आपल्या घरी गेल्यागेल्या स्वरालीनं आपल्या आजीचे माघनं डोळे झाकले, "आलीस का बाहुली?" असं आजी नेहमीप्रमाणं बोलली. स्वरालीनं हलकेच आपले हात बाजुला नेले, आपल्या आजीला कडेवरच उचलुन घ्यावं असं तिला वाटलं, "आजी तुला माहिती आज मी खुप खुष आहे!" असं स्वराली आजीचे दोन्ही हात तिच्या गालांवर ठेवुन म्हणतं होती. "कोण खुश आहे आज, आईला पण कळु द्या जरा," असं स्वरालीच्या आईने तिला विचारलं. "काही नाही आजीची आणि माझी गम्मत आहे." असं स्वराली आईला चिडवत म्हणाली. स्वरालीचे आई-बाबा दोघेही सर्व्हिसला असल्याने त्यांना तिला म्हणावा तितका वेळ देता येत नसे, म्हणुन स्वरालीला आजीची खुप ओढ होती. "हे बरं नाही हं स्वरा, चिटींग करतेस तु, आईपासुन काय लपवायचं, जा मी आज ऑफिसवरुन येतांना तुझ्या आवडीचं ब्लॅक फॉरेस्ट आईसक्रिम आणलयं, मला नाही सांगणार ना, जा आजीलाच आईसक्रिम देईल तुला ठेंगा." असं तिची आई तिच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाली.
"आई हे बघं, किती मस्त डायरी आहे ना? अर्जुनने मला प्रेझेंट केलीए." असं आईला डायरी दाखवतं स्वराली म्हणाली. "अरे वा, खुप सुंदर आहे, डायरी घेतलीस पण ती लिहिणार आहेस की नाही?" असं आईनं लाडानं आपल्या लेकीला चिडवलं. "आजी, बघं ना आई कशी करते. सारखी मला चिडवत असते, आज मी किती खुष आहे तिला माहितीच नाही, मला आज पहिल्यांदाच स्वयंपाक करायची इच्छा झाली होती माहिती आहे?" स्वरालीच्या या वाक्यानं आई आणि आजी दोन्ही आवाक झाल्या. आजपर्यंत स्वयंपाक करणं म्हणजे दिव्यं असतं असं समजणारी स्वराली चक्क स्वयंपाक करायची गोष्ट करते हे बघुन तिच्या आईला हसु आवरणं कठीण झालं, पण तिचा हिरमुड होईल म्हणुन आईनं कसंबसं हसु आवरलं, आणि आपल्या सासुबाईंकडे बघत बोलली, "बघितलंत का माई, आज सुर्य पश्चिमेकडे उगवला होता वाटतं, तुमची बाहुली मोठी झाली म्हणायची तर, चला आज स्वयंपाकघराचा ताबा सर्वस्वी स्वरालीला देऊन टाकु. मी यांना फोन करुन आजी घरी लवकर बोलवुन घेते. लेकीच्या हातचं यांना पहिल्यांदाच जेवायला मिळणार.!" "बाहुली तुला काही मदत करु का मी?" असं आजी स्वरालीला म्हणाली. "नाही आजी.." असं लाजतचं स्वराली बोलली आणि किचनकडे गेली.
आज आनंदानं घराचं कुलुप उघडुन अर्जुन घरात आला, नेहमी प्रमाणे आज त्याला रडावसं वाटलं नाही, आज आई-वडीलांच्या प्रतिमेला वंदन करतांना त्याचं मन शांत होतं. आज त्याला नेहमी वाटणार्या एकांताची चिंता नव्हती, त्यानं त्याच्याजवळ असलेला तो रेडिओ कितीतरी दिवसानंतर लावला, त्याच्यावर सुरु असलेली जुनी गाणी ऐकतांना तु सुखावला होता. स्वरालीने त्याला दिलेलं पेन त्याच्या शर्टच्या डाव्या खिशात होतं, त्यानं त्याचे दोन्ही हात त्या पेनवर ठेवले, त्याच्या चेहर्यावर हसु आलं. कितीतरी वेळ तो तसाच गाणे ऐकत बसला होता. त्यानं त्या पेनाला खुप निरखुन बघितलं, त्याचे ओठ हळुवार त्याने त्या पेनला लावले, "तुला मी कधीच माझ्यापासुन दुर होऊ देणार नाही, अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला जपुन ठेवीन..!" असं तो त्या पेनाकडे बघत बोलला. "आज काही झोप येणार नाही मला, असं त्यानं आपल्या डायरीला उचलतांना म्हंटलं. तितक्यात त्याच्या घराची डोअरबेल वाजली, दार उघडुन बघतो तर काय, त्याचा ग्रुप दारात उभा. "दो दिल मिल रहें है, मगर चुपके चुपके." असं हर्षित बोलला, आणि सगळे अर्जुनच्या घरात आले.
"प्रेमकवीचा देवदास तरं झाला नाही ना?" असं अर्जुन हर्षितला बोलला, तोच त्यानंही लगेच बाकीच्या मित्रांकडे बघत बोलला, "दोस्तांनो, जीवनात मुलगी आली, की मुलं आपल्या लंगोटी मित्रालाही विसरतात असं म्हणतात ते उगीच नाही, काय बरोबर ना अर्जुन? भामट्या, डायरी घ्यायला आपण दोघे गेलो, तिथं ती दिसली, आणि भाईंच आमच्याकडे तिळमात्र लक्ष नाही, शॉपिंग करतांना जशा बायका, आपल्या नवर्यांकडे दुर्लक्ष करतात अगदी तसंच अर्जुन करत होता. शेवटी दुकानाच्या बाहेर आल्यावर मीच तिथुन कटुन जाणं पसंत केलं." रितेश अर्जुनकडे बघत बोलला, "बरं झालं अर्जुन, तुझ्याबरोबर निदान हर्षित होता, सोहम असता तर, नक्की तो कबाब मे हड्डी झाला असता? हर्षितचं तरी या जन्मात काही होणार नाही, निदान तु तरी सुरुवात केलीस..!" "बरं ते जाऊ दे, अरे आपल्या कॉलेजचं गॅदरिंग आणि डेज येतायं ना लवकरच, त्यासाठीच आम्ही आलोय. "पण पहिले काहीतरी खायला दे यार खुप भुक लागली आहे," असं नचिकेत बोलला. "काय आज गप्पा मारुन पोट भरलेलं दिसतं नाही वाटतं, थांबा मस्त कांदापोहे बनवतो, ध्रुव चल मला मदत करायला." असं बोलत अर्जुनने किचनकडे मोर्चा वळवला..
आपल्या उभ्या आयुष्यात फक्त मॅगी नुडल्स बनवता येणारी स्वराली किचनमध्ये आनंदाने शिरली खरी, पण काय बनवावं आणि कसं बनवावं हे तिला सुचेनाच. "पहिल्यांदाच स्वयंपाक बनवायचा आहे स्वराली, कम ऑन आई-बाबा आणि आजी खुष झालेच पाहिजे." असं स्वतःला धीर देतांना मनात म्हणत, स्वरालीनं वरण-भात, जोडिला हिरव्या मिर्चीचा ठेचा आणि छोट्या-छोट्या पोळ्या बनवायचं असं ठरवलं. लहानपणी आईला स्वयंपाक करतांना तिला जवळ बसवायची, म्हणुन तीला हे सगळं बनवता येईल याचा विश्वास वाटु लागला. स्वयंपाक झाल्यानंतर तीने ओट्यावरचा पसरा आवरला, आणि खुप मोठ्ठी लढाई आपण आजी जिंकली असं समाधान तिच्या चेहर्यावर होतं. "आई, झाला बरं का स्वयंपाक, बाबा आले की जेवायला बसुया, मी जाते अभ्यासाला, तु नंतर ताट तयार कर." असं स्वरालीने आईला सांगितलं. "माई, स्वरानं स्वयंपाक केलाय खरा, पण उद्या आपल्या सर्वांना दवाखान्याचा चक्कर मारावाच लागेल, मी पटकन काहीतरी करु का?" असं स्वरालीच्या आईनं विचारल्यावर सासुबाई बोलल्या, "जाऊ दे गं अश्विनी, मन मोडेल माझ्या बाहुलीचं, आणि लग्न करुन आलीस तेव्हा तुला तरी काही येत होतं का, जे होईल ते बघुन घेऊ." आता सासुबाईच असं बोलल्यावर सुनेचं काही चालतयं होयं?
थोड्या वेळानं स्वरालीचे बाबा आले, "बच्चा तुला माहिती आहे का, आज स्वयंपाक तुझ्या आश्विनीने नाही तर माझ्या बाहुलीने केलाय.!" असं आईच्या तोंडुन ऐकताच राहुल खुश झाला. स्वरालीच्या बाबांना त्यांची आई लाडानं बच्चा म्हणायची. "आशु, अगं आई काय म्हणतेय ऐकलयं का? स्वराने स्वयंपाक केलाय, अरे व्वा.! चला चला आज पहिले जेवण करुया, काय गुड न्युज दिलीस आई, इस बात पे आज नो ऑफिस वर्क, बेटा स्वरा." असं म्हणतांना स्वरालीच्या बाबा एकदम एक्साइट झाले होते. थोड्यावेळानं डायनिंग टेबलवर आईनं सर्वांसाठी जेवणाची ताटं मांडली. आपण केलेला स्वयंपाक आपल्या कुटंबाला आवडतोय का नाही हे जाणुन घेण्यासाठी स्वराली खुप उस्तुक झाली होती. "बाबा करा ना सुरुवात." असं म्हणतं तिने आपल्या बाबांना जेवायला सांगितलं. त्यांनी आनंदानं पहिला घास तोंडात टाकला, आणि ते बोलले, "बेटा, तुला माहिती आहे का, तुझ्या आईचा आणि माझा संसार इतका छान कसा आहे,?" स्वरालीनं नकारार्थी मान डोलावली. "स्वरा, अगं आम्ही दोघं कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतांना प्रेमात पडलो. मला वाटायचं ही कधीच बदलणार नाही, आणि तिला वाटायचं मी नक्कीच बदलेल, पण आमचं दोघांचं लग्न झाले, आणि दोघांचेही अंदाज चुकले, मी आहे तसाच राहिलो, आणि तुझी आई माझ्यासाठी सर्वस्वी बदलुन गेली. अगदी तिचा स्वयंपाक पण काय बरोबर ना आशु? हेच आहे ना आपल्यातल्या प्रेमाचं आणि सुखी संसाराचं रहस्य?" असं म्हणत स्वरालीचे बाबा हसायला लागले.
"स्वरा ये माझ्या बाळा, आज मी तुला माझ्या हातानं घास भरवते," असं आई बोलल्यावर स्वरालीला खुप आनंद झाला, तिला वाटलं आपण खुप चविष्ट स्वयंपाक केलाय, पण जेव्हा तिच्या आईनं तिला एक घास भरवला, "आई गं, पाणी दे पटकनं," असं ठेच्याचा घास खाल्या-खाल्या स्वरा बोलली. आपण कसा स्वयंपाक केलायं, हे तिला कळुन चुकलं. त्यामुळे ती उदास झाली. "अगं बाहुली, तुला माहिती आहे का, ज्या मुलींचा पहिल्यांदा सगळा स्वयंपाक चुकतो ना, नंतर त्याच मुली स्वयंपाकात एकदम सुगरण बनुन जातात, तुझ्या आईचंच नाही तर आजीची पण अशीच गम्मत व्हायची बरं का." असं आजी बोलल्यावर तिला बरं वाटलं. "आजी माझी बारावीची परिक्षा झाली की सुट्ट्यांमध्ये मी नक्की कुकिंग शिकेलच बघं तु." असं स्वरालीच्या तोंडुन ऐकल्यावर तिच्या आई-बाबांनाच नाही तर आजीलाही आनंद झाला. नंतर मग आईनं आणलेलं आईसक्रिमच त्यांचा त्या रात्रीच्या जेवणाचा मेन्यु ठरली.
"आयला, अर्जुनची बायकोचं नशीब एकदम जबरदस्त राहिल यार, तिला कसलंच टेंशन घ्यायची गरजं पडणार नाही, अगदी स्वयंपाकाचं पण नाही. लग्न झालेल्या कितीतरी गृहिणींना जमणार नाही असे पोहे बनवलेस तु, हॉटेलिंगचा बिझनेस कर तु खरंच." असं हर्षित बोलला, आणि बाकीच्यांनी त्याच्या समर्थनार्थ माना डोलावल्या. कांदापोहे खाऊन झाल्यानंतर नचिकेत बोलला, "बोला कॉलेजचे एकुलते एक कवीराज, यंदा कोणतं नाटक लिहिलयं गॅदरिंगसाठी?" त्यावर हर्षित लाजतच बोलला, "नाटकाचं नाव ऐकल्यावर हसायचं नाही, ’तिच्या साठी वाट्टेल ते’ हे मी लिहिलेलं नाटक आपण यंदा करुया." अपेक्षेप्रमाणे मग सगळे जण मोठ-मोठ्यानं हसायला लागले, "प्रेमकवी खरचं सिरियस झालायं भाय लोग्स, यावर्षी खरचं याचा प्रेमाचा बार उडणारच म्हणायचं तर!" असं सोहम बोलला. "मला माहिती होतं, तुम्ही नेहमी माझी उडवतात, तुम्हाला सगळ्यांना तुमच्यावर प्रेम करणारी मिळालीए, मी आणि अर्जुनच आतापर्यंत एकाच माळेचे मणी होतो, पण तोही तुमच्याच माळेत येतोयं असं वाटतयं."
"अरे, प्रेम ना कधी यानं कुणावर केलं होतं, ना कुणी याच्यावर केलं होतं, तरी प्रेमावर नाटकं लिहिणं हा याच्याकडुन घडलेला जोकच आहे, पण याचं यंदाच नाटक पाहुन कुणीतरी याच्या प्रेमात पडेल, असा दुग्धशर्करा योग नक्कीच यंदा आहे, असं मला वाटतयं, हर्ष्या तु सांग तुझी नाटकाची स्क्रिप्ट." असं अर्जुन बोलल्यावर हर्षितला नवा जोश आला आणि तो नाटकाची थिम सांगु लागला. "अरे यंदा आपण नाटकात एका सामान्य मुलगा दाखवुया माझ्यासारखा, ज्याचं तिच्यावर खुप प्रेम असतं, पण तीला कसं सांगावं हेच त्याला उमजत नसतं. मग त्याचे मित्र त्याला एक-एक फंडे सांगतात, पण त्याला एकही पटत नसतो, मग आपण असा काहीतरी सिन दाखवुया ज्यात त्याच्या कडुन तिला कळेल, ’फिल माय लव्ह.’ आणि ती पण त्याला होकार देईल."
"हे प्लॉप शो होईल यार, सगळं आधीपासुन ठरलेलं आहे असंच वाटेल. काहीतरी वेगळं पाहिजे, प्यार तो होना चाईना, पर इनकार का तडका लगना मंगतायच बॉस.! नाटकात एकदा विलन तर पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय मज्जा येणार नाही. आणि महत्वाचा मुद्दा, नाटक आपलं आहे, जर का मुलींना जास्त रोल दिला तर बघं. खुप नाटकं असतात त्यांची, आयला आपल्या नाटकासाठी आपण जीवतोडुन काम करायचं आणि मुलींनी आयतचं क्रेडिट घ्यायचं हे पटतं नाही. पण मुलींशिवाय नाटकाला मजा नाही हे पण तितकचं खरं म्हणुन थोडासा रोल दे." असं सोहम बोलला. "विलनची आयडिया मस्तच आहे, आणि हर्षित सोडुन दुसरा कोणी विलन शोभेल असं मला वाटतं नाही. याची तब्येत तर बघं, हा नुसता ओरडला तरी चार माणसं घाबरुन पळुन जातील, पण भाई कविता करतात, नाटक लिहितात असं सांगितलं तर खुद्द त्याच्या घरच्यांना विश्वास बसत नाही. प्रत्येक जण चांगला कलाकार नसतो, पण चांगला कलाकार समाजाच्या कुठल्याही स्तरातुन येऊ शकतो, हे याच्याकडे बघुन म्हणावसं वाटतं." असं म्हणतं शार्दुलनं सोहमच्या म्हणन्याला दुजोरा दिला. "अरे असं नका करु रे, यंदा मला हिरोच काम करायचं ना." हर्षित केविलवाण्या स्वरात बोलला.
"वेडा झालायं का रे तु? नाटकाची संकल्पना तुझीच, पटकथा तुच लिहिणार, नाटकाला लागणारा खर्च तुझा म्हणजे निर्माताही तुच, आमच्यासारख्यांकडुन रात्री तीन-तीन वाजेपर्यंत प्रॅक्टिस करवुन घेतो म्हणजे दिग्दर्शकही तुच, आवाज भारदस्त म्हणुन नेपथ्यही तुच करतो, आणि आता हिरोही तुलाच बनायचं असं म्हंटल्यावर सगळे हसतील ना हर्षित.?" असं रितेशने हर्षितला समजावलं. "अरे आपले किती तरी पिक्चर हिरो इतके़च विलनमुळे हिट झालेत माहिती आहे ना यार, म्हणुन हिरो म्हणुन एक तर अर्जुनला घे नाहीतर सोहमला, कारण अर्जुन ऍक्टिंग चांगली करतोच, पण आपल्यातला कुणी डायलॉग विसरला तरी तो संभाळुन घेतो, नाहीतर सोहमला हिरो बनवं, आपला चिकना सोहम नाटकाचा हिरो आहे असं कळल्यावर कॉलेजमधल्या मुली काय दंगा करतील, नेहमीप्रमाणे त्याच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या आणि शिट्ट्या मुलींकडुन जास्त येणारच बघं.!" असं नचिकेत बोलल्यावर हर्षित विलन बनायला तयार झाला. "अरे सोहमला हिरो बनवायला काही प्रोब्लेम नाही, पण त्याला एक सांगा की फक्त नाटकाच्या हिरोईनवरच लक्ष द्यायचं, नाहीतरं हा एकीलाही सोडतं नाही. देवानं याला फक्त मुली पटवण्यासाठीच जन्म दिलायं असं वाटतं. म्हणुन अर्जुनच हिरोसाठी परफेक्ट आहे." असं शार्दुलनं आपलं मत मांडलं.
"अरे मी बनेल हिरो, पण आपण नाटकाची स्क्रिप्टच थोडी चेंज करुया, नाटकाच्या शेवटी हिरोईन हिरोच्या नाही तर विलनच्या प्रेमात पडते असं दाखवुया, एकदम मजा येईल. म्हणजे मी पण हिरो राहिल, हर्षित तुमच्या मताप्रमाणे विलन, आणि शेवटी हिरोईन भेटल्यामुळे हर्षितही खुष.!" अर्जुनच्या या युक्तीवादावर सगळ्यांच एकमत झालं. "चला मी आता स्क्रिप्ट लिहायला बसतो, तोपर्यंत तुम्हाला काही सुचतयं का ते बघा." असं हर्षित बोलला आणि त्यानं नाटक लिहायला सुरुवात केली. "मला लव्हगुरुचा रोल दे बरं का, आणि हो विथ सिडक्टिव्ह फिमेल असिस्टंट" असं सोहमं हसत बोलला. इकडे बाकीचे जण मस्ती करत होते, अर्जुन मग डायरी लिहिण्यासाठी आतल्या खोलीत जाऊन बसला. त्यानं त्या डायरीवरुन एकदा हात फिरवला, त्या डायरीवर त्यानं नावं टाकलं, "तुझ्या एकांतात सदैव मी.!" आणि मग डायरी लिहायला त्यानं सुरुवात केली.
No comments:
Post a Comment