सेकंड इयर तसं आम्हाला सर्वात मोठं वर्ष वाटलं, काही त्रास नाही, मजेशीर लेक्चर अन त्यांच्या जोडीला मिळणारे भरपुर ऑफ, स्पोर्ट्स वीक अन डेज ला मिळालेले जास्त दिवस, धनेश्वर सर ही सर्व ह्या सेकंड इयरची आमच्या हिशोबाने खास वैशिष्ट्ये होती, अन प्रेमाचा गुलाबी रंगही काहींना एकतर्फी अनुभवता आला. सेकंड इयरच्या सुरुवातीला आम्हाला कसलीच चिंता नव्हती. फस्ट इयरला फस्ट क्लास मिळवुन आमच्यातले बरेच जण आनंदी होते, सेकंड इयरला डिप्लोमा करुन आलेले बरेच मुलं होते, त्यात निलेश चौधरी, निखील दिवाकर, योगेश शिरोळे, अनुप छतवानी, रमेश गोरड, आसिर शेख, गीता लोंगाणी, श्रृती रुपनार यांचा समावेश होता. शिवाय आता आमच्या बॅचची सुद्धा बदल झाला होता, अमेय, हितेश, अतुल, अम्रिता आमच्या बॅच मध्ये आले, तर मोनाली, प्राजक्ता, लक्ष्मीकांत, देऊल, आणि मनोज ह्यांना बी बॅच मध्ये जावं लागणार होतं. तसं आमच्या बॅचला लोकलाईट्सची बॅच म्हणुनच ओळखतात, कारण ९५% लोकल असणारी मुले आमच्या ए बॅच मध्येच तर आहेत ना..!
सेकंड इयर तसं खासं स्मरणात राहणार आहे ते धनेश्वर सरांच्या कृपेमुळेच. फस्ट इयरच्या कुतुहुलपुर्ण लाईफला तडका सेकंड इयरला दिला तो धनेश्वर सरांनीच. धनेश्वर सर आम्हाला सेकंड इयर मध्ये फार्मास्युटिकल बायोकेमिस्ट्री आणि फार्मास्युटिकल ऍनालिसिस-१ हे दोन विषय अन त्याच विषयांचे प्रक्टिकल्स कंडक्ट करणार होते. जणु मुलांसाठी आंधळा-मागतो एक डोळा अन देव देतो दोन अशीच गत झाली. सिनयर्सचा वारसा चालवणं हे जणु त्यांच्या ज्युनियर्सचं काम, अन C.P.N. मधील जवळपास सगळ्या मुलांसाठी आद्यकर्तव्यच आहे असं सांगितलं तर ती अतिशयोक्ती मुळीच नाही बरं का मित्रांनो. C.P.N. मधील ९०% मुलांना त्यावेळी GATE & NIPER या दोन परिक्षा देण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करणं हे लक्ष दिलेलं आहे असंच नेहमी वाटायचं. एकतर C.P.N. ची ओळख त्याच्या करड्या शिस्तीमुळे अन सगळ्यात जास्त लेक्चर(सक्तीचे) होतात या गोष्टींमुळेच जास्त होते. मग त्यात GATE & NIPER साठी सुद्धा वेळ हवा की नको? म्हणुन कोणीतरी धनेश्वर सरांच्या लेक्चरला ऑफ मागितला असणार, अन त्यावेळी धनेश्वर सरांनी "Hey, you want OFF? Now take OFF for whole year. I will not going to teach you a single word of biochemistry, Enjoy OFF.!" असं चुकुनचं म्हंटल अन लेक्चर ऑफ दिलं असावं अन त्यादिवसापासुन सेकंड इयरला धनेश्वरसरांच्या लेक्चरला ऑफ मागायची प्रथाच जणु C.P.N. मध्ये सुरु झाली असं मला तरी वाटतयं. म्हणुनच सुरुवातीस सांगितलंना आंधळा-मागतो एक डोळा अन देव देतो दोन अशी गत मुलांची का होते ते..!
आमच्या वर्गातील मुलांना पण वर्षभर ऑफ काही मिळाला नाही. कारण आधीचे आमचे सिनियर्स ऑफ मिळवंण्यात पटाईतच झालेले होते, पण आमच्या वर्गाचं तसं नव्हतं ना. "लेकीन क्या बताऊं अब हाल दुसरा हे, वो साल दुसरा था, ये साल दुसरा हे।" असं बहुतेक मुलांना वाटायचं. त्याचं एक कारण म्हणजे अश्विन गुडसुरकर असं मुलांना वाटायचं कारण हा आमच्या माजी प्रभारी प्राचार्यांचा म्हणजेच गुडसुरकर सरांचा चिरंजीव, आमच्याच वर्गात होता, त्यामुळे मुलांनी कितीही ऑफ मागितला तरी सर एकतासाच्या लेक्चरमद्ये किमान ४०-४५ मिनिटे तरी आर्वजुन शिकवायचेच. तर दुसरं कारण म्हणजे मुलांच्या या ऊठावात सुरुवातीचे काही महीने मुलींचा सहभाग नव्हताच, त्यामुळे ऊठाव करत असलेल्यांचा बिमोड करणं सरांना सहजचं जमायचं. आता हे ऊठाव, बिमोड यांसारखे शब्द वापरले कारण केवळ ४०-४५ मुलांमधुन "ऑफ" ओरडणं म्हणजे दिव्यच होतं. एकदा का मुलांनी ऑफ ओरडलं की मग पुढचे पाच-दहा मिनिटे टाईमपास झालाच म्हणुन समजा.
"केलेच तुमचे सगळे genes express? सगळे कसे आता का अपराध्याप्रमाणे माना खाली घालतायं? सिनियर्स कडुन percolate झालेले genes ओळखतो मी..तुमच्यात gene regulator दिलाच नाही ना? जरा croud, mob, community यातनं बाहेर या. तुमच्यात गट्स असतील तर तोंडावर ऑफ मागा. इथं नुसते बेंचेस गरम करायला येतात, जड कुठले, एक-एकाचे चेहरे जणु क्रिमिनल फेसच!" असं सर मग मागे बसलेल्या मुलांना ओरडतं बसायचे. अन मुलांचा गुपचुप हसायचा दणका सुरुच असायचा.
तसं धनेश्वर सर चांगल बायोकेमिस्ट्री शिकवत होते, फक्त सर मुलांना सगळ्या गोष्टीचा सर्वांगाने विचार करायला लावतं अन ही गोष्ट सिनियर्स कडुन आलेल्या वैचारिक चौकटीत न बसणारी गोष्ट. त्यामुळे दर लेक्चरला ऑफची मागणी येणं सहाजिकच. वर्गातल्या जिच्याकडे/ज्याच्याकडे सेशनलचे पेपर तपासयला जाणार तो/ती सरांचा आवडता/आवडती विद्यार्थी हे समीकरण आम्हाला सिनियर्संनी सांगितलं होतं. त्यानुसात रोहिणी चव्हाण आमच्या वर्गातल्या मुला-मुलींपैकी भाग्यवंत म्हणावी अशीच. पण तिला तर कुठनं या वर्गात आले असंच वाटायचं.
एकदा P'ceutical Analysisचं प्रक्टिकलं सुरु होतं. रोहिणीला अमोनियम बफर तयार करायला लावलं. त्यानंतर सरांनी तिला चल एक थेंब तरी चाखुन बघ काय होतं ते असं सांगितलं अन त्यावेळी तिचा चेहरा बघुन मुलांना वाईट वाटु लागलं. कारण आमचीच सिनियर असलेली पुर्वा पाटील हिला देखील असाच टास्क सरांनी करायला लावला अन तिचं तोंड त्या बफर मुळे भाजलेलं, अन ही गोष्ट मुलांना माहिती होती, अन रोहिणीने काही तसला प्रकार केलाच नाही. आमच्या सेशनलच्या प्रक्टिकलाला तर मजाच यायची कारण मुलंच पेपर चेक करणार त्यामुळे आम्हाला काही टेंशन नसायचं, कारण आपला चांगला average होणार याची सर्वांना खात्री.
"Chavan, come here, draw the structure of cholesterol on the black board. You should also explain the metabolism of cholesterol to your classmates.." असं सरांनी रोहिणीला सांगितलं की वर्गात हशा पिकायचा, कारण किती जरी टाळाटाळ केली तरी सर तिला स्ट्रक्चर काढायलाच लावतं. मुलांचा कधी जास्तच गोंधळ झाला तर सर तिच्याकडे पाहुन म्हणायचे, "चव्हाण, ऐकुन घे, हे सगळे शिंग फुटलेले जनावरं आहेत. इंडस्ट्रित वर्कर व्हायच्या पण लायक नाहीत. यांना जरा एका वर्षाचं महत्व आता नाही वार्षिक परिक्षेला कळेल बघं..!" असं सर तिला सांगत असायचे. शिकवणं झालं की मग त्यांच्या नोट्सचा कागद अश्विन गुडसुरकरकडे देऊन टाकायचे.
यावर्षी आम्हाला P'-Ceutical engineering & Physical pharmacy हे नवे विषय अभ्यासक्रमात जोडले गेले होते. हे विषय शिकवण्यासाठी सौ. बेळे मॅडम यांची नियुक्ती केलेली होती. बेळे मॅडम जे शिकवतात त्याच्याकडे लक्ष द्या, त्यांचा सिलॅबस जरी शिकवुन पुर्ण होतं नसला तरी ते जितकं शिकवतात, जेवढं लिहुन देतात ते नीट काळजीपुर्वक लिहुन घ्या, कामाला येतं असं सिनियर्स आम्हाला सांगायचे. असंच रक्षाबंधनच्या दिवशी आमच्या वर्गात जेमतेम दहा-पंधराच मुलं उपस्थित होती अन एकही मुलगी त्यादिवशी आली नव्हती. त्यावेळी बेळे मॅडम आमच्या वर्गावर आल्या, वर्गात आल्या-आल्या मुलांना बोलल्या, "काय आज तुम्हाला राखी बांधायला कुणीच आलं नाही वाटतं..!" शब्दच खुंटले ना राव, असं मुलांना झालं अन मुलं दोन-तीन मिनिटे काहीच बोलली नाहीत. मग मॅडम आम्हाला त्यांच्या कॉलेज लाईफच्या आठवणी सांगु लागल्या.
बेळे मॅडम सुद्धा आमच्याच कॉलेजमधील माजी विध्यार्थीनी होत्या, त्यामुळे एका अर्थी त्या आमच्या सुपर सिनियरच होत्या. "आमच्यावेळी कॉलेजमधलं वातावरण फारच कडक होतं, कारण त्यावेळी प्राचार्य शेटे सर होते ना..! पण तरीही आमच्या बॅच मधल्या मुला-मुलींशी चांगला बॉंड जुळला होता. आम्ही कित्येक इंटर कॉलेज स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, ट्रिप काढायचो, स्पोर्टस वीकच्या दरम्यान त्यांच्या क्रिकेट टिमच्या मुलांची टि-शर्ट्स पेंट करायचो." अशा अनेक आठवणी त्या आम्हाला सांगत होत्या. त्यांच्या मते तर आमच्या वर्गात मुलांचा एक ग्रुप अन मुलींचा एक ग्रुप, जणु दोन इंटेरिक कोटेड टॅबलेटच जणु. त्यादिवशी मी त्यांना माझी "प्रेमाचा ताजमहाल" ही कविता वाचायला दिली होती. त्यावेळी त्यांनी ती आनंदाने वाचली होती, अन मला "शाळा" हे पुस्तक नक्की वाच असा सल्लासुद्धा दिला होता. बेळे मॅडमचं ते लेक्चर आम्ही कधीच विसरु शकत नाही.
मायक्रोबायोलॉजी हा विषय शिकवण्यासाठी आम्हाला सौ. फरांदे मॅडम होत्या. फरांदे मॅडम त्यावेळी नगरसेविका अन शिक्षिका या दोन्ही भुमिका उत्तम रितीने पार पाडत होत्या. त्याचं लेक्चर असलं की मुलांना बरं वाटायचं कारण, मॅडम उत्तम पद्धतीनं मायक्रोबायोलॉजी शिकवतं होत्या. शिकवतांना कधी-कधी त्यांना फळ्यावर एखादी आकृती काढावी लागे, ती कामगिरी त्यांनी मला देऊन टाकली होती. त्यामुळे जेव्हा केव्हा मला फळ्यावर आकृती काढायला बोलवतं, आमच्या वर्गातले बॅक बेंचर्स मला हळुहळु आकृती काढायला सांगत, सुरुवातीला मी पण दोन-चार वेळा तसं केलं होतं, पण हा प्रकार मॅडमला समजला तर मॅडम आपल्याला रागवतील या भितीने मग नंतर तसं करायचं मी टाळलं होतं. नगरसेविका असल्याने, शिकवतांना कधी कधी मॅडमला फोन यायच्या त्यामुळे त्या फोनवर त्या पाच-दहा मिनिट बोलतं असत, आणि बाकीच्यांना तेवढाच गप्पा मारायला वेळ..
पर्यावरणशास्त्र हा विषयासाठी डुंबरे सरांची नेमणुक केली होती. सरांनी प्रत्येकाला एक-एक टॉपिक देउन टाकला, अन त्यावर सेमिनार द्यायला लावला होता. आम्हा मुलांना, "काय सरांनी लचांड गळ्यात मारुन दिलयं, आयला मस्त फस्ट इयरला मिळाले तसे लेक्चर ऑफ मिळाले असते, एक सुखं मिळणार होतं त्यावरही डुंबरे सरांमुळे विरझण पडलं." अशी प्रतिक्रियेला नुसतं लेक्चरला ऑफ मिळणार नव्हता हेच कारण नव्हतं, तर आठवड्यातुन फक्त एकच लेक्चर या विषयासाठी होतं. त्यामुळे सर्वच मुलांना सेमिनार देता येणं शक्यच नव्हतं त्यामुळे ज्यांचे रोल नंबर सुरुवातीचे होते त्यांना सेमिनार द्यावाचं लागणार होता, आणि हा अन्याय आहे असं त्यांना वाटायचं, सहाजिक त्यात मी पण होतोच कारण आमची ए बॅच होती ना..!
P'-Ceutical chemistry-2 हा विषय आम्हाला संजय वाघ सरांपेक्षा चांगला दुसरं कोणी शिकवुच शकलं नसतं, त्यामुळे वाघ सरच आम्हाला तो विषय शिकवाणार होते. P'-Ceutical chemistry-2 हा सेकंड इयरला असलेला सर्वात अवघड विषय आहे असं आम्हाला वाटायचं कारण आम्हाला या विषयात heterocyclic chemistry आणि reaction mechanisms यांचा अभ्यास करायचा होता. P'-Ceutical analysis-1 हा विषय धनेश्वर सर शिकवणार होते. सरांचा भर प्रॉब्लेम्स शिकवण्यावर जास्त होता. आमच्या वर्गात मोहसीन काद्री ते पटापट सोडवत असायचा, त्यामुळे बाकीच्यांना सर काही ऊठवत नव्हते.
Physical pharmacy ह्या विषयाची थेरी पार्ट सोपा अन इंट्रेस्टिंग वाटायला लागला होता तो बेळे मॅडमच्या शिकवण्यामुळे, अन त्या नोट्स लिहुन देत असल्यामुळेच. पण ह्या विषयाचे प्रॅक्टिकल्स सगळ्यात रटाळ होते. गेल्या साडे-तीन वर्षात आम्हाला सगळ्यात बोरिंग प्रॅक्टिकल्स हे Physical pharmacyचेच वाटले होते. चार वर्षात केले नाही तेवढे ब्रेकेज आमच्या बॅचने ह्या प्रॅक्टिकलला केले होते. त्यात कॉमनवर लावलेले ब्रेकेजमुळे आप-आपसांत मुलं भांडायला लागायची, तर कधी कधी लॅब असिस्टंट शिंदेंना टार्गेट केलं जायचं. पण ते मुलांना पुरुन उरायचे त्यामुळे नाईलाजाने मग ते ब्रेकेज स्विकारवच लागायचं.
मायक्रोबायोलॉजीच्या प्रॅक्टिकलला मजा यायची कारण आमचा बराच वेळ ऑटोक्लेव्ह करण्यात जायचा, अन उरलेलं प्रॅक्टिकल फक्त पाच-दहा मिनिटांचं होतं. मुलं मग कधी कधी लॅब असिस्टंट बेंडकुळे सरांनी आणलेल्या मुंबई चौफेर या वर्तमानपत्रातील शब्दकोडी सोडवायचे त्यामुळे ते चिडुन जायचे. एकदा आमच्यापैकी कोणीच प्रॅक्टिकलला काडेपेटी आणली नव्हती, त्यात नित्यापण आला नव्हता, त्यामुळे पंचाईत झाली. फरांदे मॅडमला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्या चिडल्या आणि मग त्यांनी आम्हाला पुर्ण लॅबची साफ-सफाई करायला लावली. त्यांच्या मते मुलांना पैशाच्या रुपात फाईन भरायला लावणं म्हणजे त्यांच्या आई-वडीलांनाच फाईन भरायला लावण्यासारखं होतं. कारण त्यावेळी आमच्यापैकी कोणीच आजुन एक रुपयाही कमवणारं नव्हतं. फरांदे मॅडम सारखी विचारसरणी आमच्या कॉलेजनं अवलंबली असती तर फार बरं झालं असतं असं मुलांना वाटायला लागलं.
शेटे सर निवृत्त झाल्याने आमच्या कॉलेजच्या प्राचार्यपदी प्रभारी म्हणुन गुडसुरकर सरांची नियुक्ती केली होती. मुलांच्या हिशोबाने ती एकदम सार्थ निवड झाली होती. कारण गुडसुरकर सर हे इतके कडक नव्हते, पण त्यांना शिस्त कितपत असावी याची नक्कीच जाण होती. कॉलेजच्या मुलांना शिस्तीच्या नावाखाली नको ती बंधनं घालु नये या विचारांशी सर सहमत असलेच पाहिजे असं सर्व मुलं खात्रीनं सांगतील. ज्यादिवशी शेटे सर निवृत्त झाले त्याच्या दुसर्याच दिवशी कॉलेजमधल्या कित्येक मुली जिन्स घालुन आल्या होत्या, आणि मग ही गोष्ट कॉलेजच्या नॉन टिचींग स्टाफच्या लक्षात आली, आणि सहाजिकच मग इतर सरांच्या कानावर गेल्याशिवाय थोडीच ती गोष्ट राहणार होती. त्यादिवशी जिन्स घालुन आलेल्या मुलींना प्रत्येकी १००/-रुपये इतका फाईन भरावा लागला होता.
एकदा आमदार डॉ. वसंत पवार आमच्या कॉलेजमध्ये भेटीला आले, ते आमच्या वर्गातच बहुदा पहिले आले असावे, कारण आल्या-आल्या त्यांनी मुलांना कोणता गणवेश आहे ते विचारलं, आता आम्हाला काही कॉलेजने ठरवुन दिलेला गणवेश नव्हता, त्यामुळे त्यांनी लगेच यांना सक्तीचा गणवेश करा असं सांगितलं. नंतर त्यांनी, "यांच्याकडुन चांगला फाईन घेत जा, कॉलेजला मदत होईल.."असं जेव्हा आमच्यासमोर गुडसुरकर सरांना सांगितलं, त्यावेळी आम्हाला धक्काच बसला. "Politicians are like baby's dipers, need to change time to time for the same reason." वसंत पवारांच्या तोंडुन ते ऐकल्यावर मुलांची कुजबुज सुरु झाली होती, आणि ते हसत हसत तिथुन निघुन गेले होते. त्यादिवशी वसंत पवार, एक राजकारणी म्हणुन आम्हा फार्मसीच्या मुलांसमोर त्यांचा राजकारणी बाणा दाखवलाच होता. हा एक वाईट अनुभव आम्हाला आला होता.
सरकारी अनुदानित कॉलेज असल्याने येथे येणारे सगळे मुलं हे सरकारी कोट्यातुन येतात. मॅनेजमेंट कोट्यातुन येत नसल्याने मविप्रला आपल्या कॉलेजपासुन फार काही इंकम मिळत नाही, असं आम्हाला सिनियर्स सांगायचे. आमच्या कडुन जिमखान्याची फीस घेतली जायची, पण फक्त स्पोर्ट्स वीकलाच आम्हाला जिमखान्यात जायची परवानगी. अशा अनेक गोष्टी होत्या ज्या त्यादिवसानंतर आम्हाला खटकायला लागल्या, पण याविरुद्ध आवाज ऊठवला तर लगेच कॉलेज प्रशासनाच्या डोळ्यांत येणं अन सहाजिकच या गोष्टींचा मार्क्सशीटवर परिणाम होणं हे समीकरण ठरलेलं होतं, त्यामुळे सर्ब गप्प असायचे.
अवघड जागी दुखणं अन जावई वैद्द अशी आमची गत होती. आपल्या कॉलेजमध्ये सुधारणा करायला कितीतरी वाव आहे असं एखाद्या सरांना विश्वासात घेऊन सांगाव असं आम्हाला कित्येकदा वाटायचं पण सिनियर्स ह्या गोष्टी टाळायला लावत. आमच्या सिनियर्सचही बरोबरच होतं म्हणा, कारण कुठही गेलो तरी पळसाले पाने तीनच असणार. त्यामुळे इथे फक्त चांगलं शिकवलं जातं, आणि चांगली लायब्ररी आहे यागोष्टीमुळेच बाकीच्या बाबींकडे लक्ष न देणच योग्य आहे असं आम्हाला वाटायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आलेले सर्व मुलं हे त्यांच्या मेरिट मुळे आले आहे, आणि त्यांना स्वतःच सर्व गोष्टी करुन घ्यायची सवय लागलेली आहे. आमच्या कॉलेजमधले मुलं GATE/NIPER सारख्या स्पर्धा परिक्षांत चमकतात त्याला कारणीभुत हिच गोष्ट आहे.
थोड्याच दिवसांत मग आम्हाला कॉलेजकडुन कोणता गणवेश असावा यासाठी विध्यार्थ्यांची आणि दोन शिक्षकांची कमिटी नेमण्यात आली. आणि लवकरच मग आम्हाला पिच कलरचा शर्ट आणि काळी पॅंट असा गणवेश असेल असं सांगण्यात आलं. मुलींना डी.एड.च्या मुलींसारखी साडीच असु देणे असा सल्ला धनेश्वर सरांनी दिला होता, पण मुलींनी पण त्यांच्यासाठी शर्ट-पँट असावी ही मागणी पुर्ण करुनच घेतली, शेवटी मुलं-मुली असा भेदभाव किती दिवस करणार. कॉलेजला गणवेश असावा ही चांगलीच गोष्ट आहे, निदान हल्लीचे मॉडर्न कपड्यांवरुन तरी मला असं म्हणावसं वाटतं. कारण शेजारच्याच कॉलेजमध्ये आम्हाला रोज एकसे एक नग पहायला मिळतात. एखादाबारीक शिडशिडीत मुलगा त्याच तंग झबल्यासारखं शर्ट, जणु कमरेच्या खाली टांगलेली त्याची पेंसिल कट जिन्स, पायात पादुका, हातात रुद्राक्षांच्या माळा, गळ्यातही तशाच माळा, जोडीला बेनटेक्सचे चारपाच लॉकेट, डोळ्यांवर जत्रेतुन उचलुन आणला असावा असा चष्मा, छातीचा पिंजरा दिसत असला तरी कडक इस्तरी केल्याल्या शर्टाची उघडी ठेवलेली दोन-तीन बटणं, डोक्यावर केसांचा चांगला झाप वाढलेला, हाताशी बाईक नाहीतर सिगारेट अशी मुलं तुम्हाला K.T.H.M कॉलेजच्या कॅम्पसमध्ये नक्की आढळणारच.
होस्टेलाईट्सच्या मते गणवेश झाला ते बरचं झालं, कारण रोज कोणते ड्रेस घालायचे याची चिंता मिटणार होती, आणि दुसरी म्हणजे आठवड्यातुन कपडे धुवायचा ताण आणि बॉडी डिओ वर होणारा खर्च वाचणार होता. काहींना नवल वाटेल पण हीच वस्तुस्थिती होती. सगळ्यात वाईट तर एप्रॉनच नशीब असेल, कारण इतर कपडे तरी एखाद-दोन आठवड्यातुन धुतल्या जायचे, पण होस्टेलचे मुलं दोन-चार महिने तरी एप्रॉन धुवायची तसदी घेत नव्हते. असो, आम्हाला गणवेश झाला, त्यामुळे एक फायदा झाला की बस मधल्या अनोळखी लोकांना आम्ही कंपनी कामगार वाटायचो, आणि ते बसमध्ये मग अहो-काहो करुन बोलायचे.
आमची सेकड इयरची फ्रेशर्स पार्टी देखील मस्त झाली होती. सायखेडकर बाबा म्हणुन आमच्या कॉलेजमध्ये ज्याला ओळखायचे त्या निखील तांबडेचा डान्स, प्राजक्ताचं गाणं, फायनल इयरच्या शशीचं "हवा-हवा" हे गाणं, उत्कर्षचा डान्स, माझी कविता, आमच्या वर्गातल्या मोनाली आणि अनामिकाची लावणी असे एकसे एक परफॉर्मंस झाले होते. मृणमयी तपाडियाला मिस. फ्रेशर्स तर मि. फ्रेशर्स म्यानंवारला केलं होतं. नंतर डी.जे. वर मुलं वेड्यासारखी नाचत होती, त्यातही फायनल इयरचा सागर देवरे, थर्ड इयरचे प्रशांत कुरकुटे, मोहन चौधरी, आमच्या वर्गातला विशाल गुरव हे सगळ्यांच्या नजरेत भरतील असे नाचत सुटले होते. नंतर आमच्या वर्गातले मुलं एक-एकाची उचलबांगडी करुन दोन चार झोके देत होते, जो तसं करायला विरोध करायचा त्याला मग "पब्लिक पडी" बसायची, वाहत्या गंगेत सगळेच हात धुवुन घ्यायचे.
विशाल गुरव आणि जयदिप यादव या दोघांना मुलांनी लाथाबुक्क्यांचा चांगलाच प्रसाद उचलबांगडी करतांना दिला होता, कारण तसा हात साफ करायचा चान्स परत कधी मिळणार नव्हता. गुरुच्या उचलबांगडीच्या वेळी मात्र ट्रेजिडी झाली, कारण मुलं गुरुला उचलबांगडी करुन जोर-जोरात झोके देत होते, आणि अचानक जेव्हा त्याला वर झोका देऊन सोडलं त्याचवेळी कोणीतरी सिनियर ओरडला, झालं मुलांच लक्ष तिकडे वेधलं गेलं, आणि गुरु एकदम जमिनीवर धपकन आधळला. चांगली चार-पाच मिनिटं त्याच्या तोंडुन आ नाही का उ नाही. एकदम चिडीचुप होऊन तो सगळ्यांना पहात होता, मुलं त्याला उचलायचं सोडुन तो कसं काय पडला हे सांगत हसत होते, शेवटी तोच कसाबसा ऊठला, "आरे साल्यांनो, झोका देतांना आणि वर फेकतांना एवढे जण होते, नंतर झेलतांना एकानेही हात टाकला नाही? काय भुरटे पोरं आहात, इथं चांगलीच शेकली..!" असं गुरु म्हणत होता. गुरु असा आपटला त्यामुळे बाकीच्यांचा नंबर काही आलाच नाही.
सेशनलच्या प्रॅक्टिकल्सला विशेषतः धनेश्वर सरांच्या प्रॅक्टिकलला मजा यायची. सर जास्त वेळ व्हायवा मुलींचाच घ्यायचे, त्यामुळे आम्हाला एखादा प्रश्न विचारला का की सर पुढच्या रोल नंबरला हाक मारायचे. एकदा तर सरांनी व्हायवाच्या वेळी माझं नाव विचारलं आणि मग मला "गरुड" या पक्षाची माहिती सांगायला लावली. सगळी मुलं माझ्याकडे बघुन हसत होती, मलाही हसु येत होतं. त्यावर सर मला म्हणाले, "गरुड हसु नको, ऐकुन घे, आपल्याला आपल्या नावाचा अर्थ माहिती पाहिजे की नाही. आडनाव कशी ठेवली गेली हे सर्व माहिती असायला नको का?" सर असं बरच काही सांगत होते, आणि आता आम्हाला माहिती होतं की सर ज्या गोष्टी सांगतात ते शक्य असतं, पण त्यासाठी करायच्या नाहीत.
ऑरगॅनिक केमिस्ट्रीचे प्रॅक्टिक्ल्स आम्हाल बोरिंग वाटायचे, कारण एकतर तिथली स्वच्छता, खालच्या Animal House मधुन येणारा वास, ठिकठिकाणी गळणारे पाण्याचे नळ, खराब दर्जाचे केमिकल्स, आणि बसायला स्टुल्सची असलेली कमतरता ह्यामुळे इथं काम करनं म्हणजे चांगलीच परिक्षा असायची. लवकर जाऊन स्टुल पकडुन ठेवावा लागे, त्यातही मुलींनी स्टुल माघितला, मग त्यांना नकार देणंही जमत नव्हतं. मग सरतेशेवटी खालीच भारतीय बैठक मारायला होस्टेलच्या मुलांना आवडत असे. सिंथेसाईज केलेला प्रोडक्ट जर कधी आला नसला, तर मुलं डायरेक्ट ओरिजनल प्रोडक्टलाच रि-क्रिस्टलाईज करुन टाकायचे. जर ओरिजनल प्रोडक्ट नसलाच तर मग खडुची भुकटी, हळदी पावडर, अगरबत्तीचा अंगारा, माती असे पर्याय आमच्यासमोर असायचे. आजवर कोणत्याच सरांना असला झोल पकडता आला नव्हता.
यावेळी आम्हाला पॅथोफिजिओलॉजी हा विषयपण अभ्यासक्रमात जोडला गेला होता. तो शिकवायला आम्हाला सौ.डॉ. कुलकर्णी शिकवणार होत्या. त्यांनी आणि त्यांच्या पतीने हिमोफिलिया या आजाराने ग्रस्त लोकांसाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या हॉस्पिटल मधुन त्या वेळ काढुन आम्हाला शिकवायला येत. त्यांनी एकदा हिमोफिलियावर सेमिनार दिला होता, त्यावेळी हिमोफिलियाचे पेशंटचे फोटो बघुन अंगावर शहारे आले होते, खरचं त्यांच काम "सॅल्युट" करण्यासारखचं होतं.
बायोकेमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल्सला आम्हाला तीळाचं तेल, मोहरीचं तेल, खोबरेल तेल, आणि शेंगतेल यांची Acid value & Saponification value काढायची होती. सर लॅब मध्ये आले आणि त्यांनी रोहिणी चव्हाणला नेहमी प्रमाणे आवाज दिला, "चव्हाण, कम हियर, टेल मी द डेफिनेशन ऑफ सॅफोनिफिकेशन व्हॅल्यु? बारावीत झालेलं आहे चल सांग पटकन. यु शुड नॉट जस्ट स्पिक, यु हॅव टु एक्सप्लेन दिस टु युवर बॅचमेट्स." असं सरांनी तिला सांगितलं, मग नेहमी प्रमाणेच तिच्याचेहर्याचा रंग उडाला, आणि नाईलाजाने मग ती सर्व सांगत बसली. नंतर मग सरांनी तिला सांगितलं की, "चव्हाण ऐकुन घे, मी ऐकलयं की तुप आणि मध समप्रमाणात मिसळले की विष तयार होतं, आपल्या लॅबमध्ये तुपही आहे आणि मधही आहे, चल टेस्ट करुन बघते का?" रोहिणी सहाजिकच नाही म्हणनार होती हे सरांना माहितीच होतं, त्यामुळे सर लगेच, "आजकालच्या मुली मरायला फार घाबरतात." असा शेरा मारुन मोकळे झाले. रोहिणीला प्रत्येक प्रॅक्टिकला असल्या प्रकाराला सामोरं जावं लागत होतं, पण काय करणार शेवटी धनेश्वर सरांची आवडती विध्यार्थीनी होती ती. सेशनलचे बायोकेमिस्ट्रीचे पेपर तिच्याकडेच तर चेक करायला येणार होते, त्यामुळे बाकी मुलांचा "एका कानाने ऐकुन दुसर्या कानाने सोडुन देत जा", असा सल्ला असायचा. पण ज्याचं जळतं, त्यालाच कळतं अशी रोहिणीची त्यावेळी गत झाली होती. अशी सगळी मजा सेकंड इयरला येत असायची, आमच्या फस्ट इयरच्या चौकस लाईफला चांगलाच तडला सेकंड इयरला मिळाला होता. थोडक्यात काय तर एक कडक सुरुवात सेकंड इयरला झाली होती.
No comments:
Post a Comment