N.D.M.V.P.S. Collge of Pharmacy, Nashik (C.P.N.) मध्ये एकदाचा प्रवेश मिळवला. पण फार्मसीसाठी असलेले ऍडमिशन राऊंड्स अजुन बाकी होते. त्यामुळे कॉलेज नक्की केव्हा सुरु होणार आहे याची चौकशी करण्यासाठी मी एक दिवस कॉलेजला गेलो. स्मशान-शांतते सारखीच शांतता कॉलेजच्या आवारत होती. एका वर्गात जादा तास सुरु असावा पण बाहेर जरासुद्धा जाणवत नव्हतं. नंतर कळलं की कॉलेजच्या त्या कडक शिस्त्तीचं कारण होते ते कॉलेजचे प्राचार्य श्री शेटे सर. असो, क्लर्क असलेले वडजे सर आले नव्हते त्यामुळे थोडा वेळ थांबावं लागणार होतं. अन त्यावेळी माझी ओळख झाली ती नितीश चौधरी बरोबर....!
नितीश चौधरी, C.P.N. मध्ये मिळालेला माझा पहिला जीवलग मित्र. नितीश हा त्यावेळी त्याच्या वडिलांबरोबर आला होता, अन मी एकटाच होतो. आम्ही एकमेकांशी बोलु लागलो तेव्हा कळलं की तो सुद्धा माझ्यासारखा लोकलाईट होता. नितीश R.Y.K. कॉलेजमधुन बारावी पास झालेला, त्याचा CET स्कोरही चांगला होता (१६२/२००); पण भाईंनी तब्येतीत मार खाल्ला होता. त्याच्याकडे पाहिलं की कुणीही त्याला नववी-दहावीचा विद्यार्थी समजेल असा तो छोटुकला अन गोंडुला दिसायचा. त्यावेळी त्याने मला एक प्रश्न विचारला होता, "काय रे आपले सिनियर्स आपली रॅगिंग घेतील का?" आता त्याच्याकडे बघुन त्याने तो प्रश्न का विचारला हे कोणालाही कळलं असतं. त्यावर मी त्याला, "अरे नाशिकच्या कॉलेजमध्ये कसली होते रॅगिंग अन तेही फार्मसी कॉलेजमध्ये तर मुळीच शक्य नाही." असं उत्तर दिलं, कदाचित त्यामुळे मला रॅगिंग नावाचा प्रकार काय असतो हे ठाऊकच नसावं असं त्याचा चेहराच जणु सांगत होता. तोपर्यंत नितीशचे वडील ऑफिसमधुन कॉलेज केव्हापासुन सुरु होणार याची चौकशी करुन आले होते; तेव्हा कळलं की कॉलेज ७-ऑगस्टला सुरु होणार आहे. मग आम्ही दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला अन आप-आपल्या मार्गाने घरी परतलो. घरी आल्यावर मी कधी एकदाच ७-ऑगस्ट उजाडेल याची वाट पाहत बसलो.
७-ऑगस्ट-२००७ अखेर तो दिवस उजाडलाच, First year B.Pharm चा पहिला दिवस..! कॉलेज दुपारी २-५ या वेळेत होतं; पण मी मात्र पाऊणतास सुरवातीलाच C.P.N. मध्ये येऊन पोहचलो होतो. नेमकी ती कॉलेजची लंचब्रेकची वेळ झाली होती. सगळे सिनियर्स कॉलेजच्या समोर असलेल्या छोट्याशा लॉन्सवर कल्पव्रृक्षांच्या छायेत डबे खात होती. अगदी शाळेत डबा खायला बसावं असाच थाट..! प्रोफेशनल कॉलेजच्या मुलांची ती सिंप्लिसिटी कोणाच्याही मनाला नक्कीच सुखावुन जाते. सर्वांची जेवण आटोपल्यानंतर सिनियर्स मग आमच्याकडे वळले.
आपल्या सिनियर्संना बघुन पुन्हा त्यावेळी रितेशने तोच प्रश्न पुन्हा विचारला, "काय रे आपले सिनियर्स आपली रॅगिंग घेतील का?" यावेळी त्याच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं; कारण त्याच्याइतकचं दडपण माझ्यावर येत असल्याची जाणीव माझ्यावर येत असल्याची जाणीव मला होत होती. तेवढ्यात १५-२० सिनियर्स आमच्याजवळ आले अन कोणीतरी माघुन बोललं, "मित्रा रॅगिंग घेत नाही बरं का, फक्त तुझा इंट्रो दे. नाव, गाव, तुला मिळालेले मार्क्स सांग अन तेही न घाबरता." असं जेव्हा आमच्या कानावर पडलं तेव्हा आम्हाला जरा हायसं वाटायला लागलं. मग पुढची दहा-पंधरा मिनिटे तो तोंडओळख करुन घेण्याचा कार्यक्रम सुरु असतांना कोणीतरी ओरडलं, "अरे शेटे सर येतायं बरं का..!" शेटे सरांच नाव ऎकल्याबरोबर सगळे सिनियर्स तिथुन गुपचुप निघुन गेले.
रॅगिंग सारखी विकृती मेडिकल किंवा इंजिनिअरींग कॉलेज मध्ये फार प्रमाणात आढळते. वर्तमानपत्रात येत असलेल्या रॅगिंगच्या बातम्या या बहुदा याच फिल्ड्सशी निगडीत असतात, पण फार्मसी कॉलेज मध्ये रॅगिंग झाली असं त्यावेळ पर्यंत मी ऎकलं नव्हतं, अन तसं कोणत्याच वर्तमानपत्रात छापुन आल्याचं मी बघीतलं नव्हतं. असो, कॉलेजची लंचब्रेकची वेळ संपली होती अन त्यावेळी First year B.Pharmच्या पहिल्या लेक्चरला सुरुवात झाली.
D.M.H.P. च्या लेक्चरने आमच्या प्रथमवर्षाच्या अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा झाला. D.M.H.P हा विषय आम्हाला शिकवणार होते ते श्री अनंतवार सर. आमच्या फार्मसीच्या शब्दांत सांगायचं तर अनंतवार सर हे C.P.N.चे सेकंड जनरेशन प्रोफेसर्स पैकी एक होते. कडक शिस्त, वक्तशीरपणा, निटनिटकेपणा, "कल करे सो आज कर, आज करे सो अब.!" असं जणु ब्रीदवाक्य असलेल्या अनंतवार सरांना "Mr. Perfection" असं टोपणनावं C.P.N. च्या मुलांनी एकमतानं दिलं होतं. सरांनी सर्वांची तोंडओळख करुन घेतली अन त्यांच्या विषयाची माहिती ते आम्हाला करुन देत होते पण त्यांच लेक्चर संपलं होतं, अन दुसरं लेक्चर घ्यायला आले ते श्री अहिरे सर.
अहिरे सर हे C.P.Nच्या मुलांसाठी जणु देवाचा अवतार. संयम अन शांती एखाद्या माणसात किती असावी असा प्रश्न जर आम्हा C.P.Nच्या मुलांना विचारला तर एकच उत्तर मिळेल- अहिरे सर. C.P.Nच्या विध्यार्थी वर्गात अहिरे सर हे "भाऊ" या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. "भाऊ म्हणजे एकदम देवमाणुस, कधी कोणाला यांचा त्रास झाला नाही बरं का.!" असं सिनियर्स अभिमानानं सांगायचे. अहिरे सर आम्हाला Pharmacognosy-1 हा विषय शिकवणार होते. त्यांनीदेखील सर्वांशी तोंडओळख करुन घेतली अन Pharmacognosy-1 या विषयाची ते आम्हाला माहिती देऊ लागले.
शेवटच्या तासाला आमच्या वर्गावर आले ते श्री संजय वाघ सर, C.P.N मध्ये असलेल्या चार हुकुमी शिक्षकांपैकी वाघ सर हे एक आहेत. पाल सर, वाघ सर, गुडसुरकर सर आणि बेलसरे सर या चार शिक्षकांमुळे गेल्या २५-२६ वर्षापासुन या फार्मसी फिल्डमध्ये या कॉलेजचा दबदबा आहे असं आमचे सिनियर्स आम्हाला सांगायचे. असो, वाघ सर आले अन त्यांनी आम्हाला C.P.Nची परंपरा नीट समजावुन सांगितली. याशिवाय आम्ही त्यावेळी कॉलेजच्या रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश घेतलाय असही सांगितलं, त्यावेळी आम्हा मुलांना फार आनंद झाला होता. हे सगळं घडता-घडता कधी कॉलेजची वेळ संपली ते कळलचं नाही, मग जो-तो आप-आपल्या मार्गाकडे परतला. शुक्रवारीदेखील देखील प्रॅक्टिकल्स नव्हते, अन ऎन शनिवार, त्यामुळे रविवारी विध्यार्थांना खरेदी करता येईल या हेतुनं मग लेक्चरला येणारे प्रत्येक सर आम्हाला प्रॅक्टिकल्सला लागणार्या साहित्यांची नावे, पुस्तकांची नावे यांची यादी देऊ लागले. प्रत्येक सरांनी दिलेल्या पुस्तकांच्या यादीत The Indian Pharmacopoeia, The British Pharmacopoeia, The United States Pharmacopoeia & Remington's- The Science & practice of Pharmacy या पुस्तकांची नावे आलेली असल्याने यांच्यापैकीच एखादं पुस्तक खरेदी करावं असं त्यावेळी ठरवलं. प्रॅक्टिकल्सला ऍप्रन, र्सजिकल कॅप, स्पॅट्युला, मसलिन क्लॉथ, बटर पेपर, सेल्फ लॉकिंग पॉलिथिन बॅग्स, पॉलिथिन शीट, वेट बॉक्स यासारख्या वस्तु लागणार होत्या, अन त्यांच्या जोडीला कंटेनर्स होतीच.
रविवारी सकाळीच मग मी अन माझे वडिल प्रॅक्टिकल्सला लागणार्या वस्तुंची खरेदी करायला घराबाहेर पडलो. ऍप्रन, र्सजिकल कॅप, स्पॅट्युला, मसलिन क्लॉथ, बटर पेपर, सेल्फ लॉकिंग पॉलिथिन बॅग्स, पॉलिथिन शीट, वेट बॉक्स या सारख्या वस्तु तर मिळवण्यासाठी फार शोधा-शोध करायची गरज पडली नव्हती.पण कंटेनर्स साठी मात्र चांगली पायपीट करावी लागली होती,कारण औषधाच्या च्या रिकाम्या बाटलीलाच कंटेनर म्हणतात असं तेव्हा माहिती नव्हतं ना मित्रांनो! The Indian Pharmacopoeia, The British Pharmacopoeia, The United States Pharmacopoeia & Remington's- The Science & practice of Pharmacy यासारखी पुस्तके म्हणजे आम्हा फार्मसी कॉलेजच्या मुलांची रेफरंस बुक्स पण त्यावेळी कुणास ठाऊक की रेफरंस बुक म्हणजे काय?
त्यामुळे मी विचार केला "फार्मसी काय मस्त आहे दोन-चार पुस्तकांमध्ये सगळ्या फस्ट इयरच्या कित्येक विषयांचा अभ्यासक्रम कव्हर होतोय ,आणि ह्याच पुस्तकांचा आमच्या सर्व सरांनी दिलेल्या पुस्तकांच्या यादीत प्रथम समावेश ,म्हणुन मी ही पुस्तकं फस्ट इयरलाच घेउन टाकावीत!" बस असा विचार मनात आला आणि मग सरळ गेलो ते शालीमार येथील एका नावाजलेल्या पुस्तकाच्या दुकानात. तेथे गेल्यावर त्याला विचारलं " ओ काका The Indian Pharmacopoeia,/The British Pharmacopoeia, मिळेल का?" या प्रश्नावर तो दुकानदार थोडासा गॊंधळुन गेला,तरी दोन चार मिनीटे त्याने दुकानात थोडी शोधा-शोध केली पण त्याला काही पुस्तक मिळाल नाही ,आणि नाईलाजानं तो म्हणाला "साहेब ऑर्डर करुन ठेवतो दोन-चार दिवसांत चक्कर मारा." मी दोन महिन्यांनी जरी त्याच्याकडॆ गेलो असतो, तरी त्याची पुस्तकांची ऑर्डर आली नसती, कारण मी जी पुस्तके त्याला सांगितली ती सर्व ऑफिशियल बुक्स होती. आणि हा किस्सा ज्यावेळी मी माझ्या मित्रांना सांगितला होता त्यावेळी त्यांची तर हसुन -हसुन पुरेवाट झाली होती. पण करणार काय त्यावेळी आम्ही जणु सुशिक्षित अडाण्या सारखे होतो. कंटेनर्सची सोय मग मात्र भंगारवाल्या मुळे झाली.
एकीकडे कॉलेजला सुरुवात झाली होती अन नवीन मित्रांशी ओळख होत होती. असाच एक मित्र होता नितीन आखाडे, आमच्या साठी तर नित्याच..! कोपरगावच्या या दोस्तावर श्री मकरंद अनासपुरे यांचा भरपुर प्रभाव पडलेला असल्याचं त्याला भेटल्यावर लगेच जाणवतं. असंच आम्ही लंच-ब्रेक मध्ये गप्पा मारत असतांना तिथे अंकुश कोठावदे नावाचा सिनियर नितीन जवळ आला आणि त्याला बोलला "आरे हे सिनियर्स मला फार त्रास देतायं रे, मला सांग ना मी काय करु?"
नितीन त्या अंकुशला समजवतांना बोलला "आरे घाबरतोय का शिपुरड्या ,सिनियर्स काय वाघ-बिघ आहे काय ? त्येंच्यामायला त्यांचे तर काही खडखड केली तर देउन टाकु त्या बुजगावण्यांना कळलं काय? आरे आपुन असल्यावर घाबरायचं कारण काय?" ऎवढ बोलुन झाल्यावर यत्या तेथुन निघुन गेला, आणि अंकुश मात्र हसायला लागला. आम्हाला वाटलं आता काही तरी झोल होणार आहे बरं. आणि अगदी तसचं झालं थोड्याच वेळात अंकुश आणि त्याच्या बरोबर काही सिनियर्स नित्या जवळ आले. ऎवढे सिनियर्स पाहुन नितीन एकदम घाबरला खरा पण त्याने त्याने काही त्याच्या तॊंडावर मात्र काही जाणवु दिलं नाही. मग अंकुश त्याला म्हणाला, "अरे हे सिनियर्स म्हणताय की मी त्यांच्या वर्गातला आहे!" आता मात्र नितीन मात्र जाम घाबरला त्याला काय बोलावं ते सुचेनासं झालं. आमच्या CPNites च्या शब्दांमध्ये सांगायचं तर अंकुशने नितीनला चांगलाच "स्टंट" दिला होता. आम्ही तर नित्याची दशा पाहुन हसत होतो. नंतर मग नितीनला एक गाणं म्हणायला लावलं, आणि मग कुठे त्याची सुटका झाली होती. सुरुवातीला असंच वातावरण आमच्या कॉलेजमध्ये असायचं सिनियर्स आम्हा जुनियर्सची जमेल तेव्हा विकेट काढत असायचे, पण कुणाएकालाच टार्गेट केलं जात नव्हतं हे महत्वाचं होतं. फार्मास्युटिक्सच्या लेक्चरला श्री.सावकारे सर आले. सावकारे सर हे C.P.N.च्या थर्ड जनरेशन प्रोफेसर्स पैकी एक. विध्यार्थी वर्गात श्री. सावकारे सरांना Mr.Ok / Management guru या टोपण नावाने ओळखलं जातं. Mr.Ok हे त्यांच टोपणनाव त्यांना दिलं ते त्यांच्या प्रत्येक वाक्यानंतर Ok म्हणायच्या सवयीमुळे.
सावकारे सरांची शिकवण्याची पद्धत इतर शिक्षकांपेक्षा वेगळीच, जणु "हसा, खेळा पण शिस्त पाळा." कॉलेजच्या मुलांची नस चांगल्यापैकी ज्यासरांनी ओळखली आहे त्यापैकी सावकारे सर हे एक. सरांनी पहिल्याच लेक्चरला काही तोंडओळख, कॉलेजची परंपरा सांगण्याच्या भानगडीत पडलेच नाही. त्यांनी सरळ पाईंटाच्या मुद्यात हात घातला, म्हणजे त्यावेळी आमच्यासाठी सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट सांगितली ती म्हणजे "फार्मसी फिल्डचा स्कोप".
फार्मसीकडे वळणारे कित्येकजण हे फार्मसीतच करियर करायचं ह्या विचाराने येतचं नाहीत. ती मुलं M.B.B.S./B.D.S./B.Engg.ला चांगल्या कॉलेजला किंवा प्रवेश न मिळाल्यानेच फार्मसीकडे वळतात ही वस्तुस्थिती होती. याशिवाय फी अधिक पण शैक्षणिक दर्जा कमी असलेल्या कॉलेजेसचाही या फिल्ड मध्ये सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे मुलांना फार्मसी फिल्डला त्यांच्या करियरच्या पसंतीक्रमात सहाजिकच दुय्यमस्थान द्यावं लागतं. I honestly confess that there is a great craze about M.B.B.S./B.D.S./B.Engg in mind of every tom, dick & harry. I.T. sector becomes a cynosure for students , but now a days there is a great saturation takes place in these fields & the people work in such fields so servilely, but there is no panic about this gigantic emerging field Pharmacy. असं त्यावेळी आम्हाला सांगणारं कोणी नव्हतं. त्यामुळे "Why are you chosen Pharmacy?" असा प्रश्न विचारणार्या शिक्षकांनाही, मनात जणु, "Sir, We are the rejected parcels from the M.B.B.S./B.D.S./B.Engg Colleges." असं सांगावसं वाटायचं.
सावकारे सरांनी आम्हा मुलांना फार्मसी फिल्डमध्ये काय स्कोप आहे ते सांगायला सुरुवात केली ती सुद्धा औषधनिर्माणशास्त्र या शब्दापासुनच..!" आता तुम्ही जर ह्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलाय तर तुम्ही बी.फार्म होणार. बी.फार्म. झालं की व्होलसेलर/रिटेलर बनुन मेडिकल स्टोअर्स टाकता येतील हे तर तुम्हाला माहिती आहेच. बी.फार्म आहात म्हणजे तुम्हाला फार्मा इंडस्ट्रिमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये स्कोप आहे. तयार केलेल्या प्रोडक्ट ची क्वॉलिटी तपासण हे गरजेच आहे, म्हणजे तुम्ही क्वॉलिटी कंट्रोल या डिपार्टमेंटमध्ये स्वता:ला झोकुन देऊ शकतात. पण त्यासाठी एम.फार्म असणं गरजेच आहे. एम.फार्म. असल्यावर तुम्हाला फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट आणि रिसर्च ऍंड डेव्हलपमेंट या विभागांमध्ये जाऊन रिसर्चर बनण्याची उत्तम संधी आहेच. नुसतं चांगले प्रोडक्ट बनवुन काय मिळणार, त्या प्रोडक्टचा खपही झाला पाहिजे, म्हणजे बघा तुम्हाला मार्केटिंग मध्ये सुध्दा वाव आहे. आपण अनेक बी.एस.सी./डी.फार्म. झालेले बहुतेक जणांना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह (एम.आर.) असल्याचं नेहमीच बघतो.
फार्मा इंडस्ट्रिमध्ये व्यवस्थापन असणं महत्वाच आहे म्हणजे तुम्ही M.B.A. केलं तर इंडस्ट्रिमध्ये मॅनेजर होऊ शकतात. इंटेलेक्च्युअल प्रॉप्रर्टी राईट्स मध्येही तुम्ही जाऊ शकतात. ह्या सर्व फार्मा-कंपन्यांवर नजर ठेवण्यासाठी ड्रग इंन्सपेक्टर सारखे आणि गव्हर्मेंट ऍनालिस्ट सारख्या सरकारी नोकर्या तुम्हाला उपलब्ध आहे. आजुन ह्या फिल्ड बद्दल सांगायच ठरलं तर मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये इंव्हेंट्रि कंट्रोल, डिसपेंसिंग यासाठी फार्मासिस्टची गरज असते. G.R.E सारखी परिक्षा देऊन तुम्ही परदेशातही जाऊ शकतात, परदेशात गेल तर सांगायला नको, की तुम्हाला काय-काय संधी असतात ते. आणि महत्वाचं तर सांगायच राहिलं तर हे सर्व शिकवण्याचं काम करण्यासाठी तुम्ही प्रोफेसर सुध्दा होऊ शकतात." अर्थात हे सर्व त्यांनी इंग्रजीमध्ये सांगितल होतं बरं का..!
असा भरगच्च स्कोप या फार्मसी फिल्डला असल्याचं कळल्यामुळे आम्हा विध्यार्थांना जरा बरं वाटलं होतं. या स्कोपच्या जोडीला त्यांनी त्या प्रत्येक विभागात काम करणार्यांना साधारणतः किती पगार मिळतो हेही सांगितलं होतं. त्यामुळे आता तरी आम्हा विध्यार्थीवर्गाला फार्मसी शिकणारे मेडिकल स्टोअर्स अन M.R. यापलीकडेही काही असतात याची जाणीव झाली. जणसामान्यांना खरंच फार्मसीबद्दल किती कमी माहिती असते याची जाणीव त्यावेळी झाली. सावकारे सरांच्या लेक्चरनंतर पुढचं लेक्चर ऑफ होतं, कॉलेज सुरु होऊन एक आठवडाही झाला नव्हता त्यामुळे मुख्यत्वे आम्हा लोकलाईट्सच्या मनात "रॅगिंग" या शब्दाबद्दल एक वेगळचं वलय तयार झालं होतं. लोकलाईट्स असल्याने कॉलेजसुटल्यानंतर आम्ही लगेच घरची वाट पकडायचो, पण होस्टेलला राहत असलेल्यांचं काय? कारण आमच्या वर्गात साधारणतः ७०% मुले होस्टेलला राहत होती. त्यांना सिनियर्स कशी वागणुक देतात याचं आम्हाला कुतुहुल असायचं. नितीन आखाडे शिवाय आम्हाला त्यावेळी डिटेल बातम्या सांगणारा दुसरा कोणीच नव्हता. त्यामुळे त्याला फोर्स केल्यावर बंदा एकदम मुड मध्ये आला अन होस्टेलाईट्सची गंमत सांगु लागला, "जणु सन्नाटे को चिरती सनसनीच..!"
"आयला तुमच्या लोकलाईट्सची मजा आहे यार, जरा पाच सहा दिवस होस्टेलला रहायला या मग कळेल. अरे काल आम्हाला संध्याकाळी सिनियर्संनी चांगलच पट्यात घेतलं ना राव...!" सगळ्यात पहिले त्यांनी सात-आठ पाण्याने भरलेले कॅन समोर आणुन ठेवले, अन त्याच्याजोडीला ग्लास, मग सगळ्यांना क्रमाक्रमाने त्यांच नाव, गाव, मिळालेले मार्क्स वैगेरे माहिती सांगायला लावली, अन वाक्य पुर्ण झाल्यावर "लिंबु पिळुन" असं म्हणायचं. जो चुकायचा त्याला एक ग्लास पाणी पिऊन परत पहिले पाढे पंचावन्न करावं लागत होते. हसायचं नाही, पायात ६०डिग्रीचा कोन करायचा आणि अनेक खतरनाक कंडिशन्स घातल्या रे."
"अरे नित्याला तर काहीच घेतलं नाही..!" असं मागुन मनोज जावरे नावाचा आमचा वर्गमित्र बोलला, अन तोही त्या महत्वाच्या चर्चासत्रात सामिल झाला. "अरे यांना काही केलं नाही, काही काही सिनियर्स इतके टगे होते की काय सांगु, आम्हाला त्यांनी बिना बॅट-बॉलचं क्रिकेट खेळायला लावलं. दोन-चार सिनियर्स तर अस्सल आंबट शौकीन होते की आम्हाला त्यांना हवे तसे जोक्स सांगितल्याशिवाय सोडतच नव्हते. काहींनी तर वर्गातल्या मुलींची नावे पाठ करायला लावली." जावरे असं बरचं काही सांगत होता. अन आम्ही मनोमन देवाचे आभार मानत होतो," बरं झालं देवा आम्ही लोकलाईट्स आहोत हे असलं सगळं आमच्याकडुन झेपल्या गेलं नसतं..!" दुसरी कडे नितीन अन मनोज सांगत असलेल्या गोष्टींनी आमची हसुन-हसुन पुरेवाट झाली होती. या ऑफ मिळालेल्या लेक्चरनंतर अनंतवार सरांच लेक्चर होतं, पण मुलांचं मन लेक्चर मध्ये नव्हतं तर ते होस्टेलच्या मुलांनी सांगितलेल्या गमती-जमती मध्ये रमुन गेलं होतं. पुढे एक-दोन दिवस एखादं लेक्चर ऑफ गेलं की पुन्हा अशाच गप्पांना रंग यायचा.
कॉलेज सुरु झाल्यानंतर सुमारे दहा दिवसांनी प्रॅक्टिकल्सला सुरुवात झाली. पहिलंच प्रक्टिकल होतं सावकारे सरांच म्हणजे फार्मास्युटिक्स-१चं. त्यादिवशी मग सरांनी आमच्या बॅचच्या मुलांची ओळख करुन घेतली. त्यांनीदेखील मुलांना तोच प्रश्न आता विचारला जो आम्हाला लेक्चरला येणारे प्रत्येक सर विचारायचे, "Why are you chosen Pharmacy?" त्यावेळीदेखील आमच्या मुखमंडलावर रिजेक्टेड पार्सल असल्याचा अविर्भाव, तेव्हा मग सर आम्हाची निराशा दुर करण्यासठी बोलले, "फार्मसी काय सोप्पच असतं, एखादं अभ्यासात जेमतेम साधं पोरगं पण पास होत, फक्त वेळच्यावेळी अभ्यास केला तर, नाही तर काही गाढवं वर्षभर टवाळ्या करत असतात, त्यांच्या साठी मग फार्मसी पॅसेंजर रेल्वे सारखीच असते. पाच-सहा वर्ष बी.फार्म पास होत नाहीत." सर अजुनही काही सांगत होते, आणि तेवढ्यात आवाज आला, "मे आय कम इन सर..?" आम्ही बघतो तर काय, दारात नितीश उभा होता. पण सरांनी त्याला, "गो आऊटसाइड.." असं म्हणतं हाकलुन दिलं. कारण सकाळी सव्वा दहा वाजता प्रॅक्टिकलची वेळ पण भाई मात्र शाळेच्या वेळेप्रमाने ११ वाजता आले होते.
"आपलं काय असंच असतं, हसा, खेळा अन शिस्त पाळा..!", असं हसतचं सावकारे सर नितीशला बाहेर हाकल्यावर म्हणत होते. तेवढ्यात तिथे अहिरे सर आले, आणि मग सावकारे सर बाहेर निघुन गेले. पण आमच्यावर लक्ष ठेवायला मात्र लॅब असिस्टंट नवले मामा होतेच, आम्ही फार्मसीची मुलं सर्व लॅब असिस्टंट्सला मामा म्हणुन हाक मारायचो, फक्त सर आले की त्यांनाही मग सर म्हणावं लागायचं. त्यादिवशी मग सर जरा उशीरा आले, मग त्यांनी आमची अटेंडन्स घेतली अन आमच्याशी गप्पा मारु लागले. उल्लेखनीय असं काही घडलं नव्हतं. प्रॅक्टिकल झाल्यानंतर आम्ही वाट पहात होतो ती नितीशची. नितीश आला आणि आम्हाला सांगु लागला, "अरे मला वाटलं आपलं प्रॅक्टिकल एकच तासाचं असतं कारण तीन बॅच आहेत ना..!" सरांनी हाकलल्यावर तु काय करत होतास? असा प्रश्न आम्ही त्याला विचारायला विसरलं नव्हतो, त्यावर तो बोलला, "अरे कैलास खोमणे नावाचा सिनियर भेटला तो मला त्याच्या दोस्तांकडे घेऊन गेला, त्यांनी मला बाहेर का फिरतोय असं विचारलं तेव्हा मी फार्मास्युटिक्स-१च्या सरांनी बाहेर हाकललयं. असं सांगितलं अन पुढे असं ही म्हणालो की त्या विषयापुढे ए.डी.एस. असं लिहिलेलं आहे." त्यावर ते हासायला लागले आणि बोलले, "आयला सावकारे सरांनी हाकालयं रे याला लॅबच्या बाहेर..!"
लेक्चरला आम्हाला फार कंटाळा यायचा कारण एक लेक्चर ऑफ पुन्हा एखाद्या सरांच लेक्चर, पुन्हा पुढचं लेक्चर ऑफ, कारण आम्हाला आजुन A.P.H.E. & P'Ceutical inorganic chemistry या दोन विषयांसाठी सर आजुन नियुक्त केलेले नव्हते. पुढचे दोन दिवस कंटाळवाणे गेले. कारण शुक्रवारी आमच्या बॅचला प्रॅक्टिकल्सला ऑफ होता, अन शनिवारी A.P.H.E.चं प्रॅक्टिकल तेही ऑफच होतं. दिवस सोमवारचा, ठरल्याप्रमाणे D.M.H.P.चं म्हणजे अनंतवार सरांच प्रक्टिकल, त्यामुळे आमची स्वारी कॉलेज मध्ये सकाळी नऊ वाजताच हजर झाली. त्यावेळी माझ्या अगोदर आला होता पंकज.
पंक्या म्हणजे एकदम "कुल डुड!" पण त्यादिवशी तो एकदम टपोरी वाटत होता, हातात लाल-पिवळे गंडेदोरे, गळ्यात दोन ते तीन लॉकेट्स, शर्टाची वरची दोन बटनं उघडी, एकाद्या बरोबर मारामारी करायला तयार असावं ह्या हेतुने त्याच्या शर्टाच्या बाह्या वर केलेल्या. पंकज मला विचारु लागला की कॉलेज कसं चाललयं, किती लेक्चर्स झाले आतापर्यंत? आज कसलं प्रक्टिकल आहे? आणि आजुन इतर किरकोळ बाबी जसं नाव-गाव, मी मात्र त्याच्याबरोबर जरा मोजकचं बोललो होतो, त्यामुळे तो थोडा निराश झाल्यासारखा वाटला.
थोड्या वेळानंतर प्रक्टिकल सुरु झालं, सरांनी आल्याबरोबर सर्वांनी प्रक्टिकल साठी लागणार अशा गरजेच्या वस्तु आणल्या की नाही हे बघायला सुरुवात केली. सहाजिकच पंकजभाऊंचा पहिला दिवस, त्यामुळे एकही वस्तु नव्हती, त्यामुळे सरांनी त्याला विचारलं की प्रॅक्टिकल्सला गरजेच्या वस्तु का आणल्या नाहीत? त्यावर पंकज बोलला, "सर आज माझा पहिलाच दिवस आहे." त्यावर सर चिडुन बोलले, "मग काय आरती ओवाळु तुझी? जा पहिल जाऊन त्या वस्तु घेऊन ये." पंकजची सरळ मग लॅबच्या बाहेर हाकलपट्टी केल्यानंतर नंबर आला तो नितीशचा! ही सलग दुसरी वेळ होती त्याची लॅबच्या बाहेर जाण्याची, कारण पोरगा र्सजिकल कॅप आणायची विसरला होता, मग सरांनी सांगितलं की "जा आणि दुकानात जाऊन घेऊन ये." आता याने जायचं ना जवळ असलेल्या दुकानात, पण हा गेला सिनियर कडे आणि दोन मिनीटात लॅबमध्ये परत हजर झाला. इतक्या लवकर ह्याला र्सजिकल कॅप कशी मिळाली याचा प्रश्न सरांना पडला आणि सरांनी त्याला विचारलं "काय रे र्सजिकल कॅप कुठुन आणलीस?" आता यानं काहीतरी कारण सांगुन वेळ मारुन न्यायची की नाही? सरळ सांगुन टाकल की र्सजिकल कॅप सिनियरची आहे ते. त्यामुळे सर गेले चिडुन आणि दिलं ह्याला लॅबच्या बाहेर हाकलुन. आमचं ते D.M.H.P.चं पहिलं प्रॅक्टिकल असंच मुलांना लॅबच्या बाहेर रवानगी करण्यात गेलं. आणि आम्हाला खात्री पटली की अनंतवार सर खरचं कडक आहेत.
नंतरचे दोन दिवस काही प्रक्टिकलला फार काही उल्लेखनीय असे काही घडंल नव्हतं. कारण एक प्रक्टिकल फार्मास्युटिकल ऍनालिसिसचं त्याला श्री पिंगळे सर होते. त्यामुळे काय प्रक्टिकल ऑफ होतं. आणि एक प्रक्टिकल तर कंम्प्युटर ऍप्लिकेशनचं आणि ते सुद्धा ऑफ होतं. याच दरम्यान कॉलेजमध्ये मविप्र समाजदिन साजरा झाला होता. यादिवशी G.A.T.E./N.I.P.E.R. या सारख्यां स्पर्धा परिक्षांमध्ये कॉलेजमध्ये प्रथम आणि द्वितीय आलेल्यांचा आणि वार्षिक परिक्षेत वर्गात पहिल्या अन दुसर्या आलेल्याचाही सत्कार त्यावेळी पार पडला होता. जो वर्गात पहिला यायचा त्याला त्या वर्गाचा विध्यार्थी प्रतिनिधी म्हणुन निवडलं जायचं.
कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी (जी.एस.) पदालाही तीच पात्रता होती. जी.एस. आणि विध्यार्थी प्रतिनिधी इतर कॉलेज मध्ये जसा निवडणुक घेऊन निवडतात तसं आमच्या कॉलेजमध्ये काही होत नाही. त्या दिवशी पहिल्यांदा दर्शन झालं ते आमच्या कॉलेजच्या प्राचार्यांच म्हणजेच श्री शेटे सरांचं. "शेटे सर आले बरं का..!" असं वाक्य कानी ऐकल्याबरोबर जेव्हा सिनियर्स आप-आपल्या वर्गात परतले होते त्या शेटे सरांना पहायची इच्छा मला कॉलेजच्या पहिल्याच दिवशी झाली होती.
मग आला गुरुवार फार्मास्युटिक्सचं म्हणजे सावकारे सरांच दुसरं प्रक्टिकल आणि आमच्या साठी होता आमचा पहिला एक्सपेरिमेंट: Cleansing & washing of laboratory glasswares थोडक्यात सांगायचं झालच तर आपण घरी जशी काचेच्या वस्तु धुतोना अगदी त्याच प्रमाणे आम्हाला सगळे काचेचे ऍप्रॅटस धुवायचे होते, फरक मात्र ऎवढाच की साध्या साबणा ऎवजी आम्हाला क्रोमिक ऍसिड मिक्शरने ते वॉश करायचे होते. सरांनी त्यावेळी पाच-पाच जणांचे चार ग्रुप पाडुन दिले आणि लॅब असिस्टंट श्री नवले सर (नवले मामा) यांनी मग सर्वांना ग्लासवेअर्स वाटुन दिले.
आम्ही सर्व जण ग्लासवेअर्स वॉश करण्याच्या नादात होतो, तितक्यात नळ चालू करण्याच्या नादात माझ्याकडुन "आयोडिन फ्लास्क" फुटला. सावकारे सर लगेच माझ्याकडे आले आणि जोर-जोरात हसु लागले आणि नंतर त्यानी त्याच्या बोलण्याच्या शैलीत "नवले घ्या ह्याच्या नावावर पहिलं ब्रेकेज लिहुन. याने तर सुरवातच आयोडिन फ्लास्कपासुन केली! काय नाव आहे रे तुझं?" माझा चेहरा तसा रडवेला झाला होता पण सरांसमोर काही न दाखवताच मी सरांना माझं नाव सांगितलं, "सर माझं नावं स्वप्निल गरुड" त्यावर सर बोलले, "गरुड.! चांगलीच भरारी मारली म्हणायची तर, आयोडिन फ्लास्क काय फक्त २५०/- रुपयात येऊन जाईल. घरच्यांना सांग फस्ट इयरच्या ब्रेकेज साठी चांगली २५००-३०००/-रुपयांची तयारी ठेवा..! अजुन किती ब्रेकेज करणार ह्या लॅबमध्ये कोण जाणे?" सर माझ्याकडे बघुन हसतं होते, बाकीच्या मुलांच्या नजरा तर सहानभुतीच्या ओझ्याखाली जणु मला तिथेच रडवतील असं वाटलं. मी आजुन सुद्धा तो फुटलेला आयोडिन फ्लास्क पाहत होतो, मग सावकारे सर नवले मामा यांच्याकडे पाहुन बोलले "नवले तो आयोडिन फ्लास्क त्याला चांगला पॅक करुन द्या, नाहीतर त्याला म्हणावं आता तो डस्टबिनमध्ये फेकुन दे." मग कुठे जड अंत:करणाने मी तो आयोडिन फ्लास्क त्या डस्टबिनमध्ये टाकला आणि उरलेलं प्रक्टिकल काही केलंच नाही. मला तर घरी काय सांगावं, आणि कसं सांगाव ते सुचेनासं झालं होतं. कारण आज-पर्यंत आईला घरकामात मदत करतांना साधी बशी देखील फोडली नव्हती, आणि आज एकदम आयोडिन फ्लास्क..!
लेक्चर्समध्ये पण माझं काही मन रमत नव्हतं, आणि मग कॉलेज सुटल्यावर कसातरी घरी आलो. आई विचारु लागली आज कसा होता दिवस? मी मग कसतरी धाडसं करुन बोललो "आई माझ्याकडुन आज २५०/-रुपयांचा आयोडिन फ्लास्क चुकुन फुटला गं!" मी असं वाक्य पुर्ण केलही नव्हतं की लगेच माझ्या श्रीमुखात आईने जोरदार चपराक लगावली, आणि आई शेजारच्या काकुंकडे निघुन गेली. मी मात्र किती वेळ हा प्रसंग आठवुन स्वतःला बोल लावुन घेत होतो. कारण काय करणार फार्मास्युटिक्सच्या पहिल्याच एक्सपेरिमेंटलाच पहिलं ब्रेकेज केलं होतं ना.! मग बरेच दिवस मी प्रक्टिकल करायला जरा भितच असे कारण "ब्रेकेजची" भिती दरवेळी मनात असायची.
D.M.H.P. च्या प्रॅक्टिकलला मग आम्हाला सरांनी त्यादिवशी आमचा पहिला एक्सपेरिमेंट दिला आणि तो होता- Compoundiung of :Sodium Chloride Mouthwash. सहाजिकच तयार केलेल्या प्रोडक्टची डिस्पेंसिंग करायची गरज नव्हती. D.M.H.P च्या प्रॅक्टिकलला सर दरवेळी आम्हाला पुढच्यावेळी साठी कोणतं प्रिपरेशन आहे त्याचा फॉर्म्युला आणि प्रोसिजर कोणत्या रेफरंस बुक्समध्ये मिळेल ते सांगायचे. मग ज्या दिवशी आम्हाला प्रॅक्टिकलला ऑफ असायचा त्यादिवशी मग लायब्ररीमध्ये जाऊन आम्हाला रेफरंसिंग करावी लागत असे. अनंतवार सरांविषयी प्रक्टिकलच्या वेळी एक गोष्ट जाणवते ती म्हणजे सर मुलांना एकदम शिस्तीत आणि दिल्या गेलेल्या प्रोसिजर नुसार प्रक्टिकल करायला लावणार, आणि सर एकदम स्वच्छताप्रिय आहेत, केमिकल्सची जरा सुद्धा नासधुस त्यांना आवडत नसे.
कॉलेज सुरु होऊन जवळपास पंधरा दिवस झाले होते. आता बहुतेक मुलांबरोबर ओळख झाली होती. पण काही जणांना त्यांच्या मनाप्रमाणे घडावं अगदी तसंच झालं, M.B.B.S., आणि Engineering साठी ज्यांना चांगल्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळालं हो्ता त्यांनी फार्मसीला रामराम ठोकला, त्यांत प्रशांत अत्रे, पांडुरंग फड यासारखे मित्र देखील होते. त्यांच्याप्रमाणेच काहीजणांनी आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला होता, त्यात अमेय चौरसिया, अतुल आवारे हितेश बडगुजर, अम्रिता देशमुख, किरण लुटे यांचा समावेश होता. प्रवेशप्रक्रियेच्या सर्वच राउंड्स संपले होते. आणि आता आमची फस्ट इयरची गाडी आता योग्य ट्रॅकवर आली असं म्हणायला काहीच हरकत नव्हती. आता A.P.H.E. शिकवण्यासाठी श्री राहुल शिरोळे नावाचे सर आले होते, तसेच P'ceutical inorganic chemistry या विषयासाठी श्री महेश डुंबरे नावाच्या सरांची नियुक्ती करण्यात आली होती. C.P.N. मधील बहुतेक शिक्षक हे २०ते २२वर्ष अनुभव असलेले त्यांच्या त्यांच्या विषयाचे गाढे पंडीत होते, त्यांच्या तुलनेत शिरोळे सर आणि डुंबरे सर एकदम नवखेच होते. आणि विशेष बाब म्हणजे या दोघा सरांच शिक्षण देखील याच C.P.N. मध्ये झालं होतं, त्यामुळे आम्ही मुलं सावकारे सरांसारखं आता शिरोळे सर आणि डुंबरे सरांबरोबर संवाद वाढवु लागलो होतो.
कॉलेज मधील दिवस रोज एक नवा अनुभव देतं होते, असाच एक दिवस होता ५ सप्टेंबर २००७, C.P.N. मधील आमचा पहिला शिक्षकदिन. त्या दिवशी सगळे फायनल इयरचे विध्यार्थी एकदम ऊस्ताही होते. चार वर्षातुन फक्त एकाच दिवशी शिक्षक बनण्याची संधी मिळते अन तीचं सोनं करयचा ऎवढाच नेम डॊळ्यासमॊर ठॆवुनच फायनल इयरचे विध्यार्थी तयारी करत होते. त्या दिवशी सगळे फायनल इयर चे विध्यार्थी प्रत्येकाची आपुलकीनं चौकशी करत होते, प्रत्येकाला त्याला काय करता येतं हे लक्षात घेऊन त्याला त्याप्रमाणे टास्क परफॉर्म करायला लावत. सगळं एकदम खेळी-मेळीचं वातावरण होतं. काही जण तर त्यांचे किस्से सांगत तर काही जण आमच्या सरांच्या नकला करुन दाखवी.
या सगळ्यांमध्ये मात्र अंकुश कोठावदे मात्र एक नंबरी मिमिक्री करणारा कलाकार. सगळ्या सर-लोकांची प्रत्येक शैली त्याने अगदी काटेकोरपणे अन अगदी सफाईनं सादर केली. बाकी जणांनी आपल्या आपल्या पद्धतीनं त्यांच अन आमचही मनोरंजन करायाचा प्रामाणिक प्रयत्न केला, पण अंकुशला मात्र तोड नव्हती. दुपारी मग आम्ही सर्व विध्यार्थी सेमिनार हॉल मध्ये जमलो. सगळे सर, आमचे प्राचार्य श्री शेटे सर देखील उपस्थित होते. आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. फायनल इयरचे काही विध्यार्थी आणि M.Pharm.चे कांबळे सर यांनी आपाआपले मनोगत सादर केले. नंतर आमच्या प्राचार्यांना ह्या वर्षी कॉलेज मध्ये गॅदरिंग साजरा करण्याची अनुमती मागितली. आम्हाला तर काहीचं कळलं नाही. कॉलेज मध्ये गॅदरिंग साजरा करण्यासाठी अनुमती मागावी लागते याचं कारण होतं श्री शेटे सरांची कडक शिस्त. पण शिक्षकदिन असल्याने त्यांनीही मुलांची मने न दुखवता आनंदाने गॅदरिंग साजरा करण्याची अनुमती देऊन टाकली.
आता आमचे A.P.H.E. चे प्रॅक्टिकल राहुल शिरोळे सरांच्या कृपेने सुरळीत चालु झाले होते. सुरवातीचे A.P.H.E चे प्रक्टिकला सर्व हिमॅटोलोजीचे एक्सपेरिमेंट होते. त्यामुळे दरवेळी आमच्यावर फिंगर प्रिकींग करायची वेळ यायची. काही मुलींना 2-3 ml रक्तदान करायची वेळ येणार होती असं लक्षात आल्यावर म्हणुन की काय मुलांना A.P.H.E. प्रक्टिकल जरा जास्तच आवडायला लागलं. असचं A.P.H.E.च्या एका एक्सपेरिमेंटलाही फिंगर प्रिक करायची वेळ आली होती. पहिल्यावेळी माझ्या ब्लड सॅंपल वर वेळ मारुन नेलेल्या अनामिकाला आता यावेळी टेंशन आलं होतं, कारण त्यादिवशी शिरोळे सर सर्वांवर जातीने लक्ष देत होते. अनामिका देशमुखला फिंगर प्रिक करायची भिती वाटायची, पण नाईलाजाने त्यादिवशी मग स्वत:च स्वताःचं फिंगर प्रिक करायचा धाडसी निर्णय घेऊन टाकला. तीनं निडल हातात घेतली अन बोटाला लावली अन तोच, "आई गं..!" म्हणतं खाली पडली. स्वतःच्या रक्ताचा एक थेंब बघुन तिला चक्कर आली होती. तिला चक्कर आल्याची पहाताच सर पण भांबावुन गेले, अन दुसरीकडे नितीन अन नितीश लगेच लॅबच्या बाहेर पडले अन थोड्याच वेळात परतले ते ग्लुकॉन-डी अन इलेक्ट्रॉल पावडर घेऊनच..! नंतर मग अनामिकाला घरी पाठवुन दिलं. मग किती दिवस आमची बॅच तीला या गोष्टीमुळे तिला चिडवत असायची.
शिरोळे सर आम्हाला जरा कडक वाटायचे पण डुंबरे सर जणु एकदम कॉलेजकुमार. मुलांशी ते मनमोकळेपणे गप्पा मारायचे. मुळचे निफाड येथील राहणारे अन मराठी असणारे डुंबरे सर मुलांशी हिंदीत का बोलायचे ते आम्हाला कळायचं नाही. लेक्चरपेक्षा त्यांना प्रॅक्टिकल घेणं सोयीचं वाटायचं. प्रॅक्टिकलला आले की ते श्री खेलुकर मामा (दाजी) या लॅब असिस्टंटना आवाज द्यायचे, "तो दाजी,Indian Pharmacopoeia (I.P.)दो, सबको एकबार प्रसिजर (Procedure) बताता हुँ.! सब ठिकसे 0.1N NaOH, 0.1N HCl का पिपरेशन (Preparation) करके ड्रॉप बाय ड्रॉप ऍड करके स्टॅंडर्डाइजेशन करना, फायनल रिझल्ट फॅक्टर कॅल्क्युलेशनसे करके दिखाना और नो मॅनिप्युलेशन." अशी त्यांची आम्हाला प्रॅक्टिकल सांगायची पद्दत..
फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा विषय आम्हाला खुद्द श्री संजय वाघ सर शिकवणार होते. "वाघ सरांच्या लेक्चरला फक्त नीट लक्ष दिलं आणि नंतर जास्त अभ्यासही केला नाही तरी मुलं वार्षिक परिक्षेत ओ.सी. या विषयात चांगला स्कोर काढतात. आयला सर एखादा टॉपिक शिकवल्यानंतर म्हणतात, ’If you have any difficulty ask me 100 times..!' सरांच शिकवणचं इतक परफेक्ट असतं की एखादी डिफीकल्टी शोधायला मेंदुवर जोर द्यावा लागतो." असं सिनियर्स आम्हाला सांगायचे. त्यावेळी जणु सिनियर्स सांगितली तीच पुर्व दिशा असं वाटायचं. पण त्यांनी दाखवलेली दिशा नक्कीच पुर्व आहे याची खात्री आम्हाला हळुहळु पटतं गेली, कारण त्यांचे अनुभवाचे बोल होते ना..!
शिक्षकदिन झाल्यानंतरच काही दिवसांनी आमची पहिली सेशनल परिक्षा होती, त्यामुळे मग फायनल इयरने ठरवलं की आम्हाला सेशनलच्या पुर्वीच आमची हक्काची फ्रेशर्स पार्टी देऊन टाकावी. त्यांनी हा विचार केला नसेल तोच ही बातमी आमच्या वर्गातील मुलांना समजली. अन सारी मुलं त्या दिवसाची वाट पाहु लागली. पण फ्रेशर्स पार्टीच्या दोन-ते-तीन दिवस अगोदर आम्हा विध्यार्थीवर्गाची स्क्रिनिंग होणार होती, अन त्यातुन मग तीन मुले आणि तीन मुलींची अंतिम स्क्रिनिंगकरिता निवड होणार होती, अन त्यातुन ठरणार होत की कोण मि.फ्रेशर्सअन कोण मिस.फ्रेशर्सबनणार ते...!
Pharmaceutical Organic Chemistry या विषयाच्या प्रॅक्टिकलला आम्हाला सावकारे सरच शिकवणार होते. आमचे सुरवातीला साधे-साधे एक्सपेरिमेंट होते, जसे Melting point determination, boiling point determination, elemental analysis त्यामुळे आम्ही जरा निश्चिंत असायचो. आम्हाला २-२ जणांच्या गृप मध्ये प्रॅक्टिकल करावं लागत असे. आमचे रोल नंबर जरी वेगळे होते तरी पंकज आणि मी आम्ही दोघांनी मिळुन वर्षभर प्रॅक्टिकल करायचं ठरवलं होतं. Elemental analysis करतांना मजा यायची कारण आम्हाला कोणते कंपाऊंड्स दिले ते श्री मुरडनार मामांना (लॅब असिस्टंट) विचारल्यावर ते सांगुन टाकायचेत, त्यामुळे आम्हाला फक्त ठराविक टेस्ट करुन सरांना दाखवावं लागत होतं.
एकीकडे आमचं कॉलेज आता सुरळीत चालु झालं होतं, पण आमच्यातील निराशा काही कमी होतं नव्हती. आमच्या निराशेचं वर्णन हे असं होतं
निराशेचे ते पहिले महिने चार,
D.M.H.P. च्या referencingचा कंटाळाच फार,
P'-Ceuticsच्या Vivaला सारेच लाचार,
Analysisच्या प्रॅक्टिकला तर सावळा गोंधळच फार,
O.C. च्या प्रॅक्टिकलला कॉमन ब्रेकेजचा बोजा नेहमीच तयार,
A.P.H.E.चं प्रॅक्टिकलं ठरायचं मुलींमुळे रंगतदार,
पण लेक्चरला नेहमी कंटाळा अन त्यात झोप सुटायची फार,
कारण निराशेचे ते पहिले महिने चार..!
माझे इतर कॉलेजचे मित्र त्यांच्यासोबत घडलेल्या गमती-जमती आनंदाने सांगायचे पण सुरुवातीचे काही महिने आम्हाला काही उमजायचं नाही. निदान फ्रेशर्स पार्टी मुळे तरी मुलांना थोडं बरं वाटलं होतं. मी तर आजारी असल्याने आमची फ्रेशर्स पार्टीला उपस्थित नव्हतो, पण आमच्या मुलांनी ती पार्टी चांगलीच एंजॉय केली असल्याचं त्यांच्या सांगण्यातुन जाणवत होतं. त्यावेळी आमच्या वर्गातील प्रियंका कुलकर्णी हिला Mrs. Fresher तर अक्षय सोनवणे याला Mr. Fresher साठी निवडलं होतं.
खरंतर आम्हाला प्रॅक्टिकलाच जास्त बर वाटायचं कारण तेथे प्रत्येकाला स्वताःला प्रुव करायचा चान्स आहे, असं त्यावेळी आमच्या मनावर सिनियर्स कडुन बिंबवण्यात आलं होतं. आपण तयार केलेलं प्रिपरेशन आणि लेबल सगळ्य़ात चांगलं असावं असं त्यावेळी सगळ्यांना वाटायचं. अगदी "Simple Syrup(I.P.)" म्हणजेच साध्या शब्दांत सांगायचं तर "साखरेचा पाक" असो की "Sodium chloride mouthwash (B.P.)" म्हणजेच आपण घसा साफ करतांना जे मीठपाणी वापरतोना तेच. तरीही आमचा उस्ताह अनन्यसाधारण असायचा! प्रॅक्टिकल्सच्या रेफरंसिंगसाठी आमची "A batch" सगळ्यात पुढे असाय़ची. D.M.H.P. च्या प्रॅक्टिक्ल्ससाठी आम्ही फार कष्ट करायचो कारण अनंतवार सर आम्हाला प्रॅक्टिकल्सला दहा पैकी एक ते चार या रेंज मध्येच मार्क द्यायचे. त्यामुळे आपल्याला जास्त मार्क मिळावे याकरिता प्रत्येकाची धडपड होती. सर्व बरोबर असुन देखील सर इतके कमी मार्क्स का देतात हे रहस्य आम्हाला अजुन उमजलचं नाही.
आम्हाला प्रॅक्टिकल्ससाठी जरनल मिळाले होते त्यामुळे आम्ही सर्व ते पुर्ण करायच्या मागे लागलो. सावकारे सरांचं प्रॅक्टिकल होतं. सर सगळ्यांचे जर्नल बघु लागले होते. माझा नंबर आला सर माझं जर्नल बघु लागले, माझं अक्षर सुवाच्य होतं अन जर्नलही मी टापटीप लिहिलं होतं हे बघुन सरांच्या तॊडावर समाधान जाणवत होतं, पण अचानक सर हसुन बोलले "काय रे कोणाचं जरनल कॉपी केलयं? पहिल्या एक्सपेरिमेंटची ही थेरी फक्त तुझ्याच जर्नल मध्ये कशी काय? तुझ्या बॅचच्या सगळ्या मुलांनी तर एकसारखीच थेरी लिहिलेली आहे. सिनियर्सचं जरनल कॉपी केलेलं दिसतयं. त्यांनी सर्वांनी अशीच थेरी मागीलवर्षी मागीलवर्षी होती. कोणात्या सिनियरचं जरनल कॉपी केलयं खरं सांग? कॉपी केलेले जरनल मी लगेच ओळखतो. "मी मात्र सरांना सांगु लागलो की मी खरचं रेफरंसिंग करुनच जरनल लिहीलेलं आहे, पण सर ऐकायला तयार नव्हते. त्यावेळी नितीशनं सांगितलं की ती थेरी Cooper & Gun's नावाच्या पुस्तकात आहे. आम्हाला सिनियर्स कडुन असा प्रसंग घडु शकतो याची आधीच कल्पना दिलेली होती. अनं अशावेळी काय करायचं तेही सांगितलेलं. त्यामुळे मी सरांना अखेर माझं म्हणनं पटवुन देण्यासाठी लगेचच सरांना Cooper & Gun's या पुस्तकाचं वर्णन सांगितलं. सरांना कदाचित अशाच उत्तराची अपेक्षा असेलं असं मला त्यावेळी वाटलं कारण सर त्यावेळी हसायला लागले.
आमचे लेक्चर कधी-कधी मजेशीर तर कधी कधी फार कंटाळवाणे वाटायचे. अनंतवार सरांच्या लेक्चरभर लक्ष टिकवुन ठेवणं म्हणजे कठीण काम होतं. कारण आमचे लेक्चर दुपारी २ ते ५ यावेळेत असायचे, त्यात जेवण झाल्यानंतर लेक्चर आणि लाईट गेलेली, त्यामुळे अर्धा-तास झाला की मुलं पेंगायला लागायची. अमेय हा माझा मित्र तर असा भयानक पेंगायचा की बसं.! अन तेही पहिल्या दुसर्या बेंच वर असतांना देखील. अमेय वर्गात झोपा काढतो हे आमच्या कॉलेजच्या सर्व शिक्षकांना माहिती आहे, त्यामुळे त्याच्या झोपेकडे सर्व शिक्षक दुर्लक्ष करतात. अहिरे सर आम्हाला Pharmacognosy-1 या विषयाच्या नोट्स डिक्टेट करायचे, त्यामुळे लिहिण्याच्या नावाखाली मुलांची वामकुक्षी पुर्ण व्हायची, मग नितीशकडुन लेक्चर झाल्यानंतर त्याची वही घ्यायची आणि झोपेत राहुन गेलेल्या नोट्स मधल्या रिकाम्या जागा भरायचा कार्यक्रम पार पडायचा. सावकारे सरांच लेक्चरला मात्र मुलं एकदम मस्तपणे लक्ष द्यायचे, कारण सर दैनंदिन जीवनातील उदाहरणं देऊन शिकवायचे त्यामुळे आम्हाला मजा यायची. होस्टेलच्या मुलांना सिनियर्स कडुन सांगितलं होतं की एके दिवशी कंटाळा आला की किरकिरे सर एक तासाच्या लेक्चर मध्ये किती वेळा ओके म्हणतात ते मोजा. एकदिवस खरचं मुलांनी मोजुन पाहिलं तर १२७ ओके पर लेक्चर असं मुलांना आढळलं होतं. त्यावरुन त्यांना दिलेलं मि. ओके हे नावं किती सार्थ होतं हे आता कळलंच असेल..
शिरोळे सर हातात "टॉरटोरा" नवाचं पुस्तक घेऊन यायचे, सुरुवातीचे एक दोन दिवस त्यांनी बेसिक कंसेप्ट शिकवण्यावर भर दिला, पण नंतर ते जेव्हा लेक्चरला यायचे, आधीच्या लेक्चरला काय शिकवलं ते आम्हाला समराईज करावं लागायचं. या गोष्टीमुळे मुलांच्या नजरेत काळे सर हळुहळु खलनायक बनत चालले होते. याऊलट डुंबरे सरांच लेक्चर असायचं, नुसती मजा यायची कारण थोडा वेळ शिकवल्यावर मुलं लगेच ऑफ मागायची अन तो मिळायचासुद्दा. डुंबरे सर हे श्री पिंगळे सरांच्याऐवजी आम्हाला इनऑरगॅनिक केमिस्ट्री शिकवत होते, शिवाय त्यांचा मुळ विषय ऑरगॅनिक केमिस्ट्री होता, त्यामुळे ते कंटाळुन जायचे. वाघसरांच्या लेक्चरला मुलं डोळ्यात तेल घातल्याप्रमाणे लक्ष द्यायची. सर लेक्चरला येतांना त्यांच्यासोबत वेगवेगळे मॉडेल्स आणायचे, त्यांच्या मदतीने ते आम्हाला स्टिरिओकेमिस्ट्री शिकवायचे. इलेक्ट्रॉन क्लाउड, इंडक्टिव्ह इफेक्ट, कायरल कार्बन, आर-एस नॉमेनक्लेचर, रेझोनन्स, यासारख्या टर्म्स आम्हाला फस्ट इयरलाच समजणं गरजेचं आहे असं सिनियर्स सांगायचे, त्यामुळे सिंग सरांच्या लेक्चरला लक्ष देणं गरजेचच होतं, शिवाय सर जरा हळु आवाजात बोलायचे, त्यामुळे कान टवकारुन लक्ष दिल्याशिवाय काही गोष्टी समजत नव्हत्या. कंप्युटर अन बायोस्टॅटचं लेक्चरला आम्हाला शिकवण्यासाठी आजुन कोणत्याच शिक्षकांची नियुक्ती झाली नसल्याने ते लेक्चरही आम्हाला ऑफच मिळायचं, एखाद्या दिवशी मग आम्हाला दुसरे सर शिकवायला यायचे.
असचं एकदा आमच्या वर्गावर आले होते श्री रॉय सर. खरं तर रॉय सर एम.फार्मच्या विध्यार्थ्यांना शिकवत असतं. श्री रॉय सर आमच्या कॉलेज मधील फार मोठी असामी आहेत. त्यांनी अगदी गमतीशीर पद्धतीने आम्हाला फार्मसी फिल्ड बद्दल माहिती दिली, अन हळुहळु थोडंस वातावरण गंभीरते कडे वळवुन आम्हाला "फार्मासिस्ट" म्हणजे काय ते आमच्या बुद्धीच्या कक्षांना समजणार आणि पटणार अशा शब्दांत सांगितलं. त्या दिवशी घरी परततांना हा एक वेगळाच अनुभव घेऊनच प्रत्येक जण वर्गाच्या बाहेर पडला असावा. कारण रॉय सरांच्या त्या लेक्चर मुळे आता आमच्या त्या रिजेक्टेड पार्सलच्या कंसेप्टचा चांगलाच राळ झाला होता.
आमची फ्रेशर्स पार्टी छान झाली होती, पण आता आम्हाला वेध लागले होते ते आमच्या पहिल्या सेशनलचे. आमचे तीन पेपर दिवाळीच्या सुटीच्या अगोदर आणि उरलेले दिवाळीची सुटी संपल्यानंतर होते. त्यामुळे सहाजिकच दिवाळीची सुटी देखील तणावातच गेली. बाकीच्या फार्मसी कॉलेज मध्ये प्रॅक्टिकल अन थेरी पेपर हे वेगवेगळे होतात, पण आमच्या कॉलेजला तसं नव्हतं, सकाळी एका विषयाचं प्रॅक्टिकल असायचं तर दुपारी वेगळ्याच विषयाचा पेपर त्यामुळे आम्हाला दोन्ही गोष्टी सांभाळण्याकरता चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत असे.
आम्हाला पहिल्या सेशनला टेंशन होतं ते अनंतवार सरांचं कारण सर प्रॅक्टिकल्सला फारच कमी मार्क्स देतात असं सिनियर्स सांगायचे अन भरीस भर म्हणजे सरांची शिस्त, आणि प्रत्येकाला तीन प्रॉडक्ट बनवायचे सहाजिक टाईम मॅनेजमेंटची परिक्षाचं होती, शिवाय व्हायवा आणि सिनोपसिस राखुनच ठेवले होते. अशी आमची त्यावेळी गत असायची. परिक्षेनंतर मिळालेले मार्क्सही फार समाधानकारक नव्हतेच, कारण प्रत्येकाला १०-१४ या रेंज मध्ये मार्क्स मिळाले होते. बाकीच्या फार्मसी कॉलेजमध्ये असलेल्यांना तर १६-१९ या रेंज मध्ये मार्क्स मिळायचे. आम्ही सिनियर्सला जेव्हा हे सांगितलं, त्यावेळी ते म्हणायचे, "आपल्या कॉलेजमध्ये मिळणारे १०-१२ मार्क्स म्हणजे बाकीच्या कॉलेजच्या १८-१९ मार्कांसारखेच आहे, कारण आपल्या कॉलेजचे पेपर जर त्यांना सोडवायला दिले तर त्यांना १० मार्क्स पाडणं देखील अवघड असेल. आपल्या कॉलेजमध्ये फार्मसी काय असतं ते हळुहळु कळेल तुम्हाला.
सिनियर्सला नक्की काय म्हणायचं होतं त्यावेळी नाही पण नंतर कळत गेलं. आमच्या कॉलेजचं यंदाच रौप्य महोत्सवी वर्ष होतं त्यामुळे तुम्हाला फार्मसी फिल्डचा आणखी एक चेहरा बघायला मिळेल असं सिनियर्स सांगत होते. त्यामुळे आम्ही मग कधी एकदाची सिल्व्हर जुबली साजरी होते, याची वाट पहात बसलो. कारण फार्मसी काय आहे ते एकदाच कळणार होतं, त्यामुळे आमचे निराशेचे महिने एकदाचे संपणार होते.
No comments:
Post a Comment