Sunday, February 12, 2012

१) आयुष्याला मिळालं नवं औषध-फार्मसी.!

मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा, आई-वडिल दोघेही शिक्षक असल्याने लहानपणा पासुनच माझी जडणं-घडणं सुसंस्कारी अन अभ्यासाला पोषक अशा वातावरणातच झाली. इयत्ता ९वीची सहामही परिक्षा झाल्यानंतर आईने लासलगाव सारखा ग्रामिण भाग सोडुन नाशिक सारख्या शहरी भागात राहयला येण्याचा निर्णय घेतला. पण दहावी मात्र "श्री महावीर विद्दालय, लासलगाव" याच शाळेतुन करावी असा त्यावेळी माझ्या शाळेतील सर्व शिक्षकांचा आग्रह होता. त्यामुळे नाशिकला रहायला येउन देखील मी दहावीची बोर्डाची परीक्षा लासलगाव येथुनच पास झालो, अन तेही शाळेत प्रथम क्रमांक मिळवुनच..! त्यावेळी मागासवर्गीय विद्यार्थी शाळेत प्रथम आल्याने महाराष्ट्र शासनाकडुन दिला जात असलेल्या " राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार" मला त्यावेळी मला मिळाला.
दहावी पास झाल्यानंतर वडिल मला सामणगाव येथील पॉलिटेकनिक कॉलेजला प्रवेश घेण्यास सांगत होते; तर आईला मला डॉक्टर करायची इच्छा होती. अशा परिस्थितीत मला अकरावी-बारावी सायन्स करु द्यावं असा सल्ला बच्छाव सरांनी माझ्या वडिलांना दिला. ज्या शिक्षकांचा माझ्यावर जास्त प्रभाव आहे त्यापैकी बच्छाव क्लासेसचे संचालक श्री बच्छाव सर हे एक; त्यामुळे मग वडिलांचही मतपरिवर्तन होण्यास जास्त वेळ लागला नाही. आरंभ महाविद्यालय, ना.रोड येथुन मी मग माझी अकरावी-बारावी सायन्सची दोन वर्षे पुर्ण केली. या कॉलेजमधील पवार मॅडम, औटी मॅडम आणि वाघ सर यांनीदेखील वेळीवेळी मार्गदर्शन करुन माझ्या कॉलेजजीवनाला योग्य दिशा दिली. MH-CET (2007) चा फॉर्म भरतांना यांनीच मला फार्मसीचा पर्याय देखील भरायला लावला होता. ज्यावेळी CETची परिक्षा देउन घरी परतलो होतो त्यावेळी निदान B.D.S.ला प्रवेश मिळण्य़ासाठी आवशक्य असलेतील तेवढे गुण मिळतील असं वाटलं होतं, पण CETचा निकाल लागला तेव्हा मात्र धक्काच बसला, कारण गुण मिळाले होते फक्त १२१/२००. CETचा स्कोर कमी असल्याने काय करावं अन काय न करावं असं झालं. एकीकडे मला माझ्या भविष्याची चिंता अन दुसरीकडे घरच्यांना बसत असलेल्या टोमण्यांची चिंता. "कॉलेजला गेल्यावर पोरांना शिंग फुटतात म्हणतात ना ती अशीच बरं का गरुड सर..!" खरचं जर शिंग असती तर अशांनाच पहिले शिंगानी उचलुन भिरकावलं असतं पण त्यांची कीव करण्यापलीकडे मी त्यावेळी काहीच करु शकत नव्हतो.
    एक दिवस वडिलांनी विचारलं फार्मसी करशील का? आता त्यावेळी आत्महत्ये सारखा भेकड विचार सोडुन मी काहीपण करायला तयार होतो. खरं तर मलाही त्यावेळी फार्मसी बद्दल काही माहिती नव्हती. B.Engg.ला प्रवेश घेण शक्यच नव्हतं, कारण गणितात मी एकदम सोसो विद्यार्थी होतो. मला त्यावेळी Wine technology शिकण्याची जबरदस्त इच्छा तयार झाली होती, पण आईची तीव्र नापसंती अन श्रीमुखावर मिळालेल्या प्रसादामुळे फार्मसीसाठीच प्रयत्न करुन बघुया या निष्कर्षावर मी आलो.
    फार्मसीसाठी कोणतं कॉलेज चांगलं आहे त्याची माहिती मिळवण्यासाठी मग रद्दी साठी ठेवलेल्या त्या फार्मसीच्या broucherला बाहेर काढावं लागलं . त्यावेळी M.V.P.S. College Of Pharmacy, Nashik या कॉलेजच्या नावाने माझं लक्ष वेधुन घेतलं. Pune university मधलं फार्मसीचं सर्वात जुनं कॉलेज असल्याने सहाजिकच या कॉलेजबद्दल आकर्षण वाढलं होतं. त्यावेळी फार्मसीसाठी भरण्यात आलेल्या ऑप्शन फॉर्म मध्ये मी फक्त M.V.P.S. College Of Pharmacy, Nashik लाच पहिली पसंती दिली. M.G.V.या फार्मसी कॉलेजचाही पर्याय मी भरला होता. ते कॉलेज माझ्या मावशीच्या घराजवळच असल्याने मला ठाउक होतं. तीन दिवसांनंतर कोणाला कोणतं कॉलेज मिळणार याची लिस्ट लागणार होती. त्यावेळी मनात फक्त एकच विचार घुमत होता तो म्हणजे आपल्याला फार्मसीसाठी कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिकमध्ये प्रवेश मिळेल का?
   College alloted:- N.D.M.V.P.S. COLLEGE OF PHARMACY, NASHIK-02
असं जेव्हा मी इंटरनेट वर बघीतलं त्यावेळी मला हर्षवायु तर होणार नाही ना..! इतका प्रचंड आनंद झाला होता. कारण CETचा स्कोर फक्त १२१/२०० असल्याने या कॉलेजला प्रवेश मिळणार नाही याची खात्री होती, पण याच कॉलेज मधुन आपण फार्मसी करायचं ही इच्छा होती.अन अखेर खात्रीपेक्षा इच्छाच सरस ठरली कारण मला पहिल्याच प्रवेश फेरीत College Of Pharmacy, NASHIK मध्ये प्रवेश मिळाला होता.त्यावेळी मी घाई-घाईने त्या allotment letterची प्रिंट काढुन घरी पळतच येत असतांना जिन्यातच धरपडलो, पण त्यावेळी ती वेदनाच जाणवलीच नाही. कारण फार्मसी फिल्ड मधल्या एका चांगल्या कॉलेजला मला प्रवेश मिळणार याच गोष्टीचा फार आनंद झाला होता.
हा दिवस उजाडेपर्यंत आई-वडिलांना अतोनात त्रास ज्यांच्यामुळे सहन करावा लागला होता त्यांच तोंड त्या allotment letterने बंद करुन टाकलं होतं कोणी काहीही म्हंटल तरी त्यावेळी फार्मसीच्या रुपात माझ्या आयुष्याला जणु चमत्कारी औषधच मिळालं होतं.
    मग C.P.N.मध्ये प्रवेश घ्यायला माझ्याबरोबर वडिलही आले होते. त्यावेळी तो प्रवेश फॉर्म स्वतः माझ्या वडिलांनी भरला होता, अन मी फक्त सही केली होती.माझी सही झाल्यानंतर ते स्वगतच हसले. त्यावेळी मला वाटलं त्यांच हस्ताक्षर माझ्यापेक्षा कैक पटींनी चांगले आहे म्हणुन त्यांनी तो फॉर्म भरला असावा, पण त्यावेळी त्या गोष्टीचा मतितार्थ समजण्याइतका मी समजदार झालो नव्हतो. ज्या दिवशी मला त्यांच्या स्वगत हसण्याचं कोडं उमगलं त्यादिवशी मला स्वतःचीच लाज वाटली होती. भविष्यात कधी फार्मसी कडे येऊन मी जर पस्तावलो असतो तर निदान त्यांच्याकडे तरी बोट दाखवुन,"तुम्हीच तर प्रवेश फ़ॉर्म भरला नव्हता का?" असा प्रश्न तरी मला विचारण्यास राहिल. याचीच जाणीव ठेवुन त्यांनी तो फॉर्म भरला होता. माझ्या बापाची थोरवी मी त्यादिवशी ओळखण्यात मी सपशेल अपयशी झालो होतो. हीच गोष्ट मला आजही माझ्या आयुष्यात हा प्रश्न वडिलांना कधीच विचारायची वेळ कधीच येऊ न देण्यासाठी अपार कष्ट अन मेहनत करण्याची सकारात्मक ऊर्जा देऊन जाते. 
    असा झाला फार्मसी फ़िल्ड मध्ये माझा प्रवेश..! इथपर्यंत जणु माझ्या beginner's luck ने साथ दिला, पण आता यापुढे माझ्या आयुष्याचं सोनेरी Rx करणं हे केवळ माझ्याच हातात होतं.

No comments:

Post a Comment