बेयरच चित्र काढुन दाखवं ना मला." असं त्या स्वरालीला बोलल्या. "मला फक्त निसर्गचित्रच काढायला आवडतात काकु," असं स्वराली बोलली. "का गं, मघा मी तुला विचारलं तु कुठे होतीस, तुला राग तर नाही आला ना?" असं त्या बोलल्या. "नाही हो, त्यात राग येण्यासारखं कुठे काय होतं, मी थोडीच कुठे भटकत होते, शेजारी अर्जुनकडेच गेले होते. आईला माहिती असतं, त्याच्या घरी नाहीतर मैथिलीचं घर सोडुन मी दुसरीकडे कुठेच आई-बाबांशिवाय जात नाही ते." असं स्वराली बोलली.
"मला भेटवंशील का अर्जुनला?" असं त्यांनी स्वरालीला विचारलं. अर्जुनचा विषय काढताच स्वराली खुष झाली. "हो नक्कीच भेटवील ना त्याला, आत्ताच जायचं का त्याच्या घरी, फक्त नऊच वाजले आहेत, नको उद्या त्याला आपल्या घरीच बोलवुया ना." असं स्वराली त्यांना बोलली, अलका काकुनं मानेनंच संमती दिली. मग स्वराली कितीतरी वेळ अर्जुनबद्दल त्यांना सांगत बसली होती. अलकाकाकु वरवर तिला दाद देत होत्या, पण त्यांच्या मनानं अर्जुनला खलनायक ठरवुन टाकलं होतं. स्वराली दिसायला इतकी सुंदर, गुणी, चांगल्या स्वभावाची एकुलतीएक मुलगी, म्हणुनच अर्जुन मुद्दाम तिच्याशी चांगल वागत असावा असं त्यांना वाटत होतं.
No comments:
Post a Comment