कॉलेजचं गेट ओलांडताच, अर्जुन त्याचा ग्रुप नेहमी असायचा त्या जागेकडे जाऊ लागला. "हाय अर्जुन, हॅपी न्यु इयर.!" असा पाठीमागुन तेजाली आणि शामलीनं त्याला आवाज दिला. "सेम टु यु, हे पण आपण मराठी आहोत, मराठी संस्कृती जपायलाच हवी ना, नववर्षाच्या खर्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच द्यायला हव्यात." असं अर्जुन बोलला, आणि ते तिघही चालु लागले. "हाताला काय झालं रे तुझ्या? काल रात्री पार्टी बरीच एन्जॉय केलीए वाटतं?" असं तेजाली अर्जुनच्या हाताकडे बघुन बोलली. अर्जुन नुसता हसला, आणि त्यानं तिला उत्तर देण्याचं टाळलं. तितक्यात समोर उभ्या असलेल्या रितेशने अर्जुनला आवाज दिला, "काय बॉस, हात बरा आहे का? अरे एक गुड न्युज आहे ना यार, आपल्याला आज प्रॅक्टीकला ऑफ आहे. आपल्या प्रोफेसर लोकांनी काल जंगी पार्टी केलीए वाटतयं, चक्क ४-जण आज रजेवर, वर्षाची सुरुवात अशी ऑफ मिळुन झाली, देवा वर्षभर अशीच कृपा ठेव आमच्यावर.!" रितेशचं बोलणं तेजालीला कदाचित पटलं नव्हतं असं तिचा चेहरा सांगत होता, रितेश आणि तेजाली यांची जोडी म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या शिवाय करमेना अशीच होती. तेजाली रितेशला काहीतरी उपदेश करणारच होती, तितक्यात बाकीचा सगळा ग्रुप आला होता..
"क्या भाई लोग्स, नव्या वर्षाचा कोणाचा काही संकल्प?" असं सोहम आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बोलला. "काही नाही यार, कॉलेजची शेवटची दिड वर्ष राहिली त्यात काहीतरी करुन दाखवील म्हणतो." हर्षित असं बोलल्यावर सगळ्यांना हसु आलं, "काय हर्षित, कुछ कुछ होने लगा है?" असं मिताली बोलली. "अगं त्याला कुछ-कुछ नाही खुप काही होतं, पण यानं ते एक्सप्रेस करायला शिकावं की नाही? निदान माझा तरी आदर्श ठेवला असता डोळ्यांसमोर..!" असं शार्दुल बोलला. "हो का महाशय, अकरावी पासुन तुम्ही प्रयत्न करत होता, पण शेवटी काय मलाच प्रपोझ करावं लागलं, आणि म्हणताय माझा आदर्श डोळ्यांसमोर ठेवायच," असं अंजली शार्दुलला बोलली. "खरं सांगु का मित्रांनो, मला असं काही करायची प्रचंड भिती वाटते रे..!" असं हर्षित बोलल्यावर सगळ्यांना हसायला आलं. "सोडा रे कोणत्या दगडावर डोकं आपटतोय आपण, याला किती वेळा सांगितलं, वेड्या प्रेम-वैगेरे असं काही नसतं, मनाचे पोरखेळ असतात ते, अंधश्रद्धा असतात असल्या गोष्टी, पण आमच्या वेड्या प्रेमकवीला काय त्याचं?" सोहम असं बोलला, त्यामुळे हर्षितचं मन जरा खट्टु झालं होतं.
"सहा-सहा मुलींबरोबर अफेअर्स असणार्याला काय कळणार प्रेम कायं असतं?" असं इतक्यावेळ शांत असलेला अर्जुन जेव्हा बोलला, "ओह्ह्ह्ह्ह्ह" असं सगळा ग्रुप एकसुरात ओरडला, "प्रेमाबद्दल आज चक्क अर्जुन बोलतोय? देवा कृपा केलीस रे कॉलेज मधल्या किती मुलींवर." असं तेजाली बोलली, तितक्यात कॉलेजची बेल झाली. "कॉ-ओर्डिनेटर आज कोणतं प्रॅक्टीकल करायचं?" असं अर्जुन हर्षितला बोलला. "काही नाही आज लॅब मध्ये "एस.टी.डी. खेळुया इतकचं काम." बाकीचे सगळे एकासुरात बोलले. "हाय मामा, हॅपी न्यु इयर, काल मजा केली की नाही हं? असं सोहमने लॅबच्या बाहेर उभ्या असलेल्या लॅब असिस्टंटला विचारलं. "काय नाही रे मुलांनो, आम्हाला काय आला दिवस तो पांडुरंगाच्या कृपेनं सारखाच." असं लॅब असिस्टंट म्हणाला. "मामा आज काही सर नाहीत, त्यामुळे आम्ही लॅब मध्ये आमचं आमचं काम करतो, तुम्हाला काही डिस्टर्ब करत नाही, तुम्ही बसा तुमची मुंबई-चौफेर मधली कोडी सोडवतं. फक्त डॉन (प्रिंसिपल) राऊंडला येतांना दिसले की आम्हाला आवाज द्या" अशी नचिकेतनं विनंती केली. अर्जुन, रितेश, हर्षित, सोहम, नचिकेत, ध्रुव, तेजाली, मिताली, अंजली, शामली हे सगळे एकाच बॅच मध्ये होते. फक्त चैताली, आणि शार्दुल दुसर्या बॅच मध्ये होते.
लॅब मधले सगळे जण आप-आपले स्टुल एकत्र करुन एका टेवलाजवळ जमले, आणि आपाआपली पुस्तकं जवळचं ठेवली. प्रशांतने त्याच्या जवळ असलेली पाण्याची बाटली फिरवली, आणि पहिल्याच वेळी ती बाटली सोहमजवळ येऊन थांबली, सोहमला स्टेअर करायला लावलं, आणि मग सोहम आणि वृषाली दोघंही समोरा-समोर बसले, वृषाली लगेच हरुन जाईल असं सगळ्यांना वाटलं मात्र जवळपास तीन मिनिटे तीने सोहमला नजरेनं चांगलीच टक्कर दिली, पण शेवटी सोहमच जिंकला. या खेळात तो चॅंम्प होता. आता सोहमने बाटली फिरवली, आणि हर्षितसमोर त्या बाटलीचं तोंड आलं, "मला माहिती आहे, तुम्ही मला काय करायला लावणार ते, पण मी तुम्हाला मी माझी केलेली नवकविता- ’मॅडम आमची जरा न्यारी’ ऐकवतो, प्लीझ दोस्तांनो," असं हर्षित बोलला, आणि कुणी काही म्हणायच्या आतचं त्यानं ती कविता म्हणायला सुरुवात केली. सगळी बॅच पोट धरुन हसायला लागली होती. "कार्टुन आहेस यार तु, कशावरपण कविता करायची का?" असंच प्रत्येकजण त्याला म्हणत होता. सुमारे दोन तास एस.टी.डी. गेम चालु होता, बॅचंमधील जवळ-जवळ सर्वांवर काहीतरी टास्क करायची वेळ आली होती, पण सुदैवाने अर्जुनचा नंबर काही केल्या आलाच नव्हता.
"अरे ती बाटली फिरवणं थांबावा, अर्जुन सोडुन सगळ्यांचा एकतरी चान्स झाला, आता अर्जुनलाच टास्क करु देऊ, काय म्हणताय तुम्ही?" असं शौर्य बोलला, "अरे अर्जुन साठी ओन्ली ट्रुथच, नो स्टेअरिंग-नो डेअरिंग." असं बॅच मधल्या सगळ्या मुलींनी सुचवलं, उरलेल्या सगळ्यांच त्यावर एकमत झालं, पण त्याला ट्रुथसाठी कोणी प्रश्न विचारायचा यावर मग मुला-मुलींमध्ये काही एकमत होईना. शेवटी रितेशच बोलला, "अर्जुनला आपण प्रेमावरचं प्रश्न विचारु ना, सकाळीच तो सोहमला म्हंटला नव्हता का, सहा-सहा मुलींबरोबर अफेअर्स असणार्याला काय कळणार प्रेम कायं असतं?" "एक नंबर, कधी तरी मेंदु वापरला असं म्हणायला हरकत नाही तरं." तेजाली गरज नसतांना रितेशला शेरा देऊन मोकळी झाली. रितेश काही तिला प्रतिउत्तर देईल तेवढ्यात "अरे मुलांनो, प्रिंसिपल येताय बरं का, असं लॅब असिस्टंटने आरोळी दिली, आणि सगळ्या बॅचचा हिरमुड झाला. सुटलो बाबा एकदाचं, असाच भाव जणु अर्जुनच्या चेहर्यावर होता.
कॉलेज संपल्यानंतर, अर्जुन आणि हर्षित दोघंही डायरी घेण्यासाठी निघाले, या नव्या वर्षापासुन हर्षितनेही अर्जुनप्रमाणेच डायरी लिहिण्याचं ठरवलं होतं. ते दोघं ज्या दुकानात डायरी घेण्यासाठी शिरले, योगायोगाने स्वरालीसुद्धा त्याच दुकानात होती आणि तीसुद्धा डायरी बघत होती. स्वरालीला रोज चित्रं काढायची सवय होती, आणि ते चित्र काढत असतांना तिला काय वाटायचं ते ती डायरीत लिहित असे. स्वरालीला बघुन अर्जुनला आश्चर्याचा जणु सुखद धक्काच बसला. "आजी साठी डायरी खरेदी करतेस का?" असं अर्जुनने तिला मुद्दाम विचारलं, किती दिवसांनंतर त्याला तिच्याशी स्वतःहुन बोलावसं वाटलं होतं. ओळखीचा आवाज ऐकताच स्वरालीनं माघे वळुन बघितलं, अर्जुन तिच्यापाठीमागे होता आणि त्यानं तिला आवाज दिला हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा तिला खुप आनंद झाला, कळी उमलतांना झाडाला जितका आनंद होत असेल अगदी तसाच आनंद तिला झाला. "आजी साठी नाही रे, माझ्यासाठीच खरेदी करते आहे, तु पण डायरी खरेदी करायला आलास का?" असं स्वरालीनं उत्तर दिलं "हो, यंदाची ही ११वी डायरी, गेले दहा वर्ष झाले डायरी लिहितो मी, अरे बोलता बोलता तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याचं विसरलोच बघं," अर्जुनचा आणि स्वरालीचा मग संवाद सुरु झाला, हर्षित बिचारा दोघांकडे बघत बसला, दहा मिनिटांनंतर अर्जुनच्या लक्षात आलं की आपल्याबरोबर हर्षितपण आहे, त्याने हर्षितकडे बघितलं, आणि तीन डायर्या उचलल्या, एक त्यानं स्वरालीला दिली, एक हर्षितला आणि एक स्वतःसाठी.
"ही डायरी घे स्वराली, माझ्याकडुन तुला नवीन वर्षाचं प्रेझेंट, नाही म्हणु नकोस असं म्हणुन त्यानं ती डायरी स्वरालीच्या हातात दिली. "थॅंक यु अर्जुन, मी तु दिलेली डायरी घेईल, पण एका अटीवरचं, थांब एक मिनिट," असं स्वराली बोलली आणि तिनं त्याच्या साठी एक छान पेन घेतला. "तुझी यंदाची डायरी ह्या पेनने लिहावीस अशी माझी इच्छा" असं म्हणत तिने तो पेन त्याला दिला. आणि ते तिघेही दुकानाबाहेर पडले. दुकानाबाहेर पडताच हर्षित बोलला, "अरे अर्जुन, मला नचिकेतकडे जायचं आहे रे, मी येतो रात्री तुझ्या घरी, चल बाय." आणि लगेच हर्षित तिथुन चालायला लागला. "तु घरीच जातोयं ना?" असं स्वरालीने अर्जुनला विचारलं. "होय, आणि तु?" असं त्यानं तिला विचारलं, तीनं मानेनंच होकार दिला आणि हसतचं मग दोघं घराच्या दिशेने चालु लागले.
मावळतीच्या सुर्यांच्या लालीनं आसमंतावर जणु गालीचा पसरवला होता, घरट्याकडे परतणार्या पक्ष्यांची किलबील, सायंकाळी सुटलेला गारवा, दुरच्या मंदिरातुन येणार्या घंटांचा नाद, शाळा सुटल्यावर घराकडे मस्ती करत जाणार्या छोट्या-छोट्या मुलांची गंमत बघत कितीतरी वर्षांनंतर आज अर्जुन आणि स्वराली दोघंही एकत्रपणे चालले होते. हा रस्ता कधी संपु नये, एकमेकांना काय-काय सांगु असं त्यांना बोलता-बोलता वाटत होतं, म्हणुन जणु आज नेहमीच्या रस्त्यानं घराकडे न जाता जरा लांबच्या रस्त्यानंच जावं, असं त्यांच्या मनानं ठरवलं, अन सहाजिकच पाऊलही तशीच पडतं गेली. आपण लहानपणी इतके चांगले मित्र होतो, पण नंतर आपल्याबाबतीत असं का घडलं याची खंत त्या दोघांनाही वाटत होती. घर जवळ येत असल्याचं कळताच स्वरालीचं बोलण मध्येच थांबवुन अर्जुन बोलला, "आजचा दिवस खरचं किती छान होता नाही? दरवर्षी करतो त्यापेक्षा वेगळाच संकल्प मी यंदा करायचा ठरवलायं." स्वरालीने त्याच्याकडे बघितलं, आणि लाजतचं विचारलं, "वेगळा संकल्प म्हणजे?" "कळेलच की तुला थोड्या दिवसांत, तुझ्यापासुन काही लपलयं का?" असं अर्जुनने तिला उत्तर दिलं. "अर्जुन खुप काही लपवलयं तु, किती दिवसांनंतर छे, किती वर्षांनंतर आपण इतका वेळ इकमेकांबरोबर घालवलायं..! निदान यावर्षी तरी आपल्या दोघांनाही एकमेकांसाठी वेळ देता येईल हाच संकल्प कर म्हणजे झालं, चल बाय.!" असं म्हणतचं स्वराली घराकडे पळत गेली. तिच्या त्या पाठमोर्या आकृतीकडे अर्जुन बघतच राहिला. आज एक विलक्षण समाधान दोघांनाही लाभलं याचा आनंद त्या दोघांच्याही चेहर्यावरुन ओसांडत होता.
No comments:
Post a Comment