तृतीयवर्षाचा निकाल लागला मागील दोन वर्षाप्रमाणं यंदाही सर्वांना फस्ट क्लास मिळाल्याने आमचा गृप समाधानी होता. संपदा कोरान्ने यंदाही वर्गात पहिली आली होती, सलग ३वर्षी प्रथम येण्याचा तिने मान मिळवला होता जणु फार्माहॅट्रिकच, आणि आता कॉलेजचं जी.एस. पद ही तिला मिळणार होतं, खरचं कौतुकास्पदच गोष्ट होती. इकडे भाऊला बेस्ट सेमिनार झाल्याचं सांगुन देखील ५० पैकी फक्त ३२ गुणचं मिळाल्याने बाकीची मुलं त्याची खेचतं होते. आमच्या सिनियर्सची जणु गोची झाली असं आम्हाला वाटत होतं, कारण GATE , GPAT,& NIPER या परिक्षांमध्ये म्हणावं तसा रिझल्ट लागला नव्हता. दरवर्षी निदान २-३ विध्यार्थी तरी या परिक्षेत पहिल्या दहा मध्ये असायचे पण यंदाचा रिझल्ट आमच्या कॉलेजकडुन अपेक्षित नव्हता. गेल्यावर्षी गॅदरिंगल्या झालेल्या राड्याचे परिणाम थर्ड इयरच्या मुलांनी चांगलेच भोगले होते. त्यांचे १८ विध्यार्थी बायोकेमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल्सला नापास झाले होते, त्यामुळे यंदा त्यांचा वर्ग खुपच शिस्तीत वागतोय असं जाणवायला लागलयं.
असो, एखाद्यावर्षी होतं असं, पण आमच्यासाठी आनंदाची बाब म्हणजे आमच्या वर्गातील काहींनी थर्ड इयरला असतांनाचा GPAT देण्याचा निर्णय घेतला होता अन त्यात सर्वच जण क्वॉलिफाय झाले होते. GPATच्या तयारीला आता जय्यत सुरुवात झाली होती. प्राचार्यांनी देखील सर्व शिक्षकांची आणि आम्हा अंतिमवर्षाच्या विध्यार्थ्यांची बैठक बोलवली. कारण सोपच होतं, नेहमी प्रमाणे कॉलेजला GPAT मध्ये चांगला रिझल्ट खेचुन आणन्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं होतं. त्या बैठकीत प्राचार्यांनी विध्यार्थ्यांना लायब्ररीचा वेळ वाढवुन देऊ, ओपन बुक टेस्ट, शिक्षकांनी मुलांसाठी M.C.Q. Question bank तयार करणं, अशा प्रमुख बाबींचा समावेश होता. पण त्या बैठकीत एक गोष्ट सतत सलत होती की आमच्या कॉलेजमधल्या शिक्षकांचा मुलांनी फक्त GPAT वरच लक्ष केंद्रित करावं यावर भर जास्त होता. ट्रेंड बदललाय सर..असं सांगायला आम्हा मुलांची हिम्मतही होतं नव्हती, कारण आमच्यातील कित्येक जण M.B,A./ U.P.S.C-M.P.S.C. साठी थर्ड इयरपासुनच अभ्यासाला लागले होते. भाऊ, प्रियंका, संपदा यांचा G.R.E. चा चांगला स्कोर आल्याने ते परदेशात उच्चशिक्षणासाठी जाण्याकरता प्रयत्नशील होते. त्यामुळे साधारण ४०-४५ मुलंच GPAT देणार होते.
Keep the best for the last या प्रमाणेच आमच्या शिक्षकांची वर्गवार विभागणी केली असावी, कारण आम्हाला अंतिमवर्षासाठी शिकवायला संजय वाघ सर, बेलसरे सर, मिलिंद वाघ सर, कावळे सर, कावळे मॅडम, अहिरे सर, बेले मॅडम यांच्याबरोबर पाल सर आणि गुडसुरकर सरही शिकवणार होते. पाल सर आमच्या कॉलेजमधले सर्वांत विध्यार्थीप्रिय शिक्षक, तर गुडसुरकर सर सर्वांत आदरणीय.पाल सर आम्हाला Pharmacognosy-3 हा विषय शिकवणार होते. सरांची शिकवायची पद्धत एकदम हटके..सर वर्गात येतात ते प्रसन्न चेहर्यानेच..मुलंही मग हसतच त्यांना गुड मॉर्निंग करणार, जणु आदरणीय बाळासाहेब ठाकरें प्रमाणे सर हात समोर करुन मुलांना बसायला लावणार. आणि मग सुरु करणार शिकवायला फार्माकोग्नोसी-3.
तसं पाहिलं तर फार्माकोग्नोसी हा विषयचं आम्हा फार्मसीच्या मुलांचा नावडता. अमुक अमुक क्रुड ड्रग त्याची सिननिम, त्याचा बायोलॉजिकल सोर्स, जियोग्राफिकल सोर्स, कल्टिवेशन मेथड, त्याचे मॅक्रो अन मायक्रोस्कोपिकल कॅरॅक्टर्स, केमिकल कॉन्सटिट्युएन्ट्स, अडल्टट्रंट्स, केमिकल टेस्ट आणि त्याचा उपयोग, असं लक्षात ठेवावं लागतं असं एकाच नाही तर जवळ-जवळ १५०-२०० ड्रग्स आहेत. त्यामुळे प्रत्येकवेळी गोंधळ अन शेवटी कंटाळाच येतो, पणं पाल सरांची कंपॅरिझन करुन शिकवायची पद्धत या सर्वांना इंटरेस्टिंग बनवते, शिवाय सरांचा प्रत्येक ड्रग साठी खास कमेंट तयार असतोच, त्यामुळे शिकवलेली प्रत्येक गोष्टी लक्षात राहण्यास मदतच मिळते.
गुडसुरकर सर एकदम शांत स्वभावाचे सर आहेत, तसेच वेळेच्या बाबतीतही ते एकदम पक्के आहेत. वेळच्या वेळी लेक्चरला येणं, अण वेळेतच लेक्चर पुर्ण करनं ही गोष्ट आम्हाला फायनल इयरला आल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच जाणवली. सर लेक्चरला जेव्हा शिकवायला येतात तेव्हा आम्हा मुलांसाठी ते काय शिकवतात यापैकी काय लिहु अन काय लिहु नको असं होतं कारण प्रत्येक गोष्ट महत्वाची असतेच G.P.A.T. & N.I.P.E.R.च्या दृष्टीने. प्रॅक्टिकलला देखील सरांनी को-ऑर्डिनेटर नेमुन दिलेला असतो..त्यामुळे प्रॅक्टिकलची चिंता करायचं टेंशन नसतं. आमच्या A-बॅचचा मी अन अतुल को-ऑर्डिनेटर्स आहोत.
तीन वर्ष हातात होते तेव्हा काही केलं नाही अन आता आमच्या वर्गात कित्येकांच्या मनात प्रेमकळी खुलायला सुरु झाली. A small hope is sufficient to cause a birth of love,याच प्रमाणे आमच्या वर्गात सध्या अभ्यासाच्या टेंशन बरोबर प्रेमाचा रंगही उधळला जातोय. त्यातल्या त्यात प्रसाद माळी अन विशाल गुरव यांना सोडलं तर बाकी सुशिलरत्न साळवे (शायर), राहुल साठे, अनुप छतवानी, रमेश गोरड यांसारखे बरेच एकतर्फी प्रेमवीर आमच्या वर्गात तयार झाले आहेत. शंतनुच्या मनातही यंदा वसंत फुलु लागलाय, असं त्यानं आम्हाला सांगितलं अन मुलींनाही त्याची भनक लागली. पण गेले तीन वर्ष "स्वतः भाऊ" असं म्हणवुन घेत असलेल्या शंतनुला तीने भाऊ म्हंटल्यावर शंतनुचं कसं व्हायचं, यावर आम्ही त्याला जेवतांना चिडवतं असतो, तर दुसरीकडे तीला सुद्धा शंतनुच्या नावानं खुल्म-खुल्ला चिडवलं जातयं बरं का!.
अमेय तीन वर्ष आहे तसा आजही वर्गात झोपतचं असतो, कावळे सरांना कधी-कधी अनावर होतं, पण "रोज मरे त्यामागे कोण रडे" याप्रमाणे मग सर त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. नित्याच्या पदरी ह्यावर्षी देखील उपेक्षाच पडल्याने, निदान आता तरी मुलींवर लक्ष न देता अभ्यासावर लक्ष दे असं त्याला निळकंठ, नितीश, हितेश ही मुलं समजवतांना दिसतात. अमेयने हल्ली जणु वर्गात प्रवचन करायचा साइड बिझनेस सुरु केलायं असं आम्हाला वाटायला लागलयं अन त्यातल्या त्यात नितीन आखाडे, रोहिणी चव्हाण, उज्वला देसाई, अनुप छतवानी हे तर त्याचे आवडते भक्त गण झाले. उज्वला आणि रोहिनी यांच्याशी तो प्रॅक्टिकलला गप्पा मारत बसतो, आणि नंतर मग आम्हाला जेवतांना त्याचा सारांश सांगत असतो.
आधी अमेय मुलांना गुंडाळतोय असं वाटायचं, पण ज्यादिवशी त्याने त्याच्या कामगिरीचा व्हिडियो आम्हाला दाखवला होता, त्यादिवसा पासुन मग मुलं."अमेय बाबा की जय.." असंच म्हणायला लागली. हितेशला तर तो लव्हगुरुच वाटायला लागला. शंतनुच्या मते अमेय मुलांच्याच काय पण मुलींच्या अन शिक्षकांच्या डोळ्यातही धुळ फेकण्यात यशस्वी झालायं (बेळे मॅडमच्या डोळ्यांत जरा जास्तच). त्यामुळे आम्ही त्याला आता अमेय कमी अन वाळु माफिया म्हणुनच आम्ही हाक मारतो. काही म्हणा फस्ट टु फायनल इयरच्या मुलींना अमेय एकदम आयडियल"..."वाटतो. पण आम्हाला माहिती आहे की अमेय किस भवंडर का नाम है..! आमच्या फार्मसीच्या शब्दांत सांगायचं तर अमेयनं कित्येक मुलांच्या पोटावर पाय देऊन टाकलाय.
हल्ली निखील दिवाकरही कविता करायला लागलायं, पण कोणत्या मुलीवर करतोय हे सांगायला तो तयार नाही. निळकंठला तर पक्क वाटतं की त्याला ओवीच आवडते. सेकंड इयर पासुन आमच्या वर्गातली ओवी पहिले हितेशला आवडायची, पण नंतर हळुहळु या यादीत स्वप्निल येवले, नितीन आखाडे, अनुप छतवानी, विशाल गुरव, ओबेद उल्ला यांचा समावेश झाला. त्यातही विशाल गुरवने चार दिवसांसाठी यांच्या पोटावर पाय दिला, पण नंतर जणु, "चार दिनोंका प्यार ओ रब्बा, लंबी जुदाई..लंबी जुदाई." अशी स्थिती तयार झाली. कारण अनुप छतवानी आणि ओबेदने पावडरमॅनला म्हणजे विशाल गुरवला चोपलं होतं. नितीनने थर्ड इयरच्या शेवटी ओवीला प्रपोझ केलं असं त्याने नितीशला सांगितलं होतं, आणि नितीश कडुन आम्हाला कळणार नाही हे तर शक्यच नव्हतं. पण ओवीनेही मोहिनीप्रमाणे त्याला आपण मित्रच ठिक आहोत असं जेव्हा सांगितलं तेव्हा नित्या डिप्रेस झाला होता. त्याचा सहारा झाला होता आमचा वाळु माफिया अमेय.
नितीन त्याला त्याचं सगळं काही सांगत बसला, आणि अमेयला तो ओवीला समजवण्यासाठी काहीतरी कर असं सांगत होता, पण अमेयनंच जेव्हा उज्वलात इंट्रेस्ट घेतलायं, अशी बातमी आमच्या वर्गातल्या मुलांमध्ये पसरली त्यावेळी मग ओवी ज्यांना आवडायची त्या यादीत फक्त अमेयचच नाव राहिलं, आणि बाकीच्यांनी मग, "मरना है तो देश के लिए, इन लडकियोंमे रखा क्या है..!" याप्रमाणे अभ्यासाला जोरदार सुरुवात केली. होस्टेलाईट मध्ये लक्ष्मीकांतला जणु टेंशन यायला लागलं असं वाटतयं कारण नितीश अन हितेश हे दोघही करियरच्या टेस्ट सिरीजमध्ये बाजी मारयचे. सिनियर्सच्या सांगण्यानुसार जे मुलं करियरच्या टेस्ट सिरीजमध्ये चांगले मार्क्स पाडतात, त्यांना GATE मध्येही चांगले मार्क्स मिळतात.
घनकर गल्लीत राहणारे विजय, अनिकेत, येवले, M.B.A. च्या अभ्यासात चांगलेच गुंतलेले आहेत. आमच्या वर्गातल्या काही मुलींनी बोचरे या सिनियर्सचा क्लास लावलाय, तर दुसरीकडे आमच्याच काही सिनियर्सनेही "पायोनियर" यानावाने कोचिंग क्लास उघडले. आमच्या लोकलाईट्सची जी.एस.फार्माचं लोन देखील अल्पावधीतच आमच्या कॉलेजमध्ये नाहीच तर भुजबळ नॉलेजसिटीतही पसरलयं. दिवाळीची सुटी संपली, आणि सुटीनंतर कॉलेज सुरु झालं त्याच दिवशी म्हणजे २२-नोव्हेंबर-२०१०ला, "स्वप्निल तु तयार केलेले M.C.Q. खरचं खुप अवघड होते बरं का..!" असं काव्या बोलली. सेकंड इयरच्या गॅदरिंगनंतर पहिल्यांदाच आता ती माझ्याशी बोलली होती, तब्बल पाऊने दोन वर्षांनंतर. सेकंड इयरच्या गॅदरिंग नंतर तिला सांगायचं होतं काही, पण कधी नंतर हिम्मत केली नाही. दरम्यानच्या काळात पुलाखालुन बरचं काही वाहुन गेलं, पण त्यावेळी ज्या भावना होत्या, आजही त्या तशाच मनाच्या एका कोपर्यात जपुन ठेवल्या आहेत, कामी येतात कधी तरी माझ्या कवितांना प्रेरणा देण्यासाठी.
बेलसरे सरांच्या लेक्चरला नेहमी प्रमाणे शिकायला मिळतंच पण "Don't talk in front of my back, I mark any one of you absent " असं ऐकल्याशिवाय आता लेक्चरला मजाच येत नाही. सरांची नोट्सची डायरी जर आपल्याला मिळाली तर मजा येईल यार असा विचार आमच्या मनात सर जेव्हा S.A.R. शिकवतात त्यावेळी वाटतं असतं. सर IUPAC name सांगायला वर्गात ऊठवतात, त्यामुळे मुलांना टेंशन असतं. जो तो त्याच्यासाठी सेफ जागा निवडत असतो. मुलींना सर कधीच प्रश्न विचारत नाहित त्यामुळे त्यांना काळजी करायचं कारण नसतं. नितीशला मात्र सर नेहमी ऊठवतात, आणि आज आपण वाचलो या हेतुनं आम्ही मोकळा श्वास घ्यायला मोकळे असतो.
वाघ सर आम्हाला N.M.R. हा टॉपिक शिकवायला येतात. सरांच्या तोंडातुन जे रुल्स बाहेर पडतात ते कोणत्याच पुस्तकात नसतात, त्यामुळे आम्हाला ते लिहुनच घ्यावे लागतात. प्राचार्य असल्याने सरांना आमच्या वर्गावर सहसा येता येत नाही, त्यामुळे कधी कधी सौ. हरक मॅडम आमच्या वर्गावर शिकवायला येतात, पण त्यांनी शिकवत असलेल्या आणि वाघ सरांच्या N.M.R. चे problems शिकवण्यात फरक दिसतो तो अनुभवाचा. कावळे मॅडम तीन महिने रजेवर असल्याने त्यांच्याऐवजी एम.फार्मचे तोडमल सर आम्हाला शिकवण्यासाठी येत, पण आम्ही ऑफ माघुन घ्यायचो, अन आम्हाला ऑफ मिळायचा. अहिरे सर आणि बेळे मॅडम आम्हाला Pharma-jurisprudence हा विषय शिकणार होते. अहिरे सर मुलांना थोडावेळ शिकवतात अन उरलेला वेळ मुलं मग त्यांचा त्यांचा अभ्यास करत बसतात, नाहीतर वेगवेगळ्या गप्पांना रंग येतो.
बायोफार्मास्युटिक्स हा विषय शिकवण्यासाठी आम्हाला श्री मिलिंद वाघ सर येतात. मिलिंद वाघ सर देखील याच कॉलेजचे माजी विध्यार्थी आहेत. शिक्षण व्यापारीकरण विरोधी मंचात ते सक्रिय कार्यकर्ते म्हणुन कार्य करत आहेत. नुसत्या फार्मसीच नव्हे तर इतर फिल्डमधल्या विध्यार्थ्यांसाठी ते या मंचाच्या सहाय्याने मदत करतात. सरांची शिकवण्याची पद्धत एकदम निराळी, मुलांमध्ये मिसळुन मुलांकडुन मुलांना शिकवण्याची पध्दत आम्ही गेल्या तीन वर्षानंतर पहिल्यांदाच अनुभवत होतो. सहाजिक एखादी नवीन चांगली गोष्ट होत असली की तिला सुरवातीस थोडा विरोध होतोच. सर एखादा टॉपिक वाचयचे आणि त्यावर मुलांना कमेंट करायला लावायचे, आता भाषेचं बंधन नसलं तरी आमच्या कॉलेजच्या मुलांना सहाजिकच ते आवडत नव्हतं. मग सहाजिकच मुलांना ते लेक्चर "टेरर" वाटायचं.
मिलिंद वाघ सर आमच्या वर्गाकडे येतांना दिसली की मुलं टेरर-टेरर असं ओरडत वर्गात शिरायची अन सरांची नजर आपल्यावर येऊ नये म्हणुन अंग चोरुन बसायची. ३,७,२०,२२,२५,२७,३३,३६,४३,४७,५३,५५,६३ हे जणु सरांचे आवडते रोल नंबर असावेत कारण ह्याच रोल नंबरवाल्यांना सर कमेंट करायला किंवा उत्तर द्यायला सांगत. पण हळुहळु आमच्या वर्गातील मुलांना एका गोष्टीची जाणीव व्हायला लागली, आपण आपलं मत तर मांडायला शिकतोय, आणि महत्वाचं म्हणजे उत्तर आलं नाही की मेडिकेमच्या लेक्चरला जसं बाहेर जावं लागतं तसला प्रकार तर या लेक्चरला मुळीच होत नाही. मग तेव्हापासुन ते टेरर वाटणारं लेक्चर आम्हाला टेरिफिक वाटु लागलं ही गोष्ट विशेष करुन मला इथे नमुद कराविशी वाटते.
पाल सरांच्या प्रॅक्टिकलला जाम मजा येत असते. सर आम्हाला जो एक्सपेरिमेंट करायचा त्याची माहिती देतात आणि थोड्यावेळाने सर लायब्ररीत निघुन जातात. अमेयला मग रोहिणी अन उज्वला यांच्याबरोबर गप्पा मारण्याशिवाय दुसरं काम नसतं. बाकी मुलं त्याला "आरे आज किती पाट्या धुळ घेऊन आलासं?" असं म्हणुन चिडवत असतात. माझा तर जर्नल पुर्ण करायचा दणका असतो. फायनल इयरला आल्यावर मला सिंसियर असल्याचा घमेंड नाही तर माजच आलायं असं काहींना हल्ली वाटतं. दिवाकर त्याचा त्याचा टी.एस. काढण्यात रमलेला असतो कधी कधी निलेशही त्याच्याजोडीला असतो. रमेश खाली मांडी घालुन हातातल्या पुस्तकाला वाचत असतो, जमलंच तर कधी कधी आम्ही त्याला श्रद्धाच्या नावाने त्याला चिडवत असतो.
अतुल काय गेल्या तीन वर्षांप्रमाणे आजही मुलींशी फारच कमी बोलतो. पंक्या सांगितलेल्या गोष्टी विसरुन जातो, हे माहिती असल्याने अनुप छतवानी त्याला त्याची दर्दभरी "दास्तान" सांगत असतो. विश्वजीत दाडगे केव्हा लॅबच्या आत राहिल आणि केव्हा लॅबच्या बाहेर याचा कुणालाही थांग पत्ता नसतो. विशाल गुरव(पावडर मॅन) त्याचे पाणचट जोक्स अम्रिता, अनामिकाला सांगत असतो, हिना जाधवला त्यातलं काही कळतच नसावं अशी आम्हाला पक्की खात्री आहे, कारण त्याच्या जोक्सवर जेव्हा त्यादोघी हसतं असतात, हिचा चेहरा एक्सप्रेशनलेसच असतो. राहिला नितीन, तर तो विकासला घेऊन जरनल लिहीत बसतो. गेल्या तीन वर्षात मिळालेल्या धक्क्यातनं नित्या आता जरा स्वतःला सावरायचा प्रयत्न करतोय, त्यात कितपत यश येतं हे त्यालाच ठाऊक. एखादा तास झाला की मुलं चहा प्यायला बाहेर जातात, सरांनी पकडलं तर काय होईल, ह्याचा विचार करुन आम्ही कॉलेज सुटल्यावरच दानशुर संपत पगारे चौकातच चहा पिऊ असं पंक्याला सांगत असतो.
आमच्या ए बॅच मध्ये जशा गमती जमती घडतात तशा बाकीच्या बॅच मध्येही घडत असतात. बी बॅचमध्ये तीन-चार ग्रुप पडलेले आहेत असं त्या बॅचच्याच मुलांच म्हणनं आहे. एक आहे मोनाली जगतापचा, एक के गॅंग, आणि एक मुलांचा. बी बॅच मध्ये जणु गॅंगवॉर चालु आहे असं राहुल नारखेडेचं पक्क मत आहे. मोनाली आणि युवराज दोघही को-ऑर्डिनेटर असल्याने, ते के गॅंगच्या मुलींना जास्त काम वाटुन देतात असं नेहमी होत असतं. आता के गॅंग ही काही मुलांची नाही तर मुलींचा ग्रुप आहे बरं का. त्यांना तसं नाव दिलं कारण त्यांच्यातल्या प्रत्येक मुलीचं आडनाव हे "के" या अक्षराने सुरु होतं, जसं, मनाली कोरंगळेकर(मना), प्रियंका कुलकर्णी (पी.के.), संपदा कोरान्ने (एस.के.), अपुर्वा कुलकर्णी (ए.के.), प्रिया कोठारी, मयुरी कुलकर्णी ही त्यामुलींची नावं. या ग्रुपमध्ये प्राजक्ता जोशी, दिप्ती साळवे यांचा पण समावेश आहे बरं का.! मुलांचा ग्रुप काय ह्या दोघांच्या मध्ये तरंगता असतो.
सी बॅच तशी पाहिलं तर सर्वात सुखी बॅच आहे. यांच्या बॅचमध्ये एखादा निर्णय झाला की सर्व मुलं त्यावर ठाम असतात. आमच्या ए बॅचच्या एकदम विरुद्ध टोक असलेली ही बॅच. मुलांना प्रॅक्टिकलचं टेंशन नसतं, जरनलही आमच्या नाहीतर बी बॅचच्या मुलांचे कॉपी करायचे, प्रॅक्टिकलही एकाच ग्रुपमध्ये अख्या बॅचने करायचं, चंगळ आहे खरचं..! या बॅच मध्ये मुलांची संख्या जास्त आणि मुली फक्त तीनच आहेत. त्यातही प्रियंका पाटील आणि श्रुती रुपनार या त्या तीनपैकी दोघी. आमच्या वर्गातल्या सर्वात शांत मुली आहेत असं आमच्या ए बॅचला वाटतं.
ही तर झाली आमच्या वर्गातली सध्याची स्थिती. हल्ली लेक्चरही सुरळीत चालु झाले आहेत. आता आम्ही एकदाचे सिनियर्स झालोत, त्यामुळे आमच्या फस्ट इयरच्या जुनियर्सला चांगली फ्रेशर्स पार्टी देण्याचा विचार केला होता. तोही सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसच, पण ऐन आमची फस्ट सेशनल आल्याने सगळं फिस्कटलं होतं. ५ सप्टेंबरही यंदा जल्लोषात साजरा झाला. नेहमीप्रमाणे मुलं तयारीत आली होती. प्रत्येकवर्गात जाऊन आम्ही आमच्या ज्युनियर्स बरोबर गप्पा मारत होतो, आम्हाला जे अनुभव येत होते ते त्यांना सांगत होतो, ते सुद्धा त्यांचे अनुभव आम्हाला सांगत होते. सेकंड इयरच्या श्रेयस बागल(गुरुजी) या आमच्या जुनियरने वाघ सर, अनंतवार सर, धनेश्वर सरांची तुफान मिमिक्री केली होती. त्याच्या मिमिक्रीचा व्हिडीओ हितेश बडगुजर त्याच्या नव्या मोबाईलमधुन काढत होता, पण नंतर आमच्या लक्षात आलं की त्या व्हिडीओमध्ये बागलचा कमी आणि याच्या हसण्याचाच आवाज जास्त येत होता.
असो, फस्ट इयरच्या वर्गात अमेयची जादु मुलांपेक्षा मुलींवरच चालली होती. कारण मैथिली नावाची फस्ट इयरची मुलगी त्याच्या जणु प्रेमातच पडली. दुसरीकडे, थर्ड इयरच्या सायली कासारला होस्टेलचे मुलं जवळ-जवळ अर्धा ते पाऊणतास प्रश्न विचारण्यात गुंग होते. सेकंड इयरच्या प्रॅक्टिकलला रमेश गोरडला सर बनुन जायचं होतं, कारण त्याला सेकंड इयर मधली भावी ड्रग इन्सपेक्टर श्रद्धा आवडत होती. आणि त्यानिमित्तानं तिच्याशी त्याला बोलताही येणार होतं, मुलांनी त्याला पुरता हरभर्याच्या झाडावर चढवलं होतं, पण तीला जेव्हा व्हायवा साठी बोलवलं तेव्हा हा तिला नायपरला गेलेल्या सिनिरर्सची नावे विचारायला लागला, सांगायचे होते काही, ऐकायचे होते काही, पण पोरगा भलतेच प्रश्न विचारत असल्याचं पाहुन मग बाकीचीच मुलंच तिला प्रश्न विचारायला लागली, अन सहाजिक याने स्वतःच त्याच्या पोटावर पाय पाडुन घेतला होता.
यंदा ५-सप्टेंबरच्या आधी देऊल प्रत्येक सरांचे जाऊन फोटो काढत होता, त्यामुळे आपले फोटो याने कशासाठी काढले याचं प्रत्येक सरांना कुतुहल होतं, पण त्याने त्याची एक मस्त मुव्ही क्लिप बनवली होती. ती माझ्या ब्लॉगवरपण आहे बरं का. यंदा पहिल्यांदाच शिक्षकांवर म्युझिकल फिशपॉंड्स टाकण्यात आले होते. शिक्षकांसाठी संगीतखुर्चीचा कार्यक्रमही ठेवायचा निर्णय मुलींनी घेतला होता. आमच्या वर्गातल्या मुलींनी स्वतःच्या हाताने शिक्षकांसाठी त्या कार्यक्रमाच्या सुंदर निमंत्रण पत्रिका तयार केल्या होत्या. आमच्या कॉलेजच्या मुलांना वेळेचं महत्व कळावं यासाठी आमच्या वर्गातर्फे कॉलेजला एक चांगलं घड्याळ भेट म्हणुन देण्याचं ठरलं होतं. शिक्षकदिनाच्या कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये होती ती देऊलनं बनवलेली क्लिप आणि माझं मनोगत. त्यादिवशी मी खरं तर भाषणच केलं पण आमच्या एम.फार्मच्या मुलांना ती कविता कशावरुन वाटली हे मला कळलंच नव्हतं. त्यादिवशी मी त्या आठ मिनिटांच्या मनोगतात आमच्या सरांबरोबर आलेले अनुभव सांगत होतो. वाघ सर, सावकारे सर, डुंबरे सर, बेलसरे सर, आणि पाल सरांची मिमिक्री मला जमते त्याचाच आधार मी माझे मनोगत प्रभावीपणे मांडण्यासाठी केला होता. भाषण चांगलं झालं होतं, पण मला सरांना काय वाटेल याचीच जास्त चिंता लागली होती. पण दुसर्याच दिवशी भाषणात काही ऑब्जेकशन घेण्यासारखं काही नव्हतं असं जेव्हा मिलिंद वाघ सरांनी सांगितलं तेव्हा माझ्या जीवात-जीव आला होता.
आमची सेशनल परिक्षा झाली आणि मग आम्ही फ्रेशर्सच्या तयारीला लागलो, आमच्या कॉलेजमध्ये कोणताही कार्यक्रम करायचा असला तर मुलांसमोर प्रश्न असतो तो क्वॉंट्रीचा. हा यक्ष प्रश्न सोडवल्याशिवाय पुढचं काहीच करता येतं नाही. शेवटी प्रत्येकी २००/-रुपये सर्वांनी देणे हा निर्णय झाला. त्यातही काही फुकटे होते त्यांच काय करावं हाही प्रश्न असायचाच. केटरिंग, डी.जे. सर्व बुक झाले होते, फस्ट इयरच्या मुलांची स्क्रिनिंगही झाली होती. पण फ्रेशर्स पार्टीला दोन दिवस बाकी असतांना आमदार वसंत पवार यांच निधन झाल्याची वार्ता आली, त्यामुळे पुन्हा फ्रेशर्स पुढे ढकलली ती पार पडली चक्क ३ डिसेंबरलाच..
फ्रेशरला आम्ही नाटक सादर करायचं ठरवलं होतं, Back to First year B.Pharm. कधी नव्हे ते यंदा आम्हाला नाटकात मुलींना काम करण्यासाठी जास्त आग्रह करावं लागला नाही. कारण मागील दोन वर्ष आम्हाला मुलींना नाटकात काम करण्यासाठी तयार करण्यात चांगली मेहनत करावी लागायची. कारण आम्ही नाटकात मुलींना कमी संवाद देतो, हे त्याचं कारण. यंदा आमच्या नाटकाची मुख्य हिरोइन अनामिका काम करणार नव्हती. अन बी बॅचच्या मुली यंदा तयार झाल्याने मग अनामिकासाठी पर्याय उपलब्ध झाला होता. अनामिकाला मी खास महत्व देतो कारण ज्यावेळी आम्ही सेकंड इयरला पहिल्यांदा नाटक करणार होतो, तेव्हा आमच्या वर्गातल्या बाकीच्या मुली तयार झाल्या नव्हत्या, अशा स्थितीत आमचं नाटक करता येणं शक्य नव्हतं त्यावेळी अनामिका आमच्या नाटकात काम करण्यासाठी तयार झाली होती.
बाकीच्या मुलींनी जे कारणं देऊन नाटकात काम करायचं टाळलं होतं त्यांना तीने छेद दिला होता. त्यामुळेच मी जेव्हाही नाटक लिहितो, नाटकात हिरोईन म्हणुन अनामिकालाच मुलीचा रोल देण्याच्या हिशोबाने लिहितो. असो, यंदा नाटकात प्रियंका कुलकर्णी काम करणार असल्याने आमचा भाऊ म्हणजे शंतनु फारच खुष झाला होता. कारण फायनल इयरला आल्यावर शंतनुला प्रियंका आवडायला लागली होती. नाटकात सायलेंट गर्लफ्रेंड ही नवी कंसेप्ट टाकली होती, याचं बी बॅचच्या मुलींना नवल वाटत होतं. पण फ्रेशर्स पार्टी पुढे ढकल्यामुळे आमचा नाटक करायचा मुड गेला. भाऊला वाईट वाटलं होतं, पण गॅदरिंगला नक्की मोठं नाटक करुया अन तेही त्याच्या अपोझिटला प्रियंका कुलकर्णीलाच घेऊ असं सांगितल्यावर कुठे त्याला बरं वाटलं होतं.
असो, फ्रेशर्स पार्टीचं नावं आमच्या वर्गातल्या मुलांनी, "जल्लोष बेधुंद मनांचा" असं ठरवलं होतं. दरवेळी होतो तसा यंदाही कार्यक्रम जरा उशीराच सुरु करावा लागला होता. यंदा रावसाहेब थोरात हॉलमध्ये पार्टी असल्याने मुलांना बरं वाटलं होतं. यंदा फ्रेशर्स पार्टीचं पहिल्या भागाचं सुत्रसंचालन मी अन प्रसाद माळी करणार होतो, स्क्रिप्ट मीच लिहली होती, रजनीकांत वर आधारित. प्रसाद माळी बरोबर मी कसं काय सुत्रसंचालन करायला तयार झालो याचा प्रश्न आमच्या गृपच्या मुलांना पडला होता. पण शेवटचे काही महिने राहिले त्यामुळे कोणाचं मन का दुखवावं याचा विचार करुन मी त्याच्याबरोबर सुत्रसंचालन करण्यासाठी तयार झालो होतो. कार्यक्रमाचा श्री गणेशा थर्ड इयरच्या सुष्माने तिच्या सुंदर नृत्याविष्कारानेच केला. तिने अप्रतिम शास्त्रीय नृत्यातुन गणेश वंदना सादर केली होती.
नंतर आमच्या वर्गातल्या मुलींचा फ्युजन डान्स झाला, आणि आमच्या वर्गातली मुलं कंफ्युज झाली. कारण ज्या मुलींनी गेल्या तीन वर्षांत स्टेजवर येण्याचं धाडसही दाखवलं नव्हतं त्यांनी यंदा "जोर का झटका हाय जोरोंसे लगा.." यावर डान्स करुन मुलांना चांगलाच झटका दिला होता. मनोज जावरेनेही "रोबोट डान्स" केला होता. विकासने "तेरे मस्त मस्त दो नैन," हे गाणं म्हंटलं, आणि तेही राहत फतेह अली खान यांच्या साथीनेच.. तुम्हाला मी काहीतरी सांगतोय असं वाटेल, पण आमच्या कोळसे भाऊंनी जिथुन कराओके करुन आणले होते, इतके थर्ड क्लास केलेले होते की सिंगरचा आवाज मध्ये मध्ये येतचं असायचा, आता कळलं असेल की विकासने राहतजींच्या जोडीने कसं गाणं म्हटलं. यंदा फिश पॉंड्सही होतेच, त्यातही आमच्या वर्गातल्या रोहिणी आणि उज्वलावरच जास्त होते. रोहिणी वर सुशील साळवे आणि राहुल साठे यांच्या कडुन, तर उज्वलासाठी आधी सांगितलेली यादी होती. दिवाकरनेही बहुतेक त्याला आवडणार्या सगळ्या मुलींवर एक कविता केली, पण त्यावेळी मी ती वाचण्याचं टाळलं कारण ती कविता मीच केली असणार असं आमच्या वर्गातल्या मुलींना वाटलं असतं, कारण दिवाकरही कविता करायला लागला हे फक्त त्यावेळी मला माहिती होतं.त्याची ती कविता अशी होती:-
"रोहिणी" नक्षत्राच्या पहाटी,
शांततेत "प्राजक्ता"च्या फुलांचा सुवास दरवळला,
"अम्रिता" पडावा तसा फुलांचा सडा पडला
प्रियकराला वाटे आपल्या "प्रिया"स भेटावे,
तसा अलगद माझा "अनामिका"चा स्पर्श त्या फुलांना झाला,
तेवढ्यात अशा रोजच्या "उज्वला"ला जाग आली,
या "अपुर्वा"च्या स्वागतास धरती जागी झाली..!
रोहिणी, प्राजक्ता, अम्रिता, प्रिया, अनामिका, उज्वला आणि अपुर्वा ही आमच्या वर्गातल्या काही मुलींची नावं आहेत, ज्या आमच्या वर्गातल्या जास्तीत जास्त मुलांना आवडायच्या. आता अभ्यास एके अभ्यास हेच धेय्य मुलांच्या नजरे समोर आहे.
फ्रेशर्स पार्टीत जेवण झाल्यानंतर होस्टेलाईट्सचे दोन नाटक सादर झाले. एक होतं खेड्यातल्या बोगस डॉक्टरांवर, आणि एक होतं शिवरायांवर आधारित. होस्टेलचे मुलं वेशभुषा करण्यात जास्त भर देतात, जरीवाल्याकडुन भाडे तत्वावर कपडे घेऊन येतात, त्यांना त्या कपड्यात बघितलं की बघणार्याला वाटतं, यांच नाटक एकदम जबरदस्त असेल, पण बडा घर अन पोकळ वासा अशी त्यांची स्थिती असते. त्यांच्या नाटकाला ना प्रस्तावना, ना नाव, आणि पात्र परिचय, सगळं आपल्यालाच समजुन घ्यावं लागतं; विषयही भरकटतच चालतो. फक्त सगळे संवाद तोंडपाठ असतात, आणि ते म्हणतांना ते चुकत नाही एवढीच एक त्यांच्या नाटकातील उल्लेखनीय बाब असते.
श्रेयस बागल आणि त्याचा साथीदाराने चांगल सुत्रसंचालन केलं होतं. आमच्या देऊलभाऊंचा स्टॅटिक डान्सही चांगला झाला होता, अन तोही वन्स मोर मिळवुनच. या दरम्यान फस्ट इयरच्या मुलांची फायनल स्क्रिनिंग झाली, त्यातुन मयुर जाधव हा मि.फ्रेशर्स तर मुली मधुन हुमाला मिस. फ्रेशर्स म्हणुन निवडण्यात आलं. संपदाने मि. आणि मिस. फ्रेशर्स साठी मुकुट आणले होते, त्यावर छोटे लाईट लावलेले होते, त्यामुळे होस्टेलची मुलं, "कालिकेच्या जत्रेतुन आणेल का गं..?" असं ओरडत होते. असो, आम्ही तर मस्त मागे बसुन मजा करत होतो. म्युझिकल फिश पॉंड्सला चांगलेच कमेंट घसाफोड करुन पास करत होतो. एकुणच काय तर फ्रेशर्स पार्टी चांगलीच झाली होती. पार्टी संपल्यानंतर रनरअप ठरलेल्या श्रीरंगला हितेशनं पार्टी मागितली ती सुद्धा चहाची, पार्टी नव्हती जणु जबरदस्तीच होती असं म्हंटलं तरी चालेल, मग आम्ही समर्थ मध्ये जाऊन पाऊण तास चहा पित बसलो, कारण तिथेही गप्पांना चांगलाच रंग आला. श्रीरंगहा प्रियंका कुलकर्णीचा मावसभाऊ असल्याने मुलं आता शंतनुला चांगलीच चिडवत होती. शंतनु पण काही कमी नव्हता, त्यानेही मग अमेयला टार्गेट केलं, मग अमेयने हितेशला अशा आमच्या कॉलेजगप्पांना ऐन रंगात असतांना, माझं घडयाळात लक्ष गेलं, आणि मग, "चलो भाई लोग..सायट्रिकची वेळ झाली.."असं म्हणत मग मी नितीश, हितेशला निघायला लावलं. फस्ट इयरपासुन मी आजपर्यंत मी कॉलेजला येतांनाही आणि कॉलेज सुटल्यावर देखील सायट्रिक मार्गे जाणार्या बसनेच घरी जातो, कधी चुकवत नाही.
यंदाही ओथुर येथे व्हॉलिबॉलच्या स्पर्धांच आयोजन केलेलं होतं, आमची चांगली प्रॅक्टिस चालु होती, अन तेही गेल्या वर्षी तिथे जाण्याची परवानगी मिळाली तशी यावर्षी देखील मिळेल हे ध्यानात घेऊनच. पण आमच्या पदरी यंदा निराशा आली, कारण प्राचार्यांनी सरळ तिथे जायची काही गरज नाही, GPAT & GATE च्या परिक्षेचा अभ्यास करा असं बजावुन सांगितलं. मग आम्ही सावकारे सरांकडे गेलो, सावकारे सर मागीलवर्षी स्पोर्ट्स इनचार्ज होते, त्यामुळे आम्ही सरांना प्राचार्यांना आम्हाला परवानगी देण्यासाठी सांगा असं सांगण्यासाठी गेलो. सावकारे सरांना आम्ही जेव्हा सांगितलं की फायनल इयरचे आम्ही तीनच जण आहोत, बाकीचे खेळाडु हे फस्ट आणि सेकंड इयरचे आहे. आणि शिवाय स्पर्धा तीन दिवसांचीच तर आहे. तेव्हा सर हसायला लागले. त्यांनाही माहिती होतं की मागच्या वर्षाच्या बॅचचा रिझल्ट चांगला न लागल्याने आम्हाला जाऊ न देण्याचा निर्णय सरांनी घेतला होता. पण नुसतं GPAT & GATE च्या परिक्षेच कारण पचनी पडंणारं नव्हतच.
दोन-तीन दिवसात अभ्यासात काही खुप तीर मारता येणार आहे अशी तर काही गोष्ट नव्हती, आम्हाला परवानगी देऊन टाकायला हवी यावर सावकारे सर तयार झाले. मग ते आम्हाला यावर्षी स्पोर्ट्स इनचार्ज असलेल्या अनंतवार सरांकडे घेऊन गेले, अनंतवार सरांनी देखील तुम्ही पहिले त्या कॉलेजनं पाठवलेलं निमंत्रण पत्रक घेऊन या मग सांगतो असं सांगितलं. आम्ही तिथल्या आयोजकांशी संपर्क साधला असता, त्यांनी कॉलेजला एक आठवड्यापुर्वीच निमंत्रण पाठवलं आहे असं सांगितलं. मग आम्ही कार्यालयात चौकशी केली, तर त्यांनी आपल्याला काही निमंत्रण आलं नाही असं सांगितलं. आम्हाला काय झोल आहे ते कळलं. दरवर्षी बाहेरच्या कॉलेजमध्ये होत असलेल्या स्पर्धांचे आयोजक आमच्या कॉलेजला निमंत्रण पाठवतात, पण कार्यालयातुन ते नोटीस बोर्ड वर लावण्याची तसदी कॉलेजमधुन घेतली जात नाही. आमच्या कॉलेज म्हणजे पोपटपंची तयार करण्याचं मशिनच आहे असं वाटत असतं, GPAT & GATE च्या परिक्षेत यांना चांगला निकालही हवा असतो, पण त्यासाठी हव्या त्या सुविधाच कॉलेजमध्ये नसतात.
फायनल इयरच्या सुरुवातीला घेतलेल्या मिटींग मध्ये आश्वासनांचा पाऊस कॉलेज प्रशासनानं पाडला, पण त्यातली एक गोष्टही अजुन पुर्ण केली नाही. मुलांसाठी सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत लायब्ररी खुली ठेऊ, पण प्रत्यक्षात सकाळी सव्वा नऊ वाजता लायब्ररी उघडते, अकरानंतर पुस्तके मिळतात आणि संध्याकाळी साडे पाचला लायब्ररी बंद होऊन जाते. मुलांसाठी शिक्षकांना M.C.Q. Question bank तयार करायला लावली, दरमहिन्याला ओपन बुक टेस्ट ठेऊ असं सांगितलं, पण आजपर्यंत एकही M.C.Q. आम्हाला मिळाला नाही. उलटच आम्हीच आमच्यासाठी M.C.Q. तयार करुन घेतो, माझ्या ब्लॉगवर मी काही M.C.Q. Question's टाकलेले पण आहेत. आमचे सिनियर्स आमच्यासाठी एक आठवडा वर्क शॉप घेणार होते, बाकीच्या कॉलेजच्या मुलांना त्यांच्या कॉलेजन संमती देऊन तिथे जायची परवानगी दिली, पण आमच्याच कॉलेजने आम्हाला तिथे जायची परवानगी नाकारली. शिकवण्याच्या बाबतीत जरी कॉलेजचे शिक्षक तरबेज असले, तरी बाकीच्या गोष्टींत ते लवकर जुळवुन घेत नाही असं आमच्या कॉलेजच्या प्रत्येकाला वाटतं.
यंदा GATEची परिक्षा आणि राज्यसेवा पुर्व परिक्षा दोन्ही एकाच दिवशी आल्याने आमच्या वर्गातल्या काहींची पंचाईत झाली आहे. मागे काही दिवसांपुर्वी आमच्या कॉलेजचा माझी विध्यार्थी निषाद देशमुख यांच अपघाती निधन झालं होतं. काही महिन्यांपुर्वी पंचवटीतल्या एका मुलाने आत्महत्या केली होती, आणि त्याला जबाबदार ठरवलं गेलं तांबे सरांना, तीन वर्षांसाठी त्यांना बडतर्फ करण्यात आलं. आमच्या कॉलेजमधल्या मुलांना फार आनंद झाला होता. तांबे सर म्हणजे फार्मसी शिक्षकांवर लागलेला कलंकच आहे असं आमच्या कॉलेजचे मुलं अभिमानानं सांगतातच. काही दिवसांपुर्वी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष- डॉ. नरेंद्र दाभोळकर सरांचा सेमिनार झाला होता. आमच्यासाठी तो एक चांगला अनुभव होता. यंदा आमचं गॅदरिंग जानेवारी महिन्यातच असेल असा संकेत अनंतवार सरांनी दिला होता. त्यामुळे मुलं आता जोमात अभ्यास करत आहेत, कारण स्पोर्ट्स वीक मध्ये खुप वेळ निघुन जाणार, शिवाय नंतर लगेच सेकंड सेशनल आणि त्यानंतर GATEची परिक्षा असल्याने आता फायनल इयरच्या मुलांना तरी निदान दिन दुगनी और रात चौगुनी मेहनत करावीच लागणार आहे यात शंकाच नाही. त्यामुळे मी देखील नंतर वेळ मिळेल, पण यंदा एम.फार्मच्या रौप्य महोत्सवीवर्षाचा मुहुर्त असल्याने गॅदरिंग मध्येच पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं होतं.
फायनल इयरचे सुमारे पाच महिने अजुन बाकी आहे, गेल्या साडे-तीन वर्षांत काय मिळालं, काय गमवलं, काय करायचं होतं, आणि काय करायचं राहुन गेलं याचा विचार हल्ली आमच्या वर्गातल्या प्रत्येकाला पडतच असेल, कॉलेजची ही चार वर्ष आमच्या आयुष्यातला एक चांगला टप्पा होता, असं आज आम्ही म्हणु शकतो, या कॉलेजमधल्या मुलांमध्ये एक स्पर्धात्मक स्पिरिट डेव्हलप झालयं, याचा फायदा त्यांना नेहमीच होत राहिलं. यंदा आमच्या वर्गातले बरेच जण GATE/GPAT & NIPER च्या परिक्षांमध्ये चमकतीलच, आमच्या प्राचार्यांची पहिल्या पन्नास मध्ये निदान दहा विध्यार्थी आपल्या कॉलेजचे असावे अशी इच्छा आहे, त्यांची इच्छा नक्कीच पुर्ण करण्याची धमक या कॉलेजच्या मुलांमध्ये आहे. MAT/ JPEG या M.B.A. साठी असलेल्या परिक्षांतही आमच्या वर्गातल्या प्रणित सुराणा, अक्षय सोनोने, उत्कर्ष वाटाणे, ओबोद उल्ला यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. पंकज भाऊंची C.D.S. ची तयारी जोरात चालु आहे. योगेश शिरोळेला मुंबईला हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणुन जॉब लागलाय, त्यामुळे त्याचं दर्शन आता थेट वार्षिकच्याच परिक्षेला बहुतेक होईल. हितेशच्या मोठ्या भावाचं क्लिनिकचं उदघाट्न झालं, तेव्हा आता भावाच्या क्लिनिक शेजारी तु देखील आयुर्वेदिक मेडिकल टाक म्हणजे एकदम झकास होईल, असं हितेशला आमच्या वर्गातले मुलं सांगत होते.
येत्या काही महिन्यांनतर आम्ही एकदाचे बी.फार्म पास होऊ, कोण कुणाच्या संपर्कात किती वेळ राहिल हे सांगता येण आजही कठीणच आहे. फेसबुकमुळे तरी ही कमी झालेली आहे. यंदा गॅदरिंग लवकरच असल्याने आमची फेअरवेल पार्टी देखील ऐन जानेवारीत असेल. फेअरवेल मित्रांना देऊ, की आमच्या ज्युनियर्सला की कॉलेजला देऊ असा प्रश्न मला हल्ली कधी कधी पडतं असतो. पण फार्मसीला फेअरवेल देणं हा विचार माझ्या मनात डोकावला तरी त्याला नकारच मिळेल. आज माझा मुलगा डॉक्टर आहे वा इंजिनियर आहे असं सांगत असलेल्यांना माझाही मुलगा फार्मसिस्ट आहे असं अभिमानानं माझ्या आई-वडीलांना सांगत येईल, इतक फार्मसी फिल्ड मला आवडतं. या फार्मसी फिल्डची लोकांना अधिकाधिक माहिती व्हावी विशेषतः ग्रामिण भागातील मुलांना, यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहिलं. फार्मसीचा अभ्यासक्रम आणि फार्मा इंडस्ट्री यांची योग्य सांगड घालुन फार्मासीत शिकणार्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी भविष्यात मला काम करायची जबरदस्त इच्छा आहे. आयुष्यात माणसाने सामाजिक बांधिलकी जपायला हवी हे मी शिकलेलो आहे. माझं हे पुस्तकही जणु माझी सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे असं मी मानतो.
No comments:
Post a Comment