फस्ट इयरच्या आमच्या प्रवासाला आता पाच महिने उलटुन गेली होती. आता आमचं मन फार्मसीत रमायला लागलं होतं. फस्ट इयर तसं बघितलं तर एका अर्थानं चौकसबुद्धीने विचार करण्यात गेलं याचा आम्हाला फार्मसी काय असतं हे कळण्यात फायदा झाला. फस्ट इयरला प्रॅक्टिकल्सला खरचं मजा येत असायची, अन तेही फार्मास्युटिक्स आणि एम.डी.पी. च्या प्रॅक्टिकल्सला जरा जास्तच. या दोन प्रॅक्टिकल्सला आम्हाला वेगवेगळे प्रोडक्टस बनवावे लागयाचे, त्यामुळे मजा यायची.
एम.डी.पी. ला लिक्विड पॅराफिन इमलशन, कॅलामाईन लोशन, सेट्रिमाईड क्रिम, सल्फर ऑईंटमेंट, व्हिटफिल्ड्स ऑईंटमेंट, सपोझिटरीज, लोजेन्झेस, पिल्स, टॅब्लेट ट्रायट्युरेट्स, ऑरेंज एक्सट्रॅक्ट, वैगेरे बनवण्यात मजा येत असे. इमलशन काहींच बनायचं, काहींचं ब्रेक व्हायचं, आणि त्यातही ते चिगट असायचं, त्यामुळे तर मुलांची आणखी मजा यायची. तयार केलेलं इमलशन एखाद्या सिरींजमधुन पास करा म्हणजे ते ब्रेक होणार नाही असं आम्हाला सिनियर्सने सांगितलं, त्यामुळे आम्ही एक-दोन जण तसं करायला लागलो, की आमची बॅच आमच्याकडे पाहुन हसायची, पण नंतर त्यांच इमलशन ब्रेक होतं असलं की मग पुन्हा आमच्याकडे येऊन मग ते सिरींज मागायचे.
कॅलामाईन लोशन तर सगळ्यात अवघड असंच होतं, कारण काहींच बनलयं असं वाटायचं, मग एकदा का ते कंटेनर मध्ये टाकलं, की लगेच सेपरेट व्हायचं, नाहीतर इतकं घट्ट व्हायचं की बसं, नाहीतरं काहींच इतक पातळ असायचं की सरांनी बाटली उलटी केली की भसकन खाली येऊन जायचं, आणि मग सर चिडुन जायचे. सपोझिटरीज बनवतांना तर मुलांची फजिती यायची, कारण छोटा मोल्ड वापरला की चांगल्या सपोझिटरीज तयार होतील, असं आम्हाला कळालं, आणि त्यावेळी कॉलेजमध्ये अवघे दोनच छोटे मोल्ड्स होते, त्यामुळे तो आपल्यालाच मिळावा यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असायचा.
क्रिस्टल व्हॉयलेट सपोझिटरीच्या वेळी कुणाकडुन तरी क्रिस्टल व्हॉयलेट सोल्युशन खाली सांडलं, आणि घाई गडबडीत ते कुणाच्याच लक्षात आलं नाही, सगळ्यांकडुन ते पायंदळी तसंच तुडवलं गेलं, आणि मग पुर्ण लॅबची फरची निळी-जांभळी झाली. अनंतवार सर जेव्हा लॅबमध्ये आले आणि त्यांनी जेव्हा तो सारा प्रकार बघितला त्यावेळी त्यांनी मुलांना एकदम वाईट झापुन टाकलं होतं. प्रोपेलिन ग्लायकॉल सपोझिटरीज च्यावेळी आम्हाला आधीच्या बॅच कडुन कळालं की त्या नीट स्टोर करा म्हणजे मेल्ट होणार नाही, मग आमच्यातील काहींनी त्या फ्रिजमध्येही ठेवायला कमी केलं नव्हतं. लोजेन्झेस बनवायला तर मजाच यायची, एका पोलपाटावर ते मिश्रण लाटायचं आणि मग त्यापासुन त्या लोजेन्झेस बनवायच्या एकंदरीत गमतीशीर काम होतं. ऑरेंज आणि लेमन एक्सट्रॅक्ट बनवायच्या वेळी तर आम्हाला घरुन लिंबु आणि संत्रे घेऊन यावी लागत, त्यांची सालं अल्कोहोल मध्ये सात दिवस ठेवायची आणि नंतर ते फिल्टर करुन घ्यायचं इतकं सोप होतं.
फार्मास्युटिक्सचे प्रॅक्टिकल्सला तर ग्राईप वॉटर, कफ सिरप, ओरल रिहायड्रेशन पावडर, इफरव्हेसंट ग्रॅन्युल्स, क्रेसॉल विथ सोप सोल्युशन, सर्जिकल क्लोरिनेटेड सोडा लाईम सोल्युशन, टुथ पावडर, नेल लॅकर, फेस पावडर, आफ्टर शेव्ह लोशन, शॅम्पु यासारखे प्रोडक्टस बनवावी लागायची. आणि यांच्या जोडीला सावकारे सरांचा व्हायवा असायचाच. कफ सिरपच्या वेळी सरांनी अचानक मेजरिंग सिलेंडर घेतला आणि मुलांच्या कफ सिरपचे व्हॉल्युम बघायला सुरुवात केली. सगळ्यांना १३ मिली. कफ सिरप बनवायचं होतं, पण काहींच १२ मिली, काहींच १२.५मिली, काहींच बरोबर १३मिली. तर काहींच १४ मिली. पर्यंत कफ सिरप भरलं होतं. त्यामुळे सर हसायला लागले, आणि त्याच्यानुसार सरांनी मग आम्हाला मार्क्स दिले होते. इफरवेसंट ग्रॅनुल्स आम्हाला बनवायचे होते, आपलं इनो असतंना अगदी तेच बनवायचं होतं. मुलांचे ग्रॅनुल्स चांगले बनले होते, पण आम्हाला नंतर लागोपाठ दोन वेळा स्युटिक्सच्या प्रॅक्टिकलला सुटी आली होती, त्यामुळे मुलांचे ग्रॅनुल्स खराब झाले होते.
पंकजच्या होस्टेलवर एका मुलाचं पोट दुखतं होत, तर या भाऊने त्याला ते ग्रॅन्युल्स देऊन टाकले होते, त्याचं पोट दुखायचं थांबलं होतं. आम्हाला माहिती होतं की आमच्या कॉलेजमध्ये कोणत्या दर्जाचे केमिकल्स वापरतात, त्यामुळे पंक्याने जेव्हा आम्हाला किस्सा सांगितला त्यावेळी मग आमची हसता हसता पोट दुखायला लागलं होतं. ग्रॅनुल्स माझेही खराब झाले होते, पण आदल्यादिवशी मग खाण्याचा सोडा, ढोकळा करतांना बापरतात ते सायट्रिक ऍसिड, आणि थोडी पिठी साखर यांच अंदाजे मिश्रण घेऊन ते कढईत थोड तापवलं आणि त्याचे ग्रॅन्युल्स बनवले. प्रॅक्टिकलच्या दिवशी आमचे ग्रॅन्युल्स सर चेक करत होते, एक स्पॅच्युला भरुन ग्रॅनुल्स समोर ठेवलेल्या पाण्याने भरलेल्या बिकर मध्ये टाका असं सरांनी सांगितलं.
एक एक जण येऊन पाण्यात ग्रॅनुल्स टाकायचा, पण कुणाचाच म्हणावा तसा इफरव्हेसंस सरांनी दिसत नव्हता, माझा नंबर आला, त्यावेळी मी पाण्यात ग्रॅन्युल्स टाकले आणि इतका पटकन इफरव्हेसंस आला की बिकरमधलं काही पाणी ओसांडलं, सगळ्यांना वाटलं की याने नक्की काहीतरी झोल केलाच आहे. सरांनी मला १० पैकी ९.५ मार्क्स दिले होते. सर गेल्यानंतर मी मुलांना त्या ग्रॅनुल्सचा राज सांगितला त्यावर मुलं हसत होती. नंतर पुढच्या प्रत्येक प्रॅक्टिकल मध्ये काय हेराफेरी करता येईल याकडे मुलांचं लक्ष असायचं.
असंच एक प्रोडक्ट होतं, क्रेसॉल विथ सोप सोल्युशन म्हणजे लायजॉल बनवायचं होतं. आता लॅब मध्ये उपलब्ध तेल असं खराब होतं, त्यामुळे काहींचा सोप बनलाच नाही, त्यामुळे त्यांनी निरमा पावडर मध्येच क्रेसॉल ओतलं होतं आणि तसचं प्रोडक्ट सबमिट केला, पण सरांनी लगेच ते ओळखलं, आणि मुलांची चांगलीच विकेट सरांनी घेऊन टाकली. ओरल रिहाड्रेशन पावडर या प्रोडक्टलाही मजा आली होती. "चंद्रात्रे कायं असतं ओरल रिहाड्रेशन पावडर?" असं सावकारे सरांनी आमच्या भाऊला म्हणजे शंतनुला विचारलं, त्यावर तो रेफरंसिंग करुन आणलेली माहिती वाचुन दाखवायला लागला. त्यावर सर हसायला लागले, आम्हाला सर असे का हसतायं ते कळलच नाही, मग सर त्याला म्हणाले, "आरे कधी सरकारी दवाखान्यात गेला नाहीस का, तिथे नाही का एखाद्या कोपर्यात बोर्ड असतो, मीठ साखर पाणी द्या बाळा, अन जुलाब टाळा, तेच तर असतं ओरल रिहाड्रेशन पावडर, फार्मसी काय सोप्पच असतं ओके..!" मग सगळी बॅच हसायला लागली.
टुथ पावडरचं प्रिपरेशन होतं, सी. बॅचच्या सुहास सुर्यंवंशीने कुठल्या तरी पेपर मधुन एका टकल्या माणसांचा फोटो चिटकवला ज्याची बत्तीशी एकदम चकाचक होती. शिवाय "लंकेश टुथ पावडर" हे त्यांने त्याच्या टुथ पावडरला दिलेलं नाव, आणि "रावण के जमाने से चला आ रहा दंतमंजन" असं स्लोगन दिलं आणि सावकारे सरांना दाखवलं. सरांना त्यावर हसावं की त्याला रागवावं हा प्रश्न पडला, मग त्यांनी त्याला ५.५ मार्क्स देण्याचा मध्यम मार्ग अवलंबला होता. काही म्हणा सुहासने सरांनाच स्टंट दिला होता.
फस्ट इयरला कॉलेज मध्ये फेब्रुवारी महिन्यांत गेटची परिक्षा झाल्यानंतर डेजला सुरुवात झाली. आम्ही यावेळी पुर्ण मजा करायची असं ठरवलं होतं. सगळ्यात जास्त मजा मिस मॅच डेला आली आणि थिम डेला आली होती. आमच्या वर्गातल्या जयदीप यादवने साडी परिधान केली होती. मोनाली जगतापने तर खेड्यातल्या बाईला आधुनिक फॅशनचा टच दिला होता. पण या सगळ्य़ांपेक्षा सगळ्यात भयानक मिस मॅच केलं होतं अम्रिता देशमुखने. हातात धनुष्यबाण,डोक्यावर शॉवर घेतांना केस आले होऊ नये म्हणुन स्त्रिया परीधान करतात ती टोपी, John Cena नावाचा एक wwe super-star तुम्हा सगळ्य़ांना ठाऊक असेलच तो गळ्यात जशी साखळी अन कुलुप घालतोना अगदी तसंच कुलुप अन साखळी तीनं घातली होती. या वेशभुषे मागील गुढ रहस्य मला तर अजुन ऊलगडलं नाही. C.P.N.च्या भाषेत सांगायचं तर अम्रितानं त्यादिवशी स्टंटचं देऊन टाखला..!
थिम डेला होस्टेलच्या मुलांनी अंतयात्रेची कॉमेडी थिम सादर केली होती. त्यांच्याकडे बघत असलेल्या प्रत्येकाला हसु आवरतच नव्हतं. रेट्रो डे ला मात्र मुलांपेक्षा मुलींनी जास्त हिरीरीने भाग घेतला होता. टाय आणि साडी डेला आमच्या बॅच मध्ये जणु फोटो सेशनच सुरु होतं. एकंदरीतच सगळे जण आनंदाने डेज साजरे करत होते. गॅदरिंगलाही मजा आली होती, फायनल इयरच्या मुलांनी बॅक टु स्कुल डेज हे नाटक सादर केलं होतं. वैशाली परदेशी, प्रतिक्षा पाटील यांचा डान्स मस्त झाला होता. होस्टेलच्या मुलांनी, "गेली माझी सख्खी बायको मेली, आणि हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला," या दोन गाण्यांवर कडक परफॉर्मंस दिला होता. आमच्या वर्गातल्या मोनाली जगताप, किरण लुटे, अनामिका देशमुख, मनाली कोरंगळेकर यांचेही डान्स चांगले झाले होते. फस्ट इयरला असतांना फायनल इयरच्या मुलांनी पहिल्यांदाच कॉलेजमध्ये मॅग्झीन छापलं होतं, त्याला त्यांनी इंपल्स असं नाव दिलं. फायनल इयरची बॅच खरच खुप चुणचुणीत होती, अभ्यासा बरोबर इतरही गोष्टीत त्यांनी हिरीरीने सहभाग असायचा.
यादरम्यान गेटच्या परिक्षेचा निकाल लागला होता, फायनल इयरचा कैलास खोमणे पुर्ण भारतात तिसरा आला होता, आणि पहिल्या दहा मध्ये आणखी ५ जणांचा समावेश होता. पहिल्या शंभरात निम्म्याहुन अधिक मुलं आमच्याच कॉलेजची होती. नोटीस बोर्ड मुलांच्या नावाने आणि त्यांच्या स्कोरने भरुन गेला होता. सर्वांना प्रचंड आनंद झाला होता. या घवघवीत यशाचं सेलिब्रेशन तर होणारच होतं, मग ज्यांचे ज्यांचे चांगले स्कोर आले त्या सर्बांनी आख्या कॉलेजमधल्या मुलांना पार्टी दिली होती. नेहमी प्रमाणे यावर्षी देखील डी.जे.ला बोलवलं होतं, मुलांचे पाय डी.जे. च्या तालावर थिरकत होती. पण दुसर्याच दिवशी मग आल्या यशाने हुरळुन न जाता मग मुलं येणार्या नायपरच्या परिक्षेच्या तयारीत मग्न झाले. खरचं आमच्या सिनियर्स कडे बघितल्यावर आम्हाला जाणवायचं की, "जीव तोडुन अभ्यास करा आणि जीव तोडुन मजा करा" हे नक्की काय असतं.
आमची वार्षिक परिक्षा जवळ आल्याने मुलं आता अभ्यासला लागली होती, सगळ्यांच्या नजरे समोर एकच लक्ष होतं की आपल्याला फस्ट क्लास कोणत्याही परिस्थितीत मिळवायचा. आम्हा मुलांना बायोस्टॅटच्या पेपरचं टेंशन होतं, कारण मुलांना बायोस्टॅटचे कॅल्क्युलेशन्स जमत नव्हते. एम.डी.पी.च्या पेपरपेक्षा प्रॅक्टिकल्सची जास्त चिंता असायची. आमची "ए बॅच" असल्याने पहिले प्रॅक्टिकल्स आमचे असायचे, त्यामुळे सगळ्यांत जास्त दडपण आमच्या बॅचच्या मुलांना असायचं. हे सर्व असतांना देखील मुलांनी चांगली मेहनत केली होती, आणि सगळ्य़ांना बर्यापैकी चांगले पेपर गेले होते.
८०% मुलांना आपल्याला फस्ट क्लास मिळेल अशी खात्री होती. बाकीच्यांनाही त्यांना निदान फस्ट क्लासच्या आसपास मार्क्स मिळतील असं वाटतं होतं, आमच्या सावकारे सरांच्या शब्दात सांगायचं तर, "फार्मसी काय सोप्पच असतं, कोणीही थोडा फार अभ्यासकेला की युनिव्हरसिटीच्या परिक्षेत पास होतं," आणि आम्हालाही ते आता जाणवत होतं. पण नुसतं युनिव्हरसिटीच्याच नाही तर फार्मसी बरोबर आम्हाला आमच्या आयुष्याच्या परिक्षेतही चांगलं पास व्हायचं होतं, पण पहिले उन्हाळ्याची सुटीचा मनसोक्त आनंद घेऊया, आणि सेकंड इयरला भेटु असं एकमेकांना सांगतच आम्ही शेवटच्या पेपरनंतर निरोप घेतला. आणि असं आम़ची फस्ट इयरची वारी पुर्ण झाली.!
No comments:
Post a Comment