Sunday, July 1, 2012

"तो आणि त्याची ती..!" १.१०

               "अरे रितेश, चल रे पटकन, नेहमीच उशीर करतोय तु, अजुन अर्जुनच्या घरीपण जायचं आहे त्याला घ्यायला," असं नचिकेत बोलला. "अरे त्याला सांग तेजाली येत नाहीए, नट्टा-पट्टा करायची गरज नाहीए," असं ध्रुवने नचिकेतला सांगितलं. "अरे काय, कॅमेरा घेत होतो, मागच्याच महिन्यात दादानं सिंगापुरवरुन पाठवलायं," असं रितेश बोलला. "चलायचं का मग कॅमेरामॅन रितेश?" असं शार्दुल आणि हर्षितने विचारलं. "हो चला सोहम अर्जुनच्याच घरी येतोयं" असं रितेशनं सांगितलं. आणि ते अर्जुनच्या घराकडे गेले. अर्जुन आणि सोहम त्यांची अंगणातच वाट बघत होते. "काय किती उशीर, काल ठरलं सातलाच निघायचं, आणि पाऊणे आठ वाजतायं, मस्त दाट धुकं असतांना फुल्ल स्पीडनं गाडी पळवायची होती." असं सोहम बोलला. "अरे आज मला गाडी चालवायला शिकवा बरं का?" असं हर्षित बोलला. 
"अरे तु पण ना, आता पुढच्या वर्षी फायनल इयरला जाशील तरी तुला अजुन गाडी चालवता येतं नाही? कुठे न्यावं की नाही तुला? बरं झालं तुला आजपर्यंत गर्लफ्रेंड नव्हती ते, बिचारीचे हाल झाले असते. निदान आता लावण्यासाठी तरी तुला गाडी शिकवावीच लागेल," असं सोहमने त्याला चिडवलं. मग ते सगळे त्यांच्या नेहमीच्या मिसळ स्पॉटवर गेले. तिथे हर्षित, नचिकेत, ध्रुव यांच्यात कोण सगळ्यात जास्त पाव खाणार, याची बेट लागली. हर्षित चांगला बॉडी-बिल्डर होता, सहाजिकच तोच जिंकला. या पार्टीचं बिल सोहम देणार होता, म्हणुन त्याला टेंशन आलं, नंतर ते डॅमकडे रवाना झाले. डॅमवर पोहचल्यावर ते तिथल्या शिपायाला आत जाऊ देण्यासाठी विनंती करु लागले, पण त्यानं साफ नकार दिला. 
"अहो काका, असं काय करतायं, इतक्या दुरुन आलोय, वाटलं तर पाच पन्नास घेऊन सोडा ना." असं सोहम त्यांना बोलला. तरी त्यांनी त्या सर्वांना सोडलं नाही. हताश होऊन ते सगळे तिथुन निघाले. "काय पांडु होता तो, सगळ्या प्लॅनचा सत्यानास केला." असं नचिकेत बोलला. "अरे टेंशन नका घेऊ, आपण दुसर्‍याबाजुने जाऊ ना, तिथे सगळे शेतंच आहेत आजुबाजुला, आपल्याला गाड्यापण पार्क करता येतील. मला माहिती आहे रस्ता," असं ध्रुव बोलला. आणि मग ते सगळे ध्रुवच्या गाडीमागे गेले. गाड्यापार्क केल्यानंतर ते छोट्याश्या पायवाटेनं जाऊ लागले. त्यांना पाण्याचा आवाज येतं होता. रस्तात त्यांना एक छोटीशी झोपडी दिसली. मग थोड्यावेळ त्यांच तिथे फोटो सेशन झालं. त्यांना समोरुन येणारा एक शेतकरी दिसला.
"काय रे पोरांना, कुठं चालले?" असं त्या शेतकर्‍यानं विचारलं. "बंधारा बघायला चाललोय मामा." असं रितेश बोलला. "अरे जाऊ नका, पाणी सोडलं तर फजिती होईलं बरं का? तुमच्या सारखी पोरं पार्ट्या करायला इथं येतात, दारु पिऊन धिंगाणा करतात, त्या दारुच्या बाटल्या तिथंच फोडतात, माघं तुमच्याच वयाची तीन मुलं अशीच दारु पिउन पडली, एकाचा तोल पाण्यात गेला, त्याला वाचवतांना सगळीच बुडुन मेली बरं, तिथं मध्ये खोल डोह आहे एक." असं त्या शेतकर्‍यानं सांगितलं. "अहो, आम्ही पाण्यात उतरत नाहीए, आमच्यात फक्त या अर्जुनलाच पोहता येतं, आणि आम्ही काही इथं दारु प्यायला आलोयं असं वाटतं तर चेकिंग घ्याना." असं हर्षित बोलला. "जशी तुमची मर्जी, तुम्ही चांगल्या घरची मुलं दिसतायं, वडीलकीच्या नात्यानं माझं तुम्हाला सांगणं काम होतं," असं म्हणुन तो शेतकरी चालला गेला. "अरे जाऊया या आपण परत, आज दोघांनी टोकलयं आपल्याला," असं नचिकेत बोलला. "चल रे, इतक्या दुर आलोय, आज बंधारा बघुनच जाऊया." असं ध्रुव बोलला. मग ते पुढे जाऊ लागले. थोडं चालत गेल्यावर त्यांना बंधारा दिसला नाही, पण त्यातुन नदीकडे वाहत जाणारं पाणी दिसलं, काही ठिकाणी गुडघाभर पाणी दिसतं होतं. तर काही ठिकाणी पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नव्हता. दगडांवर शेवाळं साचलं होतं, म्हणुन पाय सटकुन पडणार नाही याची सगळे खबरदारी घेत होते. अर्जुन सोडुन बाकी सगळे कोरड्या दगडांवर बसुन पायानं एकमेकांवर पाणी उडवतं होते. 
रितेश त्याच्या कॅमेरानं त्याची शुटींग काढत होता. थोड्यावेळानं अर्जुन पुढे आहे तरी काय हे बघण्यासाठी गेला, त्याला एक छोटा धबधबा दिसला, तिथंपर्यंत जाण्यासाठी गुडघाभरं पाण्यातनं जावं लागणार होतं, पण धबधब्यातुन पडणार्‍या पाण्यानं त्याला भुरळ पाडली. "अरे इकडे या, काय मस्त धबधबा आहे बघा." असं अर्जुनने सगळ्यांना आवाज दिला. धबधब्याचं नाव काढताच अख्खा ग्रुप तिथं पळत आला, "अर्जुन, एकदम मस्त स्पॉट शोधलाय, चला तिथं जाऊन फोटो काढु," असं शार्दुल बोलला. "अरे नको रे, पाण्यात उतरुन जावं लागेल, शेवाळ पण आहे तिथे, धबधब्याला दुरुनच नमस्कार करुया." असं सोहम बोलला. "काय रे काय झालं तुला? मघा तर त्या शिपायाला पैसे देण्यासाठी तयार झाला होता, मग आता काय झालं?" असं नचिकेत बोलला. "अरे एकदा नीट बघं त्या जागेकडे, तिथे जाण्यासाठी कसरत करावी लागणार, काही विपरीत घडलं तर येण्याचे हाल होतील, "असं सोहम बोलला. "डर गया सो मर गया. अरे आपण साखळी करुन जाऊ म्हणजे काही होणार नाही, आणि फक्त दहा मिनिटांतच परत येऊ..!" असं हर्षित बोलला. 
मग ते सगळे हातांची साखळी करुन पाण्यातुन त्या धबधब्याकडे गेले. "अरे हा बघ जवळ आल्यावर किती छोटासा दिसतोय, असं रितेश बोलला. "मी तर अंघोळ करतोय रे." असं म्हणतं ध्रुवनं शर्ट, वॉलेट, घड्याळ, मोबाईल काढुन अर्जुनकडे सांभाळायला दिला, आणि तो खाली उतरुन त्या धबधब्याखाली बसुन अंघोळ करु लागला. "अरे या ना, काय मजा येते आहे, अरे ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिऐ." असं ध्रुव बोलायचा अवकाश, अर्जुन सोडुन एक एक जण हळु हळु खाली उतरला. अर्जुन सगळ्यांच्या वस्तु सांभाळण्यासाठी वरतीच थांबला, शिवाय शुटींग करायची जबाबदारी त्याच्यावर आली होती. "अरे अर्जुन, पाच मिनिटांत जाऊया आपण, उतर ना पाण्यात, अरे दे तो कॅमेरा इकडे." असं रितेश बोलला. अर्जुनही मग खाली उतरला. थोड्यावेळ पाण्यात भिजल्यानंतर तो परत वरती आला. "अरे कपडे वाळवायचे नाही का?" मस्त उन पडलेलं आहे, थोडं बसु ना अर्जुन ये खाली" असं रितेश बोलला, आणि अर्जुन परत खाली उतरला. 
सगळे एकमेकांवर पाणी उडवत असतांना हर्षित जोरात ओरडला, "अरे पाणी वाढतयं यार." "छे काही पण सांगतोय.." असं म्हणायला सोहम मागे वळला तोच शार्दुलच्या तोंडुन "मेलो रे आज आपण सगळे," अशी किंकाळी निघाली. बंधार्‍याचे दरवाजे उघडल्यामुळे खुप वेगानं पाणी आलं. पाच दहा सेकंदातच त्या छोट्याशा वाटणार्‍या धबधब्यातुन प्रचंड वेगानं पाणी पडु लागलं. अर्जुन कसाबसा जोर लावुन वर चढला खरा, पण बाकीचे सगळे खालीच अडकले. "अरे माझा कॅमेरा." असं पाण्यासोबत खाली पडणार्‍या कॅमेर्‍याला बघुन रितेश किंचाळला. बाकीच्यांच्या सर्व वस्तु एकएक करुन खाली पडु लागल्या. अर्जुन तोपर्यंत पुढे पळत गेला. तितक्यात शर्ट पकडण्याच्या नादात शार्दुलचा पाय सरकला, पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता, की शार्दुल सरळ खाली वाहत गेला, त्याला पकडण्याच्या नादात सोहम आणि हर्षितपण पाण्यात पडुन गेले. नचिकेत थोडासा उंच होता, म्हणुन त्याला वाटलं आपण निघुन जाऊ, पण त्या प्रयत्नात तो डोक्यावरच पडला, त्याच्या त्यामुळे लगेच बेशुद्ध झाला. इतक्यावेळ कॅमेरा गेला, असं खाली बसुन रडत असलेल्या रितेशनं जेव्हा नचिकेतला बघितलं तेव्हा तो जीवाच्या आकांतानं ओरडला, "कुणीतरी वाचवा रे आम्हाला..! पोहता येत नाही हो मला.." रितेशला पोहता येतं नव्हतं, पाणी वेगानं वाढतं होतं, पुढे गेलेल्या अर्जुनला हर्षित पाण्यात गटांगळ्या खातांना दिसला, अर्जुनने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली, सगळी ताकद लावुन त्यानं हर्षितला बाहेर काढलं. "मला मरायचं नाही रे, अर्जुन.." असं म्हणत तो रडायला लागला. 
"हर्ष्या बाकीचे कुठे आहे?" असं अर्जुन जोरात ओरडला. हर्षितला इतका धक्का बसला होता तो सारखं "मला मरायचं नाहीए" असं बडबडतं होता. चिडुन अर्जुनने त्याच्या गालावर लगावली, "तु मेला नाहीए, बाकीचे कुठे आहेत रे?" असं अर्जुनने त्याला विचारलं, पाण्याकडे फक्त त्याने बोट दाखवला, आणि तो जोर जोरानं रडु लागला. अर्जुनने पाण्यावर नजर टाकली, त्याला रितेश दिसला, कोणत्याही क्षणी तो बुडुन जाईल अशी चिन्ह दिसत होती, अर्जुनने परत जीवाची बाजी लावली, कसं तरी त्याला तो काठापर्यंत घेऊन आला. नाका तोडांत खुप पाणी गेल्यानं तो बेशुद्ध झाला होता. अर्जुन वाहत्या पाण्याच्या बरोबर पळत सुटला, कुणीचं तरी डोकं, किंवा हात दिसतोय ते बघण्यासाठी, पण खुप दुर गेल्यावरही त्याला काहीच दिसलं नाही, पोहल्यामुळे आणि इतकं जोरात पळाल्यामुळे त्याला खुप थकवा वाटतं होता. तो परत फिरला, त्याच्या डोळ्यातले अश्रु  पुसत तो त्या वेगाने वाहणार्‍या पाण्याकडे बघतचं चालला होता.
तितक्यात त्याला एका खडकाजवळ एक हात दिसला, अर्जुन पुन्हा पाण्यात उतरला, प्रवाहाविरुद्ध पोहतांना त्याला खुप कष्ट करावे लागले, तो तिथं पोहचला त्यावेळी त्याला सोहमचं निष्प्रभ शरीर दिसलं, तो मेलायं असं अर्जुनला वाटलं, त्यानं जोरलावुन त्याचं तो मृतदेह किनार्‍यापर्यंत आणला. त्याला खुप दम लागला होता. तरी त्यानं सोहमचा मृतदेह आपल्या खांद्यावर टाकला, आणि सगळी ताकद पणाला लावुन तो चालु लागला. त्याच्या अंगावरच्या सगळ्या नसा स्पष्ट दिसत होत्या, एक एक पाउल त्याला जड अंतःकरणानं उचलावं लागत होतं, सुमारे अर्ध्या तासानंतर हर्षित आणि रितेश जिथं होते, तिथपर्यंत अर्जुनने सोहमचा मृतदेह घेऊन आला. हर्षित तसाच रडत बसला होता, रितेश त्या खडकांवर तसाच पडलेला होता. अर्जुनने घाई-घाईनं त्याच्या पोटात गेलेलं पाणी काढायला सुरुवात केली, त्याच्या प्रयत्नांना यश आलं, रितेश शुद्धीवर आला, अर्जुनला हायसं वाटलं, "बाकीचे कुठयं?" असं त्यानं विचारलं, अर्जुनने खाली मान घातली, आणि सोहमच्या मृत शरीराकडे बोट दाखवला. "संपलय सगळं.." असं अर्जुन बोलला, सोहमकडे बघुन रितेश पुन्हा बेशुद्ध झाला, "हर्षित याच्याकडे बघं, मी कुणालातरी बोलावतो, असं म्हणुन अर्जुन शेताकडे गेला. आणि हताश होऊन परत आला. 
"अरे इकडे कोणीच दिसत नाही हर्षित," असं तो एकदम खिन्न मनानं बोलतं होता. "आता काय करायचं रे अर्जुन, असं म्हणतं हर्षित उठला आणि थेट पाण्याकडे पळत सुटला, तो पाण्यात उडी मारणार तोच माघुन त्याला अर्जुनने त्याला जोरात खेचलं, "काय करायला निघाला रे, हर्ष्या?" असं म्हणतांना अर्जुनलाही रडु आलं. "सावर स्वतःला, तो रितेश बेशुद्ध आहे, त्याची काळजी घे, मी येतोच कुणाला तरी घेऊन, मी येईपर्यंत इथंच थांब, परत असं केलं तर बघं, माझी शप्पथ आहे तुला." असं अर्जुन बोलला, आणि तो पुन्हा रस्त्याकडे पळत सुटला. रस्त्यावर त्यानं पुष्कळ वाहने आडवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीच थांबत नव्हतं, शेवटी तो रस्त्याच्या मध्ये झोपला, समोरुन भरधाव येणार्‍या ट्रकचालकाची त्याच्यावर नजर गेली, त्यानं सगळा जोर लावुन ब्रेक दाबला, त्याची ट्रक थांबताच अर्जुन उठला, "अरे हरामखोर, मरायची प्रॅक्टिस करतोयं का? भड्व्या रस्त्यावर झोपुन रस्त्यालाच घेत होता का? तुझ्या आईला." असं म्हणत तो ड्राईव्हर खाली उतरला. "अहो माझे मित्र बुडाले हो काका धरणाच्या पाण्यातं," असं म्हणतं अर्जुन खाली बसुन रडु लागला. ड्रायव्हरला त्याची दया आली, त्यानं पटकन ट्रक रस्त्याच्या बाजुला नेला, त्याच्या क्लिनर बरोबर तो आणि अर्जुन धावत हर्षित आणि रितेश जिथं होते तिथं पोहचले. तिथं पोहचल्यावर त्या ड्राईव्हरला परिस्थितीचं गांभीर्य कळलं. 
"माफ कर लेकरा मला," असं म्हणत ड्राईव्हरने सोहमचं शव उचललं, त्याच्या क्लिनरच्या साह्यानं हर्षितनं रितेशला पकडलं, आणि ते रस्त्याला आले. घाई-घाईनं त्यांना ट्रकमध्ये टाकुन ड्राईव्हरनं ट्रक सुरु केला. वेगानं त्याने तो ट्रक शहराच्या दिशेनं पळवला. पण दहा मिनिटात त्याच्या लक्षात आलं, की अर्जुन ट्रकमध्ये चढलाच नव्हता. "अरे गण्या ते पोरगं तिथेच राहिलं रे. जगदंबे असं कसं झालं," असं म्हणत त्याने पुन्हा ट्रक वळवला आणि त्याजागी परत आले. अर्जुनला धावपळीमुळे चक्कर आली आणि तो तिथेच पडला होता. त्याच्या तोंडातुन रक्त येतं होतं. रक्तानं-धुळीनं माखलेल्या अर्जुनला उचलतांना ड्राईव्हरच्या डोळ्यात पाणी आलं. "जगदंबे ह्या पोराला वाचिव, साकडं घालतो तुला, ह्यो वाचला तर आयुष्यात कधी दारुच्या थेंबालाबी शिवणार नाही." असं म्हणत तो घाई-घाईनं ट्रक चालवु लागला. त्यानं रस्त्याला लागलेल्या सिग्नलची पर्वा न करता भरधाव ट्रक चालवली. सिग्नल तोडल्यामुळे त्याच्या मागे पोलीसांची गाडी पण येत होती. 
खाजगी हॉस्पिटल दिसताच, त्यानं घाईनं ट्रक थांबवला, अर्जुनला बाहेर काढलं, "डाक्टर, डाक्टर, याला वाचवा.." तोपर्यंत हर्षित रितेशला घेऊन आला. रक्तानं अर्जुनचं शरीर माखलेलं होतं. डॉक्टरला वाटलं ही अपघाताची केस आहे, "पोलीस आल्याशिवाय काही करता येणार नाही," असं तो म्हणाला. "अरे खविस आहे का तु, पोरगं मरायला टेकलंय ते, याचा इलाज जर तु आता सुरु केलास नाहीस तर जगदंबेची शप्पथ, तुझा माझ्या ट्रकखाली चिरडुन मुडदा पाडिल तुझा." असं ड्राईव्हर डॉक्टरवर ओरडला. तितक्यात पोलिसांची गाडी तिथं आली. "डॉक्टर, मी सगळं सांगतो काय झालं ते, पहिले यांना ट्रिटमेंट द्या, रितेशकडे बोट दाखवत तो म्हणाला हा धरणाच्या पाण्यात पडला म्हणुन बेशुद्ध झालायं, या अर्जुननं त्याला वाचवलं, पण अचानक पळता पळता तो चक्कर येऊन पडला, आणि त्याच्या तोंडातुन रक्त येऊ लागलं," असं म्हणत हर्षित रडायला लागला. डॉक्टरांनी तत्काळ त्यांना ओ.टी. मध्ये घेतलं. 
बाहेर पोलीस ड्राईव्हरची चौकशी करु लागले. हर्षितने रडत रडत सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीनं कंट्रोल रुमला फोन केला, धरणातुन पाणी सोडण्याचं तत्काळ थांबवलं. पोलिसांच एक पथक तातडीनं घटनास्थळाकडे रवाना झालं. पंधरा मिनिटांनी नर्स बरोबर रितेशला बाहेर आनण्यात आलं, त्याच्या डोळ्यातनं अश्रुंच्या धारा थांबत नव्हत्या. पोलिसांनी त्यांच्या घरी फोन फिरवले, थोड्यावेळात त्या सगळ्यांचे पालक तिथे हजर झाले. सगळ्यांना शोक अनावर झाला. सोहमकडे बघुन त्याच्या आईनं हंबरडा फोडला. पोलिसांच मनही हेलावलं. ’धरणाच्या वाहत्या पाण्यात चार मुलं बुडुन मेले’ ही बातमी वार्‍यासारखी गावात पसरली. जो तो संजीवनी हॉस्पिटलजवळ गर्दी करु लागला. दुपारचे तीन वाजत आले होते, अर्जुनला ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन एकतास होऊन गेला होता. तितक्यात वेगानं नर्स ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आली, "तुमच्या पैकी कुणाचा ब्लड ग्रुप ए.बी. निगेटीव्ह आहे का?" असं तिनं सगळ्यांच्या चेहर्‍याकडे बघतं विचारलं, सगळ्यांनी माना खाली घातल्या. 

No comments:

Post a Comment