Sunday, February 12, 2012

३) बी.फार्मसी काय आहे ते एकदाचं कळलं..!

         आमच्या कॉलेजची सिल्व्हर ज्युबली होती, बी.फार्मचा कोर्स गेले पंचवीस वर्ष यशस्वीपणे पार पाडलेलं पुणे युनिव्हर्सिटीतलं त्यावेळी आमचं एकमेव कॉलेज होतं.  यादिवसाची खास तयारी आमच्या कॉलेजची मध्ये जणु युद्धपातळीवर सुरु होती. सर्व पास आऊट झालेल्यांचं ग्रॅंड फार्मामिट होणार होतं त्यादिवशी, आम्ही हे सर्व आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो. सिनियर्सच्या आणि शिक्षकांच्या वेगवेगळ्या समित्या नेमुन दिल्या होत्या, प्रत्येकजण त्यांच काम योग्य आणि चोखपणे पार पाडत होतं. आम्ही फस्ट इयरला असल्याने सहाजिकच आमच्या शिक्षकांना आणि कॉलेजमधल्या काही मुलांना ओळखत होतो. त्यामुळे आम्ही फस्ट इयरची सर्व मुलं नाश्ता करुन गोदा-पार्क कडे फिरायला निघुन गेलो.
        गोदा पार्ककडे जातांना आम्ही आजच्या फंक्शन बाबतच बोलत होतो. सगळ्या शिक्षकांच्या चेहर्यावरचा आनंद आज ओसांडुन वाहत होता. आम्ही मुलं फिरता फिरता पंचवटी नर्सरीत आलो, तिथे खुप सुंदर झाडे होती, ग्राहकांसाठी आणि बघणार्यालाही पसंत पडावी अशी टवटवीत रोपं तिथे होती. मुलं तिथल्या माणसां कडुन औषधी वनस्पतींची माहिती करुन घेत होते. यासगळ्या गडबडीत दुपारचे बारा कधी वाजले ते कळलचं नव्हतं. मुलांना भुक लागली होती, त्यामुळे पुन्हा आमचा मोर्चा कॉलेजकडे वळवला, पण पहिले थोरात हॉलमध्ये जाऊन तर बघु तिथं काय चाललयं ते, असं चालतांना मुलांनी आपाआपसात ठरवलं. आम्ही तिथे पोहचलो त्यावेळी तिथे प्रचंड गर्दी होती. आमच्या कॉलेजमधले ९०% पास-आऊट झालेले सुपर-सिनियर्स आज आले होते. प्रत्येक वर्षी पास-आऊट झालेल्या बॅचचं पुन्हा एकदा इंट्रोडक्शन झालं. प्रत्येक जण त्यांचा या कॉलेजनंतरचा प्रवास सांगत होतं. या कॉलेजमधुन पास झालेला प्रत्येक जण आज चांगल्या पदांवर वेगवेगळ्या फार्माइंडस्ट्रित कार्यरत होते. हे सर्व बघितल्यावर आम्हाला फार बरं वाटलं होतं.
        मला आणि शंतनुला टी-शर्ट्स आणि मोमेन्टो देण्याच्या स्टॉलवर बसवलं होतं. तिथे बहुतेक सिनियर्स मुलीच ते टी-शर्ट्स आणि मोमेन्टो देण्याचं काम करत होत्या. मला आणि शंतनुलाही आता ते काम करावं लागलं होतं. कॉलेजने यंदा सिल्व्हर ज्युबली निमित्त चांगले टी-शर्ट्स छापले होते, आलेल्या कित्येक सिनियर्सनी आठवण म्हणुन हक्काने ती विकत घेतली. मला आणि शंतनुला फार बोर झालं होतं, कारण आमचे बाकीचे मित्र कॉलेजकडे निघुन गेले होते, आणि इथे आम्ही दोघंच उरलो होतो, जो तो त्याच्या त्याच्या गडबडीत होता, त्यांच्या बॅचचे सगळे आलेत की नाही हे बघतं होता, त्यांच्या ओळखीच्या सर्वांची आपुलकीने चौकशी करत होते. असं सुंदर चित्र आम्ही बघत होतो. थोड्या वेळानंतर आम्ही तिथुन हळुच कटुन गेलो, आणि पुन्हा कॉलेजवर परतलो. इकडे आमच्या ग्रुपच्या मुलांची जेवणं आटोपली होती, हे पाहुन शंतनु जरा रागवला, पण जेवणाचा मेनु बघुन मग राग नंतर, पेटपुजा आधी करायला त्याची पसंती.
        जेवण झाल्यानंतर मग आता काय करायचं असं आम्ही ठरवत होतो, तेवढ्यात आमचं लक्ष लॉन्सवर गेलं, तिथे काही सिनियर्स त्यांच्या आठवणी ज्युनियर्सला सांगत होते, आम्ही सुद्धा तिथे गेलो. साधारण एक ते दिड तास आम्ही ते सर्व ऐकत होतो. चार वर्ष फार्मसीत कसे असतात, फार्मसी म्हणजे नक्की काय, फार्मसिस्ट झालेल्यांना त्यांच्या करियर मध्ये काय संधी असतात, फार्मा इंडस्ट्रित आणि कॉलेजमधल्या वातावरणात काय फरक असतो, फार्मसीचा अभ्यासक्रम आणि इंडस्ट्रित होत असलेल्या ताज्या घडामोडी त्यांनी आम्हाला सांगितल्या. त्यावेळी आम्हाला फार्मसी हे इंजिनियरिंग आणि मेडिकल फिल्ड्सच्या सारखचं फिल्ड आहे, या फिल्ड मध्ये रिसर्च करायला, मार्केटिंग मध्ये बराच स्कोप आहे असं आम्हाला प्रकर्षाने जाणवलं. त्यावेळी आमच्या मनातील निराशा खरचं कुठल्या कुठे गायब झाली.
        बहुतेक फार्मसी झालेले आमचे सुपर सिनियर्स आज खुपच चांगल्या पदांवर कार्यरत होते. काही जणांनी फार्मसी बरोबरच इतर साइड बिझनेस सुरु केले होते, त्यात एकाने रिच क्लास सारखे आईसक्रिम पार्लर उघडले होते, एका सिनियर्सचं "पावा ऑटोमोबाईल्स" या नावाचं नाशिक मध्ये शोरुम्स उघडलेली होती. करियर पब्लिकेशन च्या माध्यमातुन निषाद देशमुख नावाचा सिनियर्स चांगलच कार्य करत होता. फस्ट इयर ते फायनल इयर पर्यंत बहुतेक मुलं करियर पब्लिकेशनची पुस्तके टेक्स्ट बुक म्हणुन वापरत होती, यातच त्यांच यश होतं. असे अनेक उदाहरणं आम्ही त्यादिवशी बघीतली. एकंदरितच काय तर फार्मसी या फिल्डबाबत आमच्या मनात आदर तयार झाला होता. त्यामुळे निदान आता जरी कोणी फार्मसी का घेतलं तर त्याला चांगल्या प्रकारे उत्तर देता येईल असा आत्मविश्वास मनात निर्माण झाला, आणि एकाअर्थी त्या ग्रॅंड फार्मामिटला खरोखरं सुयश लाभलं होतं असंच म्हणनं योग्य ठरेलं. 

No comments:

Post a Comment