Sunday, February 5, 2012

"प्रेमासाठी वाट्टेल ते" या माझ्या पहिल्या नाटकाच्या काही आठवणी..!"

        ज्या एका नाटकामुळे माझ्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली, आणि सर्वसामान्य असलेल्या स्वप्निल गरुडला लेखक म्हणुन कॉलेज जीवनात ओळख मिळाली त्या प्रेमासाठी वाट्टेल ते, या नाटकाच्या सोनेरी आठवणी आपल्यासमोर मांडतांना मला खरंच खुप आनंद होतोयं. मला बहुतेकांनी विचारलं की या वयात इतकं सगळं लिहायची प्रेरणा नक्की कशातुन मिळते? आणि प्रत्येकवेळी माझं उत्तर असायचं की "प्रेमासाठी वाट्टेल ते" या माझ्या नाटकातुनच..! येत्या २० फेब्रुवारीला या लिहिलेल्या नाटकाला चार वर्ष पुर्ण होतील, त्यानिमित्तानंच या नाटकाच्या आठवणी तुमच्यासाठी घेऊन आलोयं.
        सेकंड इयर बी.फार्मसीला असतांना मला सुदैवानं कधी चारोळ्या सुचत गेल्या, तर कधी कविता करतांना मन रमत गेलं, कॉलेजमध्ये असलेल्या फार्माकॉर्नर साठी कित्येकदा काही लिहावसं वाटलं. कॉलेजमध्ये मग जेव्हा डेज, स्पोर्ट्स वीक आणि गॅदरिंगची चाहुल लागली, आणि एकदिवस मग वर्गात फिजिकल फार्मसीच्या लेक्चरला मग प्रेमासाठी वाट्टेल ते या नाटकाची संकल्पना सुचली. डेज, स्पोर्ट्स वीक आणि गॅदरिंग असलं की एरवी मुला-मुलींमध्ये असलेला कोल्ड वॉरला जणु विश्रांती मिळायची. अशातच मग एकप्रकारे भावनिक जवळीक वाढली की कधी कधी प्रेमात पडल्याचा भास वर्गात निर्माण व्हायचा. तु हो म्हंटली तर जगेन, नाहीतर दुसरी बघेण, अशी म्हणणारी मुलं आमच्या वर्गात नव्हती ही गोष्ट त्यावेळी जाणवायची. आणि मग एक सामान्य मुलगा आपली प्रेम व्यक्त करण्याची धरपकडच नाटकात दाखवायचं असं मी आणि माझ्या मॅव्हेरिक्स या ग्रुपने ठरवलं.
        म.वि.प्र. कॉलेज ऑफ फार्मसी, नाशिक हे कॉलेज तसं ओळखलं जात गुणवत्तेसाठी आणि कडक शिस्तीसाठी, त्यामुळे विध्यार्थांचा अभ्यासक्रमाकडे जास्त भर असायचा. हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच मुलं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीत खर्‍या अर्थानं ऍक्टिव्ह असायची. फस्ट इयरला असतांना झालेल्या गॅदरिंगमध्ये फायनल इयरच्या मुलांनी "बॅक टु स्कुल" हे बहुचर्चित नाटक सादर केलं होतं. गॅदरिंग जणु सिंगिंग आणि डान्सिंग शोच आहे अस वाटुन जायचं कारण अख्या गॅदरिंगमध्ये एकच नाटक होतं ना मित्रांनो. त्यामुळे नाटकच करण्याच आम्ही ठरवलं. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न या म्हणीप्रमाणे "प्रेमासाठी वाट्टेल ते" या नाटकालाही खुप प्रसंगांना तोंड द्यावं लागलं होतं.
        नाटक लिहायला प्रस्तावने पासुन सुरुवात जोशपुर्ण आवेशानं झाली, नाटकाची थिम ठरली, पण नाटकाचा नायक कोणाला करायचा हा यक्षप्रश्न सोडवणं गरजेचं होतं, शेवटी मग आमच्या ग्रुप मध्ये असलेला अतुल आवारेला नाटकाचा नायक बनवायचं ठरवलं. अतुल आवारेला नाटकाचा नायक बनवणं आमच्या थिमला सपोर्टिंग असच होतं, कारण अतुल वर्गातल्या काय पन बॅचमध्यल्या मुलींशीही खुपच कमी बोलायचा, थोडासा लाजाळु होता असं म्हंटलं तरी चालेलं. बाकीच्यांचे रोल मग सहजपणे ठरले, नितीश चौधरी हा आमच्या ग्रुप मधला एक अभ्यासु आणि प्रेमाचा गुलकंद आयुष्यात चाखुन बघितलेला मस्त बंदा होता, त्यामुळे सहाजिक त्याच्या वाटेला स्टुडियस बॉयचा रोल आला. शंतनु चंद्रात्रे उर्फ सार्वजनिक भाऊ हा वर्गातला सगळ्यात हजरजबाबी मुलगा, शाब्दिक कोट्या करणं आणि कोणत्याही गोष्टीत जोक सुचणं ही त्याला मिळालेली जणु जन्मजात देणगीच होती, अशा या शंतनुला सार्वजनिक भाऊ बनवलं. अमेय चौरसिया म्हणजे आमच्या वर्गातला लव्हगुरुच, कित्येक मुलींना हवाहवासा वाटणारा बॉयफ्रेंड, म्हणुन अमेयला लव्हगुरुचा रोल दिला. नितीन आखाडे नावाच्या आमच्या मित्राला अमेयच्या असिस्टंटची भुमिका दिली, नितीनवर मकरंद अनासपुरेंचा भरपुर प्रभाव असल्याचं त्याच्याशी बोलतांना प्रत्येकाला जाणवेल, तरीही कानाला हवीहवीशी वाटणारी त्याच्यी गावराण भाषा ठळकपणे लक्ष वेधुन घ्यायची. उत्कर्ष वाटाणे हा वर्गातला उत्तम डान्सर होता, गोविंदाची डान्स स्टाईल त्याला आवडायची, सहाजिकच त्याला डान्सर बनवलं. सेकंड इयरला असतांना वर्गातली काहीजण जी.आर.ई. ह्या स्पर्धापरिक्षेची तयारी करायची, त्यामुळे त्याग्रुपचा प्रतिनिधी करु शकेल असा एक जण आम्हाला हवा होता आणि तो निलकंठ पारेकरच्या रुपात आम्हाला मिळाला.
        नाटकातला सगळ्यात अवघड रोल होता तो नाटकाच्या शुभचिंतक मित्राचा. त्यावेळी नुकत्याच रिलिज झालेल्या दोस्ताना या पिक्चरमधला दोस्ताना त्या शुभचिंतक मित्राला करायचा होता, आणि तो रोल करायचा म्हणजे आम्हा फार्मसीच्या मुलांच्या शब्दांत सांगायचं तर, कोणाच्याच जी. मध्ये डी. नव्हता. बाकी कुणाचे रोल नसतील तरी चालतील पण शुभचिंतक मित्राचा रोल व्हायलाच पाहिजे या मतावर सगळा ग्रुप अडुन बसला. आणि जणु पैंजेचा विडा उचलावा या आवेशात हितेश बडगुजर याने तो रोल करायच ठरवलं आणि माझ्याच काय आमच्या ग्रुपची एक मोठी चिंता दुर केली. नाटकाचं लेखन, संपादन, निर्माता आणि दिग्दर्शनाच्या चौरंगी भुमिकेशिवाय नाटकात मी छोटासा रोल करायचं ठरवलं होतं. कॉलेजमध्ये चार वर्षात माझ्यात फक्त दोनच गोष्टी बदलेल्या होत्या एक म्हणजे माझी लेखनशैली आणि दुसरी म्हणजे माझी तब्येत..! आणि सहाजिकच चांगली तब्येत होती म्हणुन बॉडी बिल्डरचा रोल मी करणार होतो. नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी आमच्या ग्रुपच्या पंकजभाऊ चौधरींवर सोपावली होती.
        सामान्य मुलाला प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याचे मित्र आणि लव्हगुरु फंडे सांगणार होते, आणि स्टुडियस बॉय, भाऊ, शुभचिंतक मित्र, बॉडी-बिल्डर, डान्सर, जी.आर.ई. अस्पायरंट, लव्हगुरु अशी मुलांची पात्र ठरली. ज्याच्यात जे टॅलेंट होतं, त्याला त्याच पद्धतीचा रोल दिला होता. मुलं तर झाली पण नाटकात मुली पाहिजेत ना राव, त्याशिवाय नाटकाचा हिरो प्रेम व्यक्त कुणासमोर करेल?
        आमच्या कॉलेजमधल्या मुलींनी गॅदरिंग मध्ये डान्स केलेला चालतो, पण नाटकात काम करायला विचारलं की लगेच घरचे रागावतील असा बहाणा मुली पुढे करायच्या. नाटकात काम करु पण आधी आम्हाला नाटकाची स्क्रिप्ट वाचायला द्या अशी त्यांची मागणी असायची. त्यामुळे आमचा संतापही व्हायचा आणि निराश व्हायची वेळ आमच्यावर आली होती. सिनियर मुलीला रोल द्यायचा तर आमच्या नाटकाचा हिरो तयार नव्हता, त्यामुळे वर्गातल्या मुलींना विनवणं भाग होतं. प्रयत्ने वाळुचे कण रगडिता तेलही गळे, या उक्तीप्रमाणे आमच्या प्रयत्नांना यश आलं आणि अनामिका, वर्षा आणि हिना या तीन मुली नाटकात काम करायला तयार झाल्या. अनामिका नाटकाची नायिका होती, बाकीचे काय म्हणतील या गोष्टीचं तिला टेंशन यायचं. शेवटी नाटकानंतर कोणी तिला चिडवणार नाही याची खात्री आम्ही तिला दिली.
        नाटकच्या नायिकेची चिंता दुर झाल्यानंतर आम्ही नव्या उमेदीनं नाटकाची प्रॅक्टिस करु लागलो. नाटकाची स्क्रिनिंगच्या वेळी सौ बेळे मॅडम होत्या त्यामुळे मुलांच दडपण कमी झालं, आमच्या नाटकाची स्क्रिप्ट आणि नाटकाचं शिर्षक बघुन मॅडम हसल्या आणि त्यांनी आमच्या नाटकाला हिरवा झेंडा दाखवला. त्याच दिवशी थिम डे कॉलेजमध्ये साजरा झाला, आणि त्यादिवशी "वंशाची पणती" या आमच्या पथनाट्याला प्रथम पारितोषिक घोषित झाल्यावर आम्हाला खुप आनंद झाला. आमच्या ग्रुप मध्ये माझ्याशिवाय इतर कोणीच नाटक असो वा इतर काहीही स्टेजवर कधीच काही सादर केलं नव्हतं, आणि अशा ग्रुपला घेऊन आपण नाटक सादर करु शकतो, नाटकाच पहिलं बक्षिस मिळवु शकतो अशी अंधुकशी आशा मनात निर्माण झाली, अंधुक होती तरी काय, पण आशा तर होती ना..!
        आमची नाटकाची प्रॅक्टिस सुरु होती, आणि दुसरीकडे नाटकाची जणु पब्लिसिटी व्हावी म्हणुन आम्ही आमच्या थर्ड इयरच्या सिनियर्सला आमच्या नाटकाबाबत सांगायचो. त्यावेळी फायनल इयरच्या मुलांपेक्षा थर्ड इयरच्या मुलांची जास्त चालायची. ठरवलं तर फडतुस ऍक्टला डोक्यावर घेतील आणि चांगल्यातल्या चांगल्याला ऍक्टला पायदळी तुडवतील अशी ती बिंद्धास्त मुलं होती. थर्ड इयरच्या वर्गातल्या मुलांबरोबर माझं चांगल ट्युनिंग जुळायचं, त्यामुळे त्यांचा आम्हाला फुल्ल सपोर्ट मिळाला. आणि अर्धी लढाई तिथेच जिंकल्यासारखं वाटायचं. आमची नाटकाची प्रॅक्टिस अमेयच्या फ्लॅटवर रंगायची, कॉलेज लाईफ मध्ये आमचा तो पहिला नाईट आऊट होता. मुलांनी क्वांट्री करुन आणलेलं जेवणं, एकत्र बसुन खातांना मजा यायची. रात्री उशीरापर्यंत यासगळ्यांना जागवुन प्रॅक्टिस करवुन घ्यायची, आणि सकाळी पुन्हा कॉलेजमध्ये परतायचं, तिथेही मग नाटकातल्या मुलींबरोबर थोडीशी प्रॅक्टिस करायची. त्यातच स्पोर्ट्स वीकमध्ये चिअरिंग करुन चांगलीच घसाफोड केली होती, म्हणुन खुप सार्‍या कंठसुधारक गोळ्या दिवसभर खाव्या लागत होत्या. बॉडी-बिल्डरचा रोलमध्ये बॉडी निट दिसली पाहिजे म्हणुन ग्राउंडवर असो अमेयच्या फ्लॅटवर वेळ मिळाला की व्यायामाला सुरुवात होऊन जायची.
        नाटकाच्या स्क्रिप्ट बाबत मी खुप इनसिक्युर फिल करायचो, आपल्या स्क्रिप्टचे पंचेस कुणाला कळु नये याची इतकी काळजी घ्यायचो की नाटकाच्या नायिकेला म्हणजे अनामिकाला तिचे जितके संवाद होते तितकेच एका कागदावर लिहुन दिले, कोणत्यावेळी तिची एंट्री आहे ते तिला सांगितलं आणि तितके संवाद पाठ करायला लावले, बाकीच्या दोघींना तर संवाद म्हणुन फक्त १ ते २ शब्दच होते. हितेश मला सांगायचा की तिला पुर्ण स्क्रिप्ट देऊन टाकायची, पण माझ्या मनाची तयारीच नव्हती. दरम्यान हितेशचा बर्थ डे जोशात पार पडला. रोज डे च्या आदल्या दिवशी मग अचानक सगळ्या ग्रुपला काय झालं ते कळेना, प्रत्येकजण नाटक करायचं नाही असं म्हणु लागला, इतकी मेहनत घेऊन सुद्धा मुलांना आत्मविश्वास येत नव्हता, नाटक नाही होणार या विचारानं माझ्या डोळ्यांत पाणी आलं, शेवटी पंकजभाऊने सगळ्यांना समजावलं. त्यारात्री प्रॅक्टिस करतांना जाणवत होतं की बाकीच्यांसाठी नाही, पण माझे मित्र माझ्यासाठी मेहनत घेतायं आणि उद्या नाटकात नक्कीच यशस्वीपणे सादर करतील हा विस्वास मला देतायं. 
        शेवटी तो गॅदरिंगचा दिवस उजाडलाच, २०-फेब्रुवारी-२००९, आयुष्यातल्या अनेक सोनेरी दिवसांपैकी एक..! गॅदरिंग सुरु होऊन साधारण एकतास झाला तेव्हा कळलं की आमचा ड्रामा जेवण झाल्यानंतर होणार आहे. पण माझी कविता सादरी करण लगेच काही मिनिटांत होतं. त्यावेळ पर्यंत मी कविता करतो हे सर्वांना ठाऊक होतं, पण त्यादिवशी आजपर्यंत आमच्या कॉलेजच्या इतिहासत कधीच न घडणारी, आणि कुणी तशी करायची कल्पनाही न करु शकणारी गोष्ट करायचं मी ठरवलं. आयुष्यात जर मी कधी सगळ्यात जास्त हिंमत केव्हा दाखवली असं मला विचारलं तर मी या गॅदरिंगच्या दिवसाचाच उल्लेख करेल. कारण मी कविता सादर करायला आल्यानंतर, जेव्हा मी माझी नाही तर मर्ढेकरांची एक सुंदर कविता सादर करतोय आणि तेही "काव्या फक्त तुझ्यासाठीच.." असं सगळ्या कॉलेजच्या मुला-मुलींसमोर सांगुन टाकलं होतं, आणि दोन-तीन मिनिटे त्या हॉलमध्ये मुलंच काय पण मुलीही चिडवत होत्या, सोबत कवितेच्या प्रत्येक ओळींनंतर टाळ्या पडल्या होत्या.
        हे सर्व झालं होतं, पण त्यावेळी सुदैवानं काव्या तिथे हजर नव्हती. पण ती जेव्हा आली त्यावेळी बाकीच्या मुलींनी तिला तो किस्सा सांगितला. इकडे सिनियर्स तर गोंधळुन गेले. कारण त्यांच्यामते मी तिला सर्वांसमोर जणु प्रपोज करुन टाकलं होतं. जो-तो मला खरचं काय भानगड आहे ते विचारु लागला, पण मी आमच्या नाटकाच्या प्रॅक्टिसला निघुन गेलो. "आयला, आपल्या डायरेक्टरने जोश-जोश मध्ये येऊन सगळ्यात मोठा स्टंट देऊन टाकला ना यार..!" असं आमच्या ग्रुप मध्ये संवाद रंगु लागले, मग हळु हळु मला टेंशन यायला लागलं, काव्याने घरच्यांना बोलवलं किंवा एखाद्या सरांना सांगितलं तर खुप मोठा लोचा होऊन जाईल, कारण जे काही घडलं ते सगळ्यांसमोर घडलं होतं, याचा विचार करता करता आता माझ्या हिम्मतची बारा वाजले. माझ्या चेहर्‍याकडे बघुन मग मुलं, "प्यार किया तो डरना क्या", असं म्हणतं होते. पण मी कोणाला घाबरत नाही याचा आव आणत होतो, पण मुलं ते मान्यच करत नव्हती, त्यामुळे नाटकात वापरणार असणार्‍या टि-शर्टवर मग मीच, ओल्या खडुने पुन्हा, "काव्या फक्त तुझ्यासाठीच.." असं लिहुन टाकलं. तेव्हा कुठे माझ्या ग्रुपची मुलं थोडी शांत झाली. पण ज्यावेळी आमची जेवणाची वेळ झाली, त्यावेळी अन्नाचा एक घासही माझ्या घशाखाली उतरेनासा झाला, डोक्यात फक्त काव्याचाच विचार घुमत होता, माझी ती दयनीय स्थिती बघुन मुलांचे जोक्स रंगत होते, पण मी त्यांना "अरे पहिल्यांदा आपला ग्रुप नाटक सादर करतोय, आपल्या नाटकाची इतकी पब्लिसिटी झाली आणि आता कसं होणार याचं टेंशन आलयं असं पटवत होतो."
        जेवणं झाल्यावर आमचा पुर्ण ग्रुप मग थोरात हॉलमध्ये आला, अनामिकालाही आता टेंशन येतं होतं, कारण थर्ड इयरच्या मुलांनी आधी ड्रामा सादर केलेल्या मुलांची फार ऊडवली होती. आपल्या ड्रामाला काही तसं होणार नाही, तुझ्या रोल वरुन तुला कोणी नंतर चिडवलं तर मी बघुन घेईल, मारामारी करायची वेळ आली तर भरपुर बॅकिंग आहे असं सगळं समजावत मग कुठे तिला जरा धीर आला. आणि मग सुरुवात झाली ती आमच्या नाटकाला, तीही जणु काव्या फक्त तुझ्यासाठीच या आवेषातच. आमच्या आधी प्रसादच जनजागृती हे नाटक झालं होतं, नाटकाला प्रस्तावनेचा काही पत्ता नव्हता, फक्त कलाकारांची नावे सांगितली गेली, पण माझ्या नाटकाच्या स्क्रिप्टवर मी जीवापाड मेहनत घेऊन ती जास्तीत जास्त दर्जेदार बनवली होती. प्रस्तावनेच्या सुरुवातीला गायत्री मंत्र वाजवला, त्यामुळे जणु थिएटर मध्येच नाटक बघतोय असं वातावरण तयार व्हायला मदत झाली. सगळे शिक्षक त्यावेळी उपस्थित होते, आणि मग पंकज भाऊने त्याच्या कडक आवाजात प्रस्तावना सादर केली, मग सुरु झाला आमच्या नाटकाचा पहिला प्रवेश..!
        फार्मसी कॉलेज मध्ये सकाळी काय वातवरण असतं हे त्यात दाखवतं होतो, अतुल त्याचे संवाद न चुकता म्हणतं होता, अनामिकाची एंट्री झाली त्यावेळी मुलं शिट्ट्या मारत होती. घाई-घाईत ती माईक आणायचं विसरली, अन त्यावेळी ती जणु दप्तरात काही तरी शोधते असं दाखवत होती, तितक्यात अमेयनं खालुन तिला माईक दिला, आणि इतक्या वेळ ती काय शोधतेय ते सगळ्यांना कळलं, तेव्हा मागुन बागुलचा आवाज आला, "घाबरु नका मॅडम होतं असं कधी कधी.." अन मुलंच काय पण शिक्षकही ह्सायला लागली. बाकीच्यांना मग हुरुप आला. शंतनुच्या एंट्रीला आमच्या वर्गातल्या मुली चिअर-अप करायला लागल्या.             जणु साऊथ इंडियन पिक्चर टाईप आमचं नाटक, ज्यात हिरोईनला फारसं काही महत्व नसतं, जे काही असतं ते हिरो अन विलनलाच. या नाटकात मी बॉडी बिल्डरचा रोल करत होतो, डिसेंबर मध्ये रिलिज झालेल्या अमिर खानच्या "गझनी" या चित्रपटाची अजुनही जादु चालत होती, मी पण अगदी त्याच्या सारखा हेयर-कट, अगदी त्याच्या सारखी वेषभुषा केली होती, त्याच्या सारखे आठ नाही पण त्यावेळी माझ्याकडेही सहा बिस्कीट(सिक्स पॅक ऍब्स) होतेच, पण समोर सर्व शिक्षक असतांना कशी काय बॉडी दाखवणार म्हणुन आम्ही नितीशच्या टी-शर्टचा वापर केला होता. ज्यावर काव्याचं नाव स्वत: मी माझ्या हाताने लिहिलं होतं. नाटक झाल्यानंतर कित्येक दिवस ते नाव नितीशच्या टि-शर्ट वर तसचं होतं, किती वेळा धुतलं तरी जात नव्हतं.
        आमच्या नाटकातला सगळ्यात गाजला तो स्टुडियस बॉयचा डायलॉग, जो नितीश अतुलला अवंतिकाला सांगण्यासाठी वापरायच्या ओळी सांगतो, त्याचा तो डायलॉग असा होता:- नितीश: "अरे अतुल ऐक, तिला सांग, की माझ्या heart मधल्या cardiac muscleच्या cell मधल्या mitochondriaच्या outer membraneच्या cristae वर असणार्‍या F-1 particle मधील proton pump मध्ये असणार्‍या ATPच्या 3rd phosphate groupची शप्पथ माझं तुझ्यावर खरचं जीवापाड प्रेम आहे..!" हे सर्व ऐकल्यावरं बंड्या(हितेशला बंड्या हे नाव दिलं होतं) ज्यावेळी पडला त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला होता. नाटकात लव्हगुरुच्या प्रवेशातही नित्याचा गावराण ठसका प्रेषकांची वाहवाह खेचण्यात यशस्वी झाला. अमेयनं त्याच्या लव्हगुरुच्या भुमिकेला पुर्ण न्याय दिला होता, त्याच्या प्रत्येक संवादावर मुलांपेक्षा मुलींची प्रतिक्रिया जास्त तीव्रतेनं यायचीच. माझ्या पहिल्या प्रवेशातील एंट्रीला आम्ही वळुंच थिम सॉंग दिलं होतं, त्यावेळी आमचे प्राचार्यं वाघ सरांना हसु थांबवनं जमलं नव्हतं, सर खुषीनं हसतं होते, आणि आम्हाला आमच्या कामाची कडक पावती तिथेच मिळतं होती. माझ्या दुसर्‍या एंट्रीच्या वेळी गझनी पिक्चर मधील "गुजारिश" हे गाणं वाजलं त्यावेळी मुलं "डोळे तुझे बदामी" असं ओरडत होती. या नाटकात मी सुद्धा शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला होतो, त्यामुळे बाकीचे जण त्यांची ओळख सांगतांना, मला कॉलेजचं आय-कार्ड दाखवणार हे ठरलं होतं.
        माझी दुसरी एंट्री झाली, बाकीच्यांनी त्यांचे आय कार्ड दाखवल्यावर मग मी अतुलला प्रश्न विचारतो, की त्याला लव्हगुरु कडे जाऊन काही फायदा झाला आहे का? त्यावर अतुल काही फायदा झाला नाही, उलट तुच श्रेया कुलकर्णीला कसं पटवलं तेच सांग असं तो म्हणतो. त्यावर मी आमिर खानने जशी विसरण्याची अदाकारी केली त्याप्रमाणे मी ही सादर केली, आणि खुर्चीवर डोक्याला हात लावुन बसलो. मग बंड्या म्हणतो, "यार याने इतक्या मुली पटवल्या असतील ना, त्यातली नक्की कोणती श्रेया तेच त्याला आठवत नसेल बघ..!" आणि यानंतर शंतनु म्हणतो, "अन त्याच्या डोक्यावर झालेली ती जखमेची खुण, त्या मुलींचं प्रेम विसरल्यामुळे त्यांनी चोपल्यावरच पडली असणार, म्हणुन बिचार्‍याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालायं" हा संवाद झाल्यानंतर तुफान टाळ्या वाजल्या होत्या.
        नुसते आमच्याच नाही तर अतुलच्याही संवादाला तितकीच सुंदर प्रतिक्रिया येतं होती. हितेश जेव्हा अतुलच्या खांद्यावर हात टाकुन मजा करायचा प्रयत्न करतो, त्यावेळी ज्या सफाईनं अतुलनं त्याचा हात बाजुला केला, आणि मग भाऊच्या बाजुला उभा राहिला, एकदम अप्रतिम होतं ते. आणि त्यानंतरही मग हितेशनं जवळच्या टेबलला वळसा घालुन त्याच्या खांद्यावर पुन्हा हात टाकला, त्यावेळी मुलचं काय पण शिक्षकही पोट धरुन हसतं होती, आणि इकडे आम्ही, "आयला हा पुर्ण कॅरेक्टर मध्ये घुसला बरं का..!" असं म्हणतं होतो. असो, आमच्या नाटकाला दिलेला पंधरा मिनिटांचा वेळ केव्हाच संपला होता, पण नाटक इतकं कडक होतं होतं की वेळेचं कुणालाही भानचं नव्हतं. आणि जेव्हा अतुल-अनामिकाचा शेवटचा संवाद झाला, ज्यात अतुल अनामिकाला तो तिच्यावर प्रेम करतो हे सांगण्यात यशस्वी होतो, आणि नाटक संपलं त्यावेळी प्रचंड टाळ्या, शिट्ट्यांचा आवाज थोरात हॉल मध्ये घुमला होता. C.P.N.च्या इतिहासात गॅदरिंगमध्ये पहिल्यांदाच एखाद्या नाटकाला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला, याआधी कधीच असं झालं नव्हतं असं सिनियर्स सांगत होते. शिवाय, "बॉस पुढच्या वर्षी या नाटकाचा पार्ट-२ झालाच पाहिजे बरं का..!", "डोळे तुझे बदामीवर इतकं प्रेम करतो, की तिच्यासाठी चक्क नाटकचं लिहुन टाकलं, मानलं यार..!" " गझनी..आय ऍम युवर फ्रेंड..पुढच्यावेळी आम्हालाही नाटकात रोल दे बरं का..!" "बदामी डोळ्यांची काय जादु आहे यार, गझनीने न विसरता सगळे डायलॉग्स बोलले.."  अशा अनेक प्रतिक्रिया मला येतं होत्या.
        त्या अर्ध्या तासाच्या नाटकाने आमच्या कॉलेजमधल्या जणु प्रेमनगरीचं दर्शन मी आणि माझ्या ग्रुपनं घडवलं होतं. नाटक जरी मी लिहिलं होतं पण नाटकाचा नायकाच्या भुमिकेत असलेल्या अतुलने त्याची भुमिका वाजवली होती. असो, आमच्या नाटकात कोणतेच वजनदार शब्द नव्हते, जे काही संवाद होते ते आमच्या कॉलेज लाईफशी निगडित होते, त्यामुळे ते बाकीच्यांना जवळचे वाटले होते, आणि इथेच आमच्या नाटकाच्या यशाचं गुपित दडलं होतं. नाटकात सर्वांत चांगलं काम कोणाचं होतं हा प्रश्न मला विचाराल तर मी फक्त हितेशचं नाव घेईल. सगळ्यांच काम चांगलं झालं होतं, पण आमच्या वर्गातल्या कोणत्याच मुलात तो "गे"चा रोल करण्यासाठी लागणारं हिम्मत नव्हती. पण हितेशने मात्र ते शिवधनुष्य लिलया पेलुन टाकलं होतं शंतनु, नितीश, उत्कर्ष, निलकंठ, अमेय आणि नितीन यांचही काम सर्वांना आवडलं होतं, सिनियर्स मध्ये जबरदस्त ओळखं असल्याने नुसतं मंचावर गेलो असतो तरी माझ्यासाठी टाळ्या पडल्या असत्या, पण ग्रुप मधल्या बाकीच्यांना त्यावेळी फारसं कोणी ओळखतं नव्हतं. अनोळखी अन नवख्या कलाकरासाठीही पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर सादरीकरण करनं सोप नसतच नाही का मित्रांनो. अनामिकाचा तर मी विशेष आभारी राहिल, तिची भुमिका जरी त्यावेळी छोटी असली, तरी त्यावेळी जर ती नसती तर आमचं, "प्रेमासाठी वाट्टेल ते" हे नाटक झालचं नसतं. आणि आज मला जी युवालेखक, युवानाटककार म्हणुन आमच्या कॉलेजमध्ये ओळख मिळाली ती कधी मिळालीच नसती. त्यामुळे मी माझ्या सर्व ग्रुपचा सदैव आभारी राहिल यात शंकाच नाही..!
        ह्या होत्या माझ्या पहिल्या नाटकाच्या आठवणी, किती दिवसांपासुन मनात तशाच लपवलेल्या होत्या, आज मनात लपवलेले शब्द पहिल्यांदा तुमच्यासमोर आणलेले आहेत, आशा करतो की तुम्हाला ही आठवण नक्की आवडली असेल. तुम्ही देखील तुमच्या कॉलेज जीवनाचा पुरेपुर आनंद लुटावा, कॉलेज लाईफ मध्ये घडलेल्या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घ्यावा, कारण यातुन मिळणारा आनंद हा परत कधी मिळत नाही, मित्रांसमवेत जास्तीत जास्त ऍंजॉय करायला यापेक्षा दुसरी चांगली वेळ नसते, इतरांकडुन खुप काही शिकायलाही मिळतं, आणि त्यातुनच आपल्याला स्वतःला आपलं व्यक्तीमत्व घडवायला खुप मदत मिळते. चला ही पोस्ट इथेच थांबवतो, कमेंट्स करायला विसरु नका आणि हो पुन्हा आपल्या भेटीला घेऊन येईल मनात लपवलेले शब्द, तोपर्यंत तुम्ही आयुष्याची मजा घ्या, आपल्या मनातही काही शब्द लपलेले असतील तर त्यांना वाट मोकळी करुन द्या..! या पोस्ट सोबत नाटकाची प्रॅक्टिस करतांना काढलेली काही खास क्षणचित्रांच कोलाज..!

No comments:

Post a Comment