Sunday, February 12, 2012

"वाट पहात असलेल्या प्रेमाची गोष्ट..!"

        "प्रत्येकाचं स्वतःवर प्रचंड प्रेम असतं, पण तरीही प्रत्येकाला अशी एक जण हवीए जी दाखवुन देतो की आपण चुकीचे आहोत, कारण आपल्यापेक्षाही ती आपल्यावर जास्त प्रेम करते, अशीच प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात प्रेम करणारी मिळु दे, ह्याच माझ्या आजच्या दिवसाबद्दल असलेल्या शुभेच्छा..!" असं शेवटचं वाक्य सांगुन तो मंचावरुन टाळ्यांच्या गजरातच खाली उतरला, तब्बल तीनतास रंगलेल्या कार्यक्रमात बाकींच्यापेक्षा शार्दुलच्या प्रेमावरील कविता आणि विचारांनी उपस्थित तरुणाईला प्रेमाचा वेगळाच रंग दाखवला होता. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी शार्दुलचं खुप कौतुक केलं, बाकीच्या उपस्थितांनी त्याला तितकीच मनापासुन दाद दिली. उपथित तरुणाई तर त्याचीशी बोलायला उतावीळ झाली होती. "शार्दुल सर, प्लीज आम्हाला तुमची लव्ह स्टोरी सांगा ना, आम्हाला नक्कीच आवडेल ती ऐकायला..!" असं म्हणत तिथे जमलेल्या तरुण-तरुणींनी त्याला  आग्रहानं विनंती केली. कार्यक्रम संपला होता तरी मग आयोजकांनी उपस्थितांच्या आग्रहाखातर आणखी वेळ वाढवला. उपस्थितांच्या मध्ये शार्दुल बसला, त्याच्या चेहर्‍यावर जणु लाजेची लाली आली असं जाणवत होतं. आणि त्याने त्याची प्रेमकथा सांगायला सुरुवात केली. 
        "आज तब्बल पाच वर्ष होऊन जातील त्या गोष्टीला, माझ्या आयुष्यातला पहिला व्हॅलेंटाईन डे होता तो..! त्यादिवशी कॉलेजमध्ये आल्यावर जणु माझ्या मनावर प्रेमाची गुलाबी धुंदी पसरलेली होती, प्रेमाच्या वसंताने माझं सर्वांग रोमांचित झालं असं वाटतं होतं, वळिवाच्या पावसात भिजल्यासारखाच मी दिसत होता, चहुकडे भिरभिरणारी माझी नजर आज खुपच चंचल असल्यासारखी वाटत होती, समोरुन येणार्‍या प्रत्येकाकडे बघुन मी आज स्मितहास्य करत होतो, जणु प्रत्येकात त्याला तिचाच चेहरा बघत होतो, कुठुनतरी तिचा मंजुळ आवाज येईल आणि तो टिपण्यासाठी माझे कान आसुसलेले होते, अगदी हळुवारपणे श्वास घेत होतो, जणु प्रत्येक श्वासाआधी तिचीच आठवण काढत होतो. माझा जिवलग मित्राला माझ्या शेजारीच होता, त्याला सर्व काही कळत होतं, कारण माझ्या प्रेमाचं गुपित फक्त त्यालाच तर माहित होतं."
        "भाई, श्वेताली आली," असं अक्षय बोलल्यावर माझं लक्ष तिच्याकडे गेलं, "खरंच श्वेताली शिवाय दुसर्‍या कुणावर मी प्रेम करुच शकत नाही रे," असं मी अक्षयला बोललो. "अरे पण मितालीचं काय शार्दुल?" असं अक्षयच्या बोलण्याला कल्पनेच्या आकाशात स्वच्छंदपणे विहार करणारं माझं मन वास्तवाच्या जमिनीवर येऊन कोसळलं. मिताली ही अकारावी पासुन माझ्या प्रेमात पडलेली होती, आमच्या कॉलेजमधला मी पहिलाच असा मुलगा होतो ज्याला स्वतःहुन एका मुलीने प्रपोझ केलं होतं, त्यामुळे आमच्या प्रेमाबद्दल सगळ्या कॉलेजच्या मुलांमुलींनाच काय पण शिक्षकांनाही माहिती होतं. मला त्यावेळी नेहमी वाटायचं की मितालीला माझ्याबद्दल प्रेम नाही तर त्यावयात आल्यावर स्वाभाविकपणणे वाटणारं नुसतच आकर्षण आहे, त्यामुळे मी  नेहमी तिला टाळायचा प्रयत्न करायचो, तिच्याशी बोलतांना कुणी बघितलं की दिवसभर मुलं मला तिच्या नावानं चिडवत बसायची, यामुळे मला कधी मजा यायची, तर कधी हीच गोष्ट नकोशी वाटायची. कधी कोणी मितालीबद्दल वाईट बोललं की मला चिडही यायची, पण तिच्याशी काही घेणंच नाही असं नकळतं कित्येकदा माझ्या वागण्यावरुन तिला वाटायचं."
        मिताली मात्र त्यावेळी माझ्यासाठी काहीही करायला तयार असेल अशीच मला नेहमी वाटायची. पण कदाचित त्यावेळी मितालीच्या भावना मी समजु शकत नव्हतो, कारण हळुहळु मी श्वेतालीच्या विचारात गुंतत चालला होतो. एकदा आमच्या कॉलेजमध्ये सायन्स एक्सिबिशन होतं, आणि पहिल्यांदा धाडस करुन मी श्वेतालीशी बोलायचं ठरवलं. पण तिच्या टेबल जवळ नेहमी एकतर प्रदर्शन बघायला आलेल्या शाळेतल्या मुला-मुलींची गर्दी असायची, नाहितर शिक्षक जवळच असायचे, अशातच थोडा एकांत मिळण्यासाठी मी दिवसभर वाट बघायचो, प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी माझ्या वाट बघण्याला यश आलं, मितालीची नजर चुकवुन मी आणि अक्षय श्वेतालीच्या टेबलवर गेले आणि तिला तिच्या प्रोजेक्टची माहिती विचारु लागले, श्वेताली आम्हाला माहिती सांगण्यात गुंग झाली होती, आणि माझी नजर तिच्यावरुन हटत नव्हती, आयुष्यात पहिल्यांदाच मी जणु तिला डोळे भरुन बघत होतो. ती अशीच बोलत रहावी असं मला वाटतं होतं. पण नंतर अक्षय मला तेथुन घेऊन गेला. त्यादिवसा पासुन मनात ठरवलं होतं की श्वेताली बरोबर किमान एकदा तरी बोलायचा प्रयत्न करायचा. मिताली आणि मी एकाच बॅच मध्ये होते, तर श्वेताली दुसर्‍या बॅच मध्ये असायची त्यामुळे दररोज बोलायचा मला प्रयत्न करताच येत नव्हता.
        बॅचमध्ये मिताली माझ्याशी बोलत असली की जणु माझ्या डोक्यातुन श्वेतालीचा विचार बाजुला जातोय असं मला वाटायचं, म्हणुन मी मितालीला सोडुन बाकीच्यांशी बोलायचो. मितालीचं मन यातुन खुप वेळा दुखवलं जायचं. कितीतरी दिवस असंच चाललेलं असायचं, दहा पंधरा दिवसातुन एकदा एखादं दोन शब्द माझं आणि श्वेतालीचं बोलणं व्हायचं. यादरम्यान श्वेतालीची मैत्रिण शामली अक्षयला आवडायला लागली होती. अक्षयाच्या मनाची स्थिती मला कळाली होती. आम्हा दोघांची पण कमालाच होती, दोघांनाही अशा मुली आवडल्या ज्या दोघीही एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड्स होत्या. त्यावेळी एकदम खुल्लम-खुल्ला प्रपोझ करणं म्हणजे खुपच रिस्की काम होतं, त्यामुळे मित्र किंवा मैत्रिणींच्या मार्फत प्रेम व्यक्त व्हायचं. मितालीने सुद्धा अक्षयला सांगुनच मला प्रपोझ केलं होतं. अशातच मितालीचा जेव्हा वाढदिवस आला त्यावेळी मी कटाक्षाने तिला बर्थ डे विश करायचं टाळलं होतं, त्यादिवशी तिला माझा नक्कीच खुप राग आला असणार हे मला माहिती होतं. पण श्वेताली शिवाय मला दुसरं काही सुचतच नसायचं. माझ्या अशा वागण्यानं मिताली दुखावली जायची हे मला कळायचं, पण मी मितालीला श्वेताली बद्दल सांगु शकत नव्हतो, कारण इतक्या दिवसांनतर श्वेताली माझ्याशी बोलायला लागली होती, आणि मितालीमुळे कदाचित श्वेताली आपल्याशी बोलणार नाही असं मला वाटायचं.
        कॉलेजमध्ये व्हॅलेंटाईन डे जवळ येत होता, इकडे माझ्या आणि अक्षय दोघांच्या मनात प्रेमाच्या इंद्रधनुष्य खुलत चालला होता. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अक्षयने शामली साठी एक ग्रिटींग घेतलं होतं, त्याच्या मनाच्या सगळ्या भावना त्याने त्यात लिहिल्या होत्या, आणि ते ग्रिटींग शामलीला देण्यासाठी तो खुप आतुर झाला होता. मी पण अक्षयसारखं ग्रिंटींग घेतलं होतं, शेवटी आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड्स होते ना, साला दोघांनीही एकसारखंच प्रपोझ करण्याचं ठरवलं होतं. त्यादिवशी दिवसभर मिताली माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होती पण मी तिला दिवसभर टाळलं, त्यामुळे कॉलेज सुटल्यानंतर मिताली लगेच निघुन गेली, मला तर जणु रान मोकळचं असल्यासारखं वाटलं. श्वेताली आणि शामली निघाल्यावर मी आणि अक्षय दोघंही त्यांच्या माघुन निघाले, कॉलेजजवळ असलेल्या सिद्धीविनायकाच्या मंदिराजवळ येताच अक्षयने शामलीला आवाज दिला. शामली थांबल्यानंतर अक्षयच्या मनातल्या भावना उचंबळुन आल्या. त्या भावनेच्या भरात त्याने तिला प्रपोझ करुन टाकलं, अक्षयच्या शेजारी मी आणि शामली सोबत असलेली श्वेताली आम्ही दोघंही अक्षयकडे आवाक होऊन बघत होतो.
        अक्षयचं बोलणं संपल्यानंतर शामली अक्षयला म्हणु लागली, "अरे हे वय काय प्रेम करायचं असतं का? बारावीचं वर्ष आहे हे, करियचा विचार करायला पाहिजे ना,.." असं बरंच काही शामलीनं अक्षयला सुनावलं होतं. अक्षयची तर बोलतीच बंद झाली होती. शामलीचा तो आक्रमक पवित्रा बघुन माझी श्वेताली साठी घेतलेलं ग्रिटींग तिला देण्याची हिम्मतच झाली नाही. कदाचित त्यावेळी श्वेतालीला नक्कीच जाणवलं असावं की मीसुद्धा तिला प्रपोझ करणार होतो ते..! शामलीनं अक्षयला चांगलच फैलावर घेऊन टाकलं, बिचार्‍याची जणु ऐन वयात प्रेम करायची मस्तीच तीनं जिरवुन टाकली होती असं म्हंटलं तरी चालेलं. त्या दोघी गेल्यानंतर अक्षयचा चेहरा तर केविलवाणा झाला होता. समोरच्या बिल्डींगमधुन एक काकांनी घडलेला सगळा प्रकार बघितला होता, अक्षयला बघुन ते त्याला बोलले, "काय यार, एका मुलीला प्रपोझ करता आलं नाही तुला?" अक्षय त्यांच्याकडे बघुन नुसताच हसला. मला काय बोलावं हेच सुचेनासं झालं होतं, जणु श्वेतालीच्या नाव मी जरा मनात जास्तच जपले होते, म्हणुन की काय देवही त्याच्यावर रुसले होते असं मला वाटु लागलं.
        "शार्दुल, मला टेंशन यायला लागलं रे, यार आपलं ठरलं होतं ना की त्या दोघींना प्रपोझ करायचं ते, मी प्रपोझ केलं आणि जणु बळीचा बकरा झालो रे, तुझ्यासाठी मी तीचं इतकी बोलणं ऐकुन घेतलं, मला वाटलं तु श्वेतालीला प्रपोझ करशील, बाकीच्यांना मुलींना प्रपोज कसं करायचे सक्सेस फुल सल्ले तुम्ही दिले, पण भाई तुम्ही मला दगा दिला. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा..!" असं अक्षय बोलला होता. मलाही अक्षयबद्दल वाईट वाटलं होतं, माझ्या एका शब्दाखातर त्याने शामलीला प्रपोझ करायचं डोळे झाकुन ठरवलं होतं. त्यावेळी श्वेतालीसाठी मी स्वार्थीच होऊन गेलो असं अक्षयला वाटलं असतं तर नवल नव्हतं. मी अक्षयला समजावलं, अक्षयला माझ्या मनाची स्थिती माहिती होती तो माझा बेस्ट फ्रेंड होता, माझ्यासाठी अगदी सख्ख्या भावापेक्षाही अक्षय जवळचा होता.
        दुसर्‍यादिवशी वर्गात मग अक्षय आणि शामली जेव्हा समोरासमोर आले त्यावेळी काही घडलं नाही असंच त्या दोघांकडे बघुन जाणवलं. शामलीला प्रपोझची स्थिती पाहिल्यानंतर श्वेतालीला प्रपोझ केलं तर काय होईल याच्या कल्पनेनंच माझं डोकं सुन्न होऊन जायचं. पुढचे काही दिवस मग श्वेतालीचा विचार माझ्या मनातुन मावळत असल्यासारखं होतं होतं, त्याला कारण होतं मिताली. मितालीवर आमच्याच वर्गातलाच एक मुलगा प्रेम करु लागला, आणि या गोष्टीचा मला त्रास व्हायचा, इतके दिवस मितालीची पर्वा न करणार्‍या माझ्या मनाला आता तिची काळजी वाटायची, मितालीवरच मी प्रेम करु लागलोयं हे जणु त्या गोष्टीमुळे अक्षयला जाणवायचं.
        कॉलेजमधली काही मुलं मला मितालीबद्दल नको नको त्या गोष्टी सांगत असायचे, एक दिवस मला मितालीपासुन दुर करायचं या हेतुन मला मारायला मुलं पण आली होती, त्यावेळी मी आणि अक्षय दोघंच होते, मी त्यांच्याशी बोलुन वेळ मारुन नेली, एकप्रकारे जीवावर जे आलं ते, आता फक्त धमकीच्या रुपात राहिलं असं झालं. त्या दिवसापासुन माझ्या मनात मितालीबद्दल असलेल्या भावना पेटुन उठल्या. पण मितालीलाच आता माझ्यामध्ये काही रस नव्हता, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं त्यावेळी मी तिच्यावर खुप चिडलो होतो, तिला खुप घालुन पाडुन बोललो होतो. काय करणार शेवटी माणुस होतो ना, ती कशी का असेना माझ्यावर प्रेम करायची, आणि प्रेम करणारी माणसं अशी निघुन गेली की दुखः होणारचं..! असो, तेल गेले तुपही गेले हाती राहिले धुपाटणे अशी माझी अवस्था झाली असं अक्षय म्हणायचा. बोर्डाच्या परिक्षेमुळे अभ्यासावरही लक्ष देणं गरजेचं असायचं, पण आयुष्यात अशी एकामागुन एक वादळं आली आणि मी यात केव्हा कोलमडेल याची मलाच खात्री नव्हती.
        बारावीची परिक्षा झाल्यानंतर सी.ई.टी.च्या क्लासला देखील मी आणि मिताली एकाच क्लासला होतो, जणु मनाला लागलेली जखम दररोज उघडी पडायची, मिताली आणि आपल्यात हे असं कसं का झालं याच्या विचारानं मला नेहमी वाईट वाटायचं. अक्षयही त्याच्या आयुष्यातील त्या धक्क्यातुन सावरुन गेला होता. बारावीचा आणि सी.ई.टी.चा निकाल लागल्यानंतर वर्गातील मुला-मुलींचा एक-मेकांशी संपर्क तुटुन गेला होता, अक्षय कडुन मला कळालं की मिताली अजुनही आपल्याच शहरात आहे, पण श्वेतालीचं काय झालं याची त्याला माहिती नव्हती. करियरसाठी मी सगळ्यांपेक्षा वेगळीच वाट निवडली होती, मी ज्या कॉलेजला होता, त्याच्या शेजारच्या कॉलेजच्या कॅंम्पसमध्ये रोज मला कितीतरी प्रेमी युगुलं दिसायची, आणि त्यांना बघितलं की मला श्वेतालीची आठवण यायची. कॉलेजमधले कोणी मित्र-मैत्रीण भेटली की मी आठवणीनं श्वेतालीची चौकशी करायचो, आणि एक दिवस मला श्वेताली कोणत्या फिल्ड मध्ये आहे, कोणत्या गावात आहे ते कळालं, तिच्या आठवणींची आठवण काढण्याच्या सवयी मुळे मला कविता करण्याचा छंद जडला. प्रेमात पडला की माणुस नक्की कवी होऊन जातो, हे मला बघितलं की खरंच वाटायचं, असं अक्षय म्हणायचा.
        माझ्या कॉलेजमध्ये हळुहळु मी त्या कवितांमुळे विध्यार्थीवर्गात लाडका बनला होतो. शार्दुलची नक्कीच गर्लफ्रेंड असणार असं कॉलेज मधल्या प्रत्येकाला वाटायचं, मीसुद्धा नेहमी त्यांना तसंच भासवायचो, कारण मी अजुनही मनानं श्वेतालीला माझी गर्लफ्रेंड मानायचो. त्यावेळी कॉलेजमध्ये श्वेतालीसाठी कविता करण्यात मी पुरताच रमुन जायचो, हळुहळु माझ्या कविता करण्याच्या छंदा बरोबर मला नाटकं लिहायचा छंद लागला, लिखानाच्या वेडाने मला पुरतच झपाटुन टाकलं होतं, त्यावेळी माझ्याकडे ना तिचा फोटो होता, ना तिचा कॉंटॅक्ट नंबर, फक्त कॉलेज मधल्या तिच्या आठवणींची शिदोरी घेऊन मी माझं कॉलेज लाईफ जगत होतो. एक दिवस श्वेताली त्याला भेटेलच या आशेनं माझं मन अजुनही तिची वाटच बघत होतं. अक्षयनेही शामलीशिवाय दुसर्‍या कुणाचा कधी विचार केला नव्हता. मी रोज प्रार्थना करायचा की एक दिवस श्वेतालीची आणि माझी भेट होऊ दे, पण कॉलेजच्या चार वर्षात एकदाही तसा प्रसंग आलाच नाही.
        मी शेवटच्या वर्षाला असतांना एकदिवस मला मितालीला भेटावसं वाटलं, मी तिच्या मावस बहिणीकडे मितालीची चौकशी केली, मितालीने पण मला भेटण्याची तयारी दाखवली, मितालीच्या वाढदिवसाच्या चार दिवस आधी माझी आणि मितालीची भेट झाली. साधारण एक अर्धा तास आम्हीदोघं एकमेकांशी बोलत होते, कॉलेजमधल्या गमती जमती एकमेकांसोबत शेअर करत होते, पण दोघांपैकी कुणीच एकमेकांना आमच्या रिलेशनशिप बाबत विचारलं नाही. मितालीच्या वाढदिवशी यावेळी पहिल्यांदाच मी तिला विश केलं, तीनं तिच्या बर्थ डे पार्टीसाठी मला बोलावलं होतं, पण काहीतरी कारण सांगुन मी नाही गेलो. त्या दिवसानंतर पुन्हा मी मिताली सोबत कॉंटॅक्ट ठेवलाच नाही, श्वेतालीवर असलेल्या प्रेमासाठी तसं केलं होतं.
        चार वर्षांचा कालावधी खुप मोठा होता, पुलाखालुन बरंच पाणी निघुन गेलेलं आहे याची मला चांगलीच कल्पना होती, पण अजुनही श्वेतालीसाठी माझ्या मनात असलेली प्रेमाची ज्योत अजुनही तितक्याच उमेदीनं जळतं होती. चार वर्षांपासुन मी तिची वाट बघत होता, ह्याच नवल अक्षयला वाटायचं. माणुस प्रेमासाठी काहीपण करायला तयार होतो, म्हणुन प्रसंगी देवही त्याच्यापुढे झुकतो असं मी म्हणतो ते चुकीचं नाही, कारण  तब्बल चार वर्षांनंतर मला श्वेतालीने मेसेज केला होता, एका सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातुन तिला माझा नंबर मिळाला. माझ्या जीवनाला तर नवी संजिवनीच मिळाली होती. आता मला तिच्याशी केव्हाही बोलता येण्यासारखं होतं, मी तिच्यावर प्रेम करतो हे सांगता येणार होतं, पण तरीही मी अजुनही तिच्याशी बोलला नव्हतो. तिच्यावर प्रेम करतो हे आजही तिला सांगण्याच धाडस माझ्यात नव्हतं, कारण नुसत्या शब्दांनी मला माझं प्रेम व्यक्त करायचं नव्हतं.
        माझं पदवीचं शिक्षण पुर्ण झालं होतं, पण श्वेताली पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती. पुढच्या शिक्षणासाठी मला माझ्या फिल्डमधलं सर्वोत्तम कॉलेज मिळालं होतं, त्यादिवशी मी खुप आनंदात होता, त्या आनंदाच्या भरातच मी श्वेतालीला मेसेज करुन मी तिच्यावर प्रेम करतो असं घाबरत का होईना सांगितलं, पण तिचा प्रेमावर विश्वासच नाही, आणि तसल्या भानगडीत तिला पडायचं नाही असं तीने मला सांगितलं. माझ्या हृदयाची किती शकले झाली होती हे मलाच माहिती होतं, त्यासुमारास मी एकाएकी खुप आजारी झाला, त्यामुळे मी मला मिळालेल्या कॉलेज मधुन प्रवेश माघे घेतला. दोन महिने आजारपणात काढल्यानंतर मी वर्षभर घरीच बसण्यापेक्षा जॉबला जाऊ लागलो, मी मुद्दाम नाईट शिफ्ट निवडली होती.
        आता मी आणि श्वेताली रोज एकमेकांशी रात्री तासन-तास बोलु लागली होतो, दररोज घडलेल्या दिवसभरातील गप्पांत आम्ही गुंतुन जायचो, मी तिला माझ्या कॉलेजची जॉबची मजा सांगायचो, ती मला तिच्या कॉलेजच्या गमतीजमती सांगायची. माझं जीवन आता पुर्णपणे श्वेतालीमय झालं होतं, आज रात्री श्वेतालीला काय सांगाव याचाच दिवसभर विचार करत माझ्या मनात असायचा. दरम्यान दिवाळीच्या सुट्टीत श्वेताली तिच्या घरी आली, आणि साडे चार वर्षांनंतर माझी आणि तिची भेट झाली, पण ती सुद्धा काही क्षणांसाठीच, श्वेताली सोबत तिची मैत्रीण होती, आणि तिला घरी जायचं होतं त्यामुळे ती पटकन निघुन गेली. पण इतक्या दिवसानंतर ती मला दिसली होती त्यामुळे मी त्यादिवशी खुप खुष होतो. कधी कधी श्वेताली तिच्या कॉलेजच्या गमती जमती सांगात असायची आणि मलाही तिलापण खुप काही सांगायला असायचं, त्यामुळे मी तिचं बोलणं मध्येच थांबवायचो आणि मग श्वेताली माझ्यावर रागवायची, आणि फोन कट करायची. मग मी तिला कितीवेळा सॉरी म्हणायचो, तिला मनवण्यासाठी नको नको ती शक्कल लढवायचो. काय करणार शेवटी माझं मन अजुनही तिच्याकडे गहाण होतं ना, आयुष्यात कुणापुढे झुकला नाही पण तिच्यापुढे तर माझा इगोही झुकायचा. चुक झाली तर मान्य करायची आणि बरोबर असलं तरी गप्प राहयचं हे त्यावेळी मला गरजेचं वाटायचं, कारण अशानचं तर नाती टिकतात..!
        एक दिवस मी कामात व्यस्त असतांना श्वेतालीचा मिसकॉल आला, त्यावेळी मी तिला मेसेज म्हणुन त्याची एक चारोळी पाठवली. तशी चारोळी का पाठवली असं श्वेतालीनं विचारलं आणि जोश जोश मध्ये येऊन मी सांगितलं की तिच्यासाठी लिहिलेल्या कादंबरीतलं वाक्य आहे ते. श्वेतालीला आनंद झाला की मी कादंबरी लिहितोय. पण त्यावेळी खरं सांगायचं तर मी कादंबरीचा ’क’ पण लिहिला नव्हता. त्यादिवशी अख्खी रात्र मी जागाच होतो, श्वेतालीला सांगितलंय कादंबरी लिहितोय, पण आपण तर एक शब्द अजुन लिहिला नाहिये, हा विचार मला स्वस्थ बसु देत नव्हता. शेवटी प्रेमासमोर देवही झुकला असं मला वाटलं कारण त्याच रात्री कादंबरीची स्टोरी सुचली, आणि शब्दही तितक्याच तत्परतेने सुचत गेले, शेवटी माझ्याच आयुष्याचीच तर कथा होती ती..!
        दुसर्‍या दिवशी मी तिला त्या कादंबरीची सुरुवातीचे काही पाने वाचुन दाखवली, त्या कादंबरीचा नायक तिला हवाहवासा वाटला, तसं ती त्याला बोलली सुद्धा..! त्यावेळी तिला कोण समजावणार होतं की तो कादंबरीचा नायक मीच होतो ते? असेच मग एक एक दिवस सरत होते, मी श्वेतालीसाठी ती कादंबरी पुर्ण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होतो. कादंबरीची एक एक ओळ लिहितांना समोर श्वेतालीच आहे असं समजुन मी लिहित गेला, मी आणि श्वेताली जर आज सोबत असते तर मी तिच्यासोबत कसा जगला असतो, तिच्यासाठी काय काय केलं असतं, हेच मला त्या कादंबरीत दाखवायचं होतं. एक दिवस ती मला म्हणाली की, "शार्दुल माझ्यावर एक कविता कर ना..!" त्यादिवशी मी माझ्या आजपर्यंतच्या सगळ्या प्रेमकविता जाळल्या होत्या, जणु त्या कवितांच्या राखेतुन अशी कविता बाहेर यावी ज्यातुन तिला माझ्या मनाच्या भावना कळतील असं वाटायचं, पण आजही तिच्याशिवाय मला काही दिसतच नाही, म्हणुनच की काय तिच्या बद्दल असलेल्या भावना लिहायला शब्दंच सुचत नाही."
        "शार्दुल सर, मग हे सगळं तुम्ही त्यांना का सांगत नाही? तुमच्या कविता आणि विचार ऐकले की आम्हाला नवी उमेद मिळाली, आणि प्रत्यक्षात तुम्हीच एकप्रकारे एकतर्फी प्रेमात आहात? सरप्राईजिंग आहे सगळं..?" असं एक मुलगा शार्दुलला बोलला. बाकीच्यांच्या नजराही जणु शार्दुलला तोच प्रश्न विचारत होत्या असं जाणवतं होतं. एका श्वेतालीसाठी काहीही करायला तयार असलेला शार्दुल तिला तिच्यावर प्रेम करतो हेच सांगु शकत नव्हता ह्या गोष्टीवर जमलेल्यांचा विश्वास बसत नव्हता. प्रश्न विचारणार्‍या मुलाकडे शार्दुलने एकक्षण बघितलं, आणि तो हलकेच हसला.
        "मित्रा, मी जिच्यावर प्रेम करतो ती श्वेताली तिच्या आई वडीलांसाठी अनमोल अशी राजकुमारी आहे, आणि तिच्या आई-वडील तिच्यासाठी नक्की तिचा परफेक्ट राजकुमार शोधतीलच. मी तिचा बेस्ट फ्रेंड आहे, मग तिचा प्रियकर का बणु शकत नाही तिच्या स्वप्नांतला राजकुमार का नाही बनु शकत हे मी तिला कधीच विचारणार नाही कारण मला माहिती आहे की मी अजुन तिच्यासाठी परफेक्ट नाहिए..! म्हणुनच मी  तिच्यावर असंच निस्वार्थ प्रेम करत होतो, करत आहे आणि करत राहिल, तिच्यासाठी परफेक्ट होईपर्यंत माझं प्रेम असंच आयुष्यभर तीची वाट बघंत राहिलं..! माझ्या या प्रेमाला तुम्ही शोकांतिका ठरवु नका, त्याला नुसतं  निस्वार्थ प्रेमंच असु द्या..! कसं आहे आयुष्यात प्रत्येकाला त्याचं खरं प्रेम मिळेलच असं नसतं, पण कुणावर तरी आपलं प्रेम असावं इतकच जगण्याला कारण पुरेसं असतं..!" असं शार्दुल बोलुन गप्प झाला. एकमिनीट सगळेच शांत होते, आणि मग सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला, आणि जणु शार्दुलच्या भावनांचा आपण आदर करतोय असं दाखवुन दिलं.
        आजही आपल्या सभोवताली कित्येक असे शार्दुल असतील ज्यांना बघितलं की खरंच कुणाच्या तरी प्रेमात पडावं असं वाटतं नाही का? कदाचित आयुष्यात शार्दुलला त्याची श्वेताली भेटेलही वा भेटणारही नाही पण श्वेतालीवर असलेलं त्यांच प्रेम सदैव असंच राहु दे हीच देवाकडे प्रार्थना..! प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस म्हणुन हल्ली व्हॅलेंटाईन डेचं महत्व वाढतयं. पण आजकाल जितक्या लवकर मेक अप होतं, तितक्याच लवकर ब्रेक-अप सुद्धा होतं, डोकं वापरुन वाट्टेल तितक्या मुलींबरोबर अफेअर करण्यापेक्षा जी आपल्यावर मनापासुन प्रेम करते तिच्यावरच सर्वार्थाने प्रेम करायला शिका हेच मला सांगायचं आहे. आशा करतो की तुम्हाला ही कथा आवडली असेल..! पुन्हा लवकरच भेटेल एका नव्या विषयासह, माझ्या मनात लपवलेल्या आणखी काही शब्दांसहं..!
 तुम्हा सर्वांचाच,
स्वप्निल सुरेश गरुड

No comments:

Post a Comment