सेकंड इयरचं गॅदरिंग २० फेब्रुवारीला होतं, पण त्यावेळी आम्हाला कधी नव्हे ते चार दिवस डेज साजरे करण्यासाठी आणि चार दिवस स्पोर्ट्ससाठी मिळाले होते, त्यामुळे सर्व विध्यार्थीवर्ग आनंदित होता. पण यावेळी आमच्यावर्गासाठी तसा अविस्मरणीय असाच होता. यंदा थिम डेला दोनच थिम सादर झाल्या होत्या आणि त्याही आमच्याच वर्गाततुनच, एक होता माझा ग्रुप आणि दुसरा होता प्रसाद माळीचा. माळीच्या ग्रुपने, "थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली" यावर पथनाट्य सादर केलं. तर आमचा विषय होता, "वंशाची पणती" यात आम्ही मुलींच्या सातत्याने होत असलेल्या भ्रुणहत्येवर सादरीकरण केलं होतं, आणि जर मुलींची संख्या दिवसेंदिवस अशीच घटत गेली तर काय होईल, हे सुध्दा प्रखरतेने मांडण्यात यशस्वी झालो होतो. त्यामुळे आम्हाला "थिम डे" चा विजेता ग्रुप असं घोषित करण्यात आलं.
ज्या ज्या आऊटडोर स्पोर्ट्समध्ये आमच्या वर्गातील टिम्सने भाग घेतला त्यातील सर्वांच्या डोळ्यांच्या कडा यंदा पाणवल्या होत्या. आमची व्हॉलिबॉलच्या टिमने थर्ड इयरच्या टिमला साखळीफेरीत पराभवाची चव चाखवली होती, पण त्याच थर्ड इयरच्या टिम कडुन आमच्या टिमला फायनल मॅचमध्ये पराभव स्विकारावा लागला होता, अन तेही सव्वा-दोन तासांच्या कडव्या झुंजी नंतर. हातातली मॅच निसटली असं पाहताच आमच्या वर्गाच्या व्हॉलीबॉल टिमचा कॅप्टन स्वप्निल येवलेला अश्रु अनावर झाले, त्याला रडतांना पाहुन बाकीच्यांनाही त्यांचा अश्रुंचा बाध मग आवरता आला नाही.
आमच्या वर्गातल्या मुलींची क्रिकेट टिमही फायनल मॅचमध्ये होती, तर प्रतिस्पर्धी टिमही थर्ड इयरच्या मुलींची होती. समिना आणि तृप्ती ह्यांच्यावर थर्ड इयरची भिस्त, तर आमच्या वर्गाचा प्रिया कोठारी आणि प्रियंका कुलकर्णीवर दारोमदार होता. पहिली बॅटिंग थर्ड इयरच्या मुलींची होती, कधी नव्हे ते आज अपुर्वा कुलकर्णीने चांगली बॉलिंग टाकली आणि दुसर्याच ओवरमध्ये समिनाचा अडसर दुर केला, त्यावेळी आमच्या वर्गातील बाकीच्या मुलींकडुन, "तन की शक्ती, मन की शक्ती बोर्नव्हिटा" असं म्हणतं, जोरदार चिअरिंग झालं होतं, अन त्याच बरोबर खेळण्यातील शिट्ट्यांचाही आवाजानं सर्वांच लक्ष वेधुन घेतलं होतं. असो, पण नंतर बाकींच्यांची कामगिरी इतकी सरस झाली नव्हती, कारण आठ ओव्हर्स मध्ये थर्ड इयरच्या मुलींनी शंभरचा टप्पा ओलांडला होता, आणि जिंकण्यासाठी आता आमच्या वर्गातील मुलींना १०२ धावांची गरज होती.
प्रियंका आणि प्रिया यांच्या खेळीवरच सर्व अवलंबुन होतं, पण तृप्ती जांभळेच्या पहिल्याच चेंडुवर षटकार खेचण्याच्या नादात प्रिया कोठारी बाद झाली आणि तेही भोपळा न फोडताच, आणि मॅचचा निकाल तिथेच स्पष्ट झाला होता. इकडे थर्ड इयरच्या मुलांनीही चिअरिंग करायला सुरुवात केली, कारण ती मॅच बघायला बंकवीर नितीन बागुल उपस्थित झाला होता. त्याच्यासारखं खतरनाक अन नॉनस्टॉप चिअर-अप करतांना आजपर्यंत आमच्या कॉलेजमध्ये दुसर्या कोणाला बघितलं नव्हतं. सहाजिकच आमच्या वर्गातल्या मुलींची "तन की शक्ती, मन की शक्ती...!" कमजोर पडली होती. देऊलभाऊ कोल्हे तरी आमच्या वर्गातल्या मुलींसाठी चिअर-अप करतच होता, पण त्याला जेव्हा, "लेडिज कोच, गंदी सोच" असा टॉण्ट मारायला थर्ड इयरच्या मुलांनी सुरुवात केली, तेव्हा कुठे देऊल थोडा शांत झाला होता. यादरम्यान थर्ड इयच्या मुलींच्या बॉलिंग पुढे आमच्या मुलींचा निम्याहुनही जास्त संघ गारद झाला होता, अन ४३ धावांनी थर्ड इयरचा संघ विजयी झाला होता. चुकीचा फटका मारुन बाद झाल्याने प्रिया कोठारी रडायला लागली, तिला समजावतांना मग इतरही मुलींच्या डोळ्यांतनं आसवं वाहत होती.
आमच्या मुलांची ओव्हरआर्मची क्रिकेट टिमही यंदा थर्ड इयरच्याच मुलांकडुन पराभुत झाली होती अन तेही अगदी शेवटच्या चेंडुवर आणि एका विकेटने. आमच्या वर्गाची पहिली बॅटिंग होती, बारा ओव्हरमध्ये ७७ धावा आमच्या वर्गातल्या मुलांनी केल्या. थर्ड इयरच्या बागुलची चिअरिंग जोरात चालु होती, आणि यावेळी आमच्या वर्गातले मुलंच काय पण मुलीसुद्धा थर्ड इयरच्या चिअरिंगला सडेतोड उत्तर देत होत्या. शंतनुने त्याच्या दुसर्या ओव्हरमध्ये चक्क ८ डेड बॉल टाकले त्यावेळी त्याला "डेड्मॅन" असं थर्ड इयरचे मुलं चिडवायला लागले, पण पुढच्याच ओव्हरमध्ये त्याने अजय शिंदेला क्लिन बोल्ड करत थर्ड इयरची बोलतीच बंद केली. राहुल साठेची फिरकीनेही चांगलाच जलवा दाखवला होता, त्यानेही थर्ड इयरचे ४ फलंदाज अवघ्या १५ धावांत टिपले होते. जस-जशी मॅच पुढे सरकत गेली, तस-तशी आम्हा बघणार्यांची उस्तुकता शिगेला पोहचतं होती.
शेवटच्या ओव्हरला तर जणु एकदम भारत-पाकिस्तान मॅचसारखा फिल आला होता. थर्ड इयरचा संघ आजपर्य़ंत अपराजित होता, आज तो आमच्या वर्गाकडुन पराभुत होतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. शेवटच्या ओवरचा शेवटचा बॉल, थर्ड इयरला जिंकायला फक्त १ रनची गरज, आणि आम्हाला त्यांच्या शेवटच्या विकेटची असं चित्र त्यावेळी निर्माण झालं होतं. शेवटचा बॉल टाकताच थर्ड इयरचे दोघेही फलंदाज क्रिजवर पळाले, सुहासचा थ्रो चुकला आणि थर्ड इयरला तो रन मिळाला आणि त्यांनी विजयावर शिक्का मोर्तब केला, पुन्हा एकदा थर्ड इयर कडुनच आमच्या वर्गावर पराभुत होण्याची वेळ आली होती, त्यामुळे पुन्हा आमच्या वर्गातल्या मुलांना अश्रुंना वाट दाखवावी लागली.
या सगळ्या दरम्यान हितेशचा वाढदिवस आला, आमच्या गॅदरिंगच्या दोन दिवस आधी, त्यादिवशी आमच्या वर्गाची एकही मॅच नव्हती, तरी मुलं क्रिकेटची फायनल मॅच बघायला आली होती. मॅच थोडी उशीरा होणार होती, त्यामुळे आम्ही सर्व कॅंटिनकडे गेलो होतो, त्यादिवशी बाकीच्या कॉलेजला सुटी असल्याने कॅंटिनमध्ये चहा शिवाय दुसरं काहीच मिळणार नव्हतं, पण पहिल्यांदा वर्गातील सर्व मुलं-मुली एकत्र आले होते, त्यामुळे गप्पांना रंग आला होता. मोनाली जगतापने वर्गातलं मुलं कशी प्रवेश करतात याची उत्तम नक्कल करुन दाखवली. तर दुसरी कडे मयुरी कुलकर्णीने देखील आमच्या काही शिक्षकांची मिमिक्री सादर केली. बेळे मॅडमच्या मिमिक्रीला तर दोनदा वन्स मोर आला होता. असं सगळं रंगत असतांना हळुहळु मुलांच्या मनातल्या प्रेमभावना उचंबळुन आल्या होत्या.
अशातच शुभदा आली, तिला बघताच सतिष अग्रवाल असा काही खुष झाला होता, पण इकडे वैभव सुखाळकरला टेंशन आलं होतं. कारण सर्वांना ठाऊक होतं की वैभ्याला शुभदा आवडायची. ती आली आणि मुलं तिला वैभवच्या नावाने चिडवायला लागली, शुभदा उशीरा आल्याने या पुर्वी इथे काय झालं होतं हे तिच्या कळलंही नव्हतं अन अशातच मुलं तिला चिडवत असल्याचं पाहुन तीच्या सुमुखावरील भाव बदलायला लागले तोच मुलींनी मोर्चा सांभाळला, मुलींनी मग तिला सगळं थोडक्यात समजवल्यावर ती आणि वैभव मग समोरासमोर आले, सगळ्या वातावरणाला गंभीररुप प्राप्त झालं. पण वैभव काही जास्त बोललाच नाही, त्यामुळे आम्हा पोरांचा हिरमुड झाला. वैभव नंतर त्यादिवशीचा बर्थडे बॉयचा नंबर आला म्हणजेच हितेशचा..! हितेशला आमच्याच बॅच मधली ओवी आवडायची. तिचा वाढदिवसाच्या दिवशी याने स्व:खर्चाने तिच्यासाठी एक केक, कॅडबरी आणि येलो रोझ आणला होता. आम़च्या वर्गात सर्वप्रथम वाढदिवस साजरा झाला होता तो ओवीचाच, आणि त्यानंतर मग बाकीच्यांचेही वाढदिवस साजरे करायची जणु मग प्रथाच सुरु झाली. पण हितेशचा तो रोझ ओवीनेनं घेता हिनानेच घेऊन टाकला होता. कारण ओवीच्या आधी हिनाचा वाढदिवस साधारण दोन-तीन दिवसांपुर्वी झाला होता, आणि ती सुद्धा तिथे उपस्थित होती, त्यामुळे तिला वाईट वाटु नये म्हणु तिचा आणि ओवीचा कंबाइन वाढदिवस साजरा करायची कल्पना आमच्या बॅचच्या मुलींनी दिली, पण आमच्या भाईंच्या इतक्या मेहनतीला सुरंग लागुन गेला होता, त्यामुळे आम्ही त्याला चिडवत होतो.
हितेशचं झाल्यानंतर सहाजिक मुलींचा मोर्चा माझ्याकडे वळला, कारण याआधी मिळेल त्या ऑफ लेक्चरला मी वर्गात प्रेमकविता सादर करायचो, त्यामुळे कोणावर कविता केल्या याची उत्सुकता सर्वांना होती. त्यातच काही दिवसांपुर्वी वर्गात मी सहज बा.सी. मर्ढेकरांची,"डोळे तुझे बदामी" ही कविता वाचुन दाखवली होती, त्यामुळे बदामी डोळ्यांबाबत उत्सुकता होती, पण त्यावेळी मी उत्तर द्यायचं टाळलं होतं, आणि शिवाय,
"प्रेमकविता करण्यासाठी,
प्रेमात पडणं गरजेचं नसतं..
प्रेमाची फक्त जाणं असणं,
गड्या हेच क्वॉलिफिकेशन गरजेच असतं"
अशी चारोळी सुद्धा सांगितली होती. हे सगळं संपल नाही तोच सुशील साळवे हितेश साठी केक घेऊन आला होता, त्याने केक कापला, नंतर कॅंटिन मधल्या चहा-पार्टीची सांगता झाली. कॅंटिन मधले ते दोन तास आमच्या वर्गातला कोणी सुद्धा विसरु शकणार नाही. असो, पार्टी संपल्यानंतर मुलांनी हितेशला सांगितलं की ओवीला गार्डनिंग करायला आवडतं, आणि आज अनायसे संध्याकाळी कॉलेजमध्ये रोझ डे सादर होणार होता, त्या अनुशंघाने त्याने तिला एक गुलाबाच्या झाडाची कुंडी देण्याचा विचार केला. एकीकडे आमची सुध्दा तीच कविता गॅदरिंग मध्ये पुन्हा म्हणुन दाखवण्याची पैंज लागली, आणि त्या सोबत ती कविता कोणासाठी आहे ते सांगण्याची अट होती. हे सगळं झाल्यानंतर आम्ही ग्राऊंडवर गेलो.
फायनल इयर आणि थर्ड इयर यांच्यात क्रिकेटचा अंतिम सामना रंगला होता, आमच्या वर्गातील काही मुलं थर्ड इयरच्या तर काही फायनल इयरला सपोर्ट करत होती. पण थर्ड इयरला सपोर्ट करणारे जास्तच होते, कारण थर्ड इयरच्या चिअरिंगची खिंड बंकवीर, सम्राट बंकेश्वर नितीन बागुल भाई लढवत होते. आणि जोडीला सायखेडकर बाबा म्हणुन ओळखला जाणारा निखील तांबडेही होताच. त्यांचे एक्सक्लुजिव्ह कमेंट्स ऐकणं म्हणजे आमच्या कानांसाठी तर पर्वणीच होती. मैदानात काय खेळ चालतोय यापेक्षा नितीन बागुलची कॉमेंट्री ऐकण्यात मुलं धन्यता मानायची. अधुन मधुन मोहन चौधरी थोडफार स्लेजिंग करायचा प्रयत्न करायचा. थर्ड इयरने पहिली बॅटिंग करतांना ९३ धावा फटकावल्या होत्या, त्यात थर्ड इयरच्या सायमंडचे म्हणजे राजु कुलकर्णीचे दोन सिक्सरही होते.
फायनल इयरची सर्व दारोमदार त्यांच्या एकाच प्लेयरवर होती, तो म्हणजे स्ट्रगलर अविनाश गांगुर्डे. एकहाती सामना जिंकुन देण्याची ताकद त्याच्यात होती. त्यांच्या वर्गातले सर्व फलंदाजांच पाट्या टाकण्याचं काम चालु होतं त्यावेळी हा बंदा एकहाती त्यांना जिंकुन देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होता. अविनाश जोपर्यंत क्रिजवर आहे तोपर्यंत फायनल इयरची जिंकण्याची आशा जिवंत होती. पण थर्ड इयरच्या विक्रम कदमने शेवटी त्रिफळाचित करुन स्ट्रगलरचा फायनल स्ट्रगल संपवला तेव्हा आता थर्ड इयर सामना जिंकलाच हे निश्चित झालं. मग क्रिजवर स्वप्निल कापडणीस बॅटिंग करायला आला त्यावेळी मोहन चौधरीच्या स्लेजिंगला जणु उत आला, यामुळे बॅट आजुबाजुला फिरवत कापडणीस त्याच्याकडे गेला, त्यांना समजवण्यासाठी चेतन कुलकर्णी गेला, त्यामुळे कापडणीस त्याच्यावर चिडला आणि त्याने त्याच्यावर हात उगारला, मग चेतननेही त्याला दोन सॉलिड लगावले आणि यात त्याचा दात तुटला. चेतन कुलकर्णी चांगला धिप्पाड, मजबुत शरीरयष्टीचा गडी, तर कापडणीस त्याच्यासमोर एकदम चिल्लर होता, पण तो सिनियर होता. सिनियरवर हात उगारला म्हणुन फायनल इयरचे मुलं चिडुन गेली. मुलींसमोर मार खावा लागला यामुळे कापडणीस चिडला, त्याने घाई-घाईने जवळच्या मल्हारखानच्या झोपडपट्टीतले काही टपोरी मुलं बोलवली होती, दरम्यान चेतन कुलकर्णींनाला थर्ड इयरची मुलं घेऊन गेली होती. सामना थर्ड इयरने जिंकला आणि त्यांची फायनल मॅच जिंकायची हॅट्रिक पुर्ण करुन आमच्या कॉलेजच्या इतिहासात त्यांच नाव कोरुन टाकलं.
त्यादिवशी हितेशच्या बर्थडेची पार्टी बाकी होतीच ती पहिले उरकवणं हे जणु आद्यकर्तव्य, आणि ते पार पाडलं पाहिजेच यावर आमच्या ग्रुपचं एकमत झालं. फार्मसी कॉलेजमध्ये असतांना पहिल्यांदाच आम्ही नाईट आऊट केला होता. त्या पार्टीचा खर्च हितेश ६०% आणि आम्ही ४०% करणार होतो. मग अमेयच्या फ्लॅटवर आमची पार्टी रंगली होती. मुघल दरबार मध्ये जाऊन पंकज चिकन हंडी वैगेरे घेऊन आला होता. शंतनुलाही चिकन खायची किती दिवसांची सुप्त इच्छा आज पुर्ण झाली होती. आता शंतनु ब्राम्हण होता, पण तरी त्याला चांगलच चिकन तोडतांना पाहुन बाकीचे त्याला "भाऊ भ्रष्ट झाला रे", असं बाकीचे चिडवत होती. पण भाऊंचा तर चिकन फस्त करायचा दणका चालु होता. फॅनच्या हवेमुळे तंदुरी रोट्या इतक्या कडक झाल्या की आम्हाला चावायला त्रास होऊ लागला, त्यामुळे मुलांची जेवायची इच्छा गेली. आणि पुन्हा मग आम्ही नाटकाची प्रॅक्टिस करु लागलो. अन उरलेलं सर्व सकाळी खाता येईल या हिशोबाने ते सर्व फिज मध्ये टाकलं. पुढच्या दिवशी आमच्या नाटकाची स्क्रिनिंग होणार होती. आपलं नाटक सिलेक्ट होणार का याचं आम्हाला टेंशन होतं, पण बेळे मॅडमच तिथे असल्याने आमची चिंता मिटली. आमच्या नाटकाची स्क्रिप्ट आणि, "प्रेमासाठी वाट्टेल ते" असं नाटकाचं नाव बघताच मॅडम खुष झाल्या. आणि आमचं नाटक सिलेक्ट झालं होतं.
फायनल मॅचचा असा शेवट झाल्याने फायनल इयरने तातडीने बैठक बोलवली, थर्ड इयर कडुन त्यांना मिळणार्या फेयरवेल पार्टी बाबत त्यात निर्णय घेण्याचं ठरणार होतं, काहींनी तर साफ फेयरवेलवर बहिष्कार टाकायचा असं ठरवुन टाकलं, पण थर्ड इयरची क्लास रिप्रेझेंटेटिव्ह फायनल इयरच्या मुलांची माफी मागत होती, त्यामुळे काही मुलं फेयरवेल आणि गॅदरिंगला काही गालबोट लागु देणार नाही असं सांगत असतांना, कापडणीस चिडला, आणि जोश-जोश मध्ये येऊन आमच्या वर्गातला फळा एका बुक्कीत फोडुन टाकला, त्याचा हाताला जखम झाली, त्याला तिथुन नेण्यात आलं, शेवटी हो-नाही करता करता फेयरवेल पार्टीला जास्तीत जास्त जण उपस्थित राहतील असं फायनल इयरने ठरवलं, पण यादरम्यान थर्ड इयच्या सी.आर.ला चांगलच बोली-बच्चन ऐकावं लागलं होतं असं आम्हाला वाटलं, कारण बाहेर येऊन ती ढसाढसा रडत होती. असो, एकदाची फेयरवेल सुरु झाली.
नेहमी प्रमाणे यंदाही ट्रॅडिशनल डे, रोझ डे आणि चॉकलेट डे आणि वरुन फेयरवेल पार्टी असा योग जुळुन आला. थर्ड इयरला अन फायनला त्या फेयरवेल पार्टीत काही रस नव्हता, आम्ही मात्र रोझ आणि चॉकलेट डे केव्हा सादर होणार याची वाट पाहु लागलो. यंदाही, "बाप का पैसा, रोझ मे उडाया..", "....च्या पोटावर पाय", अशा आरोळ्या मुलं देतं होती, पण फस्ट इयरला आम्ही जी मजा अनुभवली होती त्यापेक्षा यंदा त्या पार्टीत काही स्पार्क नव्हता. फायनल इयरच्या सागर देवरेने नमिताला त्याच्याकडुन "इंटेन्स लव्ह" साठी असलेला बुके देऊन सगळ्यांना धक्काच देऊन टाकाला. काव्याला रोझ द्यायला गेलो, त्यावेळी मी तिला, "डोळे तुझे बदामी," ही कविता तुझ्यासाठी म्हंटली होती असं सांगुन टाकलं. आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी एखाद्या मुलीला मी सांगितलं होतं, ती सुध्दा रोझ घेऊन हसतच गेली. नंतर मला टेंशन यायला लागलं, कारण याचे परिणाम नंतर काय होतील हे कोणीच गेस करु शकत नव्हतं.
असो, त्यादिवशी हा किस्सा झाल्यानंतर, आमचा ग्रुप कॉलेजच्या बाहेर आला, ड्रामा करायचा की नाही यावर मुलं त्यावेळी चर्चा करु लागली, कारण मी सोडलो, तर त्यावेळी बाकीच्या कोणत्याच मुलानं स्टेजवर कधीच काही परफॉर्म केलं नव्हतं, त्यामुळे मुलं घाबरतं होती. आपली मेहनत वाया जाणार असं दिसताच माझ्याही डोळ्यात पाणी आलं, शेवटी रात्रभर प्रॅक्टिस तर करु या निष्कर्शावर आम्ही आलो. त्यावेळी पंकजने बाकीच्या ग्रुपला समजवलं आणि एका नव्या ऊमेदीनं मग त्या रात्री उरलेली सगळी मंडळी नाटकाची प्रॅक्टिस करत होती.
अखेर माझ्या आयुष्यातल्या अनेक सोनेरी दिवसांमधला एक असलेला तो दिवस उजाडलाच, २० फेब्रुवारी-२००९, सेकंड इयरला असतांना गॅदरिंगचा दिवस. अमेयच्या फ्लॅट्वर आंघोळीला गरम पाण्याची सोय नव्हती. मी गार पाण्याने आघोंळ केली, पण ऐन थंडीत गार पाण्याने आघोंळ करायला बाकी़चे मुलं तयार नव्हती, मग अमेयला सोडुन बाकी सर्व जण आम्ही थोरात हॉल कडे आलो, जिथे आमचं गॅदरिंग होणार होतं. तिथे नेमकी संपदा आम्हाला भेटली आमच्या ग्रुपच्या मुलांच अवसान बघुन ती हसायला लागली, पण त्यावेळी शंतनुने त्याचा हजरजवाबी पी.जे मारुन तिला शांत केलं. बाकीचे मुलं मग नित्याच्या रुमवर आंघोळीला निघुन गेली. गॅदरिंग सुरु होऊन साधारण एकतास झाला तेव्हा कळलं की आमचा ड्रामा जेवण झाल्यानंतर होणार आहे. पण माझी कविता सादरी करण लगेच काही मिनिटांत होतं.
त्यावेळ पर्यंत मी कविता करतो हे सर्वांना ठाऊक होतं, पण त्यादिवशी आजपर्यंत आमच्या कॉलेजच्या इतिहासत कधीच न घडणारी, आणि कुणी तशी करायची कल्पनाही न करु शकणारी गोष्ट करायचं मी ठरवलं. आयुष्यात जर मी कधी सगळ्यात जास्त हिंमत केव्हा दाखवली असं मला विचारलं तर मी या गॅदरिंगच्या दिवसाचाच उल्लेख करेल. कारण मी कविता सादर करायला आल्यानंतर, जेव्हा मी माझी नाही तर मर्ढेकरांची एक सुंदर कविता सादर करतोय आणि तेही "काव्या फक्त तुझ्यासाठीच..!" असं सगळ्या कॉलेजच्या मुला-मुलींसमोर सांगुन टाकलं होतं, आणि दोन-तीन मिनिटे त्या हॉलमध्ये मुलंच काय पण मुलीही चिडवत होत्या, सोबत कवितेच्या प्रत्येक ओळींनंतर टाळ्या पडल्या होत्या. हे सर्व झालं होतं, पण त्यावेळी काव्याच तिथे हजर नव्हती. पण ती जेव्हा आली त्यावेळी बाकीच्या मुलींनी तिला तो किस्सा सांगितला. इकडे सिनियर्स तर गोंधळुन गेले. कारण त्यांच्यामते मी तिला सर्वांसमोर जणु प्रपोज करुन टाकलं होतं. जो-तो मला खरचं काय भानगड आहे ते विचारु लागला, पण मी आमच्या नाटकाच्या प्रॅक्टिसला निघुन गेलो.
"आयला, आपल्या डायरेक्टरने जोश-जोश मध्ये येऊन सगळ्यात मोठा स्टंट देऊन टाकला ना यार..!" असं आमच्या ग्रुप मध्ये संवाद रंगु लागले, मग हळु हळु मला टेंशन यायला लागलं, काव्याने घरच्यांना बोलवलं किंवा एखाद्या सरांना सांगितलं किंवा तिचा एखादा भाऊ असला आणि तिने त्याला बोलवलं तर आपली तर चांगलीच लागली, कारण जे काही केलं ते जगजाहीर केलं होतं, याचा विचार करता करता आता माझ्या हिम्मतची बारा वाजले. माझ्या केविलवाण्या अवस्थेकडे बघुन मग मुलं, "प्यार किया तो डरना क्या", असं म्हणतं होते. पण मी कोणाला घाबरत नाही याचा आव आणत होतो, पण मुलं ते मान्यच करत नव्हती, त्यामुळे नाटकात वापरणार त्या टि-शर्टवर मग मीच, ओल्या खडुने पुन्हा, "काव्या फक्त तुझ्यासाठीच..!" असं लिहुन टाकलं. तेव्हा कुठे माझ्या ग्रुपची मुलं थोडी शांत झाली. पण ज्यावेळी आमची जेवणाची वेळ झाली, त्यावेळी अन्नाचा एक घासही माझ्या घशाखाली उतरेनासा झाला, डोक्यात फक्त काव्याचाच विचार घुमत होता, माझी ती दयनीय स्थिती बघुन मुलांचे जोक्स रंगत होते, पण मी त्यांना "अरे पहिल्यांदा आपला ग्रुप नाटक सादर करतोय, आपल्या नाटकाची इतकी पब्लिसिटी झाली आणि आता कसं होणार याचं टेंशन आलयं असं पटवत होतो."
जेवणं आटपल्यावर आमचा पुर्ण ग्रुप मग थोरात हॉलमध्ये आला, अनामिकालाही आता टेंशन येतं होतं, कारण थर्ड इयरचे मुलांनी आधी ड्रामा झालेल्या मुलांची फार ऊडवली होती. आपल्या ड्रामाला काही तसं होणार नाही, तुझ्या रोल वरुन तुला कोणी नंतर चिडवलं तर मी बघुन घेईल, मारामारी करायची वेळ आली तर भरपुर बॅकिंग आहे असं सगळं समजावत मग कुठे तिला जरा धीर आला. आणि मग सुरुवात झाली ती आमच्या नाटकाला, तीही जणु काव्या फक्त तुझ्यासाठीच या आवेषातच. आमच्या आधी प्रसाद माळीचा जनजागृती हे नाटक झालं होतं, नाटकाला प्रस्तावनेचा काही पत्ता नव्हता, फक्त कलाकारांची नावे सांगितली गेली, पण माझ्या नाटकाच्या स्क्रिप्टवर मी जीवापाड मेहनत घेऊन ती जास्तीत जास्त दर्जेदार बनवली होती. प्रस्तावनेच्या सुरुवातीला गायत्री मंत्र वाजवला, त्यामुळे जणु थिएटर मध्येच नाटक बघतोय असं वातावरण तयार व्हायला मदत झाली.
सगळे शिक्षक त्यावेळी उपस्थित होते, आणि मग पंकज भाऊने त्याच्या कडक आवाजात प्रस्तावना सादर केली, मग सुरु झाला आमच्या नाटकाचा पहिला प्रवेश..! फार्मसी कॉलेज मध्ये सकाळी काय वातवरण असतं हे त्यात दाखवतं होतो, अतुल त्याचे संवाद न चुकता म्हणतं होता, अनामिकाची एंट्री झाली त्यावेळी मुलं शिट्ट्या मारत होती. घाई-घाईत ती माईक आणायचं विसरली, अन त्यावेळी ती जणु दप्तरात काही तरी शोधते असं दाखवत होती, तितक्यात अमेयनं खालुन तिला माईक दिला, आणि इतक्या वेळ ती काय शोधतेय ते सगळ्यांना कळलं, तेव्हा मागुन बागुलचा आवाज आला, "घाबरु नका मॅडम होतं असं कधी कधी..!" अन सगळी ह्सायला लागली. बाकीच्यांना मग हुरुप आला. शंतनुच्या एंट्रीला आमच्या वर्गातल्या मुली चिअर-अप करायला लागल्या, त्यातही मयुरी कुलकर्णीचा आवाज सगळ्य़ांना समजेल इतका होता.
नाटकात अतुल फार्मसी कॉलेजमधला सामान्य मुलगा होता, ज्याचं अवंतिका म्हणजे अनामिकावर प्रेम होतं. त्याचं हेच प्रेम व्यक्त करायची धरपकड आम्ही नाटकात दाखवली होती. त्याचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याचे मित्र त्याला काय सल्ले देतात, लव्हगुरु त्याला कशी मदत करणार असतो, आणि त्यात काय गंमत होते ते आम्ही सादर करणार होतो. यात हितेशला अतुलचा शुभचिंतक मित्र ( हितेशला दोस्ताना आयटम केलं होतं), नितीशला स्टुडियस बॉयचा, मी स्वत: बॉडी-बिल्डर, शंतनु त्याच्या सार्वजनिक भाऊच्या, अमेय लव्हगुरुच्या, नितीन त्या लव्हगुरुच्या असिस्टंटच्या भुमिकेत होते. जी.आर.इ. स्टुडंट म्हणुन निलकंठला तयार केलं होतं. तर डान्सरचा रोल उत्कर्ष करणार होता. रोहिणी चव्हाण, हिना जाधव आणि वर्षा जाधव यांना अनामिकच्या मैत्रिणींची भुमिका पार पाडायची होती. त्यातही हिना आणि वर्षा या दोघींना केवळ एक-एक शब्दच म्हणायचा होता.
जणु साऊथ इंडियन पिक्चर टाईप आमचं नाटक, ज्यात हिरोईनला फारसं काही महत्व नसतं, जे काही असतं ते हिरो अन विलनलाच. या नाटकात मी बॉडी बिल्डरचा रोल करत होतो, डिसेंबर मध्ये रिलिज झालेल्या अमिर खानच्या "गझनी" या चित्रपटाची अजुनही जादु चालत होती, मी पण अगदी त्याच्या सारखा हेयर-कट, अगदी त्याच्या सारखी वेषभुषा केली होती, त्याच्या सारखे आठ नाही पण त्यावेळी माझ्याकडेही सहा बिस्कीट (सिक्स पॅक ऍब्स) होतेच, पण समोर सर्व शिक्षक असतांना कशी काय बॉडी दाखवणार म्हणुन आम्ही नितीशच्या टी-शर्टचा वापर केला होता. ज्यावर काव्याचं नाव स्वत: मी माझ्या हाताने लिहिलं होतं. नाटक झाल्यानंतर कित्येक दिवस ते नाव नितीशच्या टि-शर्ट वर तसचं होतं, किती वेळा धुतलं तरी जात नव्हतं. त्या दिवसा नंतर कॉलेजमधली सिनियर्स, आणि बाकीची मुलं काव्या या नावाने कमी, पण "डोळे तुझे बदामी" असंच तिला जास्त ओळखतात.
आमच्या नाटकातला सगळ्यात गाजला तो स्टुडियस बॉयचा डायलॉग, जो नितीश अतुलला अवंतिकाला सांगण्यासाठी वापरायच्या ओळी सांगतो, त्याचा तो डायलॉग असा होता:- नितीश: "अरे अतुल ऐक, तिला सांग, की माझ्या heart मधल्या cardiac muscleच्या cell मधल्या mitochondriaच्या outer membraneच्या cristae वर असणार्या F-1 particle मधील proton pump मध्ये असणार्या ATPच्या 3rd phosphate groupची शप्पथ माझं तुझ्यावर खरचं जीवापाड प्रेम आहे..!" हे सर्व ऐकल्यावरं बंड्या (हितेशला बंड्या हे नाव दिलं होतं) ज्यावेळी पडला त्यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला होता. नाटकात लव्हगुरुच्या प्रवेशातही नित्याचा गावराण ठसका प्रेषकांची वाहवाह खेचण्यात यशस्वी झाला.
अमेयनं त्याच्या लव्हगुरुच्या भुमिकेला पुर्ण न्याय दिला होता, त्याच्या संवादावर मुलांपेक्षा मुलींची प्रतिक्रिया जास्त आवेशानं यायचीच. माझ्या पहिल्या प्रवेशातील एंट्रीला आम्ही वळुंच थिम सॉंग दिलं होतं, त्यावेळी आमचे प्राचार्यं वाघ सरांना हसु थांबवनं जमलं नव्हतं, सर खुषीनं हसतं होते, आणि आम्हाला आमच्या कामाची कडक पावती तिथेच मिळतं होती. अमेयची असिस्टंटचा रोल आम्हाला माधवी खैरनारला द्यायचा होता, पण शेवटी आम्ही नितीनलाच देण्याचं ठरवलं. माझ्या पुढच्या एंट्रीच्या वेळी गझनी पिक्चर मधील "गुजारिश" हे गाणं वाजलं त्यावेळी मुलं "डोळे तुझे बदामी" असं ओरडत होती. या नाटकात मी सुद्धा शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला होतो, त्यामुळे बाकीचे जण त्यांची ओळख सांगतांना, मला कॉलेजचं आय-कार्ड दाखवणार हे ठरलं होतं.
माझी दुसरी एंट्री झाली, बाकीच्यांनी त्यांचे आय कार्ड दाखवल्यावर मग मी अतुलला प्रश्न विचारतो, की त्याला लव्हगुरु कडे जाऊन काही फायदा झाला आहे का? त्यावर अतुल काही फायदा झाला नाही, उलट तुच श्रेया कुलकर्णीला कसं पटवलं तेच सांग असं तो म्हणतो. त्यावर मी आमिर खानने जशी विसरण्याची अदाकारी केली त्याप्रमाणे मी ही सादर केली, आणि खुर्चीवर डोक्याला हात लावुन बसलो. मग बंड्या म्हणतो, "यार याने इतक्या मुली पटवल्या असतील ना, त्यातली नक्की कोणती श्रेया तेच त्याला आठवत नसेल बघ..!" आणि यानंतर शंतनु म्हणतो, "अन त्याच्या डोक्यावर झालेली ती जखमेची खुण, त्या मुलींचं प्रेम विसरल्यामुळे त्यांनी चोपल्यावरच पडली असणार, म्हणुन बिचार्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालायं" हा संवाद झाल्यानंतर तुफान टाळ्या वाजल्या होत्या.
नुसते आमच्याच नाही तर अतुलच्याही संवादाला तितकीच सुंदर प्रतिक्रिया येतं होती. हितेश जेव्हा अतुलच्या खांद्यावर हात टाकुन मजा करायचा प्रयत्न करतो, त्यावेळी ज्या सफाईनं अतुलनं त्याचा हात बाजुला केला, आणि मग भाऊच्या बाजुला उभा राहिला, एकदम अप्रतिम होतं ते. आणि त्यानंतरही मग हितेशनं जवळच्या टेबलला वळसा घालुन त्याच्या खांद्यावर पुन्हा हात टाकला, त्यावेळी मुलचं काय पण शिक्षकही पोट धरुन हसतं होती, आणि इकडे आम्ही, "आयला हा पुर्ण कॅरेक्टर मध्ये घुसला बरं का..!" असं म्हणतं होतो. असो, आमच्या नाटकाला दिलेला पंधरा मिनिटांचा वेळ केव्हाच संपला होता, पण नाटक इतकं कडक होतं होतं की वेळेचं कुणालाही भानचं नव्हतं.
आणि जेव्हा अतुल-अनामिकाचा शेवटचा संवाद झाला, ज्यात अतुल अनामिकाला तो तिच्यावर प्रेम करतो हे सांगण्यात यशस्वी होतो, आणि नाटक संपलं त्यावेळी प्रचंड टाळ्या, शिट्ट्यांचा आवाज थोरात हॉल मध्ये घुमला होता. C.P.N.च्या इतिहासात गॅदरिंगमध्ये पहिल्यांदाच एखाद्या नाटकाला इतका जबरदस्त प्रतिसाद मिळाला, याआधी कधीच असं झालं नव्हतं असं सिनियर्स सांगत होते. शिवाय, "बॉस पुढच्या वर्षी या नाटकाचा पार्ट-२ झालाच पाहिजे बरं का..!", "डोळे तुझे बदामीवर इतकं प्रेम करतो, की तिच्यासाठी चक्क नाटकचं लिहुन टाकलं, मानलं यार..!" "गझनी..आय ऍम युवर फ्रेंड..पुढच्यावेळी आम्हालाही नाटकात रोल दे बरं का..!" "बदामी डोळ्यांची काय जादु आहे यार, गझनीने न विसरता सगळे डायलॉग्स बोलले..!" अशा अनेक प्रतिक्रिया मला येतं होत्या. त्या अर्ध्या तासाच्या नाटकाने माझ्या आयुष्याला एक कलाटणी देऊन टाकली. आमच्या फार्मसीची जणु प्रेमनगरीचं दर्शन मी आणि माझ्या ग्रुपनं घडवलं होतं. नाटक जरी मी लिहिलं होतं पण हिरोंच म्हणुन अतुलला करायचं होतं, पण त्याने त्याची भुमिका वाजवली होती. अतुल जे संवाद म्हणत होता, ते सर्व माझ्या काळजातले शब्द होते, त्या सर्व माझ्या भावना होत्या. आणि त्या तितक्याच प्रखरतेनं अतुलने मांडल्या होत्या.
अतुलच्या, "मनात माजलेल्या या भितीच्या दाट अंधाराला, माझ्या प्रेमाच्या तलवारीनं, ज्याला आता माझ्या अस्तित्वाची धार आहे, त्यानेच ह्या अंधाराला कापुन ज्याप्रमाणे उजेडाचा सडा पडेल त्याच प्रकाशांच्या आशावादी किरणांसारखं आज तिला सांगावसं वाटतं, की अवंतिका माझं तुझ्यावर प्रेम आहे" असं म्हंटल्यावर अतुल मागे वळतो, आणि समोर अवंतिका (अनामिका) उभी असते, एकदम अप्रतिम होतं ते, उपस्थितांना जाणवणं फिल माय लव्ह..! असो, आमच्या नाटकात कोणतेच वजनदार शब्द नव्हते, जे काही संवाद होते ते आमच्या कॉलेज लाईफशी निगडित होते, त्यामुळे ते बाकीच्यांना जवळचे वाटले होते, आणि इथेच आमच्या नाटकाच्या यशाचं गुपित दडलं होतं.
नाटकात सर्वांत चांगलं काम कोणाचं होतं हा प्रश्न मला विचाराल तर मी फक्त हितेशचं नाव घेईल. सगळ्यांच काम चांगलं झालं होतं, पण हितेशला जो रोल मिळाला होता, तो रोल करायचं धाडसं त्यावेळी माझ्याकडेही नव्हतं. आमच्या वर्गातला कोणत्याच मुलात तो "गे"चा रोल करण्यासाठी लागणारं जिगर नव्हतं, आमच्या फार्मसीच्या शब्दांत सांगायचं तर, तो रोल करण्यासाठी कोणाच्याच "जी मध्ये डी" नव्हता. पण हितेशने मात्र ते अवघड काम करुन टाकलं होतं. शंतनु, नितीश यांचही काम सर्वांना आवडलं होतं, सिनियर्स मध्ये जबरदस्त ओळखं असल्याने नुसतं मंचावर गेलो असतो तरी माझ्यासाठी टाळ्या पडल्या असत्या, पण हितेश, अतुल, नितीश, यांना त्यावेळी फारसं कोणी ओळखतं नव्हतं. अनोळखी अन नवख्या कलाकरासाठी कमी जरी असले तरी प्रेक्षकांसमोर सादरीकरण करनं सोप नसतच नाही का मित्रांनो.
अनामिकाचा तर मी विशेष आभारी राहिल, कारण त्यावेळी आम्ही नाटकात प्रेयसी मुलगीची भुमिका करण्यासाठी वर्गातल्या मुलींना विचारलं होतं, त्यावेळी कोणीच तयार नव्हतं. घरचे काय म्हणतील, कॉलेज मध्ये मुलं चिडवतील, अशा एक ना अनेक सबबी त्यांनी पुढे केल्या. गॅदरिंग मध्ये डान्स केलेला घरच्यांना चालतो, मग नाटकात काम करण्याला घरच्यांचा विरोध कसं काय हेच आमच्या ग्रुपला त्यावेळी कळतं नव्हतं. त्या परिस्थितीत आम्ही नाटक न करण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यावेळी अनामिका आमच्या नाटकात काम करण्यासाठी तयार झाली होती. तिची भुमिका जरी त्यावेळी छोटी असली, तरी त्यावेळी जर ती नसती तर आमचं, "प्रेमासाठी वाट्टेल ते" हे नाटक झालचं नसतं. आणि आज मला जी युवालेखक, युवानाटककार म्हणुन आमच्या कॉलेजमध्ये ओळख आहे ती कधी मिळालीच नसती. त्यामुळे मी माझ्या सर्व ग्रुपचा सदैव आभारी राहिल यात शंकाच नाही..!
No comments:
Post a Comment