Sunday, February 12, 2012

१०) जनसामान्यांबरोबर आलेले काही अनुभव..!

        फार्मसीत विध्यार्थांचा प्रवेश कसा होतो, हे तर तुम्हाला आता कळलंच असेल. गेल्या साडे-तीन वर्षांत फार्मसी शिकतांना मला जनसामान्यांबरोबर बरेच अनुभव आले, काही वाईट, काही चांगले, काही निराशाजनक तर काही प्रेरणादायी..हे सर्व मी अनुभवलं कधी बस स्टॉपवर, कधी बसमध्ये, कधी एखाद्या समारंभात तर अगदी इंडस्ट्रियल ट्रेनिंग करतांना. गेल्या साडे-तीन वर्षाच्या या प्रवासात मला एक गोष्ट सातत्याने जाणवतं होती की खरचं फार्मसी या फिल्डबद्दल सामान्यलोकांच्या मनात असलेलं वलयं फारच छोटं आहे. कदाचित मेडिकल, इंजिनियरींग, किंवा आय.टी. सारखी लोकप्रियता ह्या फिल्डच्या वाटेला त्याप्रमाणात कमीच आली.
        फस्ट इयरला असतांना प्रॅक्टिकलच्यावेळी आम्हाला एका बॉक्स मध्ये आवशक्यत्या वस्तु घेऊन जाव्या लागतं, सहाजिकच बसमध्ये असलेल्या सहप्रवाश्यांना त्याचं नवलं वाटायचं, असंच एकदा एक वृध माझ्याशेजारी येऊन बसले, माझ्याजवळच्या त्या वस्तु पाहुन ते बोलले, "काय शिकतोस?" मी त्यांना सांगितलं की मी बी.फार्म करतोय, त्यावर त्या आजोबांनी दिलेल्या उत्तरावर कित्येकांचा विश्वास बसणार नाही, कारण ते बोलले, "काय मग आता यानंतर डी.फार्म करणार का?" मी त्यांना बी.फार्म अन डी.फार्म यांतला फरक सांगत होतो, पण त्यांच्यानुसार बी.फार्म नंतरच डी.फार्म करता येतं. पुढे ते सांगत होते की त्यांच्या गावाकडे डी.फार्म झालेला त्यांचा कोणीतरी नातेवाईक राहतो, त्याला तिथले लोक "अर्धा डाक्टर" म्हणतात, "बी.फार्म नंतर डी.फार्म पण कर बरं का म्हणजे तुला  पण लोक अर्धा डाक्टर म्हणतील, नाहीतर कंपाऊंडरच राहशील आयुष्यभर..!" असा सल्लादेखील द्यायला ते विसरले नाही.
        एकदा माझा अकरावीतील मित्र भेटला, इंजिनियरींगला होता तो, "यार आपण काय पुढच्यावर्षी झालो, इंजिनियर, लगेच प्लेसमेंट.." त्यावर मी देखील त्याला बोललो, "मी पण तर होतोय ना फार्मसिस्ट..." त्यावर तो बोलला, "तुला तर मेडिकलला जायचं होतं ना, कशाला फार्मसी घेतलयं. साधा आयुर्वेदिक डॉक्टर झाला असला तरी चाललं असतं ना, फार्मसी काय शेवटी मेडिकलचं दुकानच ना. झालच शेवटी डॉक्टरांचे पाय चाटायचे काम.." त्यावेळी त्याची चांगला समाचार घ्यावा की त्याला फार्मसी बद्दल अधिक सांगावं असा प्रश्न मला पडला होता.
        एकदा मावस बहिणीच्या लग्नात असतांना आईचे मामा मी सध्या काय करतो ते आईला विचारत होते, आईने त्यांना मी फार्मसीला आहे असं सांगताच, "बरं झालं गरुड सरांची रिटायरमेंट नंतरची सोय मुलाकडुन करुन घेतली, ते सांभाळतील मेडिकलचं दुकान अन लेक बनेल एम.आर." खरचं आपल्या लोकांना आजही फार्मसी म्हणजे नुसतं मेडिकलचं दुकान किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हच यापलीकडे सुचतचं नाही. फेम केयर फार्मा-अंबड या इंडस्ट्रित मी ट्रेनिंग साठी गेलो होतो. कंपनीचं वातावरण चांगलं होतं, तेथे काम करणार्या वर्करपासुन ते मॅनेजर यांच्याशी मला चांगलं जुळवुन घेता-घेता खुप काही शिकायला मिळालं होतं. तिथे काम करत असलेले वर्कर सांगायचे, "तु फार्मसीत जास्तीत जास्त शिक बरं का..वेळ लागेल पण नंतर इंजिनियरींग अन मेडिकल असलेल्यांच्या बरोबरीनं कमवशील.." त्यांच्या त्या बोलण्याला मी त्यावेळी हसतच उत्तर द्यायचं टाळलं होतं, पण तिथल्या माझ्यापेक्षाही कमी शिकलेल्या त्या वर्करांनी ती लाख मोलाची गोष्ट सांगितली होती.
        "वेळ लागेल पण नंतर इंजिनियरींग अन मेडिकल असलेल्यांच्या बरोबरीनं कमवशील.." या गोष्टीचा मी नंतर विचार केला, अन विचारांती निर्ष्कशावर आलो की आज फार्मसीची क्रेज कमी आहे ती फक्त याच गोष्टीमुळेच. इंजिनियरींग, मेडिकल झालेल्यांना लगेच कुठेही प्लेसमेंट किंवा जॉब मिळतो, स्वतःच क्लिनीक टाकल्यावर हवी तेवढी प्रॅक्टिस करता येते. पण फार्मसीतल्या मुलांसाठी एवढं सगळं सोप नसतं. साधा डी.फार्म झालेला विध्यार्थी मेडिकल टाकतो किंवा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणुन काम करतो..यात लठ्ठ पगार मिळत नाही, बढतीसाठी शिक्षण कमी अशा अडचणी त्याला येतात. बी.फार्म केलेला विध्यार्थ्याला प्रोडक्शन या विभागात काम करता येतं पण तिथेही पगाराची समस्या असतेच. कारण बी.ई. झालेल्या मुलांचा पगार बी.फार्म असलेल्या मुलांच्या तुलनेत जास्तच असतो. फार्मा इंडस्ट्रित अनुभव असेल तर चांगला पगार मिळतोच मिळतो, पण तो अनुभव येण्यासाठी लागत असलेला वेळ हा इतर फिल्ड्सच्या तुलनेत जरा जास्तच आहे असं मला वाटतं. आणि सध्या प्रत्येकाला कमी वेळात जास्त पगाराची नोकरी पाहिजे असल्याने फार्मसीतुन वेळ खर्च करण्यास सहाजिक नापसंतीच दर्शवली जाते.
    दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनियरींग झालेल्यांना अंतिमवर्षाच्या मुलांच कॅंपस सिलेक्शन होतं, आता बी.फार्मच्या मुलांचं होत नाही यातला भाग नाही, पण इंजिनियरींगची मुलं तो जॉब करतात. पण फार्मसीचे मुलं आलेला जॉब न स्विकारता एम.फार्म करण्याच्या मनस्थितीत असतात, त्यामुळे फार्मसी कॉलेजमध्ये कॅम्पस सिलेक्शनसाठी आलेल्या फार्माकंपन्यांच्या पदरी उपेक्षाच येते. त्यामुळे पुढच्यावेळी त्या बी.फार्मच्या मुलांच सिलेक्शन करायला तयार नसतात.
    एम.फार्म केलेल्यांनाही सुरवातीचे एक-दोन वर्ष कमी पगाराच्याच नोकरीत समाधान मानावं लागतं, त्यामुळे त्यांचाही अजुन उच्च शिक्षणाकडे म्हणजे पी.एच.डी. करुन चांगल्या पगाराची नोकरी करण्याकडे कल असतो, पी.एच.डी नंतर त्यांना उत्तम पगार मिळतोच पण त्यासाठी त्यांनी मोजलेल्या वेळची किंमतही मोठीच आहे. त्यामुळेच फार्मसी कडे वळण्याचं प्रमाण हे इंजिनियरींग अन मेडिकल कडे वळणार्यांच्या तुलनेत कमी आहॆ असं मला जाणवलं. यात थोडाफार दोष फार्मसीसाठी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचादेखील आहेच. पण यावर टिका किंवा भाष्य करणं म्हणजे लहान तॊंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. मला ठाऊक आहे की मलाही अजुन फार्मसीतलं एवढं काही कळतं नाही, मलासुद्धा अजुन बराच प्रवास केल्यानंतरच यातील खाच-खळगे अन मखमली गालिचे दिसतील. पण आजवर जगलेल्या वस्तुस्थितीतुन मिळालेल्या अनुभवांची साक्षीनेच मी हे सर्व लिहिलं आहे. कदाचित यातल्या काही गोष्टी पटतील किंवा काही मुळीच पटणार नाहीत पण फार्मसीबद्दल विचार करण्याची नजर नक्कीच बदलेल अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

No comments:

Post a Comment